Skip to main content

Pariksharthi ki dnyanarthi-परीक्षार्थी ते ज्ञानार्थी

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १९१
विषय क्रमांक : ४
विषय : परीक्षार्थी ते ज्ञानार्थी
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :

प्रत्येक मानव मग तो पुरुष असो किंवा स्त्री जन्मल्यानंतर  शिक्षित होण्यासाठी विद्यार्थी दशेतून जाणारच असतो. माणूस जेव्हा विद्यार्थी बनतो तेव्हा त्याची ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया चालू होते. त्याने आत्मसात केलेले ज्ञान किती योग्य आहे किंवा त्याला ज्ञानाची किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची परीक्षा घेणे जरुरीचे आहे. त्यामुळे माणसाचे वेगळ्याप्रकारचे व्यक्तिमत्व तयार होते आणि त्याने आत्मसात केलेले ज्ञान अधिक सक्षम होऊन त्याचा फायदा सर्व समाजाला होत असतो. म्हणूनच या आठवड्याचा विषय परीक्षार्थी ते ज्ञानार्थी फार महत्वाचा आहे असे मला वाटते. त्यासाठी परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी यांच्यातील मुख्य फरक जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसे बघायला गेलं तर विद्यार्थी आणि परीक्षा यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण विद्यार्थी शाळेत जाऊ लागतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देणे जरुरीचे होते. त्यामुळे त्याला प्राप्त झालेले ज्ञान परीक्षेमुळे अधिक मजबूत होते असे मानले जाते. पण हे झाले केवळ अर्धसत्य. तसे पाहावयास गेलं तर विद्यार्थी हा फक्त परीक्षा देणारा असूच शकत नाही. आयुष्याच्या शेवट पर्यंत तो विद्यार्थी असू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत त्याला नवीन ज्ञान आत्मसात करावे लागते तरच तो नवीन गोष्टींची  निर्मिती करू शकतो. प्रत्येक माणसाला खासकरून उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांना असे वाटते की आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले. त्यात कुठे चूक आहे असे मला वाटत नाही पण शिक्षणाचे एक महत्व आहे. शिक्षणाबरोबर माणसाच्या नैतिक आचरणात सुद्धा बदल दिसायला पाहिजे. त्याचे नैतिक आचरण सुधारले गेले पाहिजे आणि त्याने आत्मसात केलेले ज्ञान समाज सुधारण्यासाठी झाले पाहिजे. अन्यथा ते शिक्षण हे फक्त परीक्षार्थी असल्याचे दिसेल. इथे मला भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणासंबंधीचे विचार आठवतात. डॉक्टर म्हणतात, " मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे. कारण कोणत्याही समाजाची उन्नती या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे". असे सांगून डॉ. आंबेडकर पुढे सांगतात, " आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ परीक्षा पास करण्यासाठीच करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा, प्रगती करण्यासाठी केला पाहिजे ; तरच समाज उन्नतावस्थेला जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन जनतेचे अज्ञान व खुळ्या समजूती दूर केल्या पाहिजे". डॉ. आंबेडकरांच्या या विधानावरून असे वाटते की डॉक्टर प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होण्यास सांगत आहेत.

आज आपण पाहतो की जवळजवळ सर्वच मुले शाळेत विद्यार्थी बनून जात असतात. पण शिकत असताना त्यांना परीक्षा द्यावीच लागणार. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आपण हुशार आहे हे सिद्ध करण्यासाठी परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. यासाठी कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही. इथे एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे आजच्या समाजाने शिक्षणाला स्पर्धात्मक रूप दिले आहे. त्यामुळे परीक्षेत उत्तम गुण मिळविणे म्हणजेच मुले हुशार आहेत असा समज सर्वत्र पसरू लागला. मुलांचे आईवडील आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करताना दिसतात; पण तसे करताना त्यांचा एकच विचार असतो तो म्हणजे परीक्षेत उत्तम गुण आपल्या मुलांना मिळाले पाहिजे. चांगले गुण मिळाले तर आपल्या मुलांना समाजात हुशार असल्याचा दर्जा मिळणार असे त्यांना वाटत असते. त्यासाठी ते आपल्या मुलांना शाळेशिवाय वेगवेगळ्या खाजगी क्लासेसना पाठवीत असतात. तसे केल्यामुळे मुलांना चांगले गुण परीक्षेत मिळतात अशी त्यांची समजूत असते. त्या क्लासेस मध्ये जाऊन मुलांनी किती ज्ञान मिळवीले याची कुठेही नोंद उपलब्ध असल्याचे दिसत नाही. अमुक क्लासला गेल्यामुळे आपल्या मुलाला चांगले गुण मिळाले असेच ते समजतात. त्यामुळे त्या खाजगी क्लासेसला नकळत प्रसिद्धी मिळते. पूर्वी असे क्लासेस साधारणता दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी असत. आता तर पहिली दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांनासुद्धा खाजगी शिकवणी लावली जाते. त्यात मुलांचे बालपण संपताना दिसत आहे. मैदानी खेळ तर त्यांच्या जीवनातून पूर्णपणे दूर गेल्याचे दिसत आहे. हल्लीच मी एका मुलाच्या आईवडिलांना खेळ म्हणजे फक्त वेळ वाया घालविणे त्यापेक्षा मुलांनी खाजगी शिकवणी करून परीक्षेत चांगले गुण मिळवावे जेणेकरून त्याचा उपयोग या मुलांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत होईल असे म्हणताना ऐकले होते. खेळसुद्धा मुलांना चांगल्या गोष्टी देऊ शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आता तर दहावी बारावीला चांगले गुण मिळालेच पाहिजे त्यासाठी मुलांचे सर्व उपक्रम बंद करून टाकतात आणि केवळ परीक्षेसाठी अभ्यास करण्यावरच भर दिला जातो. त्यात मुलांची मानसिकता बघितली जात नाही. जर मुलांना आईवडिलांच्या अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळाले नाहीत पण मुलं चांगल्या गुणांनी पास झाली याचा आनंद व्यक्त न करता त्यांना त्यांचे आईवडील फक्त दुषणे देत असतात. आपल्या मुलाला कुठल्या विषयात अधिक रस आहे, त्याचे आवडते विषय कोणते याचा विचार न करता आईवडील आपले निर्णय मुलांवर टाकून त्यांचे मानसिक खच्चीकरण करताना दिसतात. म्हणूनच मुले ज्ञान मिळविण्यापेक्षा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात आणि ज्ञानार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थ होत असतात. 

विद्यार्थी या शब्दाची व्याख्या करताना म्हटलं जात की जो विद्या किंवा ज्ञान आत्मसात करतो आणि मिळालेल्या शिक्षणातून आपले विचार परिपक्क करून आपला सर्वांगीण विकास साधतो त्यास विद्यार्थी म्हटले जाते. विद्यार्थी होण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो. आपण सारे काही शिकलो, आता आपल्याला शिक्षण्यासारखे काहीच शिल्लक नाही अस म्हणणारा माणूस मूर्ख समजला पाहिजे. तरीसुद्धा माणसे ज्ञानाचा व्यावहारिक अर्थ पदवी घेतलेल्या शिक्षणाशी लावतात. एखादी व्यक्ती पदवीधर झाली तर आपण त्यांना ज्ञानी समजतो आणि ज्ञानाची व्याख्या संकुचित करू लागतो. हे खरे आहे की शिक्षण हे ज्ञान मिळविण्याची पहिली पायरी आहे. शिक्षणाचा स्पर्श झाल्याशिवाय ज्ञानाच्या पायऱ्या चढताच येणार नाही. कारण ज्ञानाचे भांडार मिळविण्यासाठी चौकसपणा आपल्याला शिक्षणामुळे मिळतो. त्यामुळे शाळा महाविद्यालये यांना महत्व आहे. या संस्थेत शिकताना आपल्याला ज्ञान मिळत जाते, त्यातून आपल्याला बौद्धिक विकास, व्यक्तिमत्वाचा विकास आणि मनाचा विकास साधता येतो. मिळालेल्या ज्ञानामुळे आपण चिंतन, मनन करून मनाला पडलेली गुंतागुंतीची कोडी सहज सोडवू शकतो. ज्ञानामुळे सहज दिसणाऱ्या गोष्टींच्याही पलीकडे पाहण्याची डोळस वृत्ती तयार होते. त्यातून नवीन शोध लागतात. ज्ञान माणसाला संयम शिकवते आणि वैर भावना संपविण्यासाठी मदत करते. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञान माणसाला आत्मपरीक्षण करावयास मदत करते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, " शिक्षण आपल्याला घाबरवण्याऐवजी तर्कशुद्ध बनण्यासाठी मदत करते ". असे सांगून डॉ आंबेडकर ज्ञानाचे महत्व समजावून देताना शिक्षण कसे जरुरीचे आहे हे आवर्जून सांगतात. ते म्हणतात ," मुलांना शाळेत पाठवणे एवढेच पुरेसे नाही, तर त्यांना मूलभूत शिक्षण मिळेपर्यंत शाळेशी जोडून ठेवणेही आवश्यक आहे. शिक्षण माणसाला निर्भय बनविते, त्याला एकतेचा धडा शिकवते. त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देते आणि त्याला त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते ". पण आजच्या स्पर्धात्मक काळात शाळांतील, महाविद्यालयांतील मुले उत्तम गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे त्यांची ज्ञानाशी फारकत होते. उन्हाळ्यामध्ये मिळालेल्या मोठ्या सुट्टीचा वापर अवांतर वाचन करणे, गावी किंवा बाहेर कुठे फिरायला जाणे,  मनसोक्त खेळणे इत्यादी गोष्टी न करता मुले त्या सुट्टीतही खास वर्गाच्या अभ्यासक्रमाला जातात. तेव्हा एक प्रश्न पडतो की मुले ज्ञान संपादन करून बहुश्रुत कसे होतील? असे करून मुले परीक्षार्थी होऊन पदवीधर जरूर होतील पण ते ज्ञानार्थी होतील का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

हल्ली शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी तीन साडेतीन वर्षाच्या मुलांनासुद्धा परीक्षा द्याव्या लागतात. याचाच अर्थ आम्ही इथेच मुलांना परीक्षार्थ बनविण्यास सुरवात करतो. तसे पाहायला गेले तर लहान मुले अजाणतेपणाने अनेकदा प्रश्न विचारून ज्ञान मिळवत असतात. पण त्यांचे पालक आणि शिक्षक अशा परीक्षा घेऊन त्यांना परीक्षार्थी बनवीत असतात. तसे न करता त्या मुलांच्या पालकांनी व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करून ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांना ज्ञानार्थी बनविले पाहिजे. जर आपण तसे केले नाही तर विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होणार नाही आणि तयार होतील ते फक्त सुशिक्षित बेकार तरुणांचे लोंढे. जर तुम्हाला खोटे वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही शाळेत जाणाऱ्या मुलांना प्रश्न विचारा की तुम्ही इतका अभ्यास का करता? तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल परीक्षेसाठी. कारण ही मुले परीक्षांचे ओझे घेऊन आपला अभ्यास करीत असतात. त्यामुळे त्यांच्यात परीक्षेबद्दल भीती निर्माण झालेली असते. त्यात त्यांना नैराश्य आलेले असते. याचे कारण म्हणजे परीक्षेकडे लक्ष देताना ज्ञानाकडे दुर्लक्ष केलेले असते. त्यांचा सर्व जोर घोकंपट्टीवर असतो. इथे मला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक गोष्टींचे विश्लेषण करणारे  नामदार गोपाल कृष्ण गोखले  यांची आठवण येते. भारतात शैक्षणिक सुधारणा झाली पाहिजे असे मत हिरिरीने मांडणारे ते जबरदस्त पुढारी होते. लोकांमध्ये राजकीय जागृती होण्यासाठी शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षणाच्या दर्जासंबंधी आणि गुणवत्ता संबंधित विचार मांडताना त्यांनी शिक्षण पद्धतीच्या दोषांवर नेमकं बोट ठेवताना म्हटले होते की घोकंपट्टी हा सर्वात मोठा शाप आहे. घोकंपट्टीमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळत नाही आणि त्यामुळे चांगले गुणवंत पदवीधर तयार होत नाही. या गोष्टीमुळे शिक्षण एकदम कंटाळवाणे होऊन जाते आणि मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न केलाच जात नाही. आजही परिस्थिती कायम आहे. ठराविक सांचाच्या प्रश्नपत्रिकांमुळे आजची मुले शाळेय क्रमिक पुस्तके वाचण्याऐवजी गाईड्स वाचून अभ्यास करतात. याचा अर्थ ती घोकंपट्टी करतात. इथे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार फार महत्वाचे वाटतात. ते म्हणतात, " The Character of examinations of the university influences very materially the character of the studies of the young men who seek success in those examinations". ते पुढे सांगतात, " You can recognise this education is new factor in your life, as an ennobling influence under which you have now placed yourselves. And that means that your studies should not end when your school and college career is over ". किती छानपणे गोखलेंनी शिक्षणाचे विश्लेषण मांडले आहे. तेव्हा असे वाटते की ज्ञान मिळविणारा विद्यार्थी परीक्षेला कधीच घाबरत नसतो. कारण त्याने व्यवस्थितपणे ज्ञान मिळविलेले असते आणि ज्ञान हे आयुष्यभर मिळवावे लागते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षार्थ न होता ज्ञानार्थी बनले पाहिजे.

मध्ये एकदा मी एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या अहमदाबाद विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पंकज चंद्रा  यांची मुलाखत वाचत होतो. त्यात ते म्हणतात," आजकल शिक्षणापेक्षा परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे शिक्षकांना आपल्या अध्यापनशास्त्रात  नावीन्य आणण्यास वेळ मिळत नाही. परीक्षाच हे सर्वांचे अंतिम ध्येय बनले आहे. त्यामुळे आज आपल्या शिक्षण व्यवस्थेत एक प्रकारची पोकळी तयार झाली आहे. शिक्षकांना भुतकाळातील विषयांचे ज्ञान दिले जाते पण भविष्यात नवीन पिढी उभारण्याचे त्यांच्याकडे कौशल्य असल्याचे जाणवत नाही". असे सांगून ते म्हणतात, " शिक्षणातील मोठी दरी म्हणजे शिक्षण संस्था. त्या समाजाशी संलग्न नसतात. शिक्षक सिद्धांत शिकवितात पण मुलांना ते समजले आहे अशीच अपेक्षा करतात. अनेक सिद्धांत पुस्तकाच्या माध्यमातून आणणे जरी महत्वाचे असले तरी ते अपुरे आहे. त्यामुळे पाहिजे तसे संशोधन होत नाही. सर्व विद्याशाखा, शैक्षणिक संस्था आणि अभ्यासक्रम परीक्षेलाच अंतिम ध्येय मानतात".  आजच्या शिक्षण पद्धतीचे विश्लेषण करताना प्राध्यापक पंकज चंद्रा सर्व दोष फक्त शिक्षण संस्थांना देताना ते म्हणतात की शिक्षण संस्थानीच स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी परीक्षेत उत्तम गुण हेच उद्दिष्ट ठेवून विध्यार्थांना परीक्षार्थ बनविले आहे. त्यामुळे मुले शिक्षण संस्थांनी अभ्यासासाठी लावलेल्या क्रमिक पुस्तका शिवाय इतर अवांतर वाचन करीत नाही. त्यामुळे त्यांचे ज्ञान मिळविण्याचे मार्ग मर्यादित होऊन जातात. हे खरे आहे की अवांतर वाचन आणि ज्ञान मिळविण्यासाठी केलेला अभ्यास विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळवून देणार नाही पण त्यांना ज्ञान मिळवून त्यांची प्रगती नक्कीच होईल यात दुमत असता कामा नये. अवांतर वाचन म्हणजे फक्त वेळ फुकट घालवीणे नसून प्रत्येक गोष्टींची  व्यवस्थित माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करणे होय. त्याचा उपयोग आपल्याला सर्व प्रकारे होत असतो. यावर्षी भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. जर भारताचे भविष्य उज्ज्वल बनवायचे असेल तर येणारी पिढी ही खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी असली पाहिजे. त्यासाठी मुलांना अवांतर वाचनाची सवय लावून चांगले विश्लेषक बनविले पाहिजे. केवळ स्कॉलरशिप परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा किंवा NEET सारख्या परीक्षा पास होऊन चालणार नाही तर खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त करून आपण स्वतः ज्ञानार्थी झाले पाहिजे आणि सर्व समाजाला त्याचे ज्ञान दिले पाहिजे.  याची सर्वात मोठी जवाबदारी मुलांच्या आईवडिलांची आहे त्याचप्रमाणे शिक्षकांचीसुद्धा आहे. शेवटी सुप्रसिद्ध न्यायशास्त्रज्ञ, माजी शिक्षण मंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश  मोहम्मद करिम छगला यांच्या Roses in December या पुस्तकातील अवांतर वाचनामुळे त्यांच्या आयुष्यात कसा फरक पडला आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या शिक्षकांचे आभार मानले आहे. ते म्हणतात, " There was  teacher in the Dadar School who took a special liking to me, and who helped foster in me an interest in reading and in books outside the text books prescribed for class-room study. I owe an infinite debt of gratitude to him because my love of reading began from the time when this teacher opened to my eyes the long, ending vistas of beauty and wisdom that lie within the covers of the book written by great authors of the past. But mainly it was to literature that he pointed his finger as a source, which, if cultivated, would give me unbounded pleasure for the whole of my life". खरंच हे पुस्तक प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने वाचलेच पाहिजे, त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा. त्यामुळे मुलांना चांगले विद्यार्थी बनविण्यास मदत होईल आणि विद्यार्थी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होतील.

धन्यवाद


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...