Skip to main content

Mahastra Maza महाराष्ट्र माझा

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १८४
विषय क्रमांक : ४
विषय : महाराष्ट्र माझा
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ : 

१ मे १९६० रोजी भारताच्या पश्चिमी भागात मराठी भाषेचे सुंदर राज्य महाराष्ट्र या नावाने निर्माण झाले. तसे बघायला गेलं तर महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून सुंदर प्रदेश होता. १ मे १९६० रोजी त्याने आपले नवीन रूप धारण केले. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा असे अनेक मराठी प्रांत एकत्र येऊन मराठी भाषेचे राज्य निर्माण केले आणि आपल्या  सामर्थांनी मराठी संस्कृती भारताच्या  कानाकोपऱ्यात तर नेली तशीच भारताबाहेरसुद्धा पोहचविली. भारतात वेगवेगळ्या भाषांची राज्ये आहेत. ती सर्व राज्ये त्या भागातील भाषिकांना त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. तसाच महाराष्ट्रसुद्धा आम्हा मराठी भाषिकांना प्राणापेक्षा खूप प्रिय आहे. याचे समर्थन करताना आचार्य अत्रे म्हणतात, " महाराष्ट्र हे आमच्या भाषाप्रदेशाचे आणि भाषिक राज्याचे अभूतपूर्व नाव आहे ! त्या नावातच केवढा अभिमान, केवढे आव्हान आणि केवढी भावना भरलेली आहे. नुसतें नाव जरी उच्चारले म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल नि संस्कृती डोळ्यांपुढे उभी राहते. जगामध्ये इतके सार्थ आणि समर्पक नाव क्वचितच एखाद्या देशाला प्राप्त झाले आहे". किती छानपणे आचार्य अत्रेनी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे आणि त्यात कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही. या भारत देशात स्वर्ग असलेला काश्मीर आहे, सुंदर हिमाचल आहे, अधिक संपन्न असलेला पंजाब आहे, दक्षिण भागात केरळ, आंध्र, तामिळनाडू आणि कर्नाटक सारखी वैभव संपन्न अशी राज्ये आहेत तरी सुद्धा आपल्याला महाराष्ट्र खूपच छान वाटतो. याला कारण म्हणजे सौंदर्यसंपन्नतेपासून त्या त्या पायाभूत अशा इतिहासापर्यंत सर्व बाबींचा अभ्यास केला तर नक्कीच समजेल. भारताच्या इतिहासात शीख, रजपूत, बंगाली वगैरे लोकांनी उज्वल इतिहास जरूर लिहिला असेल पण महाराष्ट्राच्या शूर आणि सुंसंस्कृत लोकांनी जो काही इतिहास घडविला आहे त्या इतिहासाची सर नाही किंवा त्या इतिहासाला तोड नाही. स्वदेशावरील निष्ठा, अभिमान आणि त्याचे रक्षण करण्याची आम्हाला शिकवण प्रथम दिली ते म्हणजे आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी. ब्रिटिश सत्तेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीणारच  असे सांगून  पहिल्यांदा  भारतीय स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले ते लोकमान्य टिळकांनी. सामाजिक सुधारणा करण्याचा पहिला मान जरी बंगाली प्रदेशाला मिळाला असला तरी त्या सर्वपरीने घडवून आणण्याचा प्रयत्न रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, महर्षी धोंडू केशव कर्वे, विठ्ठल रामाजी शिंदे, डॉ आंबेडकर, महात्मा फुले, ताराबाई शिंदे यांनी महाराष्ट्रात केला हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पुढे या लोकांकडून प्रेरणा घेऊन मुस्लिम समाजात सुधारणा करण्याचे काम हमीद दलवाई, सय्यद भाई, हुसेन जामदार या मराठी मुस्लिम नेत्यांनी केले आहे. आज नुसती महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व स्त्रिया शिकून आपले भविष्य घडवू शकतात ते केवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळेच. त्याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना तसेच पीडित लोकांना कायाद्याचे कवच देऊन फार मोठे उपकार केले आहेत. असा हा महाराष्ट्र आज साहित्य, क्रीडा आणि अनेक क्षेत्रात उज्वल काम करून महाराष्ट्राबरोबर भारताचे नाव मोठे करीत आहे. उत्तुंग पर्वत रांगेत वसलेला, गगनाला प्रदक्षिणा घालण्याची आकांशा बाळगणारा, अंतःकरणाचे औदार्य व  सदगुणांची संपदा असणारा त्याचप्रमाणे पराक्रम, भक्ती आणि वैराग्य एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश म्हणजे महाराष्ट्रच आहे. म्हणून कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी रचलेले, "बहू असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राला पूर्णपणे सार्थ आहे हे कळून येते.

प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक धर्मानंद कोसंबी यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार वर्षांपासून पंढरपूरची यात्रा भरत होती. याचाच अर्थ महाराष्ट्राला प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते. काही अभ्यासक असेही दाखवून देतात की महाराष्ट्राचे नाव प्राचीन संस्कृत आणि प्राकृत साहित्यात तिसऱ्या शतकापासून नोंदवले गेले आहे. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक चिंतामण विनायक वैद्य लिहितात की महाराष्ट्राची प्राचीनता सनपूर्व ६०० पर्यंत मागे जाते तर काहींच्या मते सनपूर्व ३००च्या सुमारा पर्यंत जाते. त्यात मराठी भाषेमुळे मराठी संस्कृती निर्माण झाल्याचे दिसते. रामायण आणि महाभारतातसुद्धा महाराष्ट्रातील काही प्रदेश, नद्या आणि पर्वतांचा उल्लेख आढळतात. प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास वाचताना एक गोष्ट मात्र नक्की जाणविते ती म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय इतिहास कितीही वेगळा असला तरी सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास हा बराचसा समान आहे. आजही आपल्याला तसे जाणवत आहे. गोवा, बेळगावी, कारवार, निपाणी, हुबळी आणि धारवाड सारखे प्रदेश आजच्या भौगोलिक महाराष्ट्रात काही राजकीय कारणामुळे आले नसले तरी त्या प्रदेशाच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीकोनात बरेच साम्य असल्याचे जाणवते. इतिहासचार्य चि.वि.वैद्य यांच्या मते ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो तो भूप्रदेश प्राचीनकाळी विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरान्त, बोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जात होता आणि त्या राज्यात महाराष्ट्राचीच संस्कृती जोपासली जात होती. ते पुढे असे सांगतात की सातवाहानांच्या शिलालेखात 'महारठी' हे नाव आढळते.  यावरूनच या प्रदेशाला महारठ असे नाव पडले  आणि त्याचे संस्कृत रूप म्हणून महाराष्ट्र हे नाव प्रचलीत झाले. चि. वि. वैद्य यांनी असेही दाखवून दिले आहे की वररुची, वात्स्यायन, भरतमुनी यांच्या ग्रंथातसुद्धा महाराष्ट्र हे नाव आढळते. त्याप्रमाणे ब्रह्मपुराणातही महाराष्ट्र असे नाव आढळते. थोडक्यात  महाराष्ट्र हा प्रदेश प्राचीन काळापासून उपलब्ध असल्याचे अनेक पुरावे बऱ्याच इतिहासाकारांनी दिले आहेत. प्राचीन काळात महाराष्ट्रात मौर्य, सातवाहन, वाकाटक, कलाचुरी, चालुक्य आणि यादव अशा अनेक राजवंशाचे राज्य होते. असे म्हणतात की आजच्या महाराष्ट्रातील कोकण हा मौर्य साम्राज्याचा भाग होता तर विदर्भ वाकाटक साम्राज्याचा भाग होता. पैठण तर सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. चालुक्यांचा मुक्काम नाशिक येथे होता. तेव्हा गोवा, कोल्हापूर, कोकणातील काही भाग चालुक्यांचे मांडलिक होते. पुढे यादवांनी चालुक्यांचा पराभव केला आणि त्यांचे साम्राज्य आपल्या अधिपत्याखाली आणले. यादव राजांनी धार्मिक सहिष्णूता आणली आणि मराठी भाषेला राजवैभव प्राप्त करून दिले आणि त्या भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. प्राचीन काळात महाराष्ट्र असल्याचा अजून एक पुरावा म्हणजे सातव्या शतकात महाराष्ट्रात आलेले चिनी बौद्ध भिक्षुक ह्यूएनत्संग यांनी केलेली मराठी लोकांबद्दलची प्रशंसा. या लोकांची प्रशंसा करताना ह्यूएनत्संग म्हणतात, "मराठी लोक हे साधे असून प्रामाणिक आहेत. त्यांचा स्वभाव निग्रही व करारी आहे. मित्रांशी कृतज्ञ आणि शत्रुंशी निर्दय अशी त्यांची वृत्ती आहे. जर कुणी त्यांचा अपमान केला तर ते त्याचा सूड घेतल्याशिवाय राहत नाही. मग त्यात त्यांच्यावर प्राण संकट आले तरी त्याला ते भीत नाही".  या विवेचनातून असे दिसून येते की महाराष्ट्राचा इतिहास हा प्राचीन काळापासून उपलब्ध असलाच पाहिजे. 

वर म्हटल्या प्रमाणे महाराष्ट्राचा इतिहास हा तीसऱ्या शतकापासून असल्याचा पुरावा सापडतो पण त्या अगोदरचा इतिहास काय आहे याबद्दल ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. असे म्हणतात त्याआधी महाराष्ट्र हा सम्राट अशोक साम्राज्याचा भाग होता आणि त्या काळात तो दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. पण मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्र हा प्रदेश सर्वप्रकारच्या कार्यात प्रगत होऊ लागला. जेव्हा इस्लाम सम्राज्यांचा अंमल महाराष्ट्रात होऊ लागला, तेव्हा त्यात मराठी जनतेची मानसिक गुलामगिरी सूरू झाली आणि समाजाची आत्मनिर्भरता हरवली गेली. त्यातून मुक्तता देण्यासाठी संतप्रबोधनाची चळवळ सूरू झाली. अशावेळेस संतांनी समाजाच्या अंतरंगात नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी लोककलेचा वेगवेगळ्या अंगाने उपयोग केला. याची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलीने जरी केला असली तरी त्यांच्या अगोदर वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, वासुदेव सारखी माणसे घरोघरी जाऊन लोकवाणीतून प्रबोधन करीत असत. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत रामदास यांनी आपल्या अभंग, कीर्तन, भारूड यातून प्रतिकात्मक लोकभूमिकांमध्ये रुपकात्मक पद्धतीने अध्यात्मिक विचारांची मांडणी केली आणि समृद्ध लोककलांचा वारसा निर्माण केला. त्यातून पुढे अनेक प्रकारचे नृत्य, लावणी, पोवाडा, नाट्य, संगीत  निर्माण झाले. त्यातून मनोरंजन तर झाले पण तत्वज्ञानाची नवीन काव्ये निर्माण झाली. याच कालखंडात मराठी राज्याचे पाहिले साम्राज्य उभारले गेले ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. महाराजांनी जबरदस्त मावळ्यांची फौज उभी केली. ते करताना त्यांनी त्यांची मनगटे पोलादी बनविली आणि १६४७ रोजी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आदिलशहाचा तोरणा किल्ला जिंकून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मोगलशाही विरुद्ध लढा उभाकरून स्वतंत्र मराठा राज्य अस्तित्वात आणले. पुढे हा लढा छत्रपती संभाजीराजे आणि अनेक मराठ्यांनी चालू ठेवून मराठी साम्राज्याचा वारसा चालूच ठेवला. कालांतराने मराठी राज्यांची सूत्रे पेशव्यांकडे आली आणि त्यांनी मराठी साम्राज्याचा लढा अटकेपार नेला आणि मराठी साम्राज्य अनेक भारतीय भागात निर्माण झाले. पुढे झालेल्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठी साम्राज्य विस्कळीत होऊ लागले.  तेव्हा माधवराव पेशवानी आपल्या कर्तुत्वाने मराठी सम्राज्याची घडी नीट बसविली. पण १९१८ रोजी पेशवाईचा अंत करून ब्रिटिशांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या आधीपत्याखाली आणला. ब्रिटिशांनी अनेक सामाजिक सुधारणा करताना अनेक नागरी सुविधा आणल्या. त्याचा फायदा घेऊन महात्मा फुले, लोकहीतवादी, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे यांनी सामाजिक सुधारणा करून महाराष्ट्राला नवीन दृष्टीकोन दिला. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी मांडलेल्या छळाला कंटाळून आम्हाला स्वातंत्र्य हवे यासाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके,  रॅडचा वध करणारे चाफेकर बंधू, स्वराज्याचा पहिला मंत्र सांगणारे लोकमान्य टिळक, भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे स्वातंत्रवीर सावरकर, साताऱ्याचे नाना पाटील ( त्यांना पत्री सरकार असेही म्हणत), सेनापती बापट, एस एम जोशी, मधु लिमये, अच्युतराव आणि रावसाहेब पटवर्धन असे अनेक स्वातंत्रवीर महाराष्ट्रात जन्मले. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास हा साऱ्या भारतवर्षाला भूषविणारा ठरतो. हा इतिहास हेच दर्शवीतो की स्वदेशापुढे आणि स्वातंत्र्यापुढे महाराष्ट्राला आपल्या प्राणांची किंमत देण्यास काहीच वाटत नाही. म्हणूनच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर म्हणतात,
" गगनभेदी गिरिविण अणु नच जिथे उणे
 आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
 अटकेवर जेथले तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा ||

जशी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे अध्यात्मिक अधिष्ठानसुद्धा महाराष्ट्रात रोवले गेले ते मराठी संत साहित्यामुळे. ही सर्व संतमंडळी सर्व जातीतील होती. त्यात ब्राह्मण होते तसेच शूद्र पण होते. शिंपी, कुंभार, माळी आणि महारही होते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संत साहित्याने फक्त भागवत धर्माचा प्रचार केला नाही तर वर्णसमता निर्माण करून समाजातील वर्णविषमता आणि जातीविषमता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व देव एकच आहे असे सांगून संत नामदेव सांगतात, " विठ्ठल जातीभेद पाहत नाही, उच्चनीच भेद मानीत नाही. तो फक्त शुद्ध भाव जाणतो. तर संत एकनाथ म्हणतात की कुठल्याही अध्यात्मिक गोष्टींचा विचार करताना जाती अप्रमाण आहे, भक्तीच फक्त प्रमाण आहे. जरी सर्व संतांना वर्णजातीविषमता मान्य नसली तरी व्यवहारात समता पाळावी हे त्यांना सांगणे कठीण होत होते. केवळ मोक्षाच्या व भक्तीच्या दृष्टीकोनातून का होईना त्यांनी वर्ण समतेचा पुरस्कार केलेला दिसतो. तसे करताना त्यांनी मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम केले आहे. प्रथम मुकुंदराजांनी व नंतर महानुभावांनी मराठीत ग्रंथरचना करण्यास प्रारंभ केला. त्यावेळीस सर्व शास्त्रीपंडित मराठीत एखादा ग्रंथ लिहिणे हे धर्मशास्त्राच्या विरोधात असून तसे करणे पाप आहे असे समजत. माझा मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेही पैजासी जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन || असे सांगत संस्कृतमध्ये असलेली भगवद गीतेचे विश्लेषण करून संत ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि सर्व मराठी समाजाला भगवद गीतेची माहिती करून दिली. पुढे संत तुकाराम, संत रामदास, संत गोराकुंभार, संत चोखामेळा सारख्या संतांनी मराठी भाषेला आणि साहित्याला अभूतपूर्व तेज दिले. त्यामुळे सर्व मराठी समाज त्यांचा आजन्म ऋणी राहील. म्हणून साहित्य हे मानवी संस्कृतीचे महत्वाचे अंग बनले आहे. असे म्हणतात कुठलेही साहित्य हे देश घडविण्यास मदत करीत असते. संतसाहित्यानंतर मराठीत श्रीधर, मोरोपंत, वामन, मुक्तेश्वर सारखे अख्यान कवी निर्माण झाले. त्यांनी रामायण, महाभारत व पुराणे यातील राम, कृष्ण, हरिश्चंद्र, ध्रुव यांच्या कथा मराठीत आणून या महापुरुषांची चरित्रे मराठी समाजापुढे ठेवून त्या समाजाला वेगवेगळ्या प्रेरणा दिल्या. याचवेळी महीपति सारखे चरित्रकार निर्माण झाले. त्यांनी संतांची चरित्रे लिहून धर्मजागृतीचे काम केले आहे. त्यानंतर मराठी काव्याची पहाट झाली ती शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यामुळे. अगीनदास, तुळशीदास, परशुराम, होनाजी बाळा, अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ असे नामवंत शाहीर अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात होऊन गेले. त्याच काळात गद्य  बखर साहित्यसुद्धा लिहिले जात होते. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की बखर साहित्य म्हणजे इतिहास नव्हे. कारण हे लिखाण पुराणांच्या धर्तीवर लिहिले गेले आहे. इतिहासकाराची वस्तुनिष्ठ दृष्टी व सत्याची चिकित्सा त्यात नसली तरी भाषेचा थाट, वर्णन शैली, संभाषणातील ऐट आणि शब्दाशब्दांमधून व्यक्त होणारा स्वाभिमान यामुळेच बखरी वीर पुरुषांचे पराक्रम डोळ्यांसमोर उभे करतात. पण मराठी साहित्य खऱ्या अर्थाने फुलू लागले ते ब्रिटिश कालखंडात. तो पर्यंत फक्त संस्कृत भाषेतील साहित्य मराठीत येत होते आणि पोवाडे, अभंग, कीर्तन, बखरी यांचे स्वरूप मर्यादित होते. त्यात भौतिक विद्या नव्हती. इंग्लिश शिक्षणामुळे ती भौतिक विद्या भारतीयांना मिळू लागली आणि त्याचा परिणाम भारतीय लोकांवर होऊ लागला. मराठीत याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. १८३२ मध्ये त्यांनी प्रथम दर्पण हे मराठी साप्ताहिक सूरू केले. त्यानंतर लोकहितवादी, महात्मा फुले, विष्णूशास्त्री चिपळूणकर, रामकृष्ण भांडारकर, भाऊ दाजी लाड, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ आंबेडकर, डॉ पा. वा. काणे, वै. का. राजवाडे, न्यायमूर्ती मु. तेलंग  आणि लोकमान्य टिळक यांच्यासारखे विद्वान निर्माण झाले आणि धर्मक्रांती होऊन मराठी साहित्यास वेगळे रूप प्राप्त झाले. मग पुढे मराठी इतिहासकार म्हणून ल. रा. पांगारकर, गों.स. सरदेसाई निर्माण झाले. या भौतिक विद्येमुळे मराठी काव्याला वेगळी दिशा मिळत गेली आणि कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांनी मराठी कवितेचे स्वरुपच बदलून टाकले.नवा शिपाई ही त्यांची सुंदर कविता अभ्यासण्याजोगी आहे. केशवसू्ताप्रमाणे बालकवी, रेव्हरंड टिळक, गोविंदग्राज, केशवकुमार, कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, कवी अनिल, इंदिरा संत, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके असे कवी आणि कवयत्रीने मराठी भाषेला नवीन तेज दिले. काव्याप्रमाणे कादंबरी, लघु कथा, ललित लेख, विनोदी साहित्य निर्माण झाले. बाबा पदमनजी यांनी मराठीत पहिली कादंबरी यमुनापर्यटन ही १८५७ मध्ये  लिहिली. त्यानंतर हरिभाऊ आपटे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, वामन मल्हार जोशी, माडखोलकर, श्री.व्य. केतकर, मामा वरेरकर, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, रणजित देसाई, शिवाजी सावंत, बाळुताई खरे, गीता साने, कुमुदिनी प्रभावळकर, वगैरे लेखकांनी मराठीत कादंबरी लिहून मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोदावरी परुळेकर, नरहर कुरुंदकर, सेतू माधवराव पगडी यांच्या सारख्या लेखकांनी मानवतावादी आणि ऐतिहासिक विश्लेषण करून मराठी साहित्याला उच्च दर्जा दिला आहे. अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, व. पु. काळे, वसुंधरा पटवर्धन यांनी मराठी कथेत मोलाची भर घातली आहे. राम गणेश गडकरी, कोल्हटकर, चि. वि.जोशी, रमेश मंत्री, बाळ गाडगीळ, बाळ सामंत, वि. आ. बुआ, आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठीत विनोदी साहित्य लिहून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. यापैकी बऱ्याच लेखकांनी मराठी नाटके व एकांकिका लिहून मराठी साहित्य उज्वल केले आहे. त्यात भक्ती प्रमाणे विचारांची सुद्धा वेगळी दिशा होती. म्हणून गोविंदाग्रज आपल्या महाराष्ट्र गीतात म्हणतात,
"देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ
जिथे रंगली साधीभोळी जनाईची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी ".

मराठी साहित्याप्रमाणे महाराष्ट्रात संगीत, नाट्य, चित्रपट, नृत्य, चित्रकला, शिल्प यांच्या सारख्या कलासुद्धा बहरू लागल्या. बाळकृष्णबुआ इचलकरंजीकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महाराष्ट्रात प्रथम आणले. नंतर त्यांचे शिष्य पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर यांनी हे शास्त्रीय संगीत आत्मसात करून संगीत विद्या स्थापन केली व संगीत शिकण्याची रीतसर पद्धत निर्माण केली. पुढे त्यांची परंपरा त्यांचे शिष्य भास्करबुआ बखले यांनी चालू ठेवली आणि महाराष्ट्राला असे दोन जबरदस्त गायक दिले ते म्हणजे मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व. मग पुढे केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, गोविंदबुवा शाळीग्राम, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर आणि किशोरी आमोणकर यांनी शात्रीय संगीत मराठी समाजात रुजवली. शास्त्रीय संगीताप्रमाणे कौटुंबिक गीते, बालगीते, स्त्रीगीते, कोळी गीते, गौळणी, पोवाडे सारखे लोकसंगीतही समाजात पसरवून समाजाचे मनोरंजन करू लागले. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताप्रमाणे मराठी नाट्य संगीत आणि चित्रपट संगीतानेसुद्धा क्रांती केली आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, मा. कृष्णराव, ज्योस्त्ना भोळे, केशवराव भोसले यांनी नाट्यसंगीतात तर माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधीर फडके यांनी मराठी चित्रपट आणि भावागीतांना भारतात आणि परदेशातही कीर्ती मिळवून दिली आहे. कंठसंगीताप्रमाणे वाद्यसंगीतातसुद्धा महाराष्ट्राने अनमोल कामगिरी केली आहे. अण्णा परचूरे, डॉ. विनायक राव लिमये व विष्णुबुवा माटंगे ही माणसे उत्तम सतार वाजवीत असत. पेटी वादनात मधुकर पेडणेकर, शांताराम मांजरेकर, मुरलीधर नागेशकर, रत्नकांत रामानाथकर ही नावे अजरामर झाली आहेत. यात अजून एका व्यक्तीचा उल्लेख करावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे मुरारबा गोवेकर. ही व्यक्ती गाणे, सतार, तबला आणि पखवाज या चारी गोष्टीत तरबेज होती. संगीताप्रमाणे महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय असणारी गोष्ट म्हणजे नाटक. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांनी मराठी नाट्य प्रकार सूरू केला. पण त्यात तमाशा, भारुडे, दशावतार यांचेच मिश्रण होते. नाट्यकलेचा खरा प्रारंभ १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी "संगीत शाकुंतल" हे नाटक रंगभूमीवर आणून केला. त्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृ. प्र. खाडिलकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर यांनी अप्रतिम नाटके मराठी रंगभूमीला दिली. लेखकाप्रमाणे अनेक मराठी नट आणि नायिका यांनी मराठी रंगभूमीला जागतिक दर्जा दिला आहे. त्यात श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, राम मराठे,मधुकर तोरडमल, अरुण सरनाईक, दादा कोंडके, अशोक सराफ, शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, दत्ता भट, प्रसाद सावकार यांची नावे प्रामुख्याने येतात. नाटकाप्रमाणे चित्रपट कलाही महाष्ट्रात मोठी झालेली आहे. याची सुरुवात झाली ती दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली काढलेल्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाने. दादासाहेब फाळके हे रंगभूषाकार, छायाचित्रकार, नेपथ्यकार, लेखक व तंत्रज्ञ होते. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपट युगाचे प्रवर्तक असे म्हटले गेले आहे. पुढे बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, केशवराव धायबर, एस फत्तेलाल, विष्णुपंत दामले, राजा परांजपे, भालजी पेंढारकर, बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, संजय जाधव आणि नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटासाठी भरपूर योगदान दिले आहे. महाराष्ट्रात अजून कलेचा उल्लेख करणे जरुरीचे आहे. त्या कला म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला. चित्रकलेचा उगम महाराष्ट्रात झाला तो १८५७ मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेची स्थापना झाल्यावर. तेव्हा पासून रा. ब. महादेव,  विश्वनाथ धुरंधर यांच्या सारखे जागतिक दर्जाचे चित्रकार महाराष्ट्रात निर्माण झाले. आबालाल रहिमान, नी. म केळकर, मुरलीधर आचरेकर, बाबुराव पेंटर, नारायण श्रीधर बेंद्रे, मकबूल फिदा हुसेन सारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महाराष्ट्रात निर्माण झाले. चित्रकलेप्रमाणे  शिल्पकलेतही मराठी कलाकारांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. विनायक पांडुरंग करमकर, र. कृ. फडके, राम वंजी सुतार आणि बा.व. तालीम या मराठी शिल्पकारानी महाराष्ट्राचे नाव जगात मोठे केले आहे. 

असा या महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रामध्ये विशेष पराक्रम केले आहेत. क्रिकेट या खेळामध्येसुद्धा सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, एकनाथ सोलकर, विजय हजारें, चंदू बोर्डे सारख्या मराठी खेळाडूंनी भारताचे नाव जगात मोठे केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा आम्हाला आनंद होत आहे. पण आज हा आनंद हरवून गेल्या सारखा वाटत आहे. सर्व प्रकारच्या प्रेरणा मंदावलेल्या आहेत. ध्येयवाद, त्याग, लोकसेवा, भव्य आकांक्षा हे सर्व गुण महाराष्ट्रातून लोप पावत असल्याचे जाणवत आहे. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा बघणे चालू आहे आणि त्यासाठी कुठलीही किंमत देण्यास तयार आहोत. आज सर्व जगभर संचार करून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या जनतेत प्रबोधन घडवून आणणारे कुणीच दिसत नाही. मराठीत चांगल्या साहित्याची निर्मिती होत नाही आहे. फक्त भाषांतरच होते आहे. आज मराठी लोक फक्त व्यवहार समजण्यासाठीच इंग्रजी भाषा शिकतात.त्यामुळे ते ना धड इंग्रजीत लिहितात ना मराठीत. अशावेळेस मराठी भाषेची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. जर माणसाला साहित्य, संगीत आणि कुठलीही कला मिळाली नाही तर तो फक्त पशु होईल. त्याच्याकडून कुठलेही पराक्रम होणार नाही. कारण मानवी मनाला स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे काम ग्रंथच करीत असतात. सर्व भारतावर मराठ्यांचे साम्राज्य होऊ शकले नाही आणि १८१८ मध्ये मराठ्यांची सत्ता गेली याचा नीटपणे अभ्यास केला तर जाणवेल की धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्रांती होणे तेव्हा गरजेचे होते. फक्त रणांगणावरील पराक्रम पुरेसा असत नाही. म्हणून प्रत्येक मराठी माणसाने अनेक विषयाचे ज्ञान मिळवून स्वतःला  त्यात पारंगत करून घ्यावे आणि ते ज्ञान आपल्या समाजाला द्यावे. तरच महाराष्ट्राची प्रगती होईल आणि त्यामुळे भारताची सुद्धा. शेवटी महाराष्ट्र हे भारतातील फार महत्वाचे राज्य आहे. म्हणून सेनापती बापट नेहमी म्हणत असत,
"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले |
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले ||
खरा वीर वैरी पराधीनतेचा |
महाराष्ट्र आधार या भारताचा ||".

शेवटी महाराष्ट्र कसा असावा याचे वर्णन वसंत सबनीस यांच्या विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यातील चार ओळी देऊन हा लांबलेला लेख संपवत आहे.

" वरून रांगडा कणखर काळा,ओबड धोबध मातीचा |
   अंतरात परि संत नांदती, बोल सांगतील मोलाचा ||"

धन्यवाद
योगेश गोगवेकर 


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...