रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १७८
विषय क्रमांक : ४
विषय : कलेमागील कलाकार
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
कलाकार ही अशी व्यक्ती आहे ती कला निर्माण करतो किंवा कलेचा सराव करून ती प्रदर्शित करतो. एखादे भाषण करणे किंवा प्रवचन करणे यामध्ये सुद्धा कलेचा छानपणे वापर होऊ शकतो. लोकांचे मनोरंजन करताना सुद्धा कलाकार कलेचा वापर करत असतो. मग अशावेळीस एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे कलाकार कला का निर्माण करतो? कला निर्मितीसाठी त्याचे विचार काय आहेत? केवळ मजा करण्यासाठी किंवा आपले साहस दाखविण्यासाठी कलेची निर्मिती होते का? जर या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे कलाकार आपल्या कलेद्वारे प्रत्येक माणसामाणसांमधील विचार, भावना आणि स्मरणशक्ती एकत्र करून मानवतेचे पुल बांधत असतो. अशावेळीस मला Gina Gibney या अमेरिकन नृत्यदिग्दर्शकाची आठवण येत आहे. त्यांनी १९९१ मध्ये नूयॉर्कमध्ये Gibney Dance Company स्थापन करून नृत्यकलेचे विविध प्रकार सादर केले आहेत. ते करत असताना त्यांनी स्त्री आणि पुरुषांच्या सामर्थ आणि अंतदृष्टीवर आधारित नृत्यकला सादर केली. त्यात त्यांनी समाजातील पीडित लोकांसाठी नवीन नृत्यकलेची निर्मिती केली आहे. हे सर्व सांगताना ते म्हणतात की काही कारणासाठी कला निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्टे आहेत. जीवनात आपण पुष्कळ भावनांचे विखंडन अनुभवत असतो, त्यामुळे कला निर्माण करण्याची गरज त्यांना वाटते. पुढे ते म्हणतात, "त्यासाठी खूप चिंतनशील असावे लागते आणि ज्या विषयावर आपण कलेची निर्मिती करणार असू त्या विषयाची पूर्णपणे माहिती असावी लागते. म्हणून जेव्हा ते नृत्याचे सादरीकरण करतात तेव्हा ते माणुसकीचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतात". त्यांनी नृत्यकलेला नेहमी शक्तिशाली कला प्रकार मानला आहे. त्यासाठी त्यांनी अशा एका महिलेचे नृत्य ठेवले की ती व्यावसायिक नृत्यांगना नव्हती पण घरगुती हिंसाचारात वाचलेली पीडित व्यक्ती होती. ती एक अशी स्त्री होती की तीने आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला होता. तिलाच घेऊन तिच्याच जीवनावर एक नृत्य सादर केले आणि मानवजातीला या नृत्यकलेद्वारे दुःख काय असते आणि माणसे कशाप्रकारे जीवन जगत असतात याची जाणीव करून दिली. इथेच आपल्याला Gina Gibney च्या रूपात कलेमागील कलाकार समजून घ्यायला मदत होते.
कलेमागील कलाकार वर लिहिताना मला अजून दोन कलाकारांची इथे आठवण येत आहे. त्यापैकी एक आहेत सुप्रसिद्ध ॲनिमेटेड चित्रपट दिग्दर्शक Peter Hans Docter आणि दुसरे आहेत सुप्रसिद्ध हिंदी सिनेमा दिग्दर्शक, कलाकार आणि लेखक गुरुदत्त. या दोघांनीही जीवनपद्धती आणि कला यांचा परस्पर संबंध शोधत जगापुढे नवीन कलेची निर्मिती ठेवली. हे करत असताना दोघेही कलाकार आपल्या दैनंदिन जीवनापासून थोडे दूर गेले आणि कलेच्या वेगळ्याच विश्वात भ्रमंती करून परत आले. परत आल्यावर त्यांना जाणवले की कला विश्वाचे नियम वेगळे आहेत आणि त्या अनुभवाने त्यांनी फार मोठया दर्जाची कलाकृती सादर केली आहे. त्यांना हे माहीत होते की कलाकृती जेवढी श्रेष्ठ तितकीच बदलांची व्याप्ती वाढत असते आणि हे बदल आत्मसात करून, आयुष्यात परत आणि नव्याने सामोरे जाणे हाच कलाकृतीचा सन्मान असतो. त्याप्रमाणे त्यांनी केले सुद्धा. Peter Docter हे स्वतः ॲनिमेटेड चित्रपट बनवितात. त्या चित्रपटाचे ते स्वतः लेखन करतात आणि स्वतःचा आवाज वापरतात. Monsters, Up, inside out, Soul असे अनेक ॲनिमेटेड चित्रपट त्यांनी बनविलेले आहेत Docter सांगतात की, "मला या कलेचा खूपच आनंद मिळतो कारण या कलेमुळे या सर्व लोकांशी मला कोणत्या तरी मार्गाने संपर्क साधता येतो. जेव्हा मी एखाद्या प्रकल्पावर काम करतो तेव्हा मी खोलात जाऊन त्याची माहीत घेत असतो. तेव्हा मला माणसांची वेगवेगळी रूपे दिसू लागतात आणि त्यांचे अस्तित्व मला माझे म्हणून दाखविता येतात. त्यात फायदा असतो तसाच तोटाही असतो. प्रत्येकवेळी संघर्ष तर असतोच. त्यामुळे आपण जगात कोण आहे याची जाणीव होत राहते. जेव्हा मी कथा लिहायला बसतो तेव्हा आपल्या भावना काय आहेत आणि माणूस असणे म्हणजे काय हे व्यवस्थितपणे कार्टून चित्रपटातून मला दाखवीता येत असते". म्हणून कलाकार जेव्हा कलेची निर्मिती करतो तेव्हा त्याने अंतराळात मारलेली एक उडी असते. त्यामुळे त्याने एक सुंदर कलाकृती तयार केलेली असते. ती कलाकृती नुसती बौद्धिक प्रमेयातून निर्माण झालेली नसून त्या सुंदर कलाकृतीत विसंगती, असंगती, विपरीत विजोडपणा, विसंवाद असे अनेक प्रकार येतात. याबाबतीत हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार गुरुदत्त यांचे देता येईल. त्यांनी निर्माण केलेल्या तीन चित्रपटांमुळे ते अजरामर झाले कारण या तीन चित्रपटात त्यांनी आत्मरक्षण आणि आत्मनाश या प्रेरणांचा सुसंवाद खूप छान पणे लोकांपर्यंत पोहोचवीला आहे. ते तीन चित्रपट म्हणजे प्यासा, कागज के फुल आणि साहिब बीबी और गुलाम. इथेसुद्धा कलेमागील कलाकार कसा असतो याची जाणीव होते.
बऱ्याचवेळा आपण बघतो की प्रत्येक माणूस एखादी गोष्ट करतो तिला आपण कला म्हणून समजत नसतो. एखाद्या संग्रहालयात जर एखाद्याने प्रदर्शन भरविले तरच ती कला होते का? असे प्रश्न पडत असतात. प्राध्यापक Harrel Fletcher (Portland State University ) म्हणतात की कोणत्याही माणसाने एका गोष्टीला कला म्हटले तर ती नक्कीच कला होते. कला ही माणसाच्या विश्वासातून घडत जाते. एखादी गोष्ट कला आहे की नाही हे काही वैज्ञानिक दृष्टीकोनावर अवलंबून राहत नाही. कला ही सौंदर्यात्मक, सांस्कृतिक आणि आर्थिक बाजूंची मूल्ये दर्शविण्याचा एक व्यक्तिनिष्ठ मार्ग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती रेखाचित्रे किंवा छायाचित्रे काढते किंवा व्हिडिओ तयार करते किंवा लेखन करते तेव्हा अनेक कलाकृतीची निर्मिती करीत असते. त्यात जग कसे दिसते आणि ते कसे दिसायला पाहिजे याचे सुंदर भाव त्या कलाकृतीत येत असते. त्यातील सौंदर्य आणि शक्ती माणसांना सहजपणे समजून घेता येतात. कोणतीही कला समाजाला जगाबद्दलची जाणीव करून देत असते. म्हणजे कला समाजाला समजून घेण्याचा, गुंतवून ठेवण्याचा आणि जगाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घेण्याचा उत्तम मार्ग आहे. प्रत्येक कलाकार आपली कला सर्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. यात उत्तम उदाहरण लेखकाचे आहे. लेखक आपल्या लेखातून सहानुभूतीचे वातावरण निर्माण करीत असतो. असे काहीतरी लिहितो की त्यातून सहानुभूतीचा चमत्कार घडवून आणतो. माणसांकडे असलेल्या प्रचंड शक्तीला आव्हान करून लेखक मानवांच्या क्षमतेचा विस्तार करून त्यांचे जीवन सुंदर करू शकतो. म्हणून लेखक हा कलाकार असून लेखन ही त्याची कला आहे. इथे मी माझे स्वतःचे उदाहरण देऊ शकतो. कारण जेव्हा मी एखाद्या विषयावर वाचन करतो तेव्हा मला विचारांचा विस्तार झाल्यासारखा वाटत राहतो. असे प्रकार आपण कवी, व्यंगचित्रकार, चित्रकार यांच्या बाबतीत सुद्धा पाहू शकतो. याला कारण म्हणजे त्यांच्या कलाकृतीत आपल्याला आश्चर्य किंवा निंदकपणा, आराधना किंवा तिरस्काराची भावना निर्माण होताना दिसत असतात. याबाबतीत कलाकृती थेट किंवा जटील, सूक्ष्म किंवा स्पष्ट, सुगम किंवा अस्पष्ट असू शकते. म्हणून इथे असे म्हणता येईल की इथे कला निर्मितीचे विषय आणि दृष्टीकोन केवळ कलाकारांच्या कल्पनेने बांधलेले असतात. म्हणून कलेमागील कलाकार समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो.
बऱ्याचवेळा काही माणसे कला आणि सौंदर्य यांची घालमेल घालताना दिसतात. इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे कला आणि सौदर्य यातला मूलभूत फरक म्हणजे कलाकार हा कला निर्माण करतो आणि त्या कलेचे सौदर्य कोण पाहत असतो, वाचत असतो, ऐकत असतो यावर अवलंबून असते. कला हे मत आणि भावना व्यक्त करण्याचे महत्वाचे साधन आहे. कलेच्या माध्यमातून लोक प्रेरित होऊन जगामध्ये वेगळा दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होते. सौदर्य म्हणजे कलेचे कोणतेही पैलू किंवा गोष्टी एखाद्या व्यक्तीला पहिल्यानंतर, ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सकारात्मक वाटू लागते किंवा त्या व्यक्तीला कृतज्ञ झाल्यासारखे वाटत राहते. केवळ सौदर्य ही कला नसून, कला हीच सुंदर गोष्टींपासून बनलेली असली पाहिजे. असे प्रकार गायन आणि नृत्य कलेमध्ये भरपूर आढळून येत असतात. वर म्हटल्याप्रमाणे कुठलाही कलाकार हा नियमबद्ध चालीत आपली कला समृद्ध करू शकत नाही या मध्ये मला भारतीय शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांचे उदाहरण देता येईल. त्यांच्या काळात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घराण्याचा नियमानुसार बंदिस्त झाले होते. कुमारांनी या बंदिस्त रागाना बाहेर काढून एक प्रकारचे बंड तर केलेच पण स्वतःची अशी गायकी तयार केली. अशा वेळीस आपल्या गाण्यातून त्यांनी वेगवेगळ्या भावाना सादर केलेल्या आहेत. ते म्हणत असत की, " जर रागांचे स्वभाव बंदिशिना अभिप्रेत असलेला रस अगर भाव यातून उमटणारा आकृतीबंध जर श्रोत्यांच्या नजरेसमोर उभा करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न भिन्न रुंदीचे, हरेक भावाला साजेसे आवाजाचे लगाव कंठातून उमटायला हवेत. कधी स्वभाविक, कधी नाजूक, त्यापेक्षा हळुवार, तरल, त्यापेक्षाही सूक्ष्म आणि या उलट प्रमाणात मोठा, आणखी मोठा, मोठ्यातला मोठा असे आवाज काढता आल्याशिवाय निराळे भाव आणि त्यांच्या छटा कशा दाखवता येणार?". हे सर्व करताना त्यांनी संगीत परिवर्तनशील आहे असे मानले आहे. म्हणून गायकसुद्धा असा कलाकार असतो आणि आपल्या कलेतून वेगळ्या सौंदर्याची झलक देत असतो. अशाच सौंदर्याचा अनुभव आपल्याला बेगम अख्तर यांची गजल ऐकताना मिळत असतो. म्हणूनच म्हणावसे वाटते की कलेमागील कलाकार हा आपल्याला सौंदर्याचा अनुभव चांगल्या आणि वेगळ्या प्रकारे देत असतो.
म्हणूनच इथे आपण समजून घेतले पाहिजे की कला हा एक असा शब्द आहे की प्रत्येक माणसे सराव आणि कठोर परिश्रमाद्वारे उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. कला आपल्याला शिकविते आणि नवीन निर्मिती करण्यास मदत करते. स्वच्छंदतावाद आणि व्यक्तिवाद यामुळे कलेला मौलिकता प्राप्त झाली आहे. नवीन आणि कधीही न ऐकलेले काहीतरी करणे ही कलाकाराची व्याख्या आहे. त्याचे महत्व कलाकृती इतकेच बनले आहे. आधुनिकतेच्या युगात, मौलिकतेच्या शोधामुळे कलाकारांना कलेचे पुनर्मूल्यांकन करता येऊ लागले आहे. कला काय करू शकते? कला कशाचे प्रतिनिधित्व करू शकते? कला अमूर्त अभिव्यक्तीवाद रंगवू शकेल काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. अशावेळीस एकच उत्तर आपल्याला मिळते ते म्हणजे प्रत्येक कलाकारांने आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन पाहणे आणि आपले लक्ष आपल्या कला विश्वावर केंद्रित करणे. तेव्हा आपल्याला कले मागील कलाकार समजू शकेल.
धन्यवाद
Comments
Post a Comment