रसग्रहणात्मक
विश्लेषण
पुस्तकाचे नाव :
राब
लेखक : अनंत मनोहर
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ ;
अनंत मनोहर हे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील विविध साहित्यप्रकार हाताळणारे एक बहुआयमी व्यक्तिमत्व. कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवास वर्णन, चरित्र लेखन असे साहित्य प्रकार त्यांनी आपल्या लिखाणातून वाचकापर्यंत पोहचवले आहे. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आणि त्या खेळावर सुद्धा त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. वाटचाल ही त्यांची पहिली कादंबरी जी त्यांनी १९६४ रोजी लिहिली. त्यानंतर त्यांनी जवळपास २० कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे ६५ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. १९९२ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विश्लेषण करणारे लेख त्यांनी दैनिक सकाळ मधून लिहिले आहे. सुनील गावस्कर यांचे चरित्र त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरच्या चरित्राचा अनुवाद सुद्धा त्यांनी केला आहे. एम. ए. झाल्यावर ते बेळगावच्या राणी पार्वती कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यावेळी त्यांनी बेळगावच्या तरुण भारत या वृत्तपत्रात अनेक लेख लिहिले आणि बेळगावच्या साहित्यविश्वात एकरूप झाले. खरे तर ते पेणचे पण जवळजवळ पूर्ण आयुष्य त्यांनी बेळगाव मध्येच घालविले. वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी वीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यापैकी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत अरण्यकांड, राब, अगतिक आणि वाटचाल. त्यापैकी राब ही हल्लीच माझ्या वाचनात आलेली कादंबरी.
या कादंबरीचे कथानक फिरते ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणातील आनेगाव या गावामध्ये. भिवा मोरे हा घरातल्या भाऊबंदकीमुळे आनेगाव सोडून सैन्यात भरती होतो. मग पुढे लवकरच निवृत्ती घेऊन बेंगलोर येथील एका उदबत्तीच्या कारखान्यात नोकरी करू लागतो आणि आपली पत्नी गुणा व मुलगा शिवा यांच्याबरोबर बेंगलोरला स्थायिक होतो. भिवा मोरे अकाली मरण पावतो आणि त्याच्या बायकोस उदबत्तीच्या कारखान्यात नोकरी मिळते. हळुहळु दिवस पुढे जाऊ लागतात आणि शिवा सोळा सतरा वर्षाचा होतो. तेव्हा गुणाला भिवाच्या चुलत्याचे कोकणातून पत्र येते. ज्या चुलत्यामुळे भिवाला आणि गुणाला आनेगाव सोडावे लागले होते तोच चुलता त्यांना परत बोलावत होता. याला कारण म्हणजे त्या चुलत्याची तीन मुले स्वर्गवासी झाली होती आणि चौथा मुलगासुद्धा आजारी होऊन मरायला टेकलेला असतो. या चुलत्याची बायको आपल्या नवऱ्याला नेहमीच म्हणत असते की ज्याप्रमाणे तुम्ही भिवाला घरातून काढून त्याची मालमत्ता घेतली त्यामुळेच आपल्या कुटुंबाची पूर्ण वाट लागली. अखेरीस चुलत्याला पश्चाताप होऊन तो गुणा आणि शिवाला परत बोलावतो आणि त्यांची मालमत्ता त्यांना परत देतो. गुणा आणि शिवा परत आनेगावला परत येतात आणि तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात.
जेव्हा गुणा आणि शिवा आनेगावात येतात तेव्हा तेथील माणसे, त्यांची बोलीभाषा, त्यांचे जगणे आणि खाणे, त्यांची नाती-गोती, त्यांची स्वतःबद्दलची बांधिलकी, हेवेदावे, आपापसातले वैर, व्यवहारातील अज्ञान, अंधश्रद्धा या सर्व गोष्टी येतात. त्याप्रमाणे तिकडचा निसर्ग, हवामान, नदीनाले, जंगल, पशुपक्षी, वनचर या गोष्टीसुद्धा तेथे येतात. येथील सर्व माणसे परिस्थितीने गांजेलेली होती. इथे सर्व समाजाचे म्हणजे जातीचे आणि धर्माचे वर्णन खूप सुंदरपणे आल्यामुळे कादंबरीत कुठेही उणेपण जाणवत नाही. इथे कुठेही मुंबईतील कामगाराच्या पैशावर जगणारी कुटुंब दिसत नाही. त्यामुळे कादंबरी खूपच वाचनीय होत जाते. ही कादंबरी लेखकाने बोलीभाषेत लिहिल्यामुळे ती ग्रामीण कादंबरी तर वाटतेच पण त्यात वापरलेल्या म्हणीमुळे यातील सूक्ष्मभेदही आपल्या लक्षात येतात.
या कादंबरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीत आलेला निसर्ग. यात आलेले निसर्गाचे म्हणजे वनजीवनाचे , पर्यावरणाचे, शेतीचे उल्लेख पहिल्यास लेखकाचे निसर्गावरील नुसते प्रेम प्रकट तर होत नाही तर जंगलातील प्राणी, वनस्पती व त्यांची औषधे त्याचप्रमाणे खागोलशास्त्राबद्दल त्यांचा व्यासंग जाणवल्याशिवाय राहत नाही. या कादंबरीत काही वाईट विचारांची माणसे सुद्धा भेटतात. पण इथला माणूस हा काही अगदी वाईट नसून तो तेथील मातीचाच आहे. म्हणून या कादंबरीचा नायक शिवा म्हणतो,"आपल्याला हा प्रदेश नीट समजून घेतला पाहिजे. मला त्या माणसांसारखे व्हायचे नसेल, इथल्या माणसांच्या मनाची जडणघडण समजून घेतली पाहिजे. त्यांच्यात एकरूप होऊनही मला वेगळे राहता आले पाहिजे. माझ्या मनात स्वतःचा स्वतंत्र कप्पा मला ठेवता आला पाहिजे". असे म्हणत तो वाईट विचार दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या कादंबरीतील नायक शिवा आणि नायिका पुतळी खुप वेगळ्या वाटतात. त्यांच्यात निर्माण झालेला प्रेमाचा ओलावा फार छान पद्धतीने लेखकाने मांडला आहे आणि त्यांच्यातील शृंगारिक भावना दाखविताना शब्दांचा वापर खूपच छान पद्धतीने केला आहे. त्यामुळे चित्रण फारच वास्तववादी वाटते.
खरोखरच राब ही कादंबरी खूपच छान असून वाचनीय आहे. वाचकांनी ही कादंबरी जरूर वाचावी कारण ही कादंबरी कुठल्याही काळात सुद्धा उपयोगी ठरणारी कादंबरी आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment