Skip to main content

Vasudhaiv Kutumbkm वसुधैव कुटुंबकम

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १६७
विषय क्रमांक : ४
विषय : वसुधैव कुटुंबकम
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता :. माहीम, मुंबई 

यस्तु सर्वाणि भुतानि आत्मन्ये वानुपश्यति |
सर्वभुते्षु चात्मानं ततो न विजुगुप्सते ||
वरील श्लोक एकदा माझ्या वाचनात आला होता. त्याचा अर्थ असा आहे की या भुतलावर प्रत्येक मनुष्य प्राणी  सर्व अस्तित्वा मध्ये स्वतःला पाहतो, त्याचप्रमाणे कुणाचाही द्वेष किंवा तिरस्कार करीत नाही. या श्लोकाचा अर्थ फक्त संकुचित विचारांचा नसून खूपच व्यापक आहे. हा श्लोक आपणास सांगू इच्छितो की या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशातील लोकांनी कुटुंबपद्धती प्रमाणे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून एकत्र राहावे. त्यामुळे सर्व जगातील अशांती संपेल आणि सर्वजण गुण्यागोविंदाने जगू शकतील. तसे पाहिले तर ही संकल्पना फारच प्राचीन असून भारतीय वैदिक काळामध्ये राबविली जात होती आणि त्या संकल्पनेचे नाव होते वसुधैव कुंटुंबकम. वसुधैव कुटुंबकम वर एक संस्कृत श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, "अयं निज: परोवंती गणना लघुचेतसाम | उदारचारितानां तु वसुधैव कुटुंबकम ||". या श्लोकात वसुधैव असा पृथ्वीचा उल्लेख केला आहे. वसुधा म्हणजे पृथ्वी, एव म्हणजे ही आणि कुटुंबकम म्हणजे कुटुंब असे सांगून हा श्लोक सांगतो की पृथ्वीही एक कुटुंब आहे. या श्लोकातून आपण सहजपणे समजू शकतो की हे माझे आहे आणि ते तुझे आहे असे विचार फक्त संकुचित वृत्तीचेच लोक करतात तर उदार विचारांची किंवा हृदयांची माणसे सर्व पृथ्वीलाच एक कुंटुंब मानतात. या वरून एक सिद्ध होते की वसुधैव कुटुंबकम ही एक विचारधारा आहे. वसुधा एव कुटुंबकम असे भारताच्या संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लिहिले आहे. असा हा विचार स्वतंत्र भारताच्या संविधनातसुद्धा आढळतो. माणसामाणसांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी एकाने दुसऱ्याचा आदर करणे  किंवा त्याचा अवमान न करणे असा हेतू या विचारांमध्ये असतो. माणसाची महत्वकांक्षा वाढत गेली की तो जास्त अहंकारी होत जातो आणि सत्तेच्या लालसेसाठी तो सर्व समाजातील माणसाला एकमेकांचे शत्रू करून टाकतो. मग त्यात जाती, धर्म, व्यवसाय याचा वापर करून सर्वत्र द्वेष निर्माण करू लागतो. विकासाच्या नावाखाली अनेक जंगले नष्ट करणे, मोठया प्रमाणात वनस्पतीचा ऱ्हास करणे असे प्रकार होऊ लागतात तेव्हा मला वसुधैव कुटुंबकम हा प्रेरणा देणारा विचार आहे असे वाटू लागते.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब एक महत्वाचा घटक आहे. मानवाला आपल्या भावनिक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्याला समूहात राहण्याची आवश्यकता वाटू लागली आणि कुटुंब पद्धती उदयास आली. मग याच कुटुंबात प्रत्येक माणसाची स्वतंत्र अशी ओळख तयार होऊ लागते. कुटुंबातील लहान मोठया व्यक्तींच्या कधी प्रेमातून तर कधी रागातून व्यक्त केलेल्या भावनिक विचारांमुळे प्रत्येक माणूस घडत जातो. कुठले काम चांगले किंवा वाईट याची ओळख मानवाला कुटुंबात असल्यामुळे समजते. कुटुंब माणसाला योग्य निर्णय घेण्यास मदत तर करते; पण त्याचबरोबर  मिळालेल्या यशाचे कौतुक सुद्धा कुटुंबात होतच असते. जरी माणसाचा निर्णय चुकला किंवा त्याला त्याच्या कामात अपयश आले तरी कुटुंब त्या माणसाला सांभाळून घेते आणि त्या अपयशावर मात करण्याचे सामर्थ त्याला देत जाते. त्यामुळे आत्मविश्वास वाढून बाहेरील जगाशी लढण्याचे बळ माणसाला प्राप्त होते. अशा या भावनिक पद्धतीमुळे माणसांचे नाते त्याच्या कुटुंबाशी घट्ट होऊन जाते. जेव्हा आपण या कुटुंबाचा अर्थ व्यापक पद्धतीने घेऊ लागतो तेव्हा आपणास आपल्या आजूबाजूला असलेला समाज, राज्य, देश आणि संपूर्ण जग अशी वेगवेगळी रूपे दिसू लागतील. माणूस जेव्हा आपल्या कामानिमित्त समाजातील अनेक प्रवृत्तींशी जुळवून घेऊ लागतो तेव्हा त्याला आपली संकुचित प्रवृत्ती सोडावी लागते आणि आपल्या विचारांची कक्षा व्यापक करावी लागेल. तेव्हा त्याला जाणवेल की संपूर्ण जगच एक कुटुंब आहे आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकमेकांवर अवलंबून आहे. जर स्वतःच्या अहंकारापायी कुटुंब पद्धत माणसाने मोडून टाकायला सुरुवात केली तर तर एकसंघ समाज तर निर्माण होणार तर नाही पण समाजाचे, राज्याचे व देशाचे सुद्धा नुकसान होईल. म्हणून वसुधैव कुटुंबकम हा विचार सर्वपरीने महत्वाचा आहे.

वसुधैव कुटुंबकम या पद्धतीचा विचार करताना मला संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला अभंग आठवतो. ते म्हणतात, " हे विश्वचे माझे घर | ऐसी जयाची मती स्थिर | किंबहुना चराचर | आपणची जाला ||". याचा अर्थ असा आहे की हे विश्वच माझे घर आहे आणि या विश्वातच मला वावरायचे आहे.  जेव्हा मी इथे वावरणार तेव्हा माझ्या बरोबर इतरही जलचर, उभयचर किंवा सर्व प्रकारचे  प्राणी सुद्धा वावरणार आहेत. त्यांना मारून किंवा त्रास देऊन मला पुढे जाता येणार नाही याची मला जाणीव आहे. कारण ते सुद्धा माझे बांधव आहेत, सखे सोयरे आहेत. देवांनी ही पृथ्वी त्यांच्यासाठी सुद्धा निर्माण केली आहे. त्यामुळे ज्या पृथ्वीवर आपण राहतो तेथील प्रत्येक जीव हा आपला आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. किती सुंदरपणे वसुधैव कुटुंबकमचा विचार संत ज्ञानेश्वरांनी मांडला आहे. जर हा विचार आपणास आचरणात आणायचा असेल तर आपल्याला आपली नाती जपली पाहिजे. नाती कोणत्याही प्रकारची असोत त्यात प्रेम, आदर, विश्वास, संवेदना, समजून घेण्याची क्षमता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संवाद असणे महत्वाचे आहे. आपले कुटुंब जसे आपल्या बरोबर असेल तर आपले आयुष्य आनंदमयी होऊन जाते. त्याचप्रमाणे सर्व विश्वास आपण आपले कुटुंब मानले तर जगामध्ये नवीन निर्मिती होण्यास खूप मदत होईल. आपण भारताचा विचार केला तर असे आढळून येईल की भारताला साऱ्या विश्वाचे घर म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. प्राचीन भारतापासून ते मध्ययुग आणि आतापर्यंत सुद्धा अनेक जमाती विविध प्रांतातून भारतात आले आणि त्यांनी भारताच्या भूमिला आपली भूमी मानली आहे. भारताच्या भूमीनेही या सर्वांना जवळ केले आणि जगावेगळी एक वेगळी भारतीय संस्कृती जन्माला आली. जर या गोष्टीचा नीट अभ्यास केला तर आपल्याला हे जाणवेल की भारतीय संस्कृतीचा विस्तार होऊ लागल्याचे दिसेल. त्यामुळे भारत सुद्धा सांस्कृतिक देवाण- घेवाणीचे एक केंद्र बनले. नालंदा विश्वविद्यालय हे एक उत्तम उदाहरण आहे. असे म्हणतात की वसुधैव कुटुंबकम हे भारतीय उपनिषेदात सुद्धा आले आहे. याचाच अर्थ भारताने सर्व विश्वाला आपले कुटुंब मानले आहे.

वसुधैव कुंटुंबकम वर लिहीत असताना मला  लोकसत्तेत आलेल्या एका लेखाची आठवण झाली. त्या लेखात एका झेंडूच्या फुलांशी नाते सांगणारा एक लेख लिहिला होता. ते फुल महापूर आल्यासारखे कुठेही फुलते. त्याचा रंग मात्र भगवा असतो. या फुलाला कॉसमॉस बायपिनॅटस ( Cosmos Bipinnates) असे म्हणतात. हे फुल तुम्हाला आज भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसेल पण या फुलाचे  जन्मस्थान आहे मेक्सिको. अशी बरीच झाडे, फुले रोपं  बाहेरून आपल्या देशात येऊन स्थिरवलेलीआहेत. त्याची  अनेक उदरहरणे आपल्याला दिसून येतील. नारळाचे झाड तर उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे मिरची, बटाटा, टोमॅटो, चहा सारख्या गोष्टी सुद्धा भारतात बाहेरून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतातील गरम मसाले इतर देशात गेले आहेत. अनेक खेळ जे भारतात खूप प्रसिद्ध आहेत ते परदेशातून भारतात आलेले आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस सारखे खेळ इंग्लंड मध्ये जन्मले पण ते खेळ आज सर्व जगभर प्रसिद्ध आहेत आणि बुद्धिबळ, हॉकी सारखे खेळ भारतातून इतर देशात गेले आहेत. फुलझाडे, फळे, खेळ यांच्याप्रमाणे अनेक लिखित साहित्य (Literature ) आज सर्व जगभर पोहचले आहेत. सिनेमाने तर जबरदस्त क्रांती केली आहे, त्यामुळे जगात कुठेही निर्माण झालेले चित्रपट कुठल्याही देशात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. चित्रपटाप्रमाणे सर्व देशांचे संगीत सुद्धा आज सगळीकडे ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. याचाच अर्थ हे सर्व जगाला एकत्र जोडते म्हणजेच ते एका परीने वसुधैव कुटुंबकमच आहे. जर आपण या मध्ये संकुचित विचार करून हे आमच्या देशाचे आहे तेच आम्ही स्वीकारू अन्यथा त्या गोष्टीचा त्याग करू असे म्हणणे कितपत योग्य होईल. अशा विचाराने आपण वसुधैव कुटुंबकमचा विचार करू शकू का? असा प्रश्न नेहमी पडत असतो. मी आज अनेक पालक आपल्या मुलाबाळांना जे काही त्यांची मुले शिकतात किंवा जे काही त्यांच्या मुलांना माहीत झालेले असते ते ज्ञान त्यांच्या इतर मित्रामैत्रिणींना सांगण्यास मनाई करीत असतात. अशा संकुचितवृत्तीमुळेच त्यांची मुले कितपत यशस्वी ठरतील हे काही सांगता येणार नाही. कारण ज्ञान दिल्याने आणि संवाद केल्यामुळे वाढते. त्यासाठी वसुधैव कुटुंबकम हा विचार व्यापक पद्धतीने स्विकारायला हवा.

वसुधैव कुटुंबकम या विचारावर एक चुकीची समजूत होऊ शकते. बरेच लोक जगाची कुटुंबाची भावना आणि जगातील बाजारपेठेची भावना एक असल्याचे मानतात. तसे ते असुही शकेल पण त्यात परस्पर विसंगती आहे. कारण कुटुंबाचे व्यवहार प्रेमाचे असतात तर बाजारपेठेतील व्यवहार स्पर्धेवर आधारित असतात त्यामुळे त्यात कपट असण्याची शक्यता सुद्धा असते. कुटुंबात समविचार असतो आणि त्यात शांतीचे उद्दिष्ट असते तर बाजारपेठेत शोषण असते आणि हितसंबंध असतंच नाही. त्यामुळे परस्पर सहकार्य हे बाजारपेठेत असत नाही. या बाबतीत स्वामी विवेकानंदानी अमेरिकेत भाषण करताना म्हटले होते की कोणत्याही देशाचा आत्मा त्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यात असतो. ज्या देशांनी आपले स्वातंत्र्य मिळविताना इतरांना लुबाडून किंवा दुसऱ्यांना मारून स्वतःचे हात रक्ताने बरबटून घेतले आहेत, असा देश त्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतःच्या देशातील माणसांना द्वेष मुक्त कसा करेल. हेच तत्व तुम्हाला महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वात मिळेल. जगामध्ये जेव्हा शीत युद्ध चालू असतात तेव्हा जगाला  शांती मिळत नसते. जर समाज द्वेष करीत राहिला किंवा हिंसेवर उभा राहू लागला तर त्या देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही यांच्या ऐवजी हुकूमशाही आणि लष्करी राजवट येण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्येक देशाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बळ हवे असल्यास शांतीच्या किंवा अहिंसेच्या मार्गाने जाऊन लोकशाही स्थापन केली पाहिजे. बाजारातील तत्वापेक्षा मानवधर्माला मोठे स्थान दिले पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाशी संवाद साधला  पाहिजे.  त्यासाठी वसुधैव कुटुंबकम विचार प्रत्येक ठिकाणी रुजला गेला पाहिजे. तरच मानव भविष्यात उज्वल वाटचाल करू शकेल.

धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...