Skip to main content

Mee Maza Margdarshak -मी माझा \ माझी मार्गदर्शक

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १६८
विषय क्रमांक : ५
विषय : मी माझा \ माझी मार्गदर्शक
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

काही माणसांची व्यक्तिमत्वे इतकी प्रभावी असतात की त्यांच्या सहवासातून प्रत्येकाला सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळत असते. अशा प्रभावी माणसांच्या किंवा व्यक्तिमत्वांचा शिकवणुकीमुळे प्रत्येक माणूस आपले जीवन घडवू पाहत असतो. पण माणसाला स्वतःचा आंतरिक मार्ग माहीत नसेल तर अशा व्यक्तिमत्त्वांनी कितीही शिकवण दिली किंवा लिखाण केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. याचे कारण म्हणजे माणसाच्या मनावर व शरीरावर होणारा भौतिक गोष्टींचा परिणाम. आपले आयुष्य कसे जगावे याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक मानवाला असते. त्यासाठी मानव आपल्याला हवी असलेल्या साधनांची निवड करीत असतो आणि ही निवड करताना त्याचा संबंध भूतकाळाशी जरी नसला तरी त्याचे भविष्य घडविण्यासाठी जरूर असतो. कारण त्यात यश आणि अपयश अशा दोन्ही गोष्टी लपलेल्या असतात. आपण निवडलेल्या गोष्टी यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला खुपच संघर्ष करावा लागतो. मग माणसांच्या विचारांवर  सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांचा पगडा पडू लागतो. त्यात माणूस सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांशी अधिक जवळीक साधू लागतो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. यासाठी माणसाने स्वतःला नेहमी आशावादी ठेवले पाहिजे. आपल्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही आनंदाने स्वीकारली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक माणसाला स्वतःलाच स्वतःचा मार्गदर्शक व्हावे लागते.

मी शाळेत असताना किंवा महाविद्यालयात असताना उत्तम गुण मिळविणारा विद्यार्थी नव्हतो. त्यामुळे माझी गणना कधीच हुशार विद्यार्थ्यांमध्ये झाली नाही. याबद्दल मला कधीही खंत वाटली नाही. कारण मला नेहमी एखादी गोष्टीची पूर्णपणे माहीती करून घेण्याची  खूपच आवड होती आणि मला माझ्या वैचारिक क्षमतेबद्दल जास्त जाणीव होती. त्यासाठी कोणताही अभ्यास करताना मी परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर नजर ठेवून केला नाही. जो काही केला त्यातून उत्तम ज्ञान मिळविण्यासाठी. त्याचा फायदा मला माझ्या महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर होऊ लागला. पण हे करत असताना मला कोणीच मार्गदर्शक नव्हता. विद्यार्थ्यांनी परीक्षेत मार्क मिळविणे हेच प्रत्येक मार्गदर्शकांचे त्यावेळेचे उद्दिष्ट होते. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन फक्त अशा विद्यार्थ्यांकडे होते की जे परीक्षेत जास्त गुण मिळवीत होते. त्यात त्या विद्यार्थ्यांपेक्षा त्या मार्गदर्शकांचेच नाव अधिक होणार होते. अशा वेळी मला माझा मार्ग स्वतःच शोधावा लागला. आणि तो मी शोधत गेलो. शालेय शिक्षण झाल्यानंतर माझे महाविद्यालयिन शिक्षण वाणिज्य शाखेत झाले आणि त्या शाखेचा मी पदवीधर झालो. वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यामुळे त्या शाखेतील अभ्यासक्रमामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये निर्माण झालेल्या आवडीमुळे म्हणा, मला वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. तेव्हा अभ्यास क्रमासाठी असलेल्या पुस्तकांबरोबर त्या विषयांवर इतर पुस्तके वाचण्याचा आणि त्यातून स्वतःचे तर्क तयार करण्याचा नाद लागला. त्यातून मिळालेली माहिती मी इतरांना सांगू लागलो आणि त्यातील काही माझी मित्रमंडळी व्यवस्थित ऐकून त्याचे विश्लेषण करीत असत आणि कुठे अजून माहिती कमी पडते याची जाणीव करून देत असत. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय मला इतर विषयांची पुस्तकेही वाचण्याची सवय होऊ लागली. त्यात मराठी आणि इंग्रजीमधील पुस्तके मी खूपच वाचू लागलो. सुरुवातीला कथा, कविता, कादंबरी सारख्या पुस्तकांचे वाचन करीत असताना मला ऐतिहासिक, आत्मचरित्र, चरित्र आणि ललित साहित्य वाचण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक विषय हा एका दृष्टीकोनातून न बघता वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा माझा दृष्टीकोन तयार होऊ लागला. त्याचा फायदा मला आजही होत आहे. आणि मीच माझा मार्गदर्शक झालो.

मी जेव्हा म्हणतो की मीच माझा मार्गदर्शक झालो तेव्हा मला आचार्य विनोबा भावे यांचे एक वाक्य आठवते. ते म्हणतात, " विचार सतत वाहतात. म्हणून त्यांचे सामर्थ कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत गेले आणि नाहीसे होत गेले. तरीपण सत्ता विचारांचीच राहिली. मनुष्याला या विचारांपासून प्रेरणा मिळत आली आहे. त्यामुळे विचारांची तुलना करावी अशी कोणतीही शक्ती या जगात नाही". किती सहजपणे आचार्य विनोबा भावेनी विचारांचे मोठेपण सांगितले आहे. जर आपण आपल्या भोवती लक्ष देऊन पाहिले तर बरीच माणसे आपल्या विचारांकडे लक्ष देत नाही किंवा विचारांच्या बाबतीत जी सहजगता हवी असते तेवढी ती त्यांच्यामध्ये पाहिजे तेवढी दिसत नाही. मगाशी मी वर म्हटले होते की विचार नेहमी सकारात्मक असावे, कारण सकारात्मक विचार प्रगतीकडे घेऊन जाते तर नकारात्मक विचार नेहमी अडचण निर्माण करून प्रगती थांबवते. इथे मला वाटते की काही प्रमाणात नकारात्मक विचार करणे जरुरीचे आहे कारण जर मानवाला स्वतःचा मार्गदर्शक व्हायचे असेल तर नकारात्मक विचारांची बाजू लक्षात घेऊन स्वतःलाच स्वतःचे मित्र व्हावे लागेल आणि गंभीरपणे नकारात्मक विचारांचे विश्लेषण करून स्वतःचे  एक जबाबदार व्यक्तिमत्व तयार करावे लागेल. त्यासाठी स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल. आपण जे काही ऐकतो किंवा वाचतो याला काही पुरावा आहे का? याचा शोध घ्यावा लागेल. जे काही विचार आपल्या मनात आले आहे ते तथ्यांवर  आधारित आहे का? मी एखाद्या परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावला आहे का? त्या परिस्थिकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन कसा आहे? जर यापेक्षा वेगळी परिस्थिती घडली तर त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असेल? असे अनेक प्रश्न तयार करून आपणच त्यांची उत्तरे शोधली पाहिजे. त्यामुळे आपण नकळत नकारात्मक विचारांना आव्हान देतो आणि आनंदी जीवनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत असतो. त्यासाठी आपण कुठलेही काम करीत असताना केलेला संघर्ष किंवा आपल्याला आलेले अनुभव याचे विश्लेषण वैचारिक पद्धतीने लिहून काढले तर आपल्याला एक प्रकारचा आनंद होऊ लागतो आणि आपली प्रगती होऊ लागते. जर आपण तसे केले तर आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यास, आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवण्यास आणि अंतर्गत संघर्ष सोडविण्यास मदत करते आणि अपयशात सुद्धा यशाचा मार्ग दिसण्यास मदत होते.  यामुळे आपणच स्वतःचे चांगले मार्गदर्शक होऊ शकतो. 

सुरुवातीला महाविद्यालयात शिकत असताना आपण एक विचारधारा आत्मसात करीत असतो. पुढे जसजसे वेगवेगळ्या विषयांवरील वाचन करीत असताना किंवा एखादा विषय समजून घेत असताना महाविद्यालयात आत्मसात केलेली विचारधारा बदलू लागते आणि नवे विचार मनाच्या कोपऱ्यात रुजू लागतात. याचे कारण अनेक नवीन प्रसंग घडत जातात, नवीन विचारांचा परिचय होत जातो, नवीन माणसे भेटतात. त्यामुळे  वेगळ्या प्रकारचे चिंतन सूरू होऊ लागते आणि विचारांना नवीन दिशा मिळू लागते. आज देखील ही प्रक्रिया चालूच आहे. याला कारण असे आहे की कोणतेही ज्ञान किंवा विचार पूर्णावस्थेची पायरी कधीच गाठू शकत नाही. कारण जग हे अखंड काळापर्यंत बदलत राहणार, त्यामुळे माणसांचे ज्ञानही बदलत राहणार. विज्ञान नवीन शोध लावणारच आणि त्यामुळे ज्ञान ही वाढत जाणारच. म्हणून विचारांना मुक्तता दिली पाहिजे. जर विचार एका ठिकाणी जाऊन थांबू लागला तर नवीन गोष्टींची निर्मिती थांबेल. जर कोणी मला सांगितले की कोणतेही विचार एका धर्मामध्ये किंवा त्या धर्मांच्या धर्मग्रंथात पूर्वीपासूनच आले आहेत आणि नवीन विचार येईल असे वाटत नाही, तेव्हा मला त्या माणसांची कीव करावीशी वाटते आणि ती माणसे मला संकुचित मनाची वाटतात. जेव्हा मी डॉ. आंबेडकर समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचत होतो, तेव्हा मला अनेक जणांनी त्यात वाचण्यासारखे काय आहे असे विचारले होते. तसेच इस्लामचा अभ्यास भारतीय मुस्लिम समाजाचे मन ओळखण्यासाठी करू लागलो तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी मला नको ती दुषणे देण्यास सुरुवात केली होती. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत स्वतःचा अभ्यास चालू ठेवला आणि मला नवीन विचार आत्मसात करण्याची एक वेगळी संधी उपलब्ध झाली. तोच प्रकार काश्मीर बाबतचा. आजही अनेक जनांना काश्मीर प्रश्न काय आहे याची कल्पनाच नसते. ३७० कलाम म्हणजेच काश्मीर प्रश्न असे बरेचजण समजतात. जेव्हा मी या विषयांवर वाचन सूरू केले तेव्हा सुद्धा मला एकट्यानेच माहिती मिळावावी लागेल ही गोष्ट जाणवू लागली. मग मी डॉ. आंबेडकर, इस्लाम आणि काश्मीर या संबंधित विषयांवर बरीच पुस्तके मिळविली आणि ती वाचून स्वतःचे निष्कर्ष आणि विश्लेषणात्मक विचार लिहून ठेवू लागलो. त्यामुळे अनेक गोष्टींची माहिती समजू लागली आणि मिळालेली माहिती बरोबर आहे की चूक आहे याचा शोध घेऊ लागलो आणि मीच स्वतः स्वतःचा मार्गदर्शक झालो.

आजही जगात अनेक सुंदर गोष्टी आहेत. आपल्याला विचार मांडायला सुंदर भाषा आहेत. आपले मन मंत्रमुग्ध करणारे जादूई स्वर आहेत. मनाच्या तळापर्यंत पोचणारे रंग आहेत. प्रत्येक गोष्टींबद्दल एकमेकांची सुंदर आपुलकी आहे. जीव ओवाळून टाकावा अशी प्रेमाची ताकद माणसाला मिळाली आहे. माणूस आपल्या दहा बोटांच्या करामतीने छान कलाकृती तयार करीत आहे. सतत शिकायला आणि विचार करायला लावणारी बुद्धी आहे. पण या सगळ्यात आश्चर्यकारक असे आपले मन आहे आणि ते मन दुधारी तलवारीसारखे आहे. ते नितळ ठेवायचे असल्यास स्वच्छ तर्कदृष्टी हवी. आपल्याला आवडतील अशाच व्यक्तींनी जगावे आणि बाकीच्यांना जगण्याचा हक्क नाही अशी भावना आपल्याला विनाशाकडे घेऊन जाऊ शकते. आपल्याला जगातील सर्व लोकांसोबत जगायचे आहे, त्यासाठी इतरांचा जगण्याचा हक्क मान्य केला पाहिजे. त्याच्यासाठी संवादाची गरज आहे असा संवाद आपण स्वतःच निर्माण करू शकतो. मग तो तांत्रिक मार्गाने असला तरी चालतो पण तो संवाद तांत्रिक नसावा ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. काही गोष्टी स्वतःपासून केल्या पाहिजे. सर्वप्रथम स्वतःला सर्वोत्तम व्यक्ती बनविणे जरुरीचे आहेत. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून आपली ध्येये गाठण्यासाठी आपल्यामधील सुपरमॅन शोधला पाहिजे. स्वतःची शैली निर्माण करून इतरांनाही उत्तम जीवन जगण्यासाठी प्रेरित करीत राहिले पाहिजे. ज्या व्यक्ती कुठलाही अभ्यास नसताना आपण पारंगत असलेल्या विषयावर त्यांची चुकीची मते मांडत असतात अशा व्यक्तींशी कुठेही वाद न घालता आपले विचार लिहून काढून सर्वांपर्यंत पोहचेल असा प्रयत्न करावा म्हणजे आपले विचार करण्याची शैली विकसित होण्यास मदत होईल. त्यासाठी नेहमी आशावादाचा सराव करावा. कारण एक आशावादी अनेक आशावादी मार्गाने आव्हान स्वीकारेल आणि आपणास आनंद देणारे काम मिळविण्यात मदत करेल. त्यासाठी सकारात्मक विचार करणे आणि सकारात्मक लोकांमध्ये राहणे नेहमीच चांगले असते. हे सर्व करताना मी स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक झालो आहे आणि पुढेही होत राहणार.

धन्यवाद 
✍🏻 योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...