रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १७७
विषय क्रमांक : ४
विषय : खरोखरच स्त्री स्वातंत्र्य आहे का?
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
दरवर्षी येणारा ८ मार्च आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करीत असतो. हा दिवस साजरा करण्या मागील प्रमुख कारण म्हणजे महिलांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात दिलेल्या योगदानांचे स्मरण सदैव राहावे. या दिवशी जगातील विविध भागातील महिला एकत्र येऊन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश पसरवत असतात. त्याचप्रमाणे कोणत्याही कामात लिंगभेद न करता स्त्रियांनासुद्धा योग्य प्रतिनिधित्व करण्याची मागणी सुद्धा करतात. तसे बघायला गेले तर या दिवसाची खरी सुरुवात २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्कमध्ये सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेने केली. या दिवशी महिलांनी एकत्र येऊन वस्त्र कामगारांच्या विरोधात निषेध केला होता. पण इ. स.१९७५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. तसे करताना त्यांनी सांगितले की ८ मार्च १९१७ रोजी रशियातील महिलांच्या गटाने भाकरीचा आणि मतदानाचा हक्क मागण्यासाठी चार दिवसांचा संप केला होता. तेव्हापासून महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचे समर्थन करण्यासाठी साजरा केला जातो. जेव्हा आपण ८ मार्च २०२२ रोजी महिला दिवस साजरा करीत होतो तेव्हा एक गोष्ट सातत्याने जाणवत होती ती म्हणजे माणसाने केलेल्या प्रगतीची. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षित करण्यासाठी शाळा सूरू केली. भारतात महिलांसाठी शाळा सूरू करण्याचा प्रथम मान या दाम्पत्यांला जातो. त्यामुळे महिला शिकू लागल्या, कमावू लागल्या आणि स्वतंत्रपणे आपला व्यवसाय सुद्धा करू लागल्या. पुढे मानवाने विज्ञान, तंत्रज्ञान, जीवनशैली या मध्ये बरीच प्रगती केली आहे. त्यात महिलांचा सहभाग मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. तेव्हा वाटते महिला स्वतंत्र आहे. पण लगेच प्रश्न पडतो त्या खरोखरच स्वतंत्र आहेत का?
जेव्हा एखादी स्त्री म्हणते की ती पूर्णपणे स्वतंत्र आहे तेव्हा हे शब्द खूपच सकारात्मक आणि सशक्त वाटतात. याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती स्त्रीवादी आहे आणि त्या व्यक्तीला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. स्वतंत्र स्त्रीवादी असणे म्हणजे काही पुरुषांपासून मुक्तता हवी किंवा पुरुषांचे अस्तित्व सूडबुद्धीने खतम करणे असा नसून स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे त्या स्त्रीला आपले विचार व्यक्त करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसणे किंवा कोणतेही काम स्वतःच्या आवडत्या पद्धतीने करण्याची क्षमता असणे असा आहे. त्यासाठी त्या स्त्रीकडे आत्मविश्वास हवा आणि मत मांडण्याचे धैर्य हवे. यात स्त्रीला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तिचे स्वातंत्र्य तिच्या कोणत्याही नातेसंबंधावर अवलंबून नसून ते तिच्या ताकदीवरच अवलंबून असते. आजची परिस्थिती २० वर्षापेक्षा खूप वेगळी आहे. आज बऱ्याच स्त्रिया सशक्त आणि स्वतंत्र आहे. त्यांच्या स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणारे अनेक घटक आहेत. अनेक पुरुष विचावंतसुद्धा अशा स्वतंत्र विचारसरणी असलेल्या स्त्रियांचे महत्व मान्य करताना दिसत आहेत. चिकाटी, विश्वास, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि जागृत सर्जनशिलता हे विशेष गुण स्वतंत्र स्त्रियांना नवीन विचार मांडण्यास सक्षम करतात आणि सकारात्मक पद्धतीने विचार करून अनेक संकटांना तोंड देण्यास तयार करतात. अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाचा जबरदस्त आधारसुद्धा बनतात. हे सर्व माहीत असूनही बहुतेक स्त्रिया पारंपारिक पद्धतीचे जीवन जगताना दिसतात आणि त्यातच आपले स्वातंत्र्य शोधत असतात. आपल्या घरातील माणसांनी आपल्याला आवडीचे कपडे घालण्यासाठी दिलेली परवानगी किंवा आपल्याला नोकरी करण्यासाठी दिलेली मान्यता म्हणजेच स्वातंत्र्य अशी समजूत बहुतेक स्त्रियांची होत असते. कधीकधी तर स्वतःच्या मूलभूत अधिकारांसाठी समाजाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून परवानगी बहुतेक स्त्रियांना घ्यावी लागते. मग इथे बहुतेक स्त्रियांची रूढीवादी मानसिकता लक्षात येते आणि मग प्रश्न पडतो की स्त्रिया खरोखरच स्वतंत्र आहेत का?
स्त्री हे माणुसकीचे सार आहे. ती आई, मैत्रीण, बहीण, मुलगी आणि पत्नी आहे हे सर्व मान्य जरी करीत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सर्वप्रथम ती एक स्त्री आहे. तिच्यावर टाकलेल्या अनेक जबाबदारीमुळे ती बऱ्याचवेळा स्वतःची ओळख विसरून जाते. जेव्हा आपण स्त्री स्वतंत्र भारतीय दृष्टीकोनातून पाहतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की भारतात स्त्रिया खरोखरच स्वातंत्र्य आहेत का? त्यासाठी भारतीय संविधानात स्त्री स्वातंत्र्यासाठी काही तरतुदी आहेत का? जर अशा तरतुदी असल्या तरी भारतीय स्त्रिया स्वतंत्र आहेत का? होय भारतीय संविधानात महिलांच्या समानतेच्या संदर्भात अनेक कायदे केले गेले आहेत. त्यापैकी कलम १५(१) हे कोणतेही भेदभाव न करण्यासाठी असून समानतेसाठी आहे तर कलम १६ सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता दर्शवते आणि कलम ३९(d) हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन देण्यासाठी आहे. असे बरेच कायदे भारतीय संविधानात आहेत तरीसुद्धा बहुतेक भारतीय महिलांना त्यांच्या आवडीच्या कामाची निवड करण्याचा, विचारस्वातंत्र्याचा व भाषणस्वातंत्र्याचा अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्या पूर्णपणे मुक्त नाही आहेत कारण त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर न्याय मिळेल की नाही असे सांगता येत नाही. स्त्रीसाठी काय योग्य आहे हे समाज ठरवत असतो. बलात्कार, हुंडा बळी, विनयभंग, लैगिक छळ असे अनेक आजार आजसुद्धा महिलांना त्रास देत आहेत. अनेक कुटुंबात मुलींची घडण करताना त्यांच्यावर कशाप्रकारे वागावे यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यांना सांगितले जाते की त्यांना जीवनसाथी शोधण्यासाठी घरातील माणसे जे सांगतील त्याच मार्गाने गेले पाहिजे. त्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन स्वावलंबी किंवा सक्षम विचारांची व्यक्ती बनविण्यापेक्षा नको तो दबाव टाकून त्यांना स्वातंत्र्यापासून दूर घेऊन जात असतात. म्हणून महिलांना शिक्षित होणे फार जरुरीचे आहे. शिक्षण मिळाल्याने महिलांना आपल्या हक्कांची जाणीव होईल आणि आत्मविश्वासाने स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहाण्यासाठी ऊर्जा मिळत जाईल. जेव्हा महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळेल तेव्हाच देशात सर्व क्षेत्रात सशक्तीकरण होईल. म्हणून इथे मला महिला आरक्षण विधेयकच्या वेळी दिलेली घोषणा महत्वाची वाटते. ती म्हणजे, " बेटी पढाओ, बेटी बचाओ ". कारण महिलांना शिक्षण दिल्यास त्या सक्षम होतील आणि त्या सक्षम झाल्यास राष्ट्र सक्षम होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी भाषण करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की," हमारा मंत्र होना चाहिए : बेटा बेटी एक समान '. असे सांगून ते पुढे म्हणतात, " आइए कन्या के जन्म का उत्सव मनाए | हमे अपनी बेटीयों पर गर्व होना चाहिए | आपसे अनुरोध करूँगा अपने बेटी के जन्मदिन पर आप पांच पेड लगाए |"
स्वतंत्र भारतात स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. तरीसुद्धा हाथरस, उनाव इथे घडलेल्या घटना पाहून मन अस्वस्थ होते. आपण नेहमी पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, वगैरे देवींची पूजा करत असतो आणि त्याचवेळी देवीरूपी स्त्रीची अशी विटंबना करत असतो. तेव्हा खूपच वाईट वाटते. परस्त्री ही मातेसमान, मग ती कोणत्याही धर्माची वा जातीची असो अशी शिकवण देणाऱ्या शिवाजी महाराजांच्या राज्यातसुद्धा स्त्रियांवर होणारे अत्याचार वाचताना खूप दुःख होत असते. ही खरोखरच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. अशावेळीस स्त्रीचे स्वातंत्र्य दूर गेल्यासारखे वाटत असते. आजच्या युगात स्त्री पुरुष इतके आघाडीवर आहे. अनेक क्षेत्रात तिने आपले फार मोठे स्थान निर्माण केले आहे. स्वतःच्या कर्तुत्वाने आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर तीने हे मिळविलेले आहे. तरीसुद्धा ही गोष्ट काही मर्यादित वर्गापूरती मर्यादित असल्याचे जाणविते. बऱ्याच शिकलेल्या कुटुंबातसुद्धा स्त्रियांना फक्त मुली झाल्या म्हणून तिला दोष देत त्या स्त्रीचे मानसिक खच्चीकरण केले जाते. त्याप्रमाणे अनेक स्त्रियांचा विविध कारणामुळे छळ केला जातो. तेव्हा एक गोष्ट सतत जाणवते ती म्हणजे भारतीय समाज स्त्रीकडे स्वतंत्र नागरिक म्हणून पहावयास तयार नाही. "यत्र नार्यस्तु पुज्यते, रमन्ते तत्र देवता" हे एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ असा आहे की जिथे स्त्रीचा आदर केला जातो तिथेच देव नांदत असतो. असे असले तरी स्त्रियांवर अन्याय का होत असतो असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आज अनेक भारतीय स्त्रियांनी जगाच्या पाठीवर स्वतःचे नाव सोनेरी अक्षराने कोरले असले तरी बहुतेक भारतीय स्त्रिया गुलामगिरीच्या बेडीत अडकलेल्या दिसत आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली तर त्या होणाऱ्या अन्याया विरुद्ध बोलू लागतील आणि समानता वास्तवात उतरलेली दिसू लागेल.आज ज्ञानाच्या अनेक कक्षा रुंदावत असल्या किंवा स्वत्वाची जाणीव जरी होऊ लागली असली तरी आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे कारण अजूनही भारतातील अनेक महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत. मग ती स्त्री शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील.
प्राचीन काळापासून भारतीय स्त्रियांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे प्रयत्न केले आहेत. मैत्रयी, सुलभा, लोपमुद्रा यांनी अनेक धर्मसभा गाजवील्याचे उदाहरणे पुराण कथामध्ये सापडतात. राणी लक्ष्मीबाई, तारकेश्वर देवी, कमलादेवी चट्टोपाध्याय, सरोजिनी नायडू, अरुणा असरफ अली यांनी ब्रिटिश सत्तेशी दिलेली झुंज कोण विसरू शकेल. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गीता साने, गोदावरी परुळेकर, मालती बेडेकर, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, इंदिरा गांधी, किरण बेदी, लता मंगेशकर, कल्पना चावला अशी नावे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख आम्हांला दाखवतो की जर स्त्री स्वातंत्र्य असेल तर सर्व समाज विद्वातेच्या वाटेवर जाऊन सक्षम होऊ शकतो. म्हणूनच स्त्री पूर्णपणे स्वातंत्र्य असली पाहिजे. जर भारतीय समाजात अशा महिलां घडवायच्या असतील तर स्त्री स्वातंत्र्य जरुरीचे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment