Skip to main content

TADJOD तडजोड ( लेख )

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १७५
विषय क्रमांक : ५
विषय : तडजोड ( लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :

नेहमी आपण म्हणत असतो की कोणत्याही नातेसंबंधात तडजोड असावीच लागते. मग तो तुमचा मित्र असो किंवा सहकर्मी, कुटुंबातील सदस्य असो किंवा तुमचा जोडीदार असो. याला कारण म्हणजे स्वयंपूर्ण असं कोणीही असत नाही. कितीही केलं तरी काही न काही गोष्टी राहूनच जातात. तडजोड करणे म्हणजे एकमेकांना समजून घेऊन आपल्या टोकाच्या तत्त्वांना मुरड घालणे. तडजोड करून आपण सर्वांमध्ये स्वतःचे भले करू शकतो. याचा अर्थ असा की प्रत्येकाच्या स्वभावाचा बाज ओळखून त्यात थोडीशी सवलत देणे होय. तडजोड ही आपण संवादाद्वारे सर्वबाजूने मान्य होणाऱ्या अटींचा स्वीकार करण्याचा एक करार असतो. त्यामुळे आपला संघर्ष टाळण्यास मदत तर होतेच पण नकळत काही लाभ सुद्धा होत असतात. तत्वनिष्ठ आणि व्यावहारिक तडजोड, तर्कशुद्ध तडजोड किंवा  काही प्रमाणात सडलेल्या गोष्टींची तडजोड असे काही प्रकार तडजोडीचे असतात. सुप्रसिद्ध अमेरिकन राजकारणी आणि बराच काळ United States House of Representatives चे अध्यक्ष (Speaker) म्हणून काम केलेले Samuel Taliaferro Rayburn  त्यांनी म्हटले होते की, " I see too many people who see compromise as a bad things, an abandonment of principle. In reality, a willingness to compromise is a sign of great conviction"( बऱ्याच लोकांना तडजोड करणे म्हणजे वाईट गोष्ट वाटते, त्यासाठी ते तडजोडीचा त्याग करू पाहतात. प्रत्यक्षात तडजोड करण्याची इच्छा हे महान दृढनिश्चयाचे सुंदर लक्षण आहे). तर मराठी मध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " तरी न्यून ते पुरते | अधिक ते सरते | करुन घ्यावे हे तुमते | विनवीतू असे ||. इथे ज्ञानेश्वर माउलीने सर्वांना विनंती केली आहे की कुठलेही ज्ञान परिपूर्ण आहे असे कोणीही म्हणत नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असतेच. ते फक्त पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येकाने आपला अहंकार सोडून दिला पाहिजे आणि सर्वांना समजून घेतले पाहिजे. तडजोड करताना आपल्याला हव्या असलेल्या काही गोष्टी सोडून दिल्या तर तडजोडीतून मिळालेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला फायदा करून देत असतात.

तडजोड ही एक मूलभूत वाटाघाटीची प्रक्रिया आहे. त्यात दोन्ही पक्ष त्यांना हवे असलेले काहीतरी सोडून देतात. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या लोकांनी दुसऱ्या पक्षातील लोकांचा दृष्टीकोन समजून घ्यायला हवा. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. कारण अहंकार आपल्याला इतरांच्या चांगल्या गोष्टी पाहण्यास प्रतिबंध करतो. बऱ्याच वेळा प्रबळ इच्छाशक्ती असलेले लोक दुसऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यास तयार नसतात. त्यामुळे संघर्ष होतो आणि त्यात सर्वांचे नुकसान होत जाते. त्यासाठी सतत संवाद करून दोन्ही पक्षांनी एकत्र बसून मार्ग काढले पाहिजे. इथे मला भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आठवते. श्रीकृष्णाने बऱ्याच वेळा तडजोडी करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केले आहेत हे त्याचे चरित्र वाचताना  जाणवते. महाभारतात युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण शांतिदूत बनून जातो आणि तडजोड करताना पांडवासाठी फक्त पाच गावे मागतो. हे सर्व करताना तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करून सर्व मानवजातीला होणाऱ्या हानीपासून वाचवू पाहत असतो. पण प्रबळ इच्छाशक्ती असलेला अहंकारी दुर्योधन ही तडजोड नाकारतो आणि युद्धाला सामोरे जातो. त्यात सर्वात जास्त नुकसान कौरव सेनेचे होते. म्हणूनच आपला अहंकार बाजूला ठेवून दुसऱ्याना समजून घेतले पाहिजे. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तडजोड करणे म्हणजे कमीपणा घेणे नाही किंवा माफी मागणे सुद्धा नाही. इथे भगवान श्रीकृष्ण तडजोड करायला जातात पण आपला स्वाभिमान कुठेही हरवून बसत नाहीत. म्हणून श्रीकृष्णाचे चरित्र वाचताना एक गोष्ट नक्कीच समजते ती म्हणजे तडजोड ही जीवनशैली आहे आणि आपला अधिकार कुठे वापरावा आणि कुठे वापरू नये एवढे समजल्यावर तडजोडही कशी करावी हे समजून येते.

बऱ्याच वेळा आपण असेही पाहत असतो की तडजोड जरी जीवनशैली असली तरी काही बाबतीत तडजोड होणे शक्य नसते. याला कारण आहे माणसाच्या भौतिक आणि अभौतिक गरजा. अन्न, निवारा, पाणी, सुरक्षेची भावना, ओळख, आपलेपणा आणि स्वातंत्र्य यावर जेव्हा आवश्यकतेनुसार विवाद होतो तेव्हा कोणीही सहसा तडजोड करीत नाही  जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला असे वाटते की तडजोड झाल्याने दुसऱ्या व्यक्तींचा किंवा दुसऱ्या संघटनेचा स्वतःच्या भवितव्यावर नियंत्रण राहील तेव्हा अशा व्यक्ती किंवा संघटना तडजोड करण्यास तयार होणार नाही. यासाठी उत्तम उदाहरण आहे अमेरिकेतील काळ्या लोकांचा संघर्ष. त्यांनी स्वतःला गुलामगिरीतून सोडविण्यासाठी लढा दिला आणि त्यासाठी कायदेशीर नियंत्रण आणले आणि स्वतःसाठी कायदे केले तेव्हा ही माणसे हे कायाद्याचे नियंत्रण सोडण्यास तयार होणार नाही. यासाठी दुसरे उदाहरण बघायचे झाल्यास भारताचे देता येईल. भारतीय संविधानात दिलेल्या सवलतीवर तडजोड करण्यास दलित समाज तयार होणार नाही. जर कुठल्याही भारतीय सरकारने यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या समाजाला परत एकदा गुलामगिरीत राहावे लागेल अशी त्यांची भावना असते. इथे नियंत्रण आणि ओळख त्यांच्यासाठी मूलभूत गरजा आहेत त्यामुळे तडजोड होणे शक्य नाही. काही तज्ञांच्या मते संघर्षाच्या निराकरणासाठी तडजोड करताना वाटेल तशा सवलती देऊ नये. अशावेळीस तडजोड करताना वास्तविक गरजा लक्षात घेऊनच तडजोड करावी आणि खराब झालेले नातेसंबंध परत सुधारण्यासाठी प्रयत्न करावे.

वाटाघाटी आणि मध्यस्थी प्रकियेतील मतभेद सोडविण्यासाठी तडजोडीचा वापर हा सामान्य उपाय आहे. पण तडजोड नेहमीच माणसांचे वैयक्तिक किंवा संस्थात्मक संघर्ष असलेल्या समस्यांचे निराकरण करत नाही. याचे कारण म्हणजे तडजोड हे वारंवार एखाद्या समस्येचे उत्तर झाले आहे पण ते सर्व लोकांसाठी समाधानकारक असेल असे सांगता येत नाही. तडजोड प्रक्रिया कार्यात्मक किंवा भौतिक समाधान निर्माण करू शकेल परंतु मतभेदांशी संबंधीत भावनिक समस्यांचे निराकरण करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाईट भावना आणि वाद हे कायम असंतोषाचे कारण राहतील आणि एकमेकांशी संपर्क ठेवल्यास ते पुन्हा प्रकट होत राहतील. कारण तडजोड करताना दोन्ही पक्षांना त्यांना हवे असलेले काही मिळते सर्व नाही. बहुतेक विवाद स्पर्धात्मक रणनीतीपासून सूरू होतात जेथे दोन्ही बाजूसाठी सर्वोत्तम संभाव्य परिणाम हेच ध्येय असते. त्यासाठी वेळेची आवशकता, आर्थिक खर्च, प्रभावाचा वापर आणि व्यावहारिक बाबी सारखे अनेक घटक या समीकरणात येतात. तेव्हा तडजोडी सारखा प्रकार इथे उपयोगी पडेल असे वाटत नाही. संघर्ष आणि मतभेद व्यवस्थापित करण्यासाठी तडजोड ही प्रभावी पद्धत आहे परंतु ती सर्वोत्तम आहे असे मात्र म्हणता येणार नाही. काही मुद्यांवर असहमतीसाठी सहमती असण्याची शक्यता असू शकते. विवाद असह्य होतो आणि पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही तेव्हा तडजोडीचा प्रकार उपयोगी नसतो. जेव्हा एखादा संघर्ष होतो आणि तो टाळण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केला तर एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की तडजोड करताना महत्वाच्या समस्या किंवा महत्वाच्या गरजा गमावल्या जाणार नाही. कधी कधी सर्जनशील उपायांची आवश्यकता असते. सर्व मतभेद आणि मतभेदांवर वाटाघाटी करण्याची गरज नसते. जेव्हा समस्या सोडविण्यासाठी तडजोड किती आवश्यक आहे याची जाणीव करून घेण्यासाठी दोन्हीबाजूचा दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. म्हणून तडजोड ही विवादांचे निराकरण करण्यासाठी आदर्श प्रतिक्रिया नसते. यात कोणताही पक्ष समाधानी असू शकत नाही. त्यामुळे समस्या कायम राहू शकते. तडजोड ही एक प्रभावी पद्धत असू शकते जेव्हा इतर दृष्टीकोन कार्यक्षम नसतात किंवा परिस्थितीला या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.

तडजोड केल्याने आपले संबंध आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रांबरोबर चांगले राहतात. तेव्हा आपल्या कुठल्या भूमिकेवर तडजोड करावी किंवा कोणत्या लढाया लढण्यास योग्य आहे हे जाणून घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपला अहंकार सोडून द्यायला पाहिजे. आपण एकटे अनेक गोष्टी करू शकतो किंवा मला कुणाचीही गरज नाही ही भावना आपल्या मनातून काढून टाकायला हवी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने भूतकाळात केलेल्या चुका विसरून जाणे आणि त्या गोष्टीला कायमची तिलांजली देणे. आपल्या अपेक्षांचा पुनर्विचार करणे. यासाठी जेव्हा चर्चा होतात आणि वाद होतात तेव्हा तिथे शांत राहणे जरुरीचे आहे त्यामुळे आपण भांडणापासून दूर राहू शकू. सर्वात शेवटचे म्हणजे आपण बदलण्यासाठी तयार व्हावे. तडजोड प्रक्रियेमध्ये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही तडजोडीस तयार होता तेव्हा सर्वांना जाणवेल की तुम्ही पूर्णपणे तडजोड करण्यास तयार असून फक्त भांडण संपविण्यासाठी खोटी आश्वासने देत नाही आहात. एवढ्या चार गोष्टी जरी आत्मसात केल्या तर तडजोडीने तुमचे कोणतेही नाते सुधारू शकेल.

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...