रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक :
१७९
विषय क्रमांक : ४
विषय :
स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील पुसट रेघ
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यात नेहमीच एक पुसट रेघ असतेच. ही रेघ कळत नकळत प्रत्येक माणसांच्या आचारात आपल्याला दिसते आणि जाणवते सुद्धा. ही पुसट रेघ समजून घेण्या अगोदर आपण स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन शब्दांची व्याख्या काय आहे हे नीटपणे समजून घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करणे किंवा प्रत्येक मानवाला कोणत्याही शक्तीशी समरस न होता स्वमर्जी प्रमाणे वागण्याची क्षमता. स्वातंत्र्य ही एक संकल्पना असून त्याचा उगम भारतीय तात्विक विचारांत आहे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्त, हक्क आणि जबाबदारी या तीन गोष्टींचा संगम आहे. जेव्हा मी म्हणतो की मी प्रत्येक बाबतीत स्वतंत्र आहे तेव्हा माझी जबाबदारी खूप वाढत असते. येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. सुप्रसिद्ध विचारवंत हेरॉल्ड लास्की यांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यात त्याचे विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यांचा समावेश असायला पाहिजे. या स्वातंत्र्यामुळे प्रत्येक माणसाला नैतिक आणि भौतिक विकास साधता येतो. जरी स्वातंत्र्यामुळे माणसांची प्रगती होत असली तरी त्या स्वातंत्र्यावर काही नैतिक, सामाजिक आणि राजकीय बंधने असणे गरजेचे आहे, नाहीतर त्याचा परिणाम स्वैराचारात होऊ शकतो. मग प्रश्न पडतो स्वैराचार म्हणजे काय? त्याचा मानवी स्वातंत्र्याशी काय संबंध?. स्वैराचार म्हणजे असा आचारविचार जो कोणत्याही विचारांच्या चौकटीत बसत नाही. स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्याचा वापर करून मनमानी कारभार करणे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते आणि समाजात सबळ व्यक्ती दुर्बल व्यक्तींवर अन्याय व जुलूम करू शकते. त्यामुळे समाजात दुराचार माजवू शकतो. यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या तीन तत्वांचा उल्लेख करून भारतातील धार्मिक विषमता, गुलामगिरी आणि उच्च-निचत्वाची भावना नष्ट होण्यासाठी काही बंधनांचा उल्लेख केला आहे. भारतीय संविधानात मूलभूत तत्वे समाविष्ट करीताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील पुसट रेघ त्यांना जाणवत असल्याचे दिसते.
आज समाज सुशिक्षित होत आहे. आधुनिक शिक्षणामुळे आजची तरुण पिढी पूर्णपणे स्वावलंबी होत चालली आहे. त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य हवे आहे आणि त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांना कोणतीही बंधने नको आहेत. तेव्हा अशा पिढीतील लोकांना स्वतंत्र आणि स्वैराचार यातील फरक सांगणे जरुरीचे आहे. त्यांना सांगावयास पाहिजे की प्रत्येक स्वतंत्र व्यक्तीचे पहिले कर्तव्य आहे की त्यांनी जबाबदारी घेऊन वागणे. जर त्यातील बऱ्याच व्यक्ती बेजबाबदार पद्धतीने वागतील तेव्हा त्याची परिणती स्वैराचारात होऊ लागते. आज मी अशी बरीच कुटुंब बघतो की तिथे घरातल्या मंडळीना कोणत्याही प्रकारचे खास करून स्त्री वर्गाला कसलेही स्वातंत्र्य बिलकुल असत नाही, तर काही कुटुंबे अशी असतात की त्यामधील कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कोणतीही बंधने असत नाही. या दोन्ही गोष्टी मला बरोबर वाटत नाही. घरातल्या कोणत्याही व्यक्तीला स्वातंत्र्य न देता त्या कुटुंबातील व्यक्तीला त्याच्या विकासापासून रोखणे हा सुद्धा एक प्रकारचा अत्याचार असल्याचे जाणवते. त्या कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे ते घर आहे. त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीप्रमाणे जसे जगणे जरुरीचे आहे तसेच प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागणे सुद्धा गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीस स्वतःचा व्यवसाय निवडण्यासाठी, त्याच्या विषयाची आवड असलेली पुस्तके वाचण्यासाठी, नाटक व सिनेमा पाहण्यासाठी किंवा त्या व्यक्तीस आवडत असलेल्या सामाजिक किंवा राजकीय उपक्रमात भाग घेण्यासाठी स्वातंत्र्य देणे जरुरीचे आहे. त्यासाठी घरामध्ये थोड्याप्रमाणात चर्चा होणे जरुरीचे आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तीना त्यांची जबाबदारी काय आहे याची जाणीव होईल. तेव्हा प्रत्येक व्यक्ती इतरांच्या अधिकारांचा आदर करून स्वतःचे अधिकार व्यवस्थितपणे वापरू लागतील. काहीवेळेला असे दिसून येते की जर मुलांना जबाबदारीचे महत्व पटवून दिले नाही तर ती मुले हट्टी होतात आणि समाजात किंवा मित्रपरिवारात कोणत्याही दुसऱ्या व्यक्तींचा आदर न ठेवता स्वतःला हवे तसे वागतात. त्यामुळे त्यांचे समाजातील किंवा मित्रपरिवारामधील स्थान कमी कमी होत जाते. याला कारण त्या मुलांच्या घरातील मोठी माणसेच आहेत. कारण लहान मुले नेहमी मोठ्यांचेच अनुकरण करताना दिसतात. त्यासाठी त्या घरातील किंवा कुटुंबातील मोठया व्यक्तीने अमर्याद स्वातंत्र्याचे परिणाम ओळखून मुलांना पुढे होणाऱ्या स्वैराचारापासून दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजे, त्यांना जबाबदारीने वागण्यास शिकविले पाहिजे. थोडक्यात सांगायचे म्हणजे मुलांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजून सांगितला पाहिजे. तरच मुले मोठी झाल्यावर स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक ठळकपणे समजू शकतील.
आज मी बऱ्याच वेळा पाहतो की अनेक कुटुंबे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन्ही दिवशी कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात भाग न घेता सुट्टी म्हणून पिकनिकला जातात. खरे पाहता हे दोन दिवस म्हणजे पिकनिकला जाण्याचे दिवस नाहीत. अशा वेळेस आपल्या मुलांना या दोन दिवसांचे महत्व सांगून त्यादिवशी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात भाग घ्यायला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यांना स्वातंत्र्य व गणतंत्र दिवसाचे महत्व आणि त्या प्रति आपली जबाबदारी काय आहे हे सांगितले पाहिजे. आपला देश स्वातंत्र्य झाला आणि त्यासाठी अनेकांनी आपले जीवन कसे समर्पित केले आहे हे ठासून सांगितले पाहिजे. तेव्हा आजच्या पिढीची ही जबाबदारी असली पाहिजे की जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे ते व्यवस्थितपणे जपून ठेवले पाहिजे. स्वातंत्र्याने आपल्याला संविधान दिले आहेत. त्यात आपल्या मूलभूत स्वातंत्र्याची मूल्ये जपण्यासाठी काही कायदे केले आहेत. त्याविषयी आपण सदैव आदर ठेवण्यास शिकविले पाहिजे. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येक माणसांचे विचार वेगळे असू शकतात आणि ते मांडण्याचा त्यालाही अधिकार आहे. त्यांची मते आणि भावना ऐकून घेणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे याची जाणीव आपणास असावयास हवी. इथे मला सुप्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञानी Voltaire यांचे एक वाक्य आठवते. ते म्हणतात, " I disapprove what you said, but I will defend your to the death your right to say it ". किती सुंदरपणे त्यांनी स्वतंत्र लोकशाहीची मांडणी केली आहे. याचाच अर्थ असा होतो की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे मत न घाबरता मांडते आणि त्या व्यक्तीचे मत व्यक्त झाल्यावरसुद्धा ती व्यक्ती स्वतःला सुरक्षित मानते म्हणजे ती स्वतंत्र असल्याची हमी असते. असे विचार व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. कोणी शब्दातून व्यक्त होतात तर कोणी चित्रातून, कोणी चित्रपटातून तर कोणी नाटकातून, कोणी संगीतातून तर कोणी नृत्यातून. त्यासाठी भारतीय संविधानात कलम १९ मध्ये सर्व भारतीयांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. पण या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की त्याचा इतरांना त्रास होईल असे वागणे. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे, कर्कश हॉर्न वाजविणे, मोठया आवाजात लाऊडस्पीकर्स लावणे, गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुकणे, कचरा टाकून सार्वजनिक स्थळे अस्वच्छ करणे अशा गोष्टी स्वातंत्र्याच्या कल्पनेत बसत नाहीत. इथेच स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील रेघ अधिक पुसट होत जाते कारण या सर्व कल्पना स्वैराचाराच्या आहेत. त्यातून समाजाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला होणाऱ्या परिणामाची जबाबदारी घेण्यास तयार केले पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्तीस स्वातंत्र्य म्हणजे काय आणि स्वैराचार म्हणजे काय याची ओळख व्यवस्थितपणे होण्यास मदत होईल.
आज मानवाने भरपूर प्रगती केली आहे. आधुनिक शिक्षणामुळे माणसांची प्रगती होऊ लागली. त्यासाठी माणसांनी दुसऱ्याबरोबरचे अस्तित्व आणि विचार मान्य केले आहे. पूर्वी माणूस टोळ्यात राहून व्यक्तिगत पातळीवर आपले काम करीत होता. गेल्या काही काळात तो वेगवेगळ्या लोकसमूहात काम करू लागला आणि त्यास समजू लागले की ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत. त्यासाठी वेगवेगळे नियम येऊन एक सामाजिक करार निर्माण झाला. युद्ध आणि हिंसाचारापासून माणूस दूर जाऊ लागला आणि शांततेचा मार्ग स्वीकारू लागला. त्यामुळे माणसाची सृजनशीलता अधिक बहरली. ज्ञानाची देवाण घेवाण झाल्यामुळे नवीन तंत्रज्ञान निर्माण झाले, त्यामुळे नवीन व्यापार वर्ग निर्माण झाला, नवीन कला निर्माण झाल्या. एकंदरीत माणसाला उत्कटपणे जगण्याची संधी मिळू लागली. लोकशाही स्वातंत्र्याने वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना, संस्कृतीला एकत्र आणले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याने मर्यादित स्वातंत्र्याला दूर ठेवण्यास मदत करून वेगळेपण जपाण्याचे एक साधन म्हणून बघण्यास शिकविले. याचे उत्तम उदाहरण महात्मा गांधी यांचे देता येईल. भारताला ब्रिटिश सम्राज्यापासून स्वातंत्र्य देताना महात्मा गांधीने हे स्वातंत्र्य सर्व समाजातील लोकांना स्वातंत्र्याचा फायदा होऊन सर्व भारतीय आपला विकास साधू शकेल असा विचार मांडला. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत सामान्य माणूस हाच केंद्रस्थानी राहिला. त्यामुळे समाजाला अनेक सकारात्मक पैलू मिळू लागले. त्यांनी अहिंसेचा सुंदर मंत्र जगाला दिला. अहिंसा अर्थ म्हणजे मांसाहार नाकारणे नसून संसदिय लोकशाही आहे. त्यात अनेक विचारांची माणसे आपली मत व्यक्त करू शकतात. त्यामुळे हिंसाचारला पूर्णपणे विराम मिळतो. म्हणूनच महात्मा गांधी समजून घेताना जाणवते की लोकशाही स्वातंत्र्य म्हणजे बहुमतशाही नव्हे. लोकशाहीचा अर्थ सखोल आहे कारण लोकशाहीमध्ये कोणतेही सरकार बहुमताच्या जीवावर निवडले जाते. त्यात अनेकांचे वेगवेगळे विचार असतात आणि ते मान्य करणे म्हणजेच स्वातंत्र्य आहे. आज बऱ्याच वेळा असे वाटते की हे स्वातंत्र्य दूर जाऊन आपण स्वैराचाराकडे जातो आहोत. बेकायदेशीर कृत्ये करून अनेकजण गैरफायदा घेत असतात. त्यात त्यांना काहीच वाटत नाही. बऱ्याच वेळेला तोडफोड करणाऱ्या झुंडीचे समर्थन केले जाते. सोशल मीडिया यात अग्रेसर होताना दिसत आहे. जर आपण एखाद्या गोष्टीवर टीका केली किंवा एखाद्या व्यक्तीचे समर्थन न करता टीका केली तर एका विचित्र प्रकारे त्या टीका करणाऱ्या माणसाला खूपच त्रास देण्याचे प्रकार सोशल मीडियावर होत आहे. असे करणे म्हणजे त्या माणसाला त्याचे मत व्यक्त करण्यापासून रोखणे हे होय. त्यातून कुठलीही प्रगती होणार नाही पण समाज दोनशे वर्षे मागे जाईल.. म्हणून भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्याचा आदर करणे महत्वाचे आहे. मग तो माणूस कोणत्याही धर्माचा, पंथाचा, जातीचा, वर्गाचा असो. त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित असलेच पाहिजे. नाहीतर आपण स्वैराचाराच्या मार्गांवर गेल्यासारखे होईल कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचारात एक पुसट रेघ असते.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. जेव्हा स्वातंत्र्यात जबाबदारी नसेल तर तो स्वैराचार होतो. वर म्हटल्याप्रमाणे सोशल मीडियावर जो काही प्रकार चालतो तो म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या मतांचा आणि भावनांचा बाजार मांडला जातो. तिथे कोणत्याही वैचारिक विचारांना थारा नसल्याचे जाणवते. कुठल्याही महापुरुषांचा सन्मान न ठेवता कोणीही कसेही अफवा पसरविण्याचे काम करीत असतात. कोणत्याही बातमीची सत्यता न पडताळता ती बातमी पुढे पसरवली जात आहे. त्यामुळे समाजात अशांतता निर्माण होते. कोणतेही कायदे न पाळणे म्हणजे आपण मोठे कार्य केले असा भाव आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यात दिसू लागला आहे. त्यामुळे समाज नकळत स्वैराचाराच्या मार्गांवर जात असल्याचे जाणवत आहे. इथे एक गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे की अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यात अनेक विचारांचे मतप्रवाह असू शकतात. त्या विचारांचे खंडन होऊन सारासार विवेकनिष्ठ विचार निर्माण झाला पाहिजे. त्यातूनच राष्ट्राचा आणि त्यातील नागरिकांचा विकास घडत जातो. तेव्हा व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात न आणता समाजहिताचे संरक्षण करतील अशा काही अटी नियम अथवा कायदे तयार करणे राज्य संस्थेचे नुसते काम नसून त्यांनी निर्माण केलेलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणे महत्वाचे असते. त्यात समाजातील प्रत्येक व्यक्तींना मग ती स्त्री असो किंवा पुरुष, मुले असो अथवा तरुण, गरीब असो वा श्रीमंत संरक्षण मिळणे फार गरजेचे असते. तेव्हाच समाज आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य शाबूत ठेवून स्वैरचारापासून दूर राहील.
धन्यवाद
Comments
Post a Comment