रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १८२
विषय क्रमांक : ४
विषय : मी आणि सकारात्मकता
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
प्रत्येक माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे की नकारात्मक पडताळून पाहण्यासाठी पूर्वी एक प्रश्न विचारला जात असे. तो प्रश्न म्हणजे, तुमचा पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे? जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की ग्लास अर्धा भरलेला आहे तेव्हा ती व्यक्ती जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघते आणि प्रत्येक गोष्टींमध्ये आशावादी असते असे म्हटले जाते. सकारात्मकता म्हणजे आशावादी मार्गाचा विचार करणे किंवा अशा गोष्टींची निर्मिती करणे की जेणे करून स्वतःचे जीवन आनंदायी आणि चिंतामुक्त करणे. सकारात्मक विचार नेहमी आपणास कोणत्याही परिस्थितीत चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत करते. याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ही प्रत्येक माणसाला त्याच्या कामामध्ये चांगले यश तर देतेच पण चांगले आरोग्य देऊन त्याचे जीवन आनंदायी करते. म्हणूनच असे म्हणतात की सकारात्मक विचार ही मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण अस्वस्थ असतो किंवा दुःखी असतो तेव्हा आपण एक प्रकारचा ताण अनुभवत असतो आणि नकळत आपण नकारात्मक विचारांकडे जात असतो. याच्या उलट आपण जेव्हा आनंदी असतो किंवा समाधानी असतो तेव्हा आपण नक्कीच सकारात्मक विचारानेच काम करीत असतो. याचाच अर्थ असा जर मानवाला त्याचे आयुष्य आणि आरोग्य सांभाळायचे असेल तर त्याने आयुष्यात सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे.
सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक विनोबा भावे म्हणतात की,"कोणतेही विचार सतत वाहत असतात, म्हणून त्यांचे सामर्थ कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत जातो आणि नाहीसा होतो. पण सत्ता विचारांचीच असते. या विचारांपासून मानवाला नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्यांची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही". किती छान विचार विनोबा भावेनी मांडले आहेत. खरोखरच विचारांचे सामर्थ फार मोठे आहे. मग ते विचार सकारात्मक असो किंवा नकारात्मक. असे म्हणतात की नकारात्मक विचार करणाऱ्या माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो आणि सकारात्मक विचार करणारी व्यक्ती नेहमीच यशस्वी होत असते. कारण सकारात्मक विचारांची व्यक्ती नेहमी स्वतःची कामे करताना आत्मविश्वासाने करते. स्वतःचा स्वतःशी संवाद तर करतेच पण इतरांशीसुद्धा संवाद साधून स्वतःच्या विचारांना आधुनिक बनविते. अशी व्यक्ती नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये नावीन्य शोधत असते. एखादी समस्या सोडविताना ती पूर्णपणे सोडविण्यासाठी काय उपाय करता येईल याचा विचार करून अशी समस्या परत येऊ नये म्हणून ती कार्यक्षम तर असते पण त्या कृतीतून अनेक नवीन विचारांची उभारणी सुद्धा करीत असते. त्यामुळे समाजात एक नवचैतन्य निर्माण होते आणि त्या समाजातील प्रत्येक माणसाचा विकास साध्य होत असतो. पण याचा अर्थ असा नाही की जर तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टीने केली तर तुमचा पूर्ण दिवस सकारात्मक जाईल. याला कारण म्हणजे प्रत्येक दिवस हा वेगळाच असतो. जरी दिवसाची सुरुवात तुम्ही सकारात्मक विचाराने केली असली तरी दिवसात काहीतरी नकारात्मक विचारांच्या गोष्टी घडत असतात. त्या कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे अशा अडचणींचा सामना माणसाला करावाच लागणार. कारण येणाऱ्या अडचणीसुद्धा मानवी जीवनाचा भाग आहे. अशा वेळीस नकारात्मक विचार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून अशी कोणती गोष्ट करू शकतो की ज्यामुळे स्वतःला त्या गोष्टींमधून आनंद मिळेल आणि चांगले विचार अनुभवू शकेल. यात मी माझे एक उदाहरण देऊ इच्छितो. मी मुंबईला माहीम भागातील रहिवासी आणि नोकरीच्या निमित्ताने मला बेलापूरला जावे लागत असे. रोजचा लोकलचा प्रवास एक तासापेक्षा अधिक वेळेचा आणि कंटाळवाणा होता. तेव्हा मी यातून मार्ग काढला तो म्हणजे रोज पुस्तकांचे वाचन करावे आणि जमल्यास गाडीत येणाऱ्या व्यक्तींबरोबर संवाद साधावा. असे केल्याने माझा वेळ चांगला जाऊ लागला. वाचनामुळे ज्ञान वाढू लागले आणि भाषा सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ लागली. गाडीत येणाऱ्या इतर लोकांशी संवाद साधल्याने बरेच मित्र तर मिळालेच पण त्यांच्या विचारांमुळे अनेक प्रकारची माहिती उपलब्ध झाली.
वर म्हटल्याप्रमाणे सकारात्मक विचार ही एक अशी भावनिक वृत्ती आहे की ती नेहमी चांगल्या किंवा महान गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करते आणि त्यातून आपल्याला लाभदायक गोष्टी मिळत जातात. अशा वेळीस मला महान कवी जॉन मिल्टन यांच्या, " On His Blindness " या कवितेची आठवण येते. इ. स.१६७३ मध्ये प्रसिद्ध झालेली ही कविता आजही वाचताना खुप आनंद देते आणि आपल्याला सकारात्मक विचार करायला तयार करते. या कवितेत दोन मनांचे संवाद फार छानपणे मांडले आहेत. ही कविता लिहिण्याच्या अगोदर मिल्टन पूर्णपणे आंधळे झालेले असतात. या अंधत्वामुळे ते खूप निराश झाले होते. या कवितेत ते देवाला एक प्रश्न विचारतात की आजपर्यंत तुझी प्रामाणिकपणे सेवा केली त्याचे परिणाम म्हणून तु मला अंधत्व दिले का? त्याच वेळेला त्यांचे दुसरे मन त्यांना सकारात्मक विचार देतात. ते म्हणतात परमेश्वरावरची त्यांची श्रद्धा ढळली, म्हणून परमेश्वराला काहीच फरक पडत नाही. कारण त्याचे सामर्थ्य प्रचंड आहे. तेव्हा परमेश्वराला दोष देण्यापेक्षा मी अनेक काव्याची निर्मिती करू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी On his Blindness या महाकाव्याची निर्मिती केली आहे. जॉन मिल्टनप्रमाणे अशी अनेक व्यक्तिमत्वे आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना सकारात्मक विचार करून आपले आयुष्य घडविले आहे. त्यापैकी एक आहे सुप्रसिद्ध लेखक स्टिफन किंग. या लेखकाने सुरुवातीला खूपच त्रास सहन केला आहे. हा लेखक आणि त्याची बायको ती सुद्धा लेखक होती. पण दोघेही फार गरिबीत दिवस काढत होते. स्टिफन किंगचे अनेक लिखाण नाकारण्यात येत होते. तरीसुद्धा त्याने आपले लिखाण चालू ठेवले आणि सकारात्मक विचार करीत त्याने, " द ग्लास फ्लोर ' ही कथा लिहिली. पुढे त्याने कॅरी नावाची लिहिली आणि ती एका प्रकाशकाला विकली. या कथेमुळे त्याचे आयुष्य बदलले आणि आर्थिक समस्यातून स्टिफन किंग बाहेर आला. पुढे अनेक साहित्याची निर्मिती त्याने केली. अशीच एक गोष्ट जिम कॅरी नावाच्या विनोदी नटाची आहे. आयुष्यात आलेल्या समस्यांचा सामना करीत तो एक यशस्वी विनोदी नट झाला कारण त्याच्या सकारात्मक विचारांमुळे. स्टिफन किंग आणि जिम कॅरी या दोघांप्रमाणे अजून दोन व्यक्तिमत्वांची चरित्रे फारच प्रेरणादायक ठरतात. ती व्यक्तिमत्वे आहेत सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार वॉल्ट डिस्ने आणि सुप्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग जिने हॅरी पॉटर नावाचे एक व्यक्तिमत्व तयार केले. या दोघांनीही आयुष्यात अनेक अडचणींवर मात करून आपले आयुष्य घडविले. याला कारण त्यांचे सकारात्मक विचार. अशा या चार जणांची चरित्रे जरूर वाचावीत म्हणजे आपल्याला त्यातून प्रेरणा मिळत जाते.
सकारात्मक विचार असणे हे जरी चांगले असले तरी सकारात्मक होण्यासाठी आपल्या भावना काही विरोधी भावना दाबणे फार वाईट असते. अशा वेळीस ही सकारात्मकता विषारी सकारात्मकता होण्याची शक्यता असते. बऱ्याचवेळी आपल्याला समाजात हसतमुख, आनंदी आणि सकारात्मक असलेल्या व्यक्ती खूपच दुःखी असल्याचेसुद्धा दिसून येतात. त्यांचे जीवन एकप्रकारे विस्कळीत झालेले असते. तरीसुद्धा अशा व्यक्ती शांतपणे आणि सकारात्मक पद्धतीने राहत असते. वास्तविक जीवनातील विषारी वेदना कमी करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अशा व्यक्ती सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ही सकारात्मकता विषारी असल्याचे अनेक मानसशात्रज्ञ सांगतात. कोलंबिया विद्यापीठातील सल्लागार म्हणून काम करत असलेल्या डॉ श्वेता शर्मा लिहितात की जेव्हा सकारात्मकतेला मानवी अनुभव झाकण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी भाग पाडले जाते तेव्हा सकारात्मक विचार विषारी बनतात. ते जास्त प्रमाणात केल्यास माणसाचे मानसिक आरोग्य खराब होऊ शकते. त्यातून हृदयवीकारांसारखे रोग निर्माण होऊ शकतात आणि माणूस सतत भीतीदायक जीवन जगू लागेल. त्यामुळे प्रत्येक माणसाला त्याच्या वेदना किंवा दुःखे मांडण्यासाठी तयार केले पाहिजे. तसे केल्यास तो असुरक्षितेतून बाहेर येईल. त्यासाठी डॉ शर्मा सांगतात की अशा व्यक्तींना त्यांच्या वेदनादायिक भावना सांगण्यास तयार करावे, त्यांच्यातील अपराधीपणाची भावना दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना चांगला दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न करावा. जर तसे केले नाही तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात नैराश्य येईल किंवा अशा व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील. तेव्हा अशा व्यक्तींना समजून घेऊन त्यांना त्यांच्या कठीण भावना व्यक्त करावयास लावावे आणि त्यांच्या अडचणींशी सामना करण्यासाठी तयार करावे. हे सर्व करताना अशा व्यक्तींच्या जीवनातल्या वास्तवाशी खेळणे टाळावे आणि समतोल राखून अशा विषारी सकारात्मकतेला आळा घालावा. त्यामुळेच आपले जीवन अधिक सुंदर आणि आनंदी होऊ शकते.
सकारात्मकते बद्दल लिहीत असताना मला जाणवले की मीसुद्धा बऱ्याचवेळा सकारात्मक विचार रुजविण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणतेही नवीन काम मला सुरुवातीला जमणार नाही हे मला मान्य आहे पण प्रयत्न केल्यास ते जरूर होणार ते मी मनाशी ठरवत असतो. एखादे विचार मांडताना ते कुणाला आवडेल किंवा नाही आवडणार याचा विचार न करता स्वतःच्या आत्मविश्वासावर मी माझे विचार मांडीत असतो. अशावेळीस सकारात्मक विचारांची खूप मदत होते. मी जेव्हा माझे लेख लिहितो तेव्हा माझ्या लेखाविषयी मित्रपरिवारात टिंगल केली जाते तेव्हा वाचून वाईट वाटते. पण त्याकडे लक्ष न देता मला वाचनातून मिळालेल्या ज्ञानाचा फायदा कोणाला तरी होईल असा सकारात्मक विचार करून मी लिहीत असतो. स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी मी नेहमीच स्वतःशी संवाद तर साधतोच तसा इतरांशी सुद्धा साधत असतो. मला माहीत आहे की माझे विचार जर मी जबरदस्तीने मांडले तर ते कोणी ऐकून घेणार तर नाही पण त्यातून नाते संबंधावर सुद्धा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःचे विचार व्यवस्थित संवाद साधून मांडले तर अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजतात आणि त्यातून सकारात्मक विचार तयार होण्यास मदत होते. इथे मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते की इतर व्यक्ती आपल्या बद्दल काय बोलतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून आपली किंमत ठरवू नये. कारण आपण स्वतःला चांगले ओळखू शकतो. जेव्हा मी सकारात्मक पद्धतीने विचार करतो तेव्हा माझा आत्मविश्वास वाढत जातो, माझी एकाग्रता वाढली जाते, चांगला सुसंवाद होऊ लागतो. या सगळ्यांचा परिणाम दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तर होतोच पण जीवनातील विसंगतीना अनुसरून थोडा विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे असे प्रकार होऊन जीवन आनंदी होते. म्हणून मला वाटते की सकारात्मक विचार आपल्या क्षमतांचा उपयोग पूर्णपणे करण्यास शिकवते. त्यातून चांगले काम होऊन त्या कामाचे चांगले फळ मिळते आणि चित्त प्रसन्न राहते.
धन्यवाद
Comments
Post a Comment