रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १८७
विषय क्रमांक : ४
विषय : उन्हाळ्यातील प्रवास वर्णन
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
भारतीय परंपरेनुसार वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू आहेत. या सहा ऋतूत भारतातील तीन ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा व्यवस्थितपणे सामावलेले आहेत. प्रत्येक ऋ्तूंचे वेगवेगळे सोहळे असतात. जर सृष्टीचे महत्व आणि तिची विविधता समजून घेण्यासाठी आपण सर्व ऋतुमध्ये प्रवास करणे गरजेचे आहेत. भारतात प्रामुख्याने हिवाळ्यात बरेचजण प्रवास करणे पसंद करतात. त्यानंतर पावसाळ्यात प्रवास करतात पण उन्हाळ्यात प्रवास करणे म्हणजे बऱ्याच भारतीयांना त्रासदायक वाटत असते. उन्हाळा म्हणजे त्यांच्यासाठी एक शापच असल्यासारखे ते समजतात. ज्या उन्हाळ्यात प्रवास करण्यासाठी बहुतेक भारतीय लोक नाखुष असतात तोच उन्हाळा मला नेहमीच निसर्गाने वरदान दिल्यासारखा वाटतो. शाळेमध्ये असताना मला उन्हाळा हा ऋतू तर फारच आवडत असे कारण या दिवसात शाळेकडून मिळणारी उन्हाळ्याची मोठी सुट्टी तर असायचीच. या सर्वांपेक्षा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात दिवस मोठे असल्यामुळे बराच वेळ मनसोक्त फिरायला व खेळायला मिळायचे आणि खाण्यापिण्याची खरोखरच मौज असायची. आजही उन्हाळा मला तेवढाच प्रिय आहे. अननस, कलिंगड, फणस, काजू, टरबूज, कैऱ्या, जांभूळ, करवंड, चिंचा या सारखी फळे उन्हाळ्यात खायाला तर मिळतातच पण या फळांचा वापर भाजी बनवीताना सुद्धा केला जातो. फळांचा राजा आंबा तर उन्हाळ्यातच येतो. ही सर्व फळे खाताना मन तृप्त होऊन जाते. बऱ्याच वेळेस यातील काही फळांचा रस करून फ्रीज मध्ये ठेवतात. मग थंड झालेला रस पिण्यासारखे सुख कशातच असत नाही. या सर्वांची मजा जर आपण निसर्गात जाऊन घेतली तर त्यातून मिळणारा आनंद शब्दात व्यक्त करायला शब्दच कमी पडतील. म्हणूनच उन्हाळ्याचे दिवस मुंबईत घरी बसून घालविणे मला नेहमीच कठीण जाते. गेली दोन वर्षे कोविडच्या संक्रमणामुळे कुठे जाता आले नाही. म्हणून या वर्षी परत एकदा उन्हाळ्याची सहल काढण्याचे ठरवीले आणि गोव्याला जायचे नक्की केले. हा लेख मी गोव्यात बसूनच लिहीत आहे.
पहाटे पाच वाजताचे विमान पकडून जवळ जवळ एक तासाने गोव्याच्या दाभोळी विमानतळावर उतरलो. सर्व सामानासहित जेव्हा बाहेर आलो तेव्हा वातावरणातील सकाळचा गारवा जसा जाणवत होता तसाच हवेतील ताजेपणा सुद्धा मनाला आनंद देत होता. दरवेळेस विमानतळ ते आमच्या मार्दोळ येथील निवास्थानी घेऊन जाण्यासाठी आलेला आमचा गाडीवाला अगदी वेळेवर आला. जेव्हा गाडीत बसलो आणि गाडी जशी वेरणे या गावावरून जाऊ लागली तेव्हा तेथील हिरवी झाडे, हिरवे डोंगर, नारळ- सुपारीच्या बागा आणि तेथील आरामशीर जगणारी माणसे दिसू लागली की असे वाटत राहते की या सर्वांमध्ये आपणही इथे स्वतःला हरवून बसायला हवे. अशावेळेस मला भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गोव्याचे वर्णन नंदनवनाचा एक सुंदर तुकडा असे केले होते या वाक्याची आठवण झाली. दोन नद्या, बाजूला डोंगर, उतारावर घरे, मध्ये भाताची शेती, नारळाच्या बागा, पोफळीची कुळागरे पहिली की आपण नकळत गोव्याच्या प्रेमात पडतो. जेव्हा आमची गाडी मार्दोळ येथे पोचली तेव्हा तेथील हिरव्या गर्द पानामधून येणाऱ्या जाईजुई फुलांचा वास येऊ लागतो आणि मन प्रसन्न होऊन जाते. म्हणूनच या वेळेस उन्हाळ्याच्या खाऱ्या हवेची मजा घेण्यासाठी आम्ही परत एकदा गोवा फिरण्याचे ठरविले. आम्ही गोव्यात पाय ठेवला तेव्हा शनिवार होता. शनिवारी आराम करून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी दहा वाजता उत्तर गोव्याची सफर करण्याचे ठरवून आमच्या गाडीवाल्याला आम्ही बोलाविले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो तेव्हा हवेतील उष्मा जाणवू लागला होता. तरी सुद्धा फिरण्यास मजा येणार होती. बऱ्याच वर्षांनी आम्ही परत एकदा गोव्याची सहल करणार होतो आणि आमचा पहिला मुक्काम होता ओल्ड गोवा येथील बेसिलिका ऑफ बोम जिसस चर्च आणि चॅपल ऑफ सेंट कॅथरीन पाहण्यासाठी. बेसिलिका ऑफ बोम चर्च हे जरी आकाराने लहान असले तरी त्याचे सौंदर्य आश्चर्यचकित करते. हे प्रार्थना मंदिर जरी ख्रिश्चन धर्माचे असले ते पाहताना पवित्र्याची भावना जरूर मनात येत असते. या चर्चचे सर्वात महत्वाचे आकर्षण आहे ते म्हणजे येथील कॅथेड्रलमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष आहे. या चर्चला बॅसिलिकाचा दर्जा मिळाला आहे. यातील विविध प्रकारच्या वास्तुकला पाहण्यासारख्या आहेत. मुख्य वेदीवरील पुतळे सोन्याचे आहेत. प्रत्येक मजला मौल्यवान दगडांसह पांढऱ्या संगमवारीने बनला आहे. हे चर्च आणि त्याच्या समोर असलेले वास्तूसंग्रालय जागतिक पुरातन वारसा स्थळ म्हणून युनिस्कोने घोषित केले आहे. या चर्चच्या बांधकामाची सुरुवात २४ नोव्हेंबर १५९४ मध्ये झाली आणि १५ मे १६०५ मध्ये पूर्ण झाली. या शिवाय ओल्ड गोव्यातील चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी, सेंट कॅथेड्रल चर्च, सेंट मोनिका चर्च सुद्धा पाहण्यासारखे आहे.
जवळ जवळ दोन तास ओल्ड गोव्यात घालवील्यानंतर आम्ही निघालो मांडवी नदीच्या तीरावर वसलेल्या पणजी शहराकडे. पणजी हे एक अतिशय सुंदर शहर आहे. कुठूनही हे शहर पाहिले की त्याची सुंदरता लगेच डोळ्यात भरते. आता तर मांडवी नदीवर झालेले पुल तर रात्रीच्या वेळेस एखाद्या रत्नहारासारखे दिसतात. जर पणजी शहराचे मनोहरी रूप पाहावयाचे असेल तर संध्याकाळी थोडासा काळोख झाल्यावर पर्वरी वरून पणजीत येताना या पुलावरून यावे. तेव्हा पणजी शहर दिव्याच्या प्रकाशात चमचमताना दिसते. तेव्हा असे वाटते की हा प्रकाश निर्जीव वस्तूंना सजीव बनवत आहे. या शहरातील पाहिले आकर्षण आहे ते म्हणजे येथील पालास हे सचिवालय. हे सचिवालय पूर्वी इदालकाव पॅलेस या नावाने ओळखला जात होता. हा पॅलेस सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलखान याने बांधला होता. पणजी शहराचे सौंदर्य खुलून दिसण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे आल्तीनो टेकडी. या टेकडीवरून पणजी शहराचे विविध भाग पाहता येतात. हे सर्व पाहत असताना आपल्याला लॅटिन संस्कृतीची दाट छाया पणजी शहरावर पसरलेली दिसते. या शहरातील अजून एक आकर्षक गोष्ट म्हणजे मीरामार नावाने ओळखला जाणारा समुद्र किनारा. हा किनारा मी सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री सुद्धा पहिला आहे. उंच असलेली नारळाची झाडे या किनाऱ्याचे सौंदर्य वाढवीत असतात. हल्ली रात्रीच्या वेळेस हा किनारा विद्युतप्रकाशाने खुलविला आहे. यावेळी आम्ही दुपारच्या सुमारास गेलो तेव्हा समोरच्या सागरातून कितीतरी शुभ्र मोती चंदेरी मुलामा घेऊन उधळताना दिसत होते. खरोखरच हा समुद्र किनारा पाहताना खूप मजा येते. मीरामार बरोबर दोना पावलाने सुद्धा पणजी शहराला सुंदरता तर दिलीच पण या भागाने तिथे समर्पणाची भावना रुजविली आहे. असे म्हणतात तिथे एका प्रियेने आपल्या प्रियकराबरोबर स्वतःचे जीवन त्या भव्य सागरात लोटले. तेव्हा त्या दोघांची पाऊले त्या वाळूवर उमटली. तेव्हा पासून त्या भागास दोना पावला असे नाव पडले. दोन पावला याचा अर्थ कोकणी भाषेत दोन पावले असा होतो. या पणजी शहरात अनेक गोष्टी मजा देत असतात. हे शहर मला खूप आवडते कारण इथे माझ्यात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कोणतेही काम न कंटाळता करण्याची प्रेरणा येथे मिळत जाते. याला कारणही तसेच आहे. इथे मांडवी नदी प्रेमळपणा देते तर अल्तीनो उमदेपणा, मीरामार रसिकपणा शिकवतो आणि दोना पावला प्रेमासाठी त्याग करण्याची भावना देतो. पणजी शहर फिरून झाल्यावर दुपारचे जेवण करण्यासाठी आम्ही कोकणी कॅन्टीन मध्ये गेलो. तिथे माशाच्या जेवणाची थाळी कोकम सरबताबरोबर खाऊन दुपारच्या वेळेस निघालो ते अग्वाद किल्ला पाहण्यासाठी.
उत्तर गोव्यात बारदेश तालुक्यात कांदोळी गावात असलेला हा किल्ला कळंगुट किनाऱ्यापासून केवळ ४ किमी अंतरावर आहे. या किल्ल्याचा घेरा प्रचंड मोठा असून हा किल्ला १६व्या शतकात पोर्तुगीजांनी डच आणि मराठा फौजांपासून रक्षण करण्यासाठी बांधला. तेव्हा धार्मिक राजा फिलिप दुसरा पोर्तुगालात राज्य करीत होता. त्याने हा किल्ला बांधण्यासाठी हुकूम दिला. इ.स.१६१२ रोजी बांधलेल्या या किल्ल्याची मांडणी पूर्णपणे लष्करी पद्धतीची असून त्यात कुठेही धार्मिकपणा दिसत नाही. बारादेश तालुक्यातील पश्चिम-दक्षिण लक्षद्विपचे टोक या किल्ल्याच्या तटबंदीने वेधले आहे. त्यात दोनशे तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली होती. या किल्ल्यावर पाण्याचा प्रचंड साठा आहे. अग्वाद हा पोर्तुगल भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ पाणी असा आहे. म्हणूनच या किल्ल्याला अग्वाद असे नाव दिले आहे. सुरुवातीला या किल्ल्याला अग्वाद हे नाव नव्हते. हा किल्ला सांत कातारीन या नावाने ओळखला जायचा. दीपस्तंभ, खंदक, भरभक्कम तटबंदी या किल्ल्याचे वैशिष्ट्ये आहेत. येथे नेहमी दुपारचे जेवण करून दोन ते तीन वाजता यावे. म्हणजे समुद्राच्या लाटांवरून तरळत येणारा आल्हादायक वारा छानपैकी अनुभवता येतो. या अपर अग्वाद बरोबर लोवर अग्वाद ही जरूर पाहण्यासारखा आहे. आज तिथे ताज समूहाचे हॉटेल झाले आहे. हा भाग समुद्राच्या लाटांना अडवणारा हा एक विशाल बुरूज असल्याचे जाणवते. या किल्ल्याचा दक्षिण भाग मध्यवर्ती तुरुंग बांधण्यासाठी राखून ठेवला आहे. हा किल्ला भुशिरावर असल्यामुळे त्याचे स्वरूप एखाद्या भव्य किल्ल्यासारखे नाही आहे. या किल्ल्यातील दीपस्तंभाच्या विकासातील विज्ञानाच्या विकासाचेही टप्पे पाहावयास मिळतात. या किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला एक संत आहे. त्याचे नाव आहे सां लौरेन्सु. दरवर्षी १० ऑगस्टला त्याची जत्रा अग्वादजवळ भरते. तेव्हा असा हा किल्ला पाहण्यासाठी जरूर जावे. अग्वाद किल्ला पाहून झाल्यावर आम्ही संध्याकाळी कळंगुट या समुद्र किनाऱ्यावर आलो. हा किनारा मला नेहमीच आवडतो. कारण मला नेहमी वाटते हा किनारा सूर्यबिंब सहजपणे गिळतो. इथे सूर्यास्त पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. येथील वाळूत नेहमी पाय रुतले जातात. पायाखालची वाळू अनेकदा घसरत असल्याचा अनुभव या किनाऱ्यावर येत असतो. येथे घोंगावत येणाऱ्या लाटा आपले पाय छानपणे कुरवाळून पुढे जातात तेव्हा खूपच मजा वाटते. मला कळंगुट किनाऱ्यावर जाताना तेथील निसर्ग खूपच आवडतो. रांगेत उभी असलेली नारळाची झाडे आणि त्यातून दिसणारी ती कौलारू घरे व चर्चचा क्रॉस, तांबडी माती या सर्व गोष्टी संध्याकाळी जाताना खूपच छान वाटतात. या किनाऱ्यावर वॉटरस्पोर्टचाही आनंद घेता येतो. या किनाऱ्याबरोबर आमच्या सहलीचा पहिला दिवस संपला आणि परत आम्ही आमच्या घरी मार्दोळ येथे आलो आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी गोव्यातील महत्वाची देवळे पाहण्याची योजना तयार केली.
गोव्यातील मंदिरांवर द्रविडी संस्कृतीची छाप असल्याचे नेहमीच जाणवते. येथील शिल्पात आर्य आणि द्रविड संस्कृतीचा संगम आढळतो. त्याचप्रमाणे निसर्गाशी एकरूपता आणण्यासाठी पश्चात्यांचे वैशिष्ट्ये यात समाविष्ट केली आहेत. म्हणूनच ही देवळे आकर्षक वाटत असतात. देवळे पाहण्याची सुरुवात आम्ही मंगेश देवस्थानपासून केली. मंगेश देव आमचे कुलदैवत असल्यामुळे सोमवारी सकाळी अभिषेक केला आणि तिथेच सकाळची न्याहारी करून इतर देवस्थाने पाहण्यासाठी तयारी केली. निसर्गाच्या कुशीत वसलेले श्रीमंगेश देवाचे हे देवस्थान निसर्ग आणि ईश्वर यांच्या एकरुपतेचा साक्षात्कार घडवितो. तुम्ही जेव्हा या देवस्थानात जातात तेव्हा कल्पवृक्षांची छाया तुमच्यावर असते आणि डोंगराचे सौंदर्य तुमच्या नजरेत सामावले जाते. मंदिराचे शिल्प द्रविडी संस्कृतीची छाया दर्शविते. हे देवस्थान गौड सारस्वत जातीतील शैव लोकांचे कुलदैवत आहे. पूर्वी हे देवस्थान कुठ्ठालीस होते. पोर्तुगीज लोकांनी ते पाडल्यामुळे तेथील शिवलिंग प्रियोळ या गावी आणून त्याची स्थापना केली ती १५६० च्या सुमारास. आज हे देवस्थान जागृत असल्याचे अनेक भक्त सांगतात आणि मीही हा अनुभव घेतला आहे. दर सोमवारी तसेच पौर्णिमेला या देवाची पालखी निघते आणि माघी पौर्णिमेला मोठी जत्रा भरते. मंगेशीवरून आम्ही आलो ते नागेशी देवस्थानात. असे म्हणतात नागेशीचे स्थान हे स्वयंभू आहे. गोव्यात येणारे पर्यटक मंगेश देवस्थानात येतात मग सरळ शांतादुर्गा या देवस्थानात जातात पण जाताना वाटेत लागणाऱ्या नागेशीकडे दुर्लक्ष करतात. या देवळाच्या समोर प्रचंड तलाव आहे. असे म्हणतात की या तलावात एकेकाळी सुवर्णाच्या तेजाने झळाळणाऱ्या श्री नागेशाच्या मूर्तिचे सुंदर प्रतिबिंब दिसत असे. आता तो तलाव चिखलमय झाल्याने ते प्रतिबिंब दिसेनासे झाले आहे. हे शंकराचे देऊळ असून त्याचे शिवलिंग स्वयंभू आहे आणि त्याचा मुखवटा सोन्याचा आहे. त्यानंतर आम्ही आलो ते बंदिवड्याच्या महालक्ष्मीच्या देवळात. नागेशीप्रमाणे इथेही पर्यटक येताना दिसत नाही. इथे येणारे बरेच भक्त मंगेश किंवा शांतादुर्गाचे महाजन असतात. या महाजनांची ही देवता पालवी होते. महालक्ष्मी वरून आम्ही पोहचलो ते रामनाथी या देवस्थानाकडे. हे गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील वैष्णव लोकांचे कुलदैवत आहे. हे सुद्धा देऊळ बांदिवडे येथे आहे. पूर्वी हे देऊळ लोटली या गावात होते. पोर्तुगीजांनी ते मोडले. पण त्यातील मूर्ती व्यवस्थित होत्या. जुवारी नदी ओलांडून त्यास दुर्भाट येथे आणले आणि तिथून त्यास बांदिवडे येथे आणून त्या देवाची स्थापना केली. या देवस्थानात प्रवेश करताच आपल्याला या देवस्थानाचे तळे दिसते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेदिवशी तेथे नौकाविहाराचा उत्सव असतो. याचा मुख्य दरवाजा उंच असून वर नगरखाना असल्यामुळे तो एखाद्या किल्ल्यासारखा दिसतो. रामनाथी वरून आम्ही आलो ते कवळे येथील शांतादुर्गा देवस्थानात. ही एक वैभसंपन्न देवता असून या देवतेचे महाजन गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील शैव लोक आहेत. हे देऊळ हिरव्या गर्द झाडीत आणि डोंगरांच्या कुशीत बसलेले आहे. या मंदिराचे सौंदर्य लाल रंगाच्या छप्परात आहे. देवळाच्या पायांजवळ ग्रामदेवतेची शीला आहे. सुरुवातीला हे देऊळ केळोशी या गावी होते. पोर्तुगीज सम्राज्यापासून वाचवीत या देवतेला कवळे इथे आणून तिची स्थापना केली. इथे पाच पंचमी मोठया असतात. त्यादिवशी देवीची पालखी निघते. शांतादुर्गा देवस्थानातून आम्ही निघालो ते साखळी येतील दत्त मंदिराकडे. वाटेत जाताना आम्ही खंडोळ्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि पुढे साखळीला निघालो. साखळी येथील दत्ताचे देवस्थान निसर्गवैभवाने संपन्न आहे. त्यामुळे अनेक दत्तभक्तांना आकर्षित करून घेते. पणजी शहरापासून हे देवस्थान २५ मैल दूर असून डिचोली या जिल्यात आहे. असे सांगतात या गावी दत्तू कामत नावाचा गौड सारस्वत ब्राह्मण राहत असे. त्याने गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी तो नरसोबाच्या वाडीला गेला. तेथे अनेक ब्राह्मणानी त्यास त्रास दिला. तेव्हा दत्तगुरूंनी त्यास दृष्टांत दिला आणि त्याच्या गावी वास्तवास येऊ असे सांगितले. म्हणूनच हे देवस्थान उभे राहिले. अतिशय सुरेख असे हे जागृत देवस्थान आहे. त्यानंतर आम्ही आलो ते नार्वे येथील सप्तकोटेश्वर देवस्थानात. हे सुद्धा गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील शैव महाजनांचे कुलदैवत आहे. पोर्तुगीजांनी या देवळाची मोडतोड केली. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज सम्राजाचा काही भाग घेतला तेव्हा ते गोव्यातील नार्वे भागात आले. तेथील महाजनांनी त्यांना सांगून या देवस्थानाची उभारणी केली आणि त्यांच्याकडून अभिषेक करून घेतला. अशी ही देवालये पाहत सोमवारी संध्याकाळी परत घरी आलो तेव्हा खूपच प्रसन्न वाटत होते. उन्हाळ्याचा त्रास कुठेही जाणवत नव्हता.
तिसरा दिवस सकाळी आराम करून आम्ही दुपारी दक्षिण गोव्याकडे जाण्यास निघालो. त्यावेळी आभाळ भरून आले होते आणि पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती. जाताना वाटेत बोरी हे गाव लागले. या गावात मराठी आणि कोकणी भाषेतील कवी बा.भ.बोरकर उर्फ बाकीबाब यांचे निवास्थान लागले. थोडावेळ थांबून त्यांच्या घराच्या आवरतील छायाचित्रे काढली आणि मग दक्षिण गोव्यातील समुद्र किनारा पाहण्यासाठी गेलो कोलवा या समुद्रकिनाऱ्यावर. हा किनारा पर्यटकासाठी सुरक्षित मानला गेलेला आहे. रुपेरी वाळूसाठी हा किनारा आदर्श पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेला आहे. यातील निळेभोर पाणी सर्वांना खूपच आकर्षित करते. कळंगुटप्रमाणे हा किनारासुद्धा मला खूप आवडतो. या रुपेरी वाळूत कुठेही खडकाळ जागा आपल्याला सापडत नाही. दक्षिण गोव्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत. खासकरून दूधसागर. पण दूधसागर पाहण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस उपयोगाचे नाही. त्यासाठी पाऊस असायला हवा किंवा पाऊस संपल्यानंतर जायला हवे. दूधसागर बघण्यासाठी जाताना वाटेत मोलेम अभयारण्यात वसलेले तांबडा सुरला हे प्राचीन शंकराचे देऊळसुद्धा अतिशय सुंदर आहे. या मंदिराला गर्भगृह, अंतराळ आणि मुखमंडप अशी रचना आहे. या मुखमंडपात तिनही बाजूने प्रवेश करता येतो. या मुखमंडपाचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे त्याच्या छतावर सुंदर दगडी झुंबर कोरलेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या दाराशी सुंदर नक्षीकाम केलेली जाळीची नक्षी आहे. या मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा छोटे छोटे धबधबे आहेत. त्यामुळे इथे येण्यासाठी श्रावण महिन्यात किंवा पाऊस संपताना यावे म्हणजे येथील सौंदर्य खूपच छान वाटेल.
अशा या वैभव संपन्न गोव्याची सहल तीन दिवसात संपवून उरलेले दिवस घरातील इतर कामे करून आराम करण्यात घालविली. या प्रवासाच्या दरम्यान वाटेत कोकम सरबरत, लिंबू सॊडा, शहाळाचे पाणी यासारखी पेय त्याचप्रमाणे करवंद, जांभूळ, फणस, मानकुराद आंबे, गावठी अननस खाण्यात खूपच मजा आली. या सर्वांबरोबर गोयचे नुस्ते म्हणजे मासळीचे स्वादिष्ट जेवणाचासुद्धा त्याचा आनंदाने आस्वाद घेतला. यासाठीच उन्हाळ्यातील दिवस घरी बसण्या ऐवजी बाहेर फिरण्यास घालवीणेसुद्धा मजेदार असते. जेव्हा मी गोव्याची उन्हाळ्यातील सहल करीत होतो तेव्हा मला बा.भ.बोरकरांच्या माझ्या या गोव्याच्या भूमीत या कवितेच्या ओळी आठवत होत्या. त्यातील काही ओळी देऊन मी माझा लेख संपवत आहे.
गड्या नारळ मधाचे
कड्याकपारी मधोनी
घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर
फळी फुलांचे सुवास
माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्या चांदीच्या रे धारा
धन्यवाद
फारच सुंदर लिखाण मनास फार भावले.
ReplyDelete