Skip to main content

Ambhi Susanskrut? आम्ही सुसंस्कृत? (टीकात्मक लेख)

रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १७१
विषय क्रमांक : ४
विषय : आम्ही सुसंस्कृत? (टीकात्मक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :

खरोखर आपण सुसंस्कृत आहोत का? असा प्रश्न जेव्हा कुणी विचारतात तेव्हा आपण सहजपणे हो म्हणून उत्तर देत असतो. अशा वेळेस आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेतो त्यावेळीस आपण सहजपणे सुसंस्कृत या  शब्दाचा अर्थ शिक्षित किंवा श्रीमंत असा लावत असतो. एखादी व्यक्ती सुसंस्कृत ठरविताना आपण फक्त त्या व्यक्तीचे शिक्षण, त्याची मातृभाषेप्रमाणे इंग्रजी भाषेवर असलेली पकड, त्याची बँकेतील ठेवी, ती व्यक्ती वापरत असलेले महागडे डिझायनर कपडे, त्याच्याकडे असलेली संपत्ती इत्यादी गोष्टी लक्षात घेतो. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जरी सुसंस्कृत हा शब्द शिक्षणाशी संबंधित असला तरी सुसंस्कृत असणे म्हणजे श्रीमंत होणे नाही. श्रीमंत लोक व्यवस्थितपणे शिक्षण घेऊन सुसंस्कृत होऊ शकतात पण महागाड्या वस्तू विकत घेण्याची क्षमता कोणालाही सुसंस्कृत बनवत नाही. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला सुसंस्कृत म्हणतो तेव्हा आपल्याला हे जाणवते की त्याच्याकडे चांगले शिक्षण आहे, चांगले शिष्टाचार  आहे आणि त्या व्यक्तीला बहुतेक कलांची चांगली माहिती आहे. या गुणांमुळे ती व्यक्ती जिज्ञासू बनते आणि आपल्या आकालनाद्वारे विविध विषयात रस घेऊन नवीन गोष्टी शोधून काढत असते. मग अशा व्यक्ती माहितीपूर्ण चर्चामध्ये भाग घेऊन समाजाला आधुनिक दृष्टीकोन देते व तुमच्या कल्पना हुशार मनांच्या कल्पनांशी कशा जुळत आहेत याचे उदाहरण देऊन समाजाला धर्मांध, तर्कहीन मानसिकते पासून दूर घेऊन जाते.  हे सर्व लिहीत असताना मला एका चिनी तत्ववेत्ता, राजकारणी आणि शिक्षक कन्फ्यूशियस (Confucius) याची आठवण झाली. कारण त्याचे ज्ञान, परोपकार, निष्ठा आणि सद्गुण त्यातून निर्माण झालेले तत्वज्ञान हजारो वर्षांपासून चिनी समाजाचे मार्गदर्शक बनले आहेत. त्यामुळे मला वाटते की कन्फ्यूशियस (Confucius) हे सुसंस्कृत व्यक्तीचे परिपूर्ण उदाहरण आहे. जरी कन्फ्यूशियसना विविध विषयांचे ज्ञान होते तरी सुद्धा ते इतर सुसंस्कृत व्यक्तींच्या गुणांचा सन्मान करीत आणि त्यांचे विचार जाणून घेत असत. यात त्यांची नम्रता सुद्धा दिसून येत असे.  म्हणून आपण जेव्हा एखाद्याला सुसंस्कृत म्हणू तेव्हा आपण त्याच्या शिक्षणाबरोबर त्याचे विविध विषयावरील ज्ञान, त्याची आकलन शक्ती व जिज्ञासू वृत्ती, त्याची नम्रता आणि इतरांच्या गुणांचे योग्य रीतीने समर्थन करण्याची क्षमता या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

तरीसुद्धा आपण जेव्हा सुसंस्कृत व्यक्ती असणं म्हणजे काय हे ठरवायला जातो तेव्हा आपल्याला जाणवेल की सुसंस्कृत व्यक्ती ही एक दुर्मिळ घटना आहे आणि या संकल्पनेत अनेक जाणिवांचा समावेश आहे.  त्यापैकी एक आहे साक्षरता. प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत आणि साक्षर असणे फार गरजेचे आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तिमध्ये दोन्ही गुण आढळून येतात. तरीसुद्धा साक्षर असलेली प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही. व्यक्ती साक्षर असणे म्हणजे त्या व्यक्तीला लिहिता वाचता येणे. त्यामुळे कुठलेही लिखाण आणि वाचन करणारी व्यक्ती ही सुसंस्कृत असतेच असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे अनेकांना असे वाटते की एखाद्याला इंग्रजी लिहिता वाचता आले म्हणजे तो सुसंस्कृत झाला किंवा वेगवेगळे स्टाईल करणारे किंवा तोकडे कपडे घालणारे लोक आपण सुसंस्कृत समजू लागलो आहोत. पण त्यांच्या वागण्यातून कोणतीही गोष्ट सुसंस्कृत असल्याचे जाणवत नाही. जरी ही मंडळी साक्षर असली तरी त्यांच्यामध्ये जो अहंकाराचा उन्माद दिसून येतो तेव्हा अशा व्यक्तींना आपण साक्षर असले तरी सुसंस्कृत म्हणता येणार नाही. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास ही साक्षर माणसे रहदारीचे नियम मोठया प्रमाणावर मोडतांना रोजच पहावयास मिळतात. त्यात बरीच माणसे उच्च शिक्षित सुद्धा असतात.  त्यांच्याकडे वाहन चालवीण्याचा परवाना असतो याचाच अर्थ ते साक्षर असल्यामुळे त्यांना तो परवाना मिळालेला असतो. तेव्हा वाटते की साक्षर असलेली प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही. या बाबतीत अजून एक उदाहरण बघायचे झाल्यास लग्न करताना मुलाकडील मंडळी ज्याप्रकारे हुंडा मागतात किंवा मुलीच्या आई वडिलांना जो खर्च करायला सांगतात तेव्हा अशा व्यक्ती साक्षर किंवा उच्च शिक्षित असून सुद्धा सुसंस्कृत वाटत नाही. अशी बरीच उदाहरणे दररोज दिसण्यात येतात. वाटेत चालत असताना पान खाऊन थुंकणे आणि  सार्वजनिक रस्त्याच्या भिंती रंगवून टाकणे किंवा ज्या ठिकाणी लिहिले असते, "इथे कचरा टाकू नये" तरी त्याच ठिकाणी कचरा टाकणे. अशी कृत्ये करणारी व्यक्ती जरी साक्षर असली तरी तिला सुसंस्कृत कसे म्हणता येईल? याचाच अर्थ सुसंस्कृतपणा साक्षर झाल्याने येत नसतो. त्यासाठी चांगले विचार व चांगले संस्कार जरुरीचे असतात. सुसंस्कृत असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या पदाचा, पैशाचा आणि प्रतिष्ठेचा अहंकार न जोपासता नम्रतेने वागून सर्वांना बरोबर घेऊन जाईल आणि नियमांचे पालन करेल तरच तो सुसंस्कृत म्हणून ओळखला जाईल.

आपण एखाद्या व्यक्तीला सुसंस्कृत म्हणतो तेव्हा त्यांना सौंदर्य आणि  जीवनातील बारीकसारीक गोष्टींची कदर असते असे आपण मानतो. या बाबतीत रशियन लेखक अँटॉन चेखोव्ह ( Anton Chekhov ) लिहितो की सुशिक्षित लोकांमध्ये आरामात मिसळण्यासाठी आणि  त्यांच्याबरोबर आनंदी राहण्यासाठी, एखाद्याने एका मर्यादेपर्यंत सुसंस्कृत असणे जरुरीचे आहे (In order to feel comfortable among educated people, to be at home and happy with them, one must be cultured to a certain extent). त्यासाठी तो सुसंस्कृत होणे म्हणजे काय हे सांगताना तो म्हणतो की सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षित होणे तर गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विविध विषयाबद्दल माहिती जाणून घेणे, आधुनिक पद्धतीने विचार करणे, मोकळ्या मनाचे असणे, आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या लोकांचा आदर करणे आणि विवेक पूर्ण जीवन जगणे या गोष्टी तो सांगतो. याव्यतिरिक्त अजून अशा काही बाबी आहेत त्या माणसाला सुसंस्कृत बनवते. इथे मला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे एक वाक्य आठवते. ते म्हणत असत, " विज्ञानावर आधारलेला तर्कशुद्ध विचार भारताला स्विकारावाच लागेल " (India cannot afford to loose rational thinking and scientific temper). याचाच अर्थ माणसाला सुसंस्कृत बनण्यासाठी विज्ञानावर आधारलेले तर्कशुद्ध विचार हवेत. त्यासाठी माणसाने काही मार्ग शोधले पाहिजे. त्यातील काही मार्ग पुढील प्रमाणे आहे.

प्रत्येक माणसाने सुसंस्कृत होण्यासाठी कलेचे कौतुक करण्यास शिकले पाहिजे. चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, नाट्यकला व चित्रपट, नृत्यकला, लेखनकला वगैरे गोष्टींची स्तुती करण्यास शिकले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कला कशी पाहावी आणि समजून घ्यावी यावरील पुस्तके वाचावीत. सर्वात चांगली कलाकृती तुम्हाला आवडली असेल तर त्याबद्दल इतरांना सांगून त्या कलेचे महत्व पटवून द्या. त्यासाठी संग्रहलयात आणि आर्ट गॅलरीत जाऊन माहिती करून घेणे, नाटक व चित्रपट पाहणे महत्वाचे ठरू शकेल. नेहमी एक गोष्ट पाहण्यात येते की आपल्या घरातील एखाद्दी व्यक्ती कलेचे सादरीकरण करणार असेल तरच त्या कलेचे कौतुक केले जाते. एक रसिक म्हणून त्या कलेचा आस्वाद घेतला जात नाही. अशा व्यक्तींना आपण सुसंस्कृत म्हणू शकणार नाही कारण सुसंस्कृत माणूस कलेचा आस्वाद घेत त्या कलेचे कौतुक करीत असतो.

सुसंस्कृत होण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षाकाठी जवळ जवळ ऐंशी नव्वद पुस्तके वाचली पाहिजे. त्यात तुमच्या मातृभाषेतील आणि इंग्रजी भाषेतील सुद्धा असतील. पाश्चात्त्य देशांमध्ये पुस्तकांना खूप महत्व दिले जाते आणि ज्यांच्याकडे पुस्तके आहेत अशा व्यक्तींना सुजाण वाचक समजले जाते. कारण पुस्तके तुम्हाला बरीच माहिती पुरवत असते आणि तुम्हाला तर्कशुद्ध विचार करायला मदत करते. पुस्तके वाचताना इतिहास, कादंबरी, नाटक कविता, ललित लेख, वैचारिक लेखन, धर्म या सर्व विषयांवर वाचन केले पाहिजे. स्वतःच्या देशातील लेखकांची पुस्तके जरूर वाचली पाहिजे पण त्याचबरोबर परदेशी लेखकांनी लिहिलेली पुस्तकेसुद्धा वाचली पाहिजे. याबाबतीत Ann Morgan हिने वेगवेगळ्या देशातील लेखकांची वाचलेल्या पुस्तकांची यादी केली आहे आणि ती तिच्या संकेत स्थळी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा सुद्धा प्रत्येक माणसाला होत जाईल. कारण पुस्तकेच प्रत्येक माणसाला सुसंस्कृत बनवत असतात.

पुस्तक वाचनाप्रमाणे सुसंस्कृत व्यक्तीने वेगवेगळ्या प्रांतातील आणि देशातील अन्नाचा आस्वाद घेतला पाहिजे. प्रत्येक प्रांतातील किंवा देशातील अन्न त्या भागातील बनत असलेल्या अन्नाची माहिती देत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्या प्रत्येक भागात काय पिकते याची कल्पना सहजपणे येऊ शकते. जर त्यासाठी प्रवास केला तर खूपच चांगले म्हणजे प्रत्येक माणसाला त्या भागातील भौगोलिक परिस्थितीची जाणीव होईल. पण 
 प्रवास करणे शक्य होत नसेल तर आज  बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये विविध भागातील अन्न मिळत असते. त्याची नोंद घेऊन तिथे जावे आणि वेगवेगळ्या अन्नाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सुसंस्कृत होण्याचा अजून एक मार्ग म्हणजे स्वतःच्या धर्माबद्दल प्रेम जरूर बाळगा पण त्याचबरोबर जगातील इतर धर्मांबद्दल जरूर माहिती करून घेतली पाहिजे. धार्मिक साक्षरता, धर्माची मूलभूत शिकवणी, प्रत्येक धर्माचे संस्थापक, संस्था आणि धार्मिक परंपरांचे ज्ञान यांची माहिती असणे जरुरीचे आहे. जगातील प्रमुख धर्म म्हणजे हिंदू, बौध्द, यहूदी, ख्रिश्चन, इस्लाम आणि ताओवाद. यापैकी तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तर इतर धर्मांपैकी अजून एका धर्माची माहिती करून घ्यावी. त्यासाठी त्या धर्मातल्या व्यक्तींशी बोलले पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेट द्या. त्या धर्माची मूलभूत माहिती देणारी पुस्तके वाचा. त्याबद्दल संशोधन करा. जर तसे केले तर आपण स्वतः आपल्या धर्माची माहिती व्यवस्थितपणे समजून सांगू शकतो.

जगातल्या सर्व संस्कृतीशी संबंधित असलेली गोष्ट म्हणजे संगीत. प्रत्येक देशाचे संगीत मग ते शास्त्रीय असो वा सुगम संगीत असो त्या देशाच्या संस्कृतीशी जोडलेले असते. संगीत आणि संस्कृती हातात हात घालून जातात. म्हणून संगीताचे कार्यक्रम पाहणे किंवा ऐकणे म्हणजे जग समृद्ध झाल्यासारखे वाटते. भारतीय शास्त्रीय संगीत तर याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे सुसंस्कृत होण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत ऐकले पाहिजे.  संगीता प्रमाणे नृत्यकला ही तेवढीच महत्वाची आहे. भारतीय नृत्यकला तर प्राचीन भारतीय संस्कृतीशी जोडली गेली आहे. जेव्हा आपण ती बघायला जातो तेव्हा त्यातील सुंदर नृत्यदिग्दर्शन पाहायला मिळते. नुसती भारतीय नृत्यकला किंवा भारतीय संगीत नव्हे तर इतर देशातील सुद्धा नृत्य आणि संगीत पाहावे आणि ऐकावे. संगीत आणि नृत्याप्रमाणे नाटक आणि चित्रपट सुद्धा प्रत्येक देशाच्या संस्कृतीशी जोडले गेले आहेत. त्यासाठी नाटक पाहणे, चित्रपट पाहणे जरुरीचे आहे. मी मुंबईत राहत असल्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटके पाहत असतो. त्यातून मिळणारा आनंद सुद्धा खूप मोठा असतो. परदेशी नाट्य कलाकार त्यांची नाटके घेऊन भारतात बऱ्याचदा येतात तेव्हा ती नाटके जाऊन अवश्य पाहावी. नाटकाप्रमाणे चित्रपट मग ते भारतीय असो वा विदेशी जरूर पाहावे आणि त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा. त्यात तुम्हाला जीवनाची झलक मिळू शकते. विदेशी नाटके आणि चित्रपट तुम्हाला परकीय परंपरा आणि त्यांचे दृष्टीकोन समजून घ्यायला मदत करू शकते. म्हणूनच संगीत, नृत्य, नाटक आणि चित्रपट माणसांना सुसंस्कृत होण्यास मदत करीत असते.

सुसंस्कृत होण्यासाठी चांगले विचार आणि शिष्टाचार जरुरीचा आहे त्याचप्रमाणे प्रवास करणेसुद्धा जरुरीचा आहे. प्रवास प्रत्येकाला जगातल्या विविध संस्कृतीशी जोडत नेतो. आपले पूर्वग्रह आणि संकुचित वृत्ती नाहीशी करण्यास मदत करतो. प्रवासाद्वारे आपण जेव्हा जगातील इतर माणसांशी संवाद साधतो तेव्हा आपल्याला जाणवेल सर्व मानवजात एकसारखी आहे. प्रवासा प्रमाणे अजून एक नवी भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला सांस्कृतिक संदर्भ आणि त्या भाषेतील माणसांचे बाराकावे समजून येतील. त्यातून वेगवेगळ्या विचारसरणीचे आणि जीवनाचे दृष्टीकोन समजतील. म्हणून प्रवास आणि नवीन भाषा तुम्हाला अजून सुसंस्कृत बनवेल.

जेव्हा आपण स्वतःला सुसंस्कृत समजतो तेव्हा आपण सुसंस्कृत होण्यासाठी वर सांगितल्या प्रमाणे एक तरी गोष्ट आचारणात आणण्याचा प्रयत्न करीत असतो का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आज आपण बऱ्याचदा पाहतो की एखाद्याने एखादी चांगली कलाकृती केली असेल तर त्याचे कौतुक पूर्णपणे होताना दिसत नाही.  याचा अनुभव मी सुद्धा बऱ्याचदा घेतला आहे. स्वतःला कुठलीही कलाकृती येत नसेल पण दुसऱ्याने ती केली आहे म्हणून त्याची टिंगल करणारी माणसे ही सुसंस्कृत असूच शकत नाही. त्यांना रानटी जमातीमध्ये मोडावे लागते. याचा परिणाम आज शिक्षण संस्थेवर होत आहे. आज भारतातील शिक्षण संस्था मुलांना त्यांच्या शैक्षणिक ग्रेडच्या आधारावर भेदभाव करताना दिसतात. भिन्न क्षमता असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र मिसळण्याची संधी दिली तर ती मुले एकमेकांपासून भरपूर शिकू शकतील आणि स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. म्हणून शिक्षणाचे महत्व एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळविणे नसून एखाद्या व्यक्तीचे प्रभुत्व असणे हे आहे. तेव्हा प्रत्येक संस्थेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनविण्यासाठी त्यांना शैक्षणिक ग्रेडवर तोलता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.

म्हणून जर एखाद्याला आपण सुसंस्कृत म्हणणार असू तर त्याच्याकडे चांगले शिष्टाचार , चांगले शिक्षण, वेगवेगळ्या कलांची माहिती, भरपूर वाचन आणि त्याद्वारे आकलन करून विषय नीटपणे मांडण्याची क्षमता हे तर हवेच पण त्याबरोबर आधुनिकतेची कास धरून पूर्वग्रह सोडून देण्याची तयारी आणि सर्वांना समजून घेण्यासाठी मनाचा मोकळेपणा असण्याची गरज आहे. पण आज आपण काय पाहतो आहे. सोशल मीडियावर सतत येत असलेले चुकीचे संदर्भ लिहून प्रकाशित केलेले लेख, कृत्रिमपणे बनविलेले फोटो, भाषणाची तोडफोड करून बनविलेले व्हिडीओ आणि हरवलेली वैचारिक पद्धत त्यामुळे समाज सुसंस्कृत असल्याचे जाणवत नाही. काही टीव्ही चॅनेल्स वर चाललेला चर्चेचा धुमाकूळ पहिला तर असे वाटते आम्ही संस्कृतीच्या सर्व सभ्यता पुसून टाकल्या आहेत. याचा परिणाम नवीन येणाऱ्या पिढीवर कसा होणार आहे याचा विचार आपण करताना बिलकुल दिसत नाही. त्यामुळे समाजात अनेक वाईट गोष्टी होताना दिसत आहे. कुणीच-कुणाला समजून घ्यायला तयार नाही. आज प्रत्येक व्यक्ती पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांच्यामागे धावताना दिसत आहे. अनेकजण सक्षतेचा बुरखा घालून सुसंस्कृतपणाचा लेप लावून फिरत आहेत. त्यासाठी साक्षर असलेला समाज सुसंस्कृत असणे गरजेचे आहे. म्हणूनच इथे काही प्रश्न विचारावेसे वाटतात. ते प्रश्न म्हणजे सुसंस्कृत होण्यासाठी आपण आपल्या परंपरेचा पगडा सोडण्यास तयार आहोत का? आपले पूर्वग्रह तपासून पाहण्यास तयार आहोत का? शिक्षणाचा व आपल्या धर्माचा किंवा जातीचा अहंकार सोडून सर्वांना एकत्र घेऊन जाण्यास तयार आहात का? असे अनेक प्रश्न पडत असतात आणि पडत राहणार. जर आपल्याला सुसंस्कृत व्हायचे असेल तर वर सांगितलेली एक तरी गोष्ट आपण आचरणात आणावयास तयार आहात का? जर उत्तर नकारात्मक असेल तर आम्ही सुसंस्कृत कसे असू?

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...