Skip to main content

Pravah प्रवाह : जुन्या पिढीने स्वीकारलेली नवीन पिढीची व्याख्या किंवा पद्धती

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १७०

विषय क्रमांक : ५

विषय : प्रवाह : जुन्या पिढीने स्वीकारलेली नवीन पिढीची व्याख्या किंवा पद्धती 

संकेतस्थळ :

असं म्हटलं जातं की प्रत्येक जुनी पिढी आपला वारसा नवीन पिढीच्या हवाली करीत असते. त्यामुळे नवीन पिढीला नेहमी आपल्या पूर्वजांचे स्मरण होत राहते आणि त्यांच्या अस्तित्वाशी जुन्या पिढीशी नातेही जोडले जाते. तरीसुद्धा जुन्या पिढीची आणि नव्या पिढीची विचारसरणी खूप वेगळी असल्याचे जाणवते. याला अनेक कारणे असतात. त्यापैकी महत्वाची कारणे म्हणजे  प्रत्येक पिढीचा दृष्टीकोन, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी मानलेली मुल्यात्मकता. बऱ्याचवेळा असे दिसून येते की जुन्या पिढीला नव्या पिढीच्या आधुनिकतेत रमता येत नाही आणि त्यांना आपल्या भूतकाळात निर्माण झालेल्या गोष्टींबद्दल आदर्श वाटत असतो. सतत भूतकाळातील गोष्टींचे स्मरण करीत असल्यामुळे नवीन गोष्टींचा स्वीकार करावयाला जुनी पिढी तयार असत नाही. काही रूढी, परंपरा आणि प्रथा जरी हानिकारक नसल्या तरी त्या निरूपद्रवी असतात, त्या सोडून दिल्या पाहिजे असा विचार जुनी पिढी पुष्कळदा करायला तयार नसते. त्यामुळे जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्यातील संवाद हळु हळु कमी होत जातो. जर जुन्या पिढीने नवीन पिढीची मूल्ये समजून घेतली किंवा जुन्या पिढीच्या परंपरा आणि प्रथा नवीन पिढीवर स्वीकारण्याची सक्ती केली नाही तर नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यात छानपैकी एक संवाद तयार होईल आणि नकळत दोन्हीही पिढीमध्ये सामंजस्य आणि अतूट स्नेहभाव निर्माण होत राहील.  स्वादिष्ट स्वयंपाक, ज्वलंत कथाकथन, कठीण प्रसंगी संकटाचा सामना करण्याचे धैर्य, कार्यालयीन कामाचा अनुभव, वगैरे अशा गोष्टी नवीन पिढीला जुन्या पिढीकडून शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे नवीन पिढीपासून सुद्धा जुन्या पिढीला भरपूर गोष्टी समजून घेता येतात. मला असे वाटते की जुन्या पिढीतील बरीच माणसे आपले संभाषण बदलू लागले आहेत आणि नवीन पिढीबरोबर वेळ घालवून त्यांच्या कडून बऱ्याच नवीन पद्धतीचा स्वीकार करताना दिसत आहे. आता आपण जुन्या पिढीने नवीन पिढीकडून ज्या गोष्टी स्वीकारल्या आहेत त्या गोष्टी सविस्तरपणे पाहू.

नवीन निर्माण झालेल्या तंत्रज्ञाचा वापर करणे. आपण पाहतो की अनेक जुनी पिढी नवीन आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करताना गोंधळताना दिसतात. संगणक, मोबाईल डिव्हाइसेस आणि इतर काही आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा वापर नीटपणे करण्यास त्यांना जमत नाही. त्यामुळे जुनी  पिढी या गोष्टी नवीन पिढीकडून तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल असे शिकू लागली. त्याचा परिणाम असा झाला की जुनी पिढी आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर सहजपणे संवाद करू लागली. व्हाट्सअप, फेसबुक सारखी माध्यमे वापरून आपल्या मुलांशी, नातवंडाशी आणि मित्रपरिवाराशी संपर्कात राहू लागली. नवीन तंत्रज्ञानाशी स्वतःला जुळवून घेण्याची पद्धत जुन्या पिढीने नवीन पिढी कडून स्वीकारली आहे.

सोशल मीडिया केवळ वाया घालविण्यासाठी नाही. सुरुवातीला जुन्या पिढीतील माणसे सोशल मीडिया काम नसणाऱ्यांचा उद्योग आहे असे मानत असत. आता हा दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. अनेक जुनी पिढी व्हाट्सअप, इंस्टाग्राम व फेसबुक अशा माध्यमाचा उपयोग माहिती देण्यासाठी वापरतात. माझे एक मित्र जवळपास ऐंशी वर्षाचे असून ते न कंटाळता सोशल मीडियातून खूप सुंदर माहिती इतिहासाबद्दल, क्रिकेटच्या खेळबद्दल देत असतात. त्याप्रमाणे एका व्हाट्सअप ग्रुपवर एक वयस्क गृहस्थ इंग्रजी, हिंदी आणि मराठी चित्रपटांची सुरेख माहिती देत असतात. त्यामुळे सोशल मिडीयावार काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असतात तशीच जुन्या पिढीतील माणसे चांगली माहिती देऊन सोशल मिडीयाचा उपयोग छानपणे करताना दिसतात. म्हणूनच जुन्या पिढीने नवीन पिढीकडून स्वीकारलेल्या पद्धतीमध्ये सोशल मीडियाचा वापरसुद्धा यायला पाहिजे.

प्रवास करणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारा खर्च महत्वाचा नाही. आजची तरुण पिढी नवीन गोष्टींचे शिक्षण घेण्यासाठी सतत प्रवास करीत असते. त्यासाठी लागणारा खर्च हा महत्वाचा नसतो असे नव्या पिढीचे तसे सूत्र असते किंवा त्यांची तशी व्याख्या असते. आज ही व्याख्या जुन्या पिढीतील माणसांनी तशीच्या तशीच आत्मसात केलेली दिसत आहे. त्यामुळे ते सदैव सक्रिय राहत असलेले दिसतात. नवीन पिढीबरोबर फिरायला जाणे, त्यांच्याबरोबर सहलीला जाणे, त्यांच्याबरोबरीने पर्वत चढणे अशी अनेक मजेदार उदाहरणे या जुनी पिढीच्या बाबतीत दिसून येत आहे. सतत सक्रिय प्रवास करीत राहणे ही एक सुंदर पद्धत जुन्या पिढीने नवीन पिढीकडून स्वीकारलेली आहे.

मी माझ्या लहानपणी बऱ्याचदा पाहत असे की जुन्या पिढीतील माणसे नवीन पिढीतील माणसांची मदत घ्यायला बिलकुल तयार नसत. कारण त्यांना नवीन काही शिकण्याची गरज वाटत नसे. पण आता तशी परिस्थिती दिसत नाही. कार्यलयात काम करताना अनेक नवीन पद्धतीचा वापर करताना जुनी पिढी नवीन पिढीची मदत घेताना दिसते. त्यामुळे नवीन पिढीशी एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार होऊन जुन्या पिढीतील लोकांचे ज्ञान घेऊन नवीन पिढी जग बदलण्याचे मार्ग साध्य करताना दिसत आहेत. हिंदी चित्रपट सृष्टी हे त्यामधील एक उत्तम उदाहरण आहे. आज ही चित्रपट सृष्टी अनेक दशके कार्यरत आहे आणि अनेक पिढीने आपल्या कामातून वेगवेगळे चित्रपट निर्माण केले आहेत आणि त्यांचा प्रचंड वारसा नवीन पिढीकडे सुपूर्द केला आहे आणि नवीन पिढीने जुन्या पिढीतल्या कलाकारांच्या मदतीने स्वतःचे सामर्थ उभे केले आहे. त्याचप्रमाणे जुन्या पिढीतील कलाकाराने नवीन पिढीच्या कलाकारांची मदत घेऊन चांगले चित्रपट दिले आहे उदाहरण द्यायचे झाल्यास अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारलेली ब्लॅक हा चित्रपट पाहा.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या पिढीने नवीन पिढीकडून आत्मसात केली आहे ती म्हणजे मोकळ्या मनाची व्याख्या. नवीन पिढी ही सहनशील आणि मोकळ्या मनाची असतात. त्यांचे राजकीय विचार, त्यांचे शिक्षण हे मुक्त शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते. कुठल्याही गोष्टींचे स्वामित्व ही नवीन पिढी स्वीकारताना दिसत नाही. त्याबद्दल त्यांचे म्हणणे असते की तसे केल्यास विकास थांबतो आणि नवीन गोष्टींची निर्मिती होत नाही. ज्ञान कितीही कठीण असले तरीही ते शिकण्यास नवीन पिढी तयार असते. त्यामुळे मोकळे मन असणे गरजेचे असते. कोणताही प्रकार आहे तसा स्विकारणे म्हणजे मोकळ्या मनाची व्याख्या होत नाही. प्रत्येक गोष्ट चूक आहे का बरोबर याचा पूर्णपणे अभ्यास करून अगदी व्यवस्थितपणे त्याचे विश्लेषण करणे आणि ते ज्ञान आत्मसात करणे म्हणजेच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणे आणि तो करताना आपले मन मोकळे करणे जरुरीचे आहे. आज जुन्या पिढीतील बरीच माणसे आपले मन मोकळे ठेवण्याची कला नवीन पिढीकडून आत्मसात करताना दिसत आहे.

जुन्या पिढीने काही गोष्टी नवीन पिढीकरून स्विकारल्या आहेत. त्यातील पाच गोष्टी वर सांगितल्या आहेत. एक गोष्ट खरी आहे की जुन्या पिढीकडे अनुभव असतो आणि सहनशक्ती असते तर नवीन पिढीकडे काम करण्याची आणि शिकण्याची क्षमता असते. पिढी सारखी बदलत असते. आजची नवीन पिढी उद्याची जुनी पिढी होणार. बदल तर होतच राहणार. क्रिकेट मध्ये डॉन ब्रॅडमनची एक पिढी झाली तशीच सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरची झाली. आज खेळत असलेले खेळाडू उद्याच्या जुन्या पिढीत जाणार. यावरून असे समजते की प्रत्येक पिढी स्वतःची काही वैशिष्ट्ये घेऊन जगली आणि नवीन निर्मिती करून गेली. नवीन पिढी सुद्धा काहीतरी निर्मिती करीत असते. असा हा प्रवाह चालूच राहणार. तेव्हा जुन्या पिढीतील लोकांचे काम बनते की नवीन पिढीतील लोकांना प्रत्येक वेळी उत्तेजन देऊन त्यांना नवीन निर्मितीत सहभागी करून घेणे आणि नवीन पिढीतल्या लोकांचे काम बनते की जुन्या पिढीतील लोकांच्या अनुभवंचा उपयोग करून नवी निर्मिती करावी. कारण प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर उपलब्ध नसतात त्यासाठी जुन्या पिढीतील लोकांचा अनुभव कामी येतो. यात सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन पिढीने केलेल्या कामाचे किंवा निर्मितीचे नेहमी गुणगान जुन्या पिढीतील लोकांनी केले पाहिजे. कारण हा प्रवाह कुठेच थांबणारा नसून चालूच राहणार आहे आणि जुन्या पिढीतील माणसांना नवीन पिढीच्या व्याख्या किंवा पद्धती स्वीकाराव्या लागणार आहे 

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...