रंगलेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक: १८५
विषय क्रमांक : ४
विषय : गौरवशाली ग्रंथवारसा
शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम , मुंबई
वारसा म्हणजे अगोदरच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मिळालेली गोष्ट. असा हा वारसा सांस्कृतिक असू शकतो किंवा ऐतिहासिक अगर धार्मिकसुद्धा असू शकतो. मागच्या पिढीकडून मिळालेला हा वारसा जपून ठेवून त्यात आजच्या समाजाची भर टाकून तो पुढील पिढीच्या हाती सोपवावा लागतो. या वारसाचे स्वरूप जरी वेगळे असले तरी त्या सर्वांचे जतन करणे महत्वाचे असते कारण त्या वारसाच्या अस्तित्वामध्ये त्यावेळेच्या समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. भाषा, ऐतिहासिक ठिकाणे आणि स्मारके , कलाकृती , ग्रंथ आणि ग्रंथालये अशी काही उदाहरणे आपल्याला वारसाच्या रूपाने मिळालेली आहेत. या सर्वामध्ये फार महत्वाचा वारसा म्हणजे ग्रंथवारसा आणि तो जपून ठेवणे फार महत्वाचे आहे. ग्रंथ म्हणजे पुस्तक की ज्याचा उपयोग ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक माहिती लिखित स्वरुपात सांगण्यासाठी केला जातो. म्हणून ग्रंथाची व्याख्या करताना म्हटले आहे की कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या व बांधलेल्या पृष्ठांचा टिकाऊ संग्रह जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येतो आणि त्यातील लिखाण समाजातील सर्व लोकांच्या उपयोगासाठी केलेले असते. ग्रंथाचा उपयोग विविध कारणांसाठी होत असतो. ग्रंथामुळे ज्ञान तर मिळतेच पण मनोरंजनसुद्धा होत असते. त्यामुळे सर्वच ग्रंथ स्फूर्तीदायक होत असतात. कुठलीही व्याख्याने किंवा चर्चा ग्रंथाशिवाय होऊच शकत नाही. जर कुणी तसे केल्यास, तर त्या चर्चा किंवा व्याख्याने उपयोगी ठरणार नाही. कारण ग्रंथ मानवाशी संवाद साधतात. त्याच्या मनातील गोष्ट पारखून घेतात. त्यामुळे ग्रंथाचे माणसांशी एक अतूट नाते निर्माण झाले आहे . म्हणूनच हा ग्रंथवारसा जपून ठेवणे हे प्रत्येक पिढीतील माणसांचे कर्तव्यच आहे.
जगातील अनेक महान व्यक्तींनी जी बौद्धिक उंची गाठली आहे त्याचे कारण म्हणजे ग्रंथ वाचन. ग्रंथ वाचन केल्याने ज्ञानाचे कालवे बंधमुक्त होतात. तुम्हाला माहीत नसलेली अनेक गुपिते तुम्हाला समजतात. ग्रंथ वाचनच खरी अलिबाबाच्या गुहेची किल्ली आहे. तुम्हाला मानवी जीवनाचे तात्पर्य शोधायचे असेल तर ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही. चार्लस किंग्जले हा सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणतो, "जिवंत माणूस सोडल्यास भूतलावर ग्रंथासारखी अन्य विलक्षण गोष्ट नाही. ज्या माणसाला आपण कधी पाहिले नाही. जो आपल्यापासून दूर राहतो. तो ह्या छोट्याश्या कागदावर जी अक्षरे लिहितो, ती अक्षरे आपल्याशी बोलतात, आपल्याला शिकवीतात आणि आपले हृदय उघड करतात ". म्हणून मला नेहमी वाटते कि जेव्हा मी एखादे ग्रंथ वाचायला घेतो तेव्हा मी नकळत अंधाराला दूर करून प्रकाशाची दारे उघडण्याचा प्रयत्न करीत असतो. याबाबतीत मी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेली एक आठवण सांगू इच्छितो. यशवंतराव आपल्या आईला ज्ञानेश्वरी वाचवून दाखवीत असत. तेव्हा त्यांना त्याचे नवल वाटत असे. एक दिवस त्यांनी त्यांच्या आईला विचारले कि ज्ञानेश्वरी त्यांना कशी काय समजते ? तेव्हा त्यांच्या आईनी सांगितले.”चांगले ग्रंथ चांगुलपणाचे संस्कार करतात. त्यामुळे चांगले वाईट यातील फरक कळतो. चांगले ग्रंथ मनाला स्नान घालतात, त्यामुळे मन प्रसन्न होते. जरी एक ओवी कळली नाही तरी चालेल पण त्या ओव्यामुळे मन प्रसन्न होते. वाचत राहिल्यामुळे न कळलेला भाग सुद्धा हळूहळू समजू लागतो. त्यातूनच समज वाढते आणि माणूस ज्ञानी बनतो”. म्हणूनच ग्रंथ हे मानवी आत्म्याचे सकस अन्न आहे आणि त्यांचे वाचन केल्यावर मनावर चांगलेच संस्कार होणारच. त्यामुळे उद्याच्या उद्धारासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला ग्रंथ वारसारूपाने जपावेच लागणार आहे.
ग्रंथाचे शिळाग्रंथ, इष्टिकाग्रंथ, बांबूच्या चिरफळ्यांवरील ग्रंथ, पपायरसावरील ग्रंथ, चर्मग्रंथ, कागदावरील ग्रंथ असे विविध प्रकार आहेत. शिळाग्रंथ हा शिलालेखाचा प्राचीन नमुना म्हणून उल्लेख करता येईल. त्यात प्राचीन काळातील काही शिलालेख आणि काही संस्कृत नाटकांचे खोदकाम केलेले आहे. इष्टिकाग्रंथ हा ग्रंथ प्रकार तीन हजार वर्षापूर्वीचा मनाला जातो. पाच इंच लांबीच्या , अर्धवट ओल्या असलेल्या विटा घेऊन त्यावर कोरणीने कोरून लिहित असत. मग त्या विटा उन्हात वाळवून कठीण केल्या जात असत. हा प्रकार किती प्रमाणात योग्य होता हे सांगता येणार नाही पण जगातील प्राचीन ग्रंथात या इष्टिकाग्रंथाचा समावेश केला जातो. बांबूच्या चिरफळ्यांवरील ग्रंथ हा प्रामुख्याने चीनमध्ये होता. बांबूच्या लाकडाच्या चिरफळ्या करून त्यावर ग्रंथ लिहिले गेल्याचे म्हटले गेले आहे. आज हे ग्रंथ दमट हवेमुळे नष्ट झाल्याचे म्हटले जाते. पपायरसावरील ग्रंथ या प्रकारात पपायरस या वनस्पतीच्या खोडावर ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथाच्या गुंडाळ्या मातीच्या रांजणात ठेवल्या जात असत. असे म्हणतात की इ.स.पू. २५०० काळातील पपायरसावरील ग्रंथ अनेक शतकानंतर जमिनीखाली रांजणात सुरक्षित होते. हा प्रकार प्रामुख्याने ईजिप्तमध्ये असल्याचे आढळून आले आहे. या ग्रंथातून इजिप्तमधील लोककलाआणि विज्ञानाची माहिती उपलब्ध होते. असे म्हणतात की ग्रीक भाषेतील बिबलिओ हा शब्द पपायरस या शब्दावरुन आला असावा. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो व कवी होमर यांनीसुद्धा हा ग्रंथ प्रकार त्यांच्या लिखाणासाठी वापरला होता असे म्हटले जाते. चर्मग्रंथ हा प्रकार चोविसाव्या शतकात इजिप्तमध्ये लेखनासाठी वापरला गेल्याचे म्हटले आहे. या प्रकारात जनावरांची कातडी लेखनासाठी वापरली जात असे. कागदावरील ग्रंथ हा प्रकार कागदाचा शोध लागल्यानंतर वापरात होऊ लागला. कागदाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये इ.स.१०५च्या सुमारास लागला. अरब व्यापारांच्यामुळे हा शोध भारतात आणि युरोपमध्ये पोहचला. तरीसुद्धा कागदावर लिहिलेला पहिला ग्रंथ इ.स. १४४१ मध्ये छापण्यात आला. त्या ग्रंथाचे नाव होते मिरर ऑफ अवर सॅल्व्हेशन आणि त्या ग्रंथाचा लेखक होता लॉरेन्स यान्सन कॉस्टरहोलो. आजसुद्धा कागदावरील ग्रंथ फारच टिकाऊ असल्याचे मानले जाते. मुद्रणकलेत झालेल्या यांत्रिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे ग्रंथ निर्मितीवर खूपच चांगला परिणाम झाला. अनेक क्षेत्रात झालेल्या शिक्षणाच्या प्रगतीमुळे आणि वैज्ञानिक संशोधनामुळे ग्रंथनिर्मिती अधिक होऊ लागली. ज्ञान मिळविणे आणि त्याचा वापर नवीन निर्मितीसाठी करणे यासाठी ग्रंथ चिरंतर टिकून राहणे फार गरजेचे आहे असे वाटू लागले. म्हणूनच माणसाला ग्रंथाचा वारसा विविध प्रकारच्या शत्रूपासून जपणे गरजेचे वाटू लागले आहे.
सर्वच क्षेत्रात ग्रंथाचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्व मान्य झाले आहे. ग्रंथरूप अभिजात साहित्य हे समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रगतीचे एक महत्वाचे गमक मानले गेले आहे. आज तंत्रज्ञानात बरीच प्रगती झाली असली तरी ज्ञान मिळवून आपली बौद्धिक संचरनेची व्याप्ती वाढविण्यासाठी ग्रंथ हेच जरुरीचे प्रमाण मानले जात आहे. इथे अमेरिकन लेखक Philip G Altbach म्हणतात, ”Despite challenges from other mass media.. Books remain one of the most important means of intellectual communication and continue to be at the center of the intellectual system of most societies’. आजच्या तंत्रज्ञानाचे प्रणेते बिल गेट्स (Bill Gates) लिहितात, “Every books teaches me something new or helps me see things differently. Reading fuels a sense of curiosity about the world, which I think helped drive me forward in my career and in the work that I do know with my foundation. Even today, books and magazines still cannot beat readability and portability”. याचाच अर्थ ग्रंथ अजूनही ज्ञान मिळविण्यासाठी महत्वाचा घटक आहे. ग्रंथाचे महत्व सांगताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात,”अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रींना उजळून टाकण्याचे सामर्थ फक्त ग्रंथातच असते. ग्रंथ आपल्याला माणुसकी शिकविते. क्रांतीचे, माणुसकीचे, शांतीचे नवनवे वारसदार निर्माण करण्याचे काम ग्रंथ करीत असतात”. आजच्या काळात ग्रंथाची माहिती किंवा ग्रंथ ई-बुक पुस्तिकाद्वारे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचन वाढविण्याचे अजून एक माध्यम निर्माण झाले आहे. तरीसुद्धा आजचा समाज सोशल मिडीयावर येणाऱ्या भ्रामक आणि अनाकलनीय गोष्टी वाचण्यात वेळ घालवत आहे आणि कुठलेही संदर्भ न बघता त्या गोष्टी सत्य असल्याचे समजत आहे. त्यासाठी ग्रंथ वाचन फार जरुरीचे आहे. कारण त्यातून आपण ज्ञान आत्मसात करीत असतो. म्हणून ग्रंथाचा संपूर्ण अभ्यास करणे जरुरीचे असते. इथे मला सुप्रसिद्ध मराठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या भटके पक्षी या कविता संग्रहातील ग्रंथ नावाची एक कविता आठवत आहे. त्या कवितेत किती सहजपणे मंगेश पाडगावकरांनी ग्रंथाचे महत्व मांडले आहेत. सुंदर निसर्ग पाहून माणसांच्या मनाच्या चित्तवृत्ती फुलतात तसेच ग्रंथाच्या सहवासात माणसाला त्याच्या जीवनाचे सुंदर सूर सापडू शकतात. त्यासाठी ग्रंथाशी मैत्री करणे फार जरुरीचे आहे. आपल्या कवितेत पाडगावकर म्हणतात,
“ग्रंथ कोंडून ठेवू नका कपाटात सुरक्षित,
नको पहाऱ्यावर तुसड्या चेहऱ्यांचे रखवालदार,
जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र कोंडले जाते :
कपाटांच्या कबरीत गाडले जातात विचारांचे मुडदे.
प्रत्येक ग्रंथ असतात एक निमंत्रण:
कधी झपूर्झाचे,कधी हिरव्या हिरव्या गार गालिच्यांचे,
निळ्या आभाळात उडू लागतात शुभ्र विचारांचे पक्षी
तेव्हा उगवते इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर.
ग्रंथपाल हसतो तेव्हा ग्रंथालय होते एक बाग
न कोमेजणाऱ्या असंख्य फुलांनी बहरलेली,
ग्रंथ सुखाने फिरू लागतात हिरव्या कुरणावरून
हाक घालतात लहान मुलांसारखे उचलून घेण्यासाठी.
जेव्हा हुकूमशाही आवळते गळ्याभोवती फास
तेव्हा ग्रंथच पेरतात तिच्या ठिकऱ्या करणारे सुरुंग,
शोषणाच्या अंधारात होतात नवे सूर्य
जुलुमाचे समुद्र ग्रंथ पिऊन टाकतात अगस्तीसारखे
ग्रंथालायातले ग्रंथ भेटले पाहिजे माणसांसारखे
मोकळ्या हवे नव्या नव्या जाणिवांच्या,
ग्रंथाच्या स्पर्शाने पायांतल्या बेड्या तुटोत,
ग्रंथाच्या स्पर्शाने भिंतीचे आकाश बनो”.
अमेरिकन हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष Charles William Eliot यांनी ग्रंथाबद्दल बोलताना सांगितले, “Books are the quietest and most constant friends: they are the most accessible and widest of the counselors , and most patient of teachers”. याचा अर्थ मराठीत करावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की ग्रंथ हे माणसाचे सर्वात जवळचे मित्र आहेत. कधीही दूर न जाणारा आणि पाहिजे तेव्हा उपलब्ध असणारा एक उत्तम सल्लागार तर आहेच पण एक संयमी शिक्षक आहे. म्हणून अशा मित्राला जपले पाहिजे. जे ग्रंथ प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्यावर संस्कार करीत ज्ञान देत आहे असे ग्रंथ वारसा रूपाने जतन करून प्रत्येक पिढीला सुपूर्त केले पाहिजे. जगामध्ये आणि भारतातसुद्धाअसे काही ग्रंथ आहेत की जे आपल्याला अनेक पिढीकडून मिळाले आहे. त्यामुळे हा ग्रंथ वारसा आपण जपला पाहिजे. त्याच्यात डोकावून आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातूनच नवीन ग्रंथाची निर्मिती होऊन एक नवीन ग्रंथवारसा तयार होईल. यासाठी आपण असे काही मराठी ग्रंथ पाहू की जे आम्हाला वारसा रुपात मिळाले आहेत आणि अशा ग्रंथाची जपणूक होणे फार गरजेचे आहे. कारण हे ग्रंथ नुसते ग्रंथ नसून ते प्रेरणादायक ग्रंथ आहेत .
१. भावार्थ रामायण : संत एकनाथांनी मराठीत लिहिलेला रामायणावरील महत्वाचा ग्रंथ आहे. असे म्हणतात हा ग्रंथ म्हणजे वाल्मिकी रामायणावरील टीकात्मक ग्रंथ आहे. सोळाव्या शतकात लिहिला गेलेला हा ग्रंथ असून संत नामदेवांनी फक्त ४४ अध्याय लिहिले असून पुढे हा ग्रंथ त्यांचे शिष्य गायबा याने पूर्ण केला आहे.
२. भारत-भावदीप : हा महाभारतावरील ग्रंथ असून नीलकंठ चतुर्धर या ब्राह्मणाने लिहिलेला महाभारतावरील टीकात्मक असलेला ग्रंथ आहे.
३. भगवद गीता : १८ अध्याय व ७०० श्लोक असलेला हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जीवनाचा अर्थ अर्जुनाला सांगितलेला आहे. सर्व भारतीय लोक या ग्रंथाला पवित्र ग्रंथ मानतात. हा पवित्र ग्रंथ हजारो शतके भारतीय मनांनी सांभाळलेला गौरवशाली वारसा आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी सुद्धा या ग्रंथाला महत्व दिले आहे. याला कारण म्हणजे भगवद गीतेमधील तत्वज्ञान कालातीत आहे आणि कुठल्याही युगात त्याचे महत्व आहे.
४. ज्ञानेश्वरी : १३व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भगवद गीतेवर जे टीकात्म भाष्य मराठीत केले आहे त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात. त्यात एकूण १८ अध्याय असून हे अध्याय सर्व मराठी भाषिकांना सहजपणे कळेल असेच आहे. भगवद गीतेप्रमाणे हा ग्रंथ सुद्धा आपला गौरवशाली वारसा आहे.
५. तुकारामाची गाथा : संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिमेने जशी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच उत्कट भक्तिभावाने संत तुकाराम महाराजांनी आपले अभंग लिहिले. त्यांच्या सर्व अभंगांचे एकत्रीकरण म्हणजेच तुकाराम महाराजांची गाथा आहे. ही गाथा म्हणजेच जीवनातील विविध व्यवहारातील सूत्र रूपाने केलेले मार्गदर्शन आहे.
६. दासबोध : समर्थ रामदासांनी आपले शिष्य कल्याणस्वामी कडून हा ग्रंथ लिहून घेतला. हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्वचिंतन आहे. हा ग्रंथ कशासाठी लिहिला आहे, त्यातून रामदास स्वामींना काय सांगायचे याचे विश्लेषण ग्रंथाच्या सुरूवातीलाच आलेले आहे. त्याशिवाय मूर्खाची लक्षणे कोणती, भक्ती म्हणजे काय , खरे ज्ञान कोणते याचे विवेकपूर्ण लिखाण संत रामदासांनी या ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतील महत्वाचा वारसा आहे.
७. गीता रहस्य : ज्ञानेश्वरी नंतर मराठी भाषेत भगवद गीतेवर भाष्य करणारा हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला आहे. हा काही तत्वज्ञानाचे विवेचन करणारा ग्रंथ नसून निष्काम कर्मयोगाची माहिती सांगणारा ग्रंथ आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपला स्वार्थ सोडून दिला पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी काम करीत राहिले पाहिजे यालाच लोकमान्य निष्काम कर्मयोग म्हणतात. हा ग्रंथ म्हणजे कधीही पराभूत न होणाऱ्या व्यक्तीच्या मनाचे दर्शन असलेला सुंदर ग्रंथवारसा आहे.
८. युगान्त: युगान्त हा ग्रंथ इरावती कर्वे यांच्या संशोधकीय प्रज्ञेचा आणि ललितरम्य प्रतिभेचा कस लावणारा आहे. या ग्रंथात वैचारिक साहित्य आणि ललित साहित्य यांचा मिलाप खूप छानपणे लिहिला गेला आहे. हा ग्रंथ म्हणजे महाभारतातील व्यक्तिरेखांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी पुरुष-व्यक्तीरेखा आणि स्त्री-व्यक्तीरेखा समजून सांगताना महाभारताचा इतिहास छानपणे सांगितला आहे.
९. ऋतुचक्र : दुर्गा भागवत यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे भारतामधील सहा ऋतूंचे निसर्गावर होणारे परिणाम सहजपणे रेखाटले आहे. ऋतूंच्या बदलांचे परिणाम झाडे, प्राणी आणि माणसांवर कसे होत असतात हे सांगताना लेखिकीने भारतीय परंपरा आणि भारतीय पुराणे प्रत्येक ऋतूंशी कसे जुळले गेले आहेत याचे उत्तम वर्णन या ग्रंथात दिले आहे. उत्तम ललित लेखांचा हा ग्रंथसंग्रह प्रत्येकाने वाचलाच पाहिजे.
१०.श्रीमान योगी : रणजित देसाई यांनी मराठी भाषेतील कादंबरीच्या रुपात लिहिलेली एक उत्तम ऐतिहासिक साहित्य कृती आहे की ज्याच्यात सत्याचा स्वीकार व्यवस्थितपणे केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांवर सत्याचा आधार घेऊन ही कादंबरी लिहिण्याचे धैर्य लेखकाने दाखविलेले आहे आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. म्हणूनच मराठी भाषेतील कादंबरीच्या रूपाने आलेला हा ग्रंथ वारसा आपण जपला पाहिजे.
११.जागर : नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकात मला जागर हा ग्रंथ खूपच जवळचा वाटतो. स्वातंत्र्यानंतर भारतीय राजकारण आणि समाजकारण समजून घेण्यासाठी हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोनसुद्धा हा ग्रंथ देतो.
१२.काश्मीर एक शापित नंदनवन : शेषराव मोरे यांनी काश्मीरवर लिहिलेला एक अप्रतिम ग्रंथ आहे. यात काश्मीर प्रश्न काय आहे याचे सुंदर विश्लेषण त्यांनी या ग्रंथात केले आहे. या पुस्तकाची सुरुवात १९३१ पासून म्हणजे शेख अब्दुला यांच्या उदयापासून केली असून सर्व बाजूनी विचार करून हा ग्रंथ लिहिला आहे.
१३.मुस्लीम मनाचा शोध : मुस्लीम धर्माची व्यवस्थित ओळख करून देणारा हा ग्रंथ मराठीत सुंदरपणे शेषराव मोरे यांनी लिहिला आहे. यात इस्लाम म्हणजे काय ? मुहम्मद पैगंबर यांचे चरित्र , कुराणाचा अर्थ आणि हदीसचे महत्व सांगितलेले आहे. मराठीत इस्लाम धर्मावर लिहिलेला इतका छान ग्रंथ नाही.
१४. या सम हा : हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णाचे चरित्र आहे. मला नेहमी श्रीकृष्णाचे चरित्र खूपच आवडते. या ग्रंथात डॉ. सदानंद मोरेंनी श्रीकृष्णाला एक अवतारी पुरुष न मानता इहलोकातील मानव म्हणून हे चरित्र ग्रंथ रुपात छानपणे लिहिले आहे.
१५.डॉ. आंबेडकर ; एक चिंतन : डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे मूल्यमापन या ग्रंथात सुप्रसिद्ध समाजवादी नेते मधु लिमये यांनी केले आहे. या ग्रंथात मधु लिमये म्हणतात की डॉ. आंबेडकरांना आधुनिक भारताच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. ते नुसते बंडखोर नव्हते तर ज्ञानमार्गी बंडखोर होते असा निष्कर्ष या ग्रंथाने काढला आहे.
१६.मीरा श्याम रंगी रंगली : हा ग्रंथ लिहिला आहे वसई येथे राहणाऱ्या मॅक्सवेल लोपीस या गांधीवादी ख्रिश्चन लेखकाने. हा ग्रंथ म्हणजे संत मीराबाईंचे चरित्र आहे. इथे लेखक संत आणि चमत्कार यावरील बुद्धिनिष्ठ विश्लेषणातून विचारांचे नवीन दालन वाचकांपुढे उभे करतात. खरोखरच हा ग्रंथ वाचण्यास योग्य असा आहे.
वरती मी १६ ग्रंथाची नावे दिली आहेत कि हे ग्रंथ आपण जपले पाहिजे कारण हा ग्रंथ वारसा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचे आहे. अजून भरपूर ग्रंथ आहेत पण त्यांची नावे घालत गेलो तर ती यादी संपणार नाही. म्हणून फक्त १६ ग्रंथच घेतले. ग्रंथ वाचन माझ्यासाठी खुप महत्वाचा आणि निकटचा विषय आहे. वाचनाने ज्ञानप्राप्ती तर होतेच पण मनोरंजनसुद्धा होते. त्यातून बौद्धिक आणि मानसिक विकाससुद्धा होतो. त्यामुळे आजच्या सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टी सहजपणे लक्षात येतात. म्हणून सुप्रसिद्ध लेखक W Somerest Maugham म्हणतात, " ग्रंथात दुसरे तिसरे काहीही नसले तरी एका चांगल्या वाक्यासाठी वाचले पाहिजे. कारण थोर ग्रंथकार तुमचे विचार घडवितात आणि तुमच्या जीवनाला वेगळा आचार देतात". म्हणूनच ग्रंथ आपले चांगले मित्र असतात. यासाठीच सफदर हाश्मी आपल्या एका कवितेत म्हणतात,
किताबे करती है बाते
बीते जमानों की
किताबे कुछ कहना चाहती है |
तुम्हारे साथ रहना चाहती है ||
धन्यवाद
Comments
Post a Comment