रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १६४
विषय क्रमांक : ५
विषय : साहित्यात संतांचे योगदान
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
मध्ययुगीन भारतामधील युग हे एक अंधारयुग होते असे म्हटल्यास काही वागवे ठरू नये. कारण सतत होणाऱ्या राजकीय आणि धार्मिक आक्रमणांनी सामाजिक जीवन त्रस्त केले होते. भारतीय संस्कृतीची मानचिन्हे, देवालाये, तीर्थस्थाने आणि अनेक प्रकारचे साहित्य उध्वस्त होत होते. विचित्र बाह्य परिस्थितीमुळे सामाजिक जीवन प्रदूषित झाले होते. सामाजिक विकासाच्या सर्व दिशा रूढी आणि बंदिस्त अशा समाज रचनेत अडकून पडल्या होत्या. त्यामुळे समाज सर्वप्रकारच्या धर्मकांडाला महत्व देऊ लागला आणि पुराणातील भक्तीचा भावार्थ लुप्त होत गेला. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी व्रतवैकल्यांची मालिका तयार झाली. धर्मशास्त्राची चर्चा ज्ञान दृष्टी देऊ शकत नव्हती. सगळीकडे धर्माचे व्यापारीकरण होऊ लागले होते. अशा वेळीस, "हरिहरा नाही भेद | नका करू वाद |" असे श्लोक सामान्य जनतेच्या कानावर पडू लागले. समाजात रूढ झालेले देवातांचे बंड मोडून टाकण्याचे आव्हान होऊ लागले. समाजाला कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी कोणी म्हणू लागले," शेंदूर- शिरणी जी इच्छिती | ती काय आर्त पुरविती |". आणि इथेच संत साहित्याचा उगम झाला. हे संत साहित्य म्हणजे त्यावेळी स्वतःला पंडित समजून समाजाची दिशाभूल करणाऱ्या माणसांवर एक प्रकारचा आघात होता. त्यात आत्मज्ञानाचा आग्रह होता. "ज्ञानापसी प्रेम उत्तम" असे सांगत संत सांगू लागले की देव दगडात नसून माणसांच्या हृदयात आहे. जातीभेद मोडून टाकून मनावतेची शिकवण देताना संत सांगतात, " जे जे देखिजे भूत | ते ते जाणिजे भगवंत |". त्यामुळे मध्ययुगीन समाजावर क्रांतिकारक विचारांचा परिणाम जसा होत गेला तसाच सामाजिक सुधारणाचा विचारसुद्धा समाजामध्ये रुजू लागला. आपण आपले कर्तव्य निरालसपणे करणे म्हणजेच खरी ईश्वर पूजा असे सांगताना संत म्हणू लागले, " जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा ||".
महाराष्ट्रातील बहुतेक संतमंडळी ही मध्ययुगीन काळातील समन्वयवादी होती. परंपरा आणि पूर्वापार चालत आलेल्या काही रूढी तशाच ठेवून त्यातील योग्य आणि अयोग्य गोष्टी समजून घेऊन लोकांच्या बुद्धीला सहजपणे आकलन होईल अशारीतीने त्यांनी आपले अनुभव सामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. नवे विचार लोकांमध्ये रुजविण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतमंडळी करू लागली. अध्यात्मशास्त्रा सारखे गहन शास्त्र ज्यात जीवनाचे इंगित दडलं आहे ते फक्त संस्कृत भाषेत होते आणि संस्कृत ही देवांची भाषा असल्यामुळे ती फक्त उच्च कुळातील लोकांना शिकण्याचा हक्क आहे असे सांगून इतर समाजातील वर्गाना ही भाषा शिकण्यास मज्जाव करण्यात आला होता. ते लोकांच्या भाषेत म्हणजे मराठी भाषेत आणण्याचा पहिला प्रयत्न केला तो संत ज्ञानेश्वरांनी. भगवत गीता मराठीत आणून त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा भगवत गीतेवरील टिकात्मक विश्लेषण असणारा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी पसायदान मागितले आहे. भगवत गीता दुष्टांचा संहार करायला सांगते तर ज्ञानेश्वर पसायदानातून परमेश्वराकडे मागणे मागतात , " जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो | भूतां परस्परे पडो | मैत्री जीवांचे ||". याचाच अर्थ संत ज्ञानेश्वर पसायदानात पृथ्वीवरील सर्व जीवांचे कल्याण मागतात. जसे संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीता मराठीत आणली तसेच संस्कृत मधील भागवत संत एकनाथानी मराठीत आणले. तसे करताना त्यांनी त्याचा मूळ तत्वांचा गाभा कुठेही डागळेला नाही. संस्कृतमधून मराठीत आलेले ब्रह्मज्ञानही निखळ आणि बावनकशी आहे असे सांगताना संत एकनाथ म्हणतात, " भागवत प्राकृत जाले | परि नाही चुकले निजज्ञाना ||". संस्कृत मधील भागवताप्रमाणे रामायण सुद्धा भावार्थ रामायण म्हणून एकनाथानी मराठीत आणले आहे. जेव्हा संत आपले विचार लोकांच्या भाषेत सांगू लागले तेव्हा त्यांच्यात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रकारचा आपलेपणा निर्माण झाला. जेव्हा आपण या गोष्टी वाचतो तेव्हा आपल्याला जाणवते की संस्कृत साहित्यापेक्षा मराठीत आलेले संत साहित्यात अध्यात्मविवरण आणि आत्मसाक्षात्काराचे अनुभव सुंदरपणे मांडले गेले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथानी हे कार्य केले आहे. ते करत असताना त्यांनी समग्रसाहित्यशात्र मांडले नाही हे खरे पण त्याचा विचार त्यांनी जरूर केलेला आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
मराठी संत साहित्याने विवेकाची जपणूक सातत्याने केली आहे. कारण संत साहित्यामध्ये एक प्रवृत्तीवाद आहे आणि एक निवृत्तीवाद पण आहे. निवृत्ती आणि प्रवृत्तीचा समन्वय म्हणजे विवेक. विवेक हे एक महत्वाचे जीवनमूल्य आहे. संत निवृत्तीनाथापासून ते संत निळोबारायपर्यंत सर्व संतांनी विवेकाचं महत्व सांगितले. नरदेहाचे महत्व सांगताना संत एकनाथ म्हणतात की नरदेह हा चोवीस गुरूंचा गुरु आहे कारण त्यात विवेक आहे, वैराग्य आहे आणि विचारसुद्धा आहे. या बाबतीत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. युसूफ महंमद पठाण लिहितात की विवेक आणि विचार हे संत साहित्याचे एक पायभूत मूल्य आहे. या विवेकाची शिकवण आजच्या जीवनातही उपयुक्त आहे असे सांगून ते पुढे लिहितात, " विवेकानेच आपल्याला अविवेकापासून समाजाला दूर नेता येईल. विवेकाच्या आभावामुळे समाजात अविवेकी घटना घडतात. संपूर्ण संत साहित्याने या केंद्रवर्ती मूल्यांची सातत्याने जपणूक केली आहे. असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती असं मानण्याचे कारण नाही. दैवी आणि आसुरी प्रवृतीचे लोक ज्ञानी आणि अज्ञानी पुरुष, उत्तम पुरुष आणि मूर्ख पुरुष यांची लक्षणे सांगताना संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत रामदास यांनी या उभयंतामधील विवेकाची लक्ष्मण रेषा किती महत्वाची आहे हे आवर्जून सांगितले आहे". विवेकाची मूल्य सांगताना सर्व संतांनी कथांच्या माध्यमातून अध्यात्माची वीण गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी "कथा" या शब्दाचा प्रयोगही ज्ञानेश्वरी सांगताना केला आहे. संत एकनाथांची भारुडे ही वरकरणी स्फूट रचना वाटते पण त्यात एक कथाच सांगितलेली वाटते. काही भक्त लोक हे विसरले की भक्ती हे जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्याची आठवण करून देतांना संत एकनाथांनी त्यात अनेक कथा गुंफल्या आहेत. भावार्थ रामायणातसुद्धा राम म्हणजे अंतिम सत्य हे सांगताना संत एकनाथांनी राम कथा सांगितली आहे. समर्थ रामदासांनीसुद्धा दासबोध या ग्रंथ हा अनेक कथांच्या आधारे लिहिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सुंदरकांड आणि युद्धकांडमध्ये सुद्धा अनेक कथा लिहिल्या आहेत. दत्त संप्रदायाचा गुरुचरित्र हा ग्रंथसुद्धा अनेक कथांचा सुंदर संग्रह आहे. अशाप्रकारे अनेक कथा सांगून आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे आणि या कथा मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी खूपच पोषक ठरल्या गेल्या.
मराठी संत साहित्यात संतांनी वर्णव्यवस्थेला विरोध केलेला आढळतो. त्यामुळे त्यांच्या साहित्यात समता या मूल्याला फार महत्व आहे. सारे प्राणीमात्र समान असल्याचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये संत साहित्यात आपल्याला वाचताना सतत जाणवत राहते. संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्यासारखे संत वर्णव्यवस्थेवर तुटून पडताना दिसतात. आपल्या एका अभंगात संत तुकाराम वर्णव्यवस्थेवर परखड टीका करताना म्हणतात, " बरा देवा कुणबी केलो | ना तरी दंभे असतो मेलो ||". हिंदू धर्मावरील असलेले वर्णव्यवस्थेचे सावट दूर करण्याचे प्रयत्न खास करून संत एकनाथ, संत नामदेव आणि संत तुकाराम या तीन संतांनी केल्याचे दिसून येते. समानते बरोबर सर्व संतांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी या विरोधात आवाज उठवला असल्याचे जाणवते. हा समतावादी विचारांबरोबर समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदा्यामुळे खूपच शक्य झाले असे वाटते. अवतार कल्पनेतून अनेक दैवत वादाचा उदय झाला. त्यामुळे अंधश्रद्धांना खतपाणी घातले गेले आणि त्याचा फायदा देवाच्या मंदिरातील पुजारी आणि गुरवांचा झाला. ही माणसे समाजातील भाविक लोकांच्या श्रद्धेचं मानसशास्त्र बरोबर ओळखून त्यांना लुटत होती. तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक संप्रदायाने एका विशिष्ट देवातेचा आग्रह धरून एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आणि अशा अंधश्रद्धा समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. नाथ संप्रदायचा शिव, वारकरी लोकांचा विठ्ठल, दत्तसंप्रदायचा दत्त, समर्थसंप्रदायाचा राम आणि महानुभावांचा कृष्ण अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यात देवेतेंची नावे वेगळी असली तरी त्याचे मूळ स्वरूप निर्गुण-निराकार आहे असे सांगून अनेक धार्मिक रूढी मोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व करताना संतांनी मूळ तत्वविचारांशी कुठेही प्रतारणा केली नाही. त्यांनी फक्त उदात्त लौकिक आणि पारलौकिक ध्येय स्वतः समोर ठेवल्याचे दिसून येते. हीच ध्येय संतांनी जीवनध्येय म्हणून प्रतिपादिलेली आहेत. दुरितांचे तिमिर जावो असे संत ज्ञानेश्वर पसायदानात मागतात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून अनेक समाजसुधारकांनी संत साहित्याबद्दल कुठलेही पूर्वग्रह न ठेवता संत साहित्य हे समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम असल्याचेही मान्य केले आहे.
संत साहित्य हे जरी अध्यात्मिक गोष्टींचा पुरस्कार करीत असले तरी ते एक प्रकारचे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान आज समाजातील सर्व थरापर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत झिरपलेले असल्याचे जाणवते. आपल्या अभंगातून समाजातील वेगवेगळ्या गोष्टींचे प्रबोधन संतांनी केले आहे. त्यांच्या अभंगवाणीमध्ये अध्यात्मिक अवस्थांचे सुंदर प्रतिबिंब उमटल्याचे जाणवते. म्हणूनच त्यांच्यामध्ये आणि समाजामध्ये एक दुर्गम दरी निर्माण झाली नाही आणि सर्व समाज त्यांच्या तत्वज्ञानाशी, त्यांच्या विचारांशी पूर्णपणे समरस झाला. समाजाच्या उध्दारासाठी जर संत झिजले नसते तर सर्वसामान्य माणसांना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली नसती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या अभंगातून नेहमी समाजप्रबोधन केल्याचे जाणवते. एका अभंगात ते म्हणतात, " बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी | पडिले प्रसंगी काळाऐसे || जयामध्ये देव आदी मध्ये अंती | खोल पाया भिंती खचेनिया || ". इथे ते सांगतात की जे काही ते बोलले आहे ते ईश्वराची आज्ञा झाली म्हणून बोललो. असे सांगून त्यांनी ईश्वरी सत्तेचे अधिष्ठान सांगितले आहे. हे सर्व सांगताना त्यांचा उपदेश लोकांना उपयुक्त आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणारा असाच आहे. असा उपदेश करताना लोकांचा अधिकार आणि त्या काळानुसार त्यांच्या गरजा यांचा विचार करूनच केल्याचे जाणवते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात," समय जाणा समय जाणा | भलते नाणा भलतेथे ||". इथेच संत तुकाराम महाराजांच्या वाणीचे सामर्थ समजते. म्हणून संत बहिणाबाई त्यांच्या अभंगांना तुकाराम वेद असे संबोधितात तर सर अलेक्झांडर ग्रँट यांनी त्यांना महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी असल्याचे सांगतात. स्वतःचा खेळ स्वतःच खेळावा असे सांगताना तुकाराम महाराज सांगतात, " खेळो मनासारखे जिवाच्या संवादे | कौतुक विनोदे निरंजनी ||". या अभंगामध्ये संत तुकाराम आपल्या अंतरातील खेळाचे वर्णन करतात आणि स्वतःशी चाललेल्या संवादाला ते एक खेळ समजतात. म्हणूनच अनेक समाजसुधारकांना किंवा सत्यशोधक समाजाला संत तुकाराम मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक वाटतात. म्हणून तुकाराम महाराजांनी केलेली अभंगवाणी मराठी भाषेतील संत साहित्याची मोठी देणगी आहे. तुकाराम महाराजांप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनीही दासबोध ग्रंथात सांगितलेली तत्वे मराठी संत साहित्यातील अनमोल ठेवा आहे असे वाटते.
भारतातील कोणतीही स्त्री, मग ती कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो, ती आपल्या धर्मासाठी, समाजासाठी, घरातल्या मंडळीसाठी नेहमीच त्याग करीत आली आहे. त्याग हा तिचा स्थायी भावच असतो असे दिसते. मराठी संत साहित्यात अनेक स्त्री संतांचे योगदान खूप मोठे आहे. संत मुक्ताई, संत जनाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई सिऊरकर अशी काही नावे आहेत. जसे मराठी हिंदू संतांचे योगदान आहे तसेच मुस्लिम संतांचे सुद्धा आहे. मुस्लिम समाजाचा अभ्यास करताना ही गोष्ट दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही. आधुनिक मुस्लिम संत म्हणून सांगली इथे जन्मलेल्या सय्यद अमीन यांचे नाव आद्य मुस्लिम संत साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. इ. स. १०५० ते इ. स. १८५० पर्यंत ५० मुस्लिम मराठी संतांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. या संतांनी सुद्धा हिंदू मराठी संताप्रमाणे भक्तीचा मार्ग अवलंबिलेला होता. असे करताना त्यांनी अनेक ओव्या, अभंग, काव्य यांची भर मराठी साहित्यात घातलेली दिसते. संतकवी आलमखान, शाह मुर्तुजा कादरी, मुंतोजी लखजी, हसरत लाडके मशाक, श्रीगोंदेकर शहामुनी, शेख दाजी, शाह बेग वगैरे अशा अनेक मुस्लिम मराठी संतांचे योगदान मराठी संत साहित्यात मोठे आहे. संत शेख महंमद श्रीगोंदेकर हे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कादरी शाखेचे सुफी तत्वज्ञान आणि भागवत धर्माचे विचार यांचा समन्वय खूप छानपणे त्यांनी मांडला आहे. विठ्ठल हे महाराष्ट्रातील आराध्य दैवत. त्याच्या विशिष्ट रूपाची व ध्यानाची संगत लावताना संत श्रीगोंदेकर म्हणतात, " वि म्हणजे विकासाला | ठ म्हणजे ठसावला | म्हणोनी विठ्ठल बोला | टीका प्रश्न्यिक ||". म्हणजे विठ्ठलाच्या तीन अक्षरांपैकी वि चा अर्थ महत्वाचा असून तो विश्वरूपाने विकासला आहे, पण विकारला नाही आणि ठ या शब्दाचा अर्थ ठसवला असा होतो म्हणजे त्याचे सर्वत्र असणे, प्रकटणे हे सूचित होते. तिसऱ्या ल या शब्दाचा अर्थ आम्हा भक्तांना लवकर लाभतो. संत शेख श्रीगोंदेकर हे धर्माने मुस्लिम असले तरी हिंदू तत्वज्ञान आणि अध्यात्म यांच्यावर त्यांनी विशेष अधिकार मिळवलेला होता. म्हणून एका ठिकाणी ते म्हणतात, " ज्ञानगोदेचे वासी | सोवळे वोवळे नाही आम्हासी | जळ अंघोळ मळ त्यागी | ज्ञान आंघोळी शुच योगी ||".
मराठी संत साहित्याचे योगदान सांगण्याचा एक प्रयत्न मी माझ्या आकलनाने केला आहे. मराठी संत साहित्य समृद्ध आहे आणि मराठी साहित्याची शोभा वाढविणारे आहे. सर्व मराठी समाजाला या संत साहित्याबद्दल आदर वाटत राहिला आहे कारण संत साहित्यात समाजचिंतन, तत्वचिंतन निःस्वार्थीपणाने आणि त्यागी वृतीने आले आहे. हे सर्व सांगण्यासाठी संत चंदनाप्रमाणे झिजले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या अंतःकरणाना स्पर्श करून व त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून सुबोधपणे या संत साहित्याने आपले इंगित साधले आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment