Skip to main content

GUDHI PADAVA ANI MARATHI NAVIN VARSH -गुढी पाडवा / मराठी नववर्ष

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १८०
विषय क्रमांक : ३
विषय : गुढी पाडवा / मराठी नववर्ष
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई 
संकेत स्थळ : 

हिंदू पंचांगानुसार (कॅलेंडर) चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्ल प्रतिपदा या दिवशी येणारा सण म्हणजे गुढी पाडवा. महिन्याच्या सुरुवातीला येणारा हा सण भारताच्या काही भागात खासकरून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर  मोठया उत्साहाने आणि थाटामाटात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढी म्हणजे ध्वज किंवा भगवान ब्रम्हाचे प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. उपलब्ध असलेल्या काही पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रम्हाने अनेक देव-देवता, पुरुष-स्त्री आणि राक्षस निर्माण केले असे म्हटले जाते. थोडक्यात म्हणजे या दिवशी भगवान ब्रह्माने विश्वाची स्थापना केली. म्हणून या प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रम्हाची विधीवत पूजा केली जाते. तशी पूजा केल्याने सर्व वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन सर्व चराचरात सुख- समृद्धी नांदत असते. वेदांग ज्योतिष ग्रंथानुसार हा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे म्हटले आहे. या ग्रंथात असेही म्हटले आहे की जर या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्यास ती वस्तू आपणास लाभदायक ठरते असे सांगून हा ग्रंथ सांगतो की या दिवशी कोणत्याही नवीन उपक्रमांचा किंवा व्यवसायाचा प्रारंभ करावा आणि सोन्याची खरेदी करावी. तर काही पुराणे असे सांगतात की गुढी म्हणजे विजयी चिन्ह आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. असे म्हणतात की  प्रभू श्रीराम या दिवशी रावणाचा वध करून आपल्या पत्नीसह आयोध्या नगरी परत आले आणि त्यादिवशी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्याचप्रमाणे महाभारतात महाराज युधिष्टिर यांचा सुद्धा राज्याभिषेक या दिवशी झाला असे म्हटले आहे आणि विष्णू पुराणात या दिवशी भगवान विष्णूनी मत्स्य अवतार धारण केल्याचे म्हटले आहे. काही पुराणात तर असे म्हटले आहे की या दिवशी वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व  स्वर्गातील अमरेंद्राने वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. अशा अनेक धार्मिक आणि कथेनुसार या दिवसाकडे अत्यंत शुभ आणि लाभदायक दिवस म्हणून पाहिले गेले आहे. 

वर दिलेल्या अनेक कारणामुळे गुढी पाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला संवत्सर प्रतिपदा असेही म्हटले जाते. बरेच हिंदू समाजातील लोक हा दिवस पुण्यकाळ आहे असे मानतात.अनेक ग्रंथ किंवा या विषयातील अभ्यासक असेही सांगतात की हिंदू धर्मामध्ये हाच खरा वर्षाचा प्रथम दिवस ठरतो. मग संपूर्ण भारतात फक्त काही भागातील  हिंदू लोकच  या दिवशी नवीन वर्ष म्हणून का साजरा करतात असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात गुढी पाडवा साजरा करताना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात तर उत्तर प्रदेश, गुजरात, बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यात तसे होत नाही. याचे कारण पाहायला गेल्यास असे आढळून येईल की काही हिंदू लोक चंद्राच्या गतीवरून तर काही हिंदू लोक सूर्याच्या गतीवरून वर्षाची सुरुवात ठरवतात. तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही भागातील लोक सौरमनाप्रमाणे वर्ष पाळतात तर महाराष्ट्रात, गोव्यात, कर्नाटक, तेलंगणा  व आंध्र प्रदेश या भागातील लोक चांद्रमासाप्रमाणे महिना पाळतात. म्हणून दोन्ही दक्षिणेतील भागातील नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी येत असते. काही धर्मग्रंथानुसार प्राचीन काळी मकरसंक्रात याच दिवशी वर्षारंभ होता असे काही धर्मविधीवरून दिसते. पुढे हा दिवस बदलून वसंत ऋतुमध्ये येत असलेल्या चैत्राच्या दिवशी केला असे वाटते आणि याची सुरुवात जवळ जवळ ८०० वर्षांपूर्वी काश्मीर मध्ये झाली असल्याचे मला काश्मीरवर करत असलेल्या अभ्यासात आढळले. कारण या दिवशी परशत्रूस त्या भागातील राजाने मागे हटविले असे म्हटले जाते. दक्षिणेत कानडी प्रांतात या दिवसास इगादि तर तेलगू प्रांतात या दिवसास युगादि असे म्हणतात तर मराठी प्रांतात यास गुढी पाडवा असे नामकरण झाल्याचे दिसते. पण उत्तरेमध्ये खासकरून गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान कार्तिक शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ असल्याचे मानतात. कदाचित रामायण व महाभारतात हेमंत ऋतूला दिलेल्या महत्वामुळे असेल किंवा सौरमानाप्रमाणे वर्षारंभ करण्याच्या पद्धतीमुळे असेल. पण सर्व हिंदू धर्मग्रंथ, श्रुती, स्मृती, पुराणे व  ज्योतिष ग्रंथ वाचलित तर चैत्र शुक्ल प्रतिपदा हाच दिवस हिंदूंचा नवा वर्षारंभ असल्याचे दाखले मिळतात.

गुढी पाडवा या दिवशी हिंदू लोक हा दिवस महत्वाचा मानून काही संकल्पाचा उच्चार करतात. तसे बघायला गेले तर  हिंदू समाजात बहुतेकजण आपण ब्रम्हांडातील एक व्यक्ती असून धार्मिक कृत्ये करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मानतो. त्यास असे वाटते की ही धार्मिक कृत्ये धर्माच्या पायावर झाली असून धर्म म्हणजे देवाकडे जाण्याचा किंवा परत जाऊन मिळण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे तो आपली सर्व कृत्ये देवास अर्पण करीत असतो. त्याची अशी समजूत असते की धर्म म्हणजे कोणा एक व्यक्तीचा उपदेश नसून तो अनादी असून सत्य आणि निष्काम- कर्म ही त्याची मुख्य अंगे आहेत. जर एखाद्या गोष्टीत सत्यता नसेल तर ती गोष्ट धर्मकृत्यात येत नाही आणि जर काही अधर्म होऊ लागला तर परमेश्वर वेगवेगळे अवतार घेऊन अधर्माचा नाश करतो असे हिंदू समाज मानीत असतो. म्हणून वेद व उपनिषदे वर आधारित असलेला धर्म नामशेष होणार नाही याची काळजी हा हिंदू समाज घेत असतो. त्यासाठी तो आपले धार्मिक विधी धर्माने सांगितल्याप्रमाणे करीत असतो. गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी तो सकाळी उठून बेसन आणि उटणे लावतो आणि अंघोळ करतो. त्यानंतर आंब्यांच्या पानांचे तोरण बनवून आपल्या घरांचे दरवाजे सजवतो. मग ज्या ठिकाणी गुढी उभारायची असेल ती जागा स्वच्छ आणि शुद्ध करतो. नंतर त्याठिकाणी कलश आणि पताकायुक्त गुढी उभारतो. त्या गुढीच्या बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी लावून वरच्या टोकाला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यास फुलांचे हार आणि साखरेचे गाठले बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसावतो. मग गुढीचा बांबू पाटावर ठेवून त्या गुढीची गंधफुले घालून व कुंकू लावून पूजा करतो. अशावेळीस घरातील प्रत्येक व्यक्ती उत्तम वस्त्रे परिधान करून निंबाचे अंकुर आणून त्यात मिरी, हिंग, लवण, जिरे व ओवा घालून त्याचे भक्षण करतात. मग गुढी दारात किंवा घरातल्या गॅलेरीत उभारतात. हे सर्व झाल्यावर कुटुंबातील सर्व मंडळी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करतात. असे केल्यास आपल्या घरात सुख आणि शांतता लाभून आपली समृद्धी होते असे गुढी पाडव्याचा सण साजरा करताना हिंदू माणूस समजत असतो. असे हे सुंदर धार्मिक स्वरूप गुढी पाडव्याच्या दिवशी पहावयास मिळते.

हिंदू समाजातील अनेक पंथ, जाती कधीही नवीन वर्ष साजरे करू दे पण चैत्र शुक्ल प्रतिपदेला फार महत्व आहे हे कोणीही नाकारता येणार नाही. कारण या दिवशी प्रत्येकजण एकमेकांची भेट घेऊन प्रत्येकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. तो आपल्या कुलदेवतेकडे प्रार्थना करून मागील वर्षी घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आभार व्यक्त तर करतोच पण जी काही वाईट कृत्ये झाली असेल त्याबद्दल माफी मागून येत्या नूतन वर्षी आपले वर्तन शुद्ध, सात्विक आणि प्रेमळ असावे याची मागणी करीत असतो. यासाठी आपल्या संतांनी गुढी पाडव्याचे महत्व त्यांच्या अभंगातून सांगितले आहेत. ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरीत एक श्लोक सांगितला आहे. त्यात ते म्हणतात, " अधर्माची अवधी तोडिं | दोषांची लिहिली फाडिं | सज्जनांकरवी गुढी | सुखाची उभवी ||". या दिवसाचे महत्व सांगताना ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात, " ऐके संन्यासी आणि योगी | ऐसी एक्यवाक्यतेची जगीं | गुढी उभाविली अनेगीं | शास्त्रान्तरी ||".  संत ज्ञानेश्वराप्रमाणे संत नामदेव, संत जनाबाई यांनी सुद्धा या दिवसाचे विशेष महत्व सांगून ठेवले आहे. संत चोखोबा आपल्या एका अभंगात म्हणतात, "टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची ||"  तर संत तुकाराम महाराज म्हणतात, " पुढे पाठविले गोविंद गोपाळा | देऊनी चपळा हाती गुढी ||". पण सर्वात जास्त गुढी पाडव्याचा उल्लेख कुणी केला असेल तर तो संत एकनाथानी. त्यांनी गुढी या शब्दाचा वापर आनंदाची गुढी, भक्तीसाम्राज्याची गुढी, ज्ञानाची गुढी, भावार्थाची गुढी, स्वानंदाची गुढी अशी केली आहे. मराठी शब्दकोशात काही अभ्यासकांनी उजवी गुढी आणि डावी गुढी असे गुढीचे  दोन प्रकार असल्याचेही म्हटले आहे. उजवी गुढी म्हणजे विनंती मान्य करणे किंवा संमत्ती देणे तर डावी गुढी म्हणजे विनंती अमान्य करणे किंवा नापासंत करणे. मराठी कवितेत तर बहिणाबाई चौधरीने ' गुढी उभारनी' या कवितेत गुढी पाडव्यावर अनेक कविता करून गुढी पाडव्याची अनेक वर्णने दिली आहेत. त्यांच्या एका कवितेत त्या म्हणतात,
गुढी पाडव्याला उंच गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ||
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ||
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकठी उषाताईचा ||
किती छानपणे कवियत्री बहिणाबाई चौधरीने केले आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध लेखिका डॉ सरोजिनी बाबर यांनी आपल्या लेखात गुढी पाडव्याचे महत्व लोक संस्कृतीच्या दृष्टीने फार मोठे असल्याचे नमूद केले आहे. या सणाचे महत्व सामाजिक दृष्टीकोनातून दाखविण्यासाठी वेगवेगळ्या गाण्याच्या मैफिली सकाळी करतात किंवा मिरवणूका काढून हिंदू संस्कृतीची झलक दाखवीत असतात.

गुढी पाडव्याचा सांस्कृतिक इतिहास सांगताना म्हटले होते की ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यादिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा होती किंवा प्रभू श्रीरामचा राज्याभिषेक गुढी पाडव्याच्या दिवशी झाला. अशा अनेक प्रकारच्या गोष्टींबरोबर एक कथा पुराणात सापडते ती म्हणजे शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाची. असे म्हणतात की या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण  घातले. मग त्यांच्या साह्याने त्याने शकांचा पराभव केला. त्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणनामुख्यता मराठी मुलखात सुरू झाली. दक्षिणी मुलखात ही कालगणना अजूनही वापरली जाते. ही कालगणना सुरु करण्याचे श्रेय सातवाहन घराण्यातील  गौतमिपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाला जाते. त्याने शकक्षत्रप राजाचा पराभव केला ते सल होते. इ.स. ७८. या सातकर्णी राजाची राजधानी होती पैठण आणि हे युद्ध झाले नाशिकच्या परिसरात. त्याच्या राज्याला महाराष्ट्रातील सुवर्णयुग असे म्हटले जाते. हा गौतमीपुत्र सातकर्णी इ. स.७२ ते ९५ पर्यंत सत्तेवर होता. मौर्याच्या साम्राज्यानंतर कुशान, हुन, पल्लव, शक सारखे परकीय टोळ्यांनी आक्रमण करून उत्तर भारत काबीज केला तेव्हा त्यांना दक्षिण भारतावर आक्रमण करण्यास गौतमीपुत्र सातकर्णी याने रोखले. त्यांनी शकांच्या केलेल्या पराभवला फार महत्व असून त्यांच्या प्रदेशांवर विजय मिळवल्यानंतर शालिवाहन शक कालगणना सुरू झाली आणि तो दिवस गुढी पाडवा होता असे म्हटले जाते. वास्तविक पाहता शालिवाहन शके या कालगणनेतला शके हा शब्द शक राजांशी निगडित नसून शक ही कालगणनेची पद्धत आहे. इ. स. ७८ पासून शालिवाहन राजाने सुरू केलेली कालगणना आपण मराठी कालगणना म्हणून मानत आलो आहे. इथे असे ही नमूद करावयाचे वाटते ते म्हणजे मराठी भाषेचा उदय याच पैठणीमध्ये याच काळात झाल्याचे आढळते.  गुढी पाडव्याच्या निमित्ताने अजून एका पुराण कथेचा उल्लेख करून माझा वाढलेला लेख मी संपवत आहे. ती कथा आहे आदिशक्ती देवीची म्हणजे देवी पार्वतीची. असे म्हणतात की भगवान शंकर आणि देवी पार्वतीचे लग्न ठरले तो दिवस होता गुढी पाडवा. मग लग्न झाले याच महिन्याच्या शुक्ल तृतीयेच्या दिवशी. त्यांच्या लग्नाची सर्व तयारी गुढी पाडव्यापासून सूरू झाली. म्हणून देवी पार्वतीची पूजा गुढी पाडव्याला करतात. मग पुढे नऊ दिवस जागरण करून लग्न झालेल्या देवी पार्वतीची योगिनीची अधिपती म्हणून नवव्या दिवशी पूजा करतात. म्हणून हे नऊ दिवस चैत्र नवरात्र म्हणून मानतात. म्हणून या दिवशी हळदीकुंकूचा कार्यक्रम सुद्धा ठेवला जातो.

अशा सुंदर दिवशी आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत आहोत. येत्या नवीन वर्षात तुम्हा सर्वांना आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान महेश यांच्या चरणी प्रार्थना.

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...