रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १६५
विषय क्रमांक: ४
विषय : सौंदर्याची परिभाषा
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
सौंदर्य हा शब्द अनेक संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ घेऊन वापरला जातो. रोजच्या संदर्भात या शब्दाचा उपयोग व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या संदर्भात केला जातो. हा शब्द स्वच्छता आणि वैयक्तिक सादरीकरणासाठीसुद्धा वापरला जातो. म्हणजेच इथे प्रत्येक गोष्टींची सुंदरता दाखविली जाते. सौंदर्य म्हणजे अविष्कार. मराठीत बा. सी. मर्ढेकरांनी सौंदर्याची व्याख्या करताना म्हटले आहे, " सौंदर्य म्हणजे संवाद-विरोध-समतोल-लययुक्त रचना". या व्याख्यावरून असे म्हणता येईल की एखाद्या कामाच्या यशाचे महत्व किंवा एखाद्या कलेची निर्मिती की ज्यात अशी काही वैशिष्ट्ये असतात त्यामुळे त्याचे सौंदर्य सहजपणे मानवाला त्याच्या इंद्रियाद्वारे जाणवत असते. म्हणजे सौंदर्य या शब्दाचा वापर विशेषण म्हणून वापरता येतो. सौंदर्य हा आधुनिक शब्द लॅटिन भाषेतून आलेला असला तरी तो ग्रीक भाषेत एस्टेटिक्स (aisthesis) म्हणून बराच प्रसिद्ध आहे. याचा अर्थ असा की कोणतेही नैसर्गिक वैशिष्ट्ये मानवी इंद्रियांद्वारे समजून घेणे किंवा जाणून घेणे. खरे पाहता एस्टेटिक्स (aisthesis) या शब्दाचा अर्थ आहे संवेदनशास्त्र. सुप्रसिद्ध जर्मन लेखक अलेक्झांडर गॉटलिब बामगार्टेन यांनी सौंदर्य हा शब्द इ. स १७३५ मध्ये आपल्या पुस्तकात कवितेतील सौदर्य दाखविताना केला. त्यात त्याने सौंदर्याचा अंतर्भाव संवेदनशास्त्रात केला आणि सौंदर्याला शास्त्राचा दर्जा दिला. त्यानंतर इमॅन्युएल कान्ट या तत्ववेत्यांनी सौंदर्याची तत्वमीमांसा मांडली. त्यानंतर हेगेल, बोझंकित, क्रोचे, कॉलिंगवुड या तत्ववेत्यांनी सौंदर्य आणि कला यांच्या स्वरूपाचे वेध घेणारे सिद्धांत मांडायला सुरुवात केली तर मराठीमध्ये दि. के. बेडेकर, प्रभाकर पाध्ये, नरहर कुरुंदकर, पु. शि. रेगे, बा. सी. मर्ढेकर आणि रा. भा. पाटणकर यांनी सौंदरशास्त्र समजून सांगताना सुंदर पद्धतीने सौंदर्याची परिभाषा मांडली आहे.
सौंदर्यशास्त्र म्हणजे सौंदर्याचे आणि कलेचे तत्वज्ञान असते ज्यात कलेविषयी आणि सौंदर्या विषयी विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण करताना त्या कला आणि सौंदर्याचे स्वरूप काय आहे, त्यांचे नियम कोणते, इतर कले बरोबर त्यांचे काही संबंध येण्यासाठी त्यांच्या अटी कुठल्या आहेत हे समजावून घ्यावे लागते. जर आपण क्रिकेट या खेळाचे सौंदर्य पाहणार असू किंवा त्या खेळाचा आस्वाद घेणार असू तर आपल्याला त्या खेळाचे नियम काय आहेत याची माहिती असायला हवी. त्याचप्रमाणे साहित्यकृतीचे म्हणावे लागेल. कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद समाजाने निर्माण केलेल्या नियमातच असायला हवा कारण साहित्यकृतीचे विश्लेषण व मूल्यमापन ही समाजमनातील घटना आहे हे लक्षात ठेवून ज्या व्यक्तिमार्फत ही साहित्यकृती समाजात आली म्हणून नुसत्या त्या व्यक्तीच्या चरित्र्याचा अभ्यास करून त्या कृतीचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही. त्यासाठी समाजमनाच्या संदर्भात ती साहित्यकृती समजून घेतली पाहिजे. म्हणून इथे बऱ्याच जणांना सौंदर्यशास्त्र हे विज्ञान असल्याचे नमूद करावेसे वाटते. कारण कोणत्याही नियमबद्ध आणि तर्कशुद्ध शास्त्राला आपण विज्ञान म्हणत असतो. हे खरे आहे की विज्ञानाला जसा अभ्यासाचा एक प्रांत असतो तसा प्रांत सौंदर्यशास्त्राला सुद्धा असतो आणि इतर विज्ञान प्रांतात सत्यसंशोधनाची जी पद्धत वापरण्यात येते तीच सौंदर्यशास्त्रात ही वापरण्यात येते. या बाबतीत सौंदर्य शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. रा भि. पाटणकर लिहितात की, "सौंदर्यशास्त्र हे काही स्वतंत्र विज्ञान नव्हे किंवा मनोविज्ञानाचे उपांगही नव्हे. याचे कारण सांगताना डॉ. पाटणकर लिहितात की सौंदर्यशास्त्र कोणत्याच प्रकारचे विज्ञान होऊ शकत नाही. सौंदर्यशास्त्राचे प्रश्न, पद्धती व सिद्धांत आणि विज्ञानाचे प्रश्न, पद्धती व सिद्धांत यांच्यात मूलगामी भेद आहेत. आणि त्यांची गल्लत करणे विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अनिष्ट आहे". असे सांगून ते पुढे लिहितात, "विज्ञानाची कार्यें अनेक आहेत. वस्तुस्थितीच्या घटकांचे वर्गीकरण व विश्लेषण करणे, त्यांतील परस्परसंबंधाचे सार्वत्रिक नियम शोधणे, अशा नियमांच्या साहाय्याने अमुक घटनेचे भविष्य वर्तविणे आणि या ज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्यें समजण्यात येतात. सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते. त्यासाठी विज्ञानात अवलोकन, वर्गीकरण, अभ्युपगम व वस्तुस्थितीची कसोटी लावणे असे प्रकार असतात जे सौंदर्यशास्त्रात येत नाही आणि सौंदर्यशास्त्राचा सिद्धांत वैज्ञानिक सिद्धांत सारखा प्रस्थापित होत नाही. म्हणून सौंदर्यशास्त्र हे विज्ञान होऊ शकत नाही. फार तर तत्वज्ञानाचा एक भाग होऊ शकेल". म्हणून सौंदर्याची परिभाषा समजून घेताना सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नाही हे समजूनच घ्यावे लागेल.
सौंदर्यशास्त्र हे जरी विज्ञान होऊ शकले नाही तरी ते तत्वज्ञानाची एक शाखा नक्कीच आहे. याचे कारण असे की सौंदर्यशास्त्र तत्वज्ञानाच्या शाखेत दोन प्रश्न सातत्याने शोधत असते. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे कोणत्या गोष्टी सुंदर आहेत? नक्की कोणत्या गुणांमुळे त्या सुंदर आहेत आणि ते ठरविण्याचे निष्कर्ष कोणते?. दुसरा प्रश्न असा आहे की सौंदर्य या संकल्पनेची तार्किक वैशिष्ट्ये कोणती आणि त्याचे स्वरूप काय? यासाठी आपल्याला आधुनिक तत्ववेत्तानी सांगितलेल्या सौंदर्यशास्त्र याकडे पाहावे लागेल. कारण सौंदर्यशास्त्र हे निकर्षाचे शास्त्र आहे. ते संकल्पना निर्माण करीत नाही ; पण तार्किक स्पष्टता ते प्राप्त करून देते. म्हणून डॉ पाटणकर इथे म्हणतात, "सौंदर्य विषयक जाणीवा निर्माण करणे हे काही सौंदर्यशास्त्राचे काम नव्हे. एक समीक्षक म्हणून आपण कलास्वरूपाविषयी काही जाणीवा नकळत व्यक्त करीत असतो. उदाहरण सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की हे चित्र खूप सुंदर आहे किंवा वाचलेले पुस्तक खूप छान आहे. असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक विधानामागे संकल्पनांचा सौंद्धांतिक व्यूह उभा असतो याची आपणाला जाणीव नसते; निदान त्याचे स्वरूप आपण स्पष्टपणे बघितलेले नसते. सौंदर्यशास्त्र या संकल्पनांना स्पष्टता देऊन आपल्याला आत्मरूपाचे दर्शन घडवतात. म्हणून सौंदर्यशास्त्रातील संकल्पनाच अशा आहेत की त्या प्रत्यक्ष वापरल्याशिवाय त्याचे तार्किक विश्लेषण करणे शक्य होत नाही. केवळ रसिकतेमुळे सौंदर्यशास्त्रात गती येत नाही. त्यामुळे या शास्त्राला तत्वज्ञानाच्या पातळीवर तर काम करावे लागेलच आणि त्याचबरोबर कलेच्या समीक्षेच्या पातळीवर सुद्धा काम करावे लागेल". डॉ पाटणकर सांगतात ते बरोबर आहे कारण कलासमीक्षातील संकल्पनांना सौंदर्यशास्त्रात फार महत्व आहे. निसर्गाचे सौंदर्य पाहायला सौंदर्यदृष्टीची गरज असते आणि कलासौंदर्याच्या संदर्भात मानवाला प्राप्त झाली आहे. त्यामुळेच कलासमीक्षा व सौंदर्यशास्त्र यांचा परस्परसंबंध कोणीही नाकारू शकत नाही. याला कारण म्हणजे कलेच्या संदर्भात केवळ भावनात्मक प्रतिसाद शक्य असतात. तेथे तार्किक विश्लेषण शक्य नसते. म्हणून कलासमीक्षा ही काहीशी वेगळी भूमिका घेऊन कलाकृतीच्या अनन्यत्वाचा वेध घेत असते. इथे डॉ पाटणकर सांगतात की कलासमीक्षेत कलाकृतीचे मूल्यमापन ज्या संकल्पनांच्या व तत्वांच्या साहाय्याने होत असते, त्याचे काटेकोर विश्लेषण सौंदर्यशास्त्र करीत असल्यामुळे ते समीक्षेला व पर्यायाने सुजाण कलानुभवाला उपकाराच ठरते.
सौंदर्यशास्त्रात एक महत्वाचा सिद्धांत आहे आणि तो म्हणजे आविष्कारवाद. या सिद्धांताच्या अनेक संकल्पना आपण कळत नकळत वापरीत असतो. या संकल्पना आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की त्या बरोबर आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला पडताळून पाहण्याची गरज वाटत नाही. या संकल्पनेच्या सिद्धांतशी बेनेदेत्तो क्रोचे याचे नाव जोडले गेले असले तरी या परंपरेचा उगम इमॅन्युएल कान्ट मध्ये सापडतो. कान्ट यांनी केलेली सौंदर्याचीमिमांसा क्रिटिक ऑफ जजमेन्ट (Critic of Judgment) या ग्रंथात समाविष्ट आहे. सौंदर्याच्या अनुभवाचे वेगळेपण दाखवण्याचा मुख्य उद्देश कान्टचा आहे. त्यासाठी तो तत्वज्ञानाच्या चौकटीमध्ये ज्ञानमीमांसा आणि निती मीमांसा यातला दुवा सौंदर्यशास्त्रातील सिद्धांतात वापरतो.म्हणून तो म्हणतो, "The beautiful is that which, apart from concepts, is represented as the object of a universal delight ". याचा अर्थ असा की सुंदर वस्तू या सर्वांना आनंद देत असतात. पण रोचक गोष्टींपासून मिळणाऱ्या आनंदाला व्यक्तिमत्वाच्या मर्यादा असतात. जी सुंदर गोष्ट एकास आल्हादायक असते ती सर्वांना आल्हादायक असायला हवी. या बाबतीत सौंदर्यविधान ज्ञानात्मक विधानासारखे आहे. इथे ज्ञानात्मक विधानालाही सार्वत्रिक मान्यता असते. आकाश निळे आहे हे सर्वांनाच मान्य असते. पण सौंदर्यविधान आणि ज्ञानात्मक विधान यात एक फरक आहे आणि तो म्हणजे ज्ञानात्मक विधानाची सार्वत्रिकता संकल्पनांच्या साह्याने निर्माण होते. ज्ञानानुभव सार्वत्रिक असतो, पण त्यात आनंदाचा प्रश्न निर्माण होत नसतो. सौंदर्य विधानाची सार्वत्रिकता व अपरिहार्यता सिद्ध करण्यासाठी कान्टने सौंदर्यानुभव ज्ञानानुभवाच्या फार जवळ आणला. कान्ट प्रमाणे अनेक तत्ववेत्तानी सौंदर्यशास्त्रात मोलाची भर टाकली आहे. त्यात आहे जॉर्ज हेगेल, केवल चिद्वादी, रॉजर फ्राय, सुसान लॅगर, बोझंकित, क्रोचे आणि कॉलिंगवुड. यात हेगेल सौंदर्याची व्याख्या करताना म्हणतो सौंदर्य म्हणजे नियमितेचा चैतन्याचा इंद्रियगोचर अविष्कार. संवेदनाच्या विश्वात दिसणारे चैतन्याचे रूप म्हणजे सौंदर्य. ही व्याख्या तत्ववेत्ता बोझंकित याला पूर्णपणे मान्य नाही. हेगेलने केलेला निसर्गसौंदर्याचा अधिक्षेप तो मान्य करत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार परमत्वाचा अविष्कार जसा कलेत होतो तसा तो निसर्गसौंदर्यातही होतो आणि हेंगेलचे कलास्वरूपशास्त्र बोझंकितच्या लिखाणात सौंदर्यशास्त्र बनते. रॉजर फ्रायने आपल्या कलासमीक्षेला सौंदर्याची जोड देऊन कलेतील आकारिक घटकांच्या मूल्यांवर भर देणारी सौंदर्यवादी भूमिका मांडली तर सुसान लॅगर हिने कला ही भावनेच्या घडणीचे प्रतीक आहे असा सिद्धांत मांडला. कोणतीही कलाकृती ही मानवाच्या भावनेमुळे निर्माण होते आणि त्यामुळे त्या भावनेचा वेगळाच अनुभव येतो आणि तो अनुभव म्हणजे सौंदर्यभावना असे लॅगर यांनी म्हटले आहे. सौंदर्यशास्त्राची परिभाषा समजून घेताना अनेक पश्चिमेकडिल विचारवंतांनी मांडलेले विचार संक्षिप्त रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयावर आजही अनेक विचार मांडले जात आहेत.
सौंदर्यशास्त्राबद्दल मराठीत कुतूहल निर्माण केले ते बा. सी. मर्ढेकर यांनी. त्यांनी त्यासाठी दोन ग्रंथ लिहिले. त्यातील एक मराठीत असून त्याचे नाव आहे सौंदर्य आणि साहित्य आणि दुसरा ग्रंथ आहे इंग्रजी भाषेत त्याचे नाव आहे Arts and Man. या दोन्ही ग्रंथात त्यांनी कलेचे माध्यम, सौंदर्यभावना, सौंदर्यविधान व कलेची फलश्रुती याबद्दल विचार मांडून मराठीत सौंदर्याची परिभाषा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कलेची मीमांसा मांडताना मर्ढेकरांनी दोन भाग पाडले आहेत. एक आहे सौंदर्यशास्त्राचा ज्यात अस्तित्व, प्रत्यय आणि फलश्रुती या तीन टप्प्यात मर्ढेकरांचा सौंदर्यशास्त्रातील विचार प्रकट होतो. दुसऱ्या भागात त्यांनी कलामिमांसा या विषयावरील उपप्रश्नांच्या विवरणाचा आहे. त्यासाठी त्यांनी कलाकृतीच्या घाटाचे चैतन्यत्व संवादलय, विरोधलय व समतोललय अशा तीन लयीत विशद केली आहे. म्हणून ते म्हणतात की सौंदर्याचे अस्तित्व अनुभूतीवर अवलंबून नसून ते एक स्वतंत्र, स्वयंभू असे तत्व असते. यात त्यांनी सौंदर्य भावनेला अधिक महत्व दिले आहे. ते पुढे म्हणतात संवेदनाच्या गुणांनी व त्यांच्यात संवाद- विरोधात्मक लयीने जी भावना उत्पन्न होते ती म्हणजे सौंदर्यभावना. असे म्हणत ते सांगतात की सौंदर्य भावना ही लौकिक जीवन व्यवहारातील भावनांपेक्षा सर्वस्वी वेगळी, स्वयंपूर्ण व स्वायत्त असते. संवेदना केवळ अंगभूत गुणांवर आधारलेल्या संवेदनांचा आस्वाद मर्ढेकरांना महत्वाचा वाटतो. मर्ढेकरांप्रमाणे सुरेंद्र बारालिंगे, प्रभाकर पाध्ये, गंगाधर पाटील, माधव आचवल, नरहर कुरुंदकर, पु. शि. रेगे आणि डॉ पाटणकर यांनी सुद्धा सौंदर्यशास्त्रबद्दल आपले विचार खूप छानपणे मांडून सौंदर्याची परिभाषा लिहिली आहे. या सर्वांनी सौंदर्याचे आकलन तत्वज्ञानात्मक दृष्ठिकोनातून कसे करता येईल याचे विवेचन मांडले आहे. डॉ. रा. भ. पाटणकरांनी सौंदर्यमिमांसा या ग्रंथात स्वायत्तवाद आणि लौकिकतावाद या दोन कलाविषयी संकल्पनांना दोन ध्रुव कल्पून विविध सौंदर्यशास्त्रीय सिद्धांताची परिभाषा लिहिली आहे. प्रभाकर पाध्येनी मर्ढेकरांच्या आणि डॉ पाटणकरांच्या विचारांवर भाष्य करीत सौंदर्यशास्त्राचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून आपले विचार मांडले आहेत. कलानिर्मिती, कलानुभव किंवा सौंदर्यानुभव मानवी मेंदूतील आदिम भागाशी संबंधित असतो असा विचार प्रभाकर पाध्ये यांनी मांडला आहे. डॉ.अशोक रानडे यांनी संगीतातील सौंदर्यशास्त्र मांडताना संगीतकृतीत लयबंध सौंदर्यत्व असल्याचे नमूद करतात. पुढे ते म्हणतात स्वर, लय आणि बंदिश यांचे मिलन संगीतकृतीत सौंदर्य निर्माण करते. त्यांनी संगीताचे सौंदर्य छानपणे संगीताचे सौंदर्यशास्त्र या पुस्तकात मांडले आहे.
सौंदर्याची परिभाषा समजून घेताना आपण अनेक तार्किक विचारांचा आढावा वर घेतला आहे. त्यासाठी अनेक विचारवंतांनी मांडलेल्या वैचारिक बैठकीचा आढावा संक्षिप्त रूपात घेण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा आपण सौंदर्याचा विचार करतो तेव्हा आपण हे जाणले पाहिजे की सौंदर्याला ठराविक चौकटीमध्ये बांधता येणार नाही. तसे केले तर त्याचा आस्वाद आपण पूर्णपणे घेऊ शकणार नाही. प्रत्येक माणसाला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे. प्रेमाने बोलणे म्हणजे सुंदरता, आपले मत योग्यरीतीने मांडणे म्हणजे सुंदरता तसेच एखाद्या गोष्टीला नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुसऱ्याला समजून घेण्याची क्रिया म्हणजेच सुंदरता. त्यामुळे सौंदर्याची परिभाषा ही मानवी जीवनावर अवलंबून असते. त्यामुळे स्वतः विवेकी राहून स्वतःचा आत्मविश्वास वाढवीणे म्हणजे सुंदरता. म्हणून सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नसून ती एक तत्वज्ञानाची शाखा आहे. ती एक अशी विवेकी शाखा आहे की ज्यात सौंदर्यतेचे सार आणि कलेचे सौंदर्य याबद्दल खूप छानपणे आस्वाद घेता येतो.
धन्यवाद
Comments
Post a Comment