Skip to main content

mala avagat asaleli Kala मला अवगत असलेली कला

रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १६६
विषय क्रमांक : ५
विषय : मला अवगत असलेली कला
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :

साहित्य, संगीत, नृत्य, गायन, वाचन, लिखाण, चित्र काढणे, शिल्प बनविणे अशा अनेक कला मानवाला येत असतात.  जर या कला माणसाने स्वतःपासून दूर केल्या किंवा तो या कलेशिवाय जीवन व्यतीत करू लागला तर तो साक्षात बिना शेपटी शिंगाचा पशु म्हणून ओळखू लागेल. एक वेळ माणूस अन्न न खाता उपाशी राहू शकेल पण कलेशिवाय जीवन व्यतीत करणे त्याला कठीण जाईल. म्हणून कुठल्याही कलेला मानवी जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. कुठलीही कला दुसरं तिसरं काही नसून देवाने माणसाला दिलेला एक प्रकारचा आशीर्वाद आहे. कला हा संस्कृत शब्द असून त्याचा संबंध सौंदर्य आणि आनंदाशी आहे. माणूस जेव्हा स्वतःच्या भावानांना एका सुंदर रूपात व्यक्त करत असतो त्यालाच आपण कला म्हणत असतो. प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या कला अवगत असतात. त्याचा शोध मुळापासून घेतल्यास त्या कलेचे महत्व वाढीस लागून ती कला शिकताना कंटाळा येणार नाही. आपल्याला ती आवडू लागेल. कलेची अशी कोणतीही परिभाषा नाही किंवा त्याची एक व्याख्या करणे सुद्धा कठीण आहे. मानव स्वतःची कल्पनाशक्ती किंवा कौशल्य वापरून कलेची निर्मिती करीत असतो. त्यामुळे ती व्यक्तिनिष्ठ बनते आणि त्याची व्याख्या वेगवेगळ्या संस्कृतीप्रमाणे बदलू लागते. म्हणून कलेची व्याख्या तीन प्रकारात मोडते. ते प्रकार म्हणजे प्रतिनिधित्व, अभिव्यक्ती आणि स्वरूप. म्हणून सुप्रसिद्ध रशियन लेखक Leo Tolstoy  म्हणतो, " कला ही एक मानवी क्रिया आहे ज्यात एक व्यक्ती जाणीवपूर्वक, विशिष्ट बाह्य चिन्हाद्वारे इतर भावानांवर हात ठेवीत आहे, आणि इतरही या भावनांनी संक्रमित होतात आणि त्यांना अनुभव देखील येतात". म्हणून कला ही संस्कृतीची स्वाक्षरी आहे आणि निसर्गाचे अनुकरण सुद्धा आहे. या सर्व कला मध्ये मला अवगत असलेली कला आहे वाचनाची.

प्रत्येक माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कलेची वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी एक वाचन आहे. वाचन फक्त आवड किंवा छंद नसून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर कौशल्याने करण्याची कला आहे. वाचनाने ज्ञान वाढते आणि त्याचा वापर सभेत बोलताना आणि लेखन करताना होत असतो. त्यामुळे विचारांची शक्ती वाढून आपल्याला चांगल्या गोष्टींची प्रेरणा मिळते. आपण सुशिक्षित तर होतोच पण समाजातील सर्व प्रकारच्या लोकांबरोबर  वागण्याची कला अवगत होऊ लागते. त्यातून वाईट विचार दूर होऊन माणूस सकारात्मक विचार करून प्रत्येक गोष्टीची मांडणी तो व्यवस्थितपणे करू शकतो. स्वतःच्या कार्यालयात दिवसभरात आलेले ईमेल्स, अहवाल, पत्रव्यवहार पटकन समजून घेण्यासाठी वाचन कौशल्य उपयोगी पडते. नुसते कला शाखेमध्ये नाही तर विज्ञान व वाणिज्य शाखे मधील विद्यार्थ्यांना अभ्यासात पारंगत होण्यासाठी वाचन कलेचा उपयोग होत असतो. जर विद्यार्थी वाचनात पारंगत असतील तर त्यांना अभ्यास करताना कधी कंटाळा येणार नाही आणि त्यांचे चित्तसुद्धा विचलित होणार नाही. त्याचप्रमाणे कठीण शब्दांचे अर्थ आणि लांबलचक वाक्यांचे अर्थ समजून घेण्यास कोणताही त्रास होणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे वाचन कला ही काही नैसर्गिक देणगी नाही. योग्य मार्गाचा सतत वापर करून आपण कार्यक्षम वाचक बनू शकतो किंवा वाचन कला आत्मसात करू शकतो. त्यासाठी आपल्याला सक्रिय वाचन करणे जरुरीचे आहे. आपण जे काही वाचणार आहोत त्या गोष्टीची साधारण कल्पना आपल्या मनात करून ठेवली पाहिजे. त्यावर उपलब्ध असलेली पुस्तके किंवा लेख याची पूर्णपणे माहिती करून घेतली पाहिजे. वाचत असलेल्या पुस्तकात आपल्याला हवी असलेली माहिती शब्दांमध्ये किंवा वाक्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण एखादी कादंबरी वाचण्यासाठी घेतली असेल तर त्यात आलेली पात्रे, त्यांची एकमेकांशी असलेली नाती, त्यातून निर्माण झालेले समज गैरसमज या सर्व गोष्टी समजून घेऊन ती कादंबरी वाचली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे कथा वाचताना सुद्धा तेच नियम लागू होतील. कुठलीही कथा वाचताना आपल्या मनात एक काल्पनिक चित्र उभे केले पाहिजे. त्यामुळे वाचताना कंटाळा न येता वाचन चित्तवेधक होईल आणि वाचन अधिक काळ लक्षात राहील. वैचारिक लेखन हे कथा व कादंबरीपेक्षा वेगळे असते. कारण कथा आणि कादंबरीमध्ये स्पष्ट असा घटनाक्रम असतो आणि पुढे काय होईल याची उत्कंठा वाचकाला असते. वैचारिक लेखांमध्ये विचारांची मांडणी विशिष्ट क्रमाने केलेली असते. त्यामुळे वाचकाला हा क्रम समजून घेणे जरुरीचे असते. अशा लेखांमध्ये असे अनेक शब्द असतात की ते अपल्याला त्या लेखकाचे विचार दर्शवीत असतात. त्यामुळेच मला वाटते की वाचन एक कला आहे.

खरोखरच वाचन एक कलात्मक कौशल्य आहे. जर वाचनाची व्याप्ती वाढवायची असेल तर वाचलेली गोष्ट आपल्याला का आवडली किंवा का मनास पटली नाही हे सर्व लिहून काढावे म्हणजेच एक परीक्षण तयार होईल. त्यामुळे वाचन अधिकच सक्षम होईल. कुठलेही लिखाण वाचताना आपला दृष्टीकोन औदासीन्य न वाटणारा असला पाहिजे. इथे वाचकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे आपण नुसते लेखकाचे विचार वाचत नसून आपण त्या लेखकाशी संवाद साधत असतो, त्यास प्रश्न विचारत असतो आणि त्याच्याशी चर्चा करीत असतो. मग वाचनात गोडी वाटू लागेल. बहुधा वाचन एके ठिकाणी बसून वाचायचे असल्यामुळे अनेक वाचक कंटाळतात. अशावेळीस समविचारी मित्रांशी एकत्र बसून जे वाचावे आणि जे वाचले आहे त्याबद्दल चर्चा करावी म्हणजे वाचनाची कक्षा रुंदावण्यास मदत होते आणि वाचन रंजक होते. वर म्हटल्या प्रमाणे वाचन ही नैसर्गिक देणगी नसून ती आपल्याला स्वतःच निर्माण करायची असते. काही माणसांना वाचनाची सुरुवात नव्याने करायची असते. अशावेळीस त्यांनी सुरुवातीला वाचन करताना आपल्या आवडत्या विषयावर वाचन करावे. नंतर एखाद्या विषयात गोडी वाटू लागली की मग त्या विषयाची इतर पुस्तके वाचून काढावी. त्यासाठी आपल्याला काय हवय याचे पूर्ण चित्र आपल्या मनात तयार झाले पाहिजे. जर आपण इंग्रजी भाषेतून वाचन करायला सुरुवात करणार असू तर ती इंग्रजी भाषेतील सोप्या लेखानाने करावी. एकदम इंग्रजी भाषेतून वाचण्याची सुरुवात करण्यासाठी शेक्सपीयर, शॉ, डिकसन वगैरे लेखकांच्या पुस्तकापासून सुरुवात करू नये नाहीतर आपण फक्त काही पानेच वाचू शकू. त्यासाठी इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके व इंग्रजीतून लिहिलेले ब्लॉग्स वाचले पाहिजे. काही दिवसांनी वाचायची सवय झाली की मग त्यात गोडी निर्माण होईल. मग वरील लेखकांची पुस्तके क्रमाक्रमाने वाचायला सुरुवात करावी. त्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल मग इंग्रजी पुस्तके सहजपणे वाचता येईल. जेव्हा एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ आपणास समजला नसेल तर लगेच तो शब्द शब्दकोशात पाहू नये. त्यामुळे वाचनात खंड पडतो आणि वाचन कंटाळवाणे होऊ लागते. अशावेळीस त्या शब्दाचा संदर्भ लक्षात घेऊन आपल्यापरीने अर्थ लावावा आणि  वाचन चालूच ठेवावे. मग वाचन पूर्ण झाल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ शब्दाकोशातून माहीत करून घ्यावा.  आज इंटरनेटमुळे आपल्याला वाचण्यासाठी हवी असलेली पुस्तके आणि त्यांची माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे. वाचन कलेचे कौशल्य वाढविण्यासाठी त्याचा जरूर लाभ घ्यावा. 

वाचन ही एक अशी कला आहे की त्यातून माणसाचा शब्दसंग्रह वाढत जातो आणि संवाद साधण्याची कला सुद्धा अवगत होते. जर वाचन दांडग असेल तर आपल्या आजूबाजूला, देशात आणि जगात काय घडते आहे याची पूर्णपणे कल्पना येऊन त्या घटनांचे विश्लेषण करणे सोपे होऊन जाते. दांडगे वाचन दोन व्यक्तींमध्ये समंजस आणि बुद्धिमान संवाद घडवून आणत असते. मानवी मनाची आणि नातेसंबंधाची गुंतागुंत समजायला वाचन मदत करते. म्हणूनच वाचन हे संवाद वाढायला, वाद घालायला आणि विचारांची देवाणघेवाण करायला महत्वाचे साधन ठरते. पण आज सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे अनेक गोष्टींची माहिती लगेच उपलब्ध होत असते. इथे अनेकजण या माहितीलाच ज्ञान समजतात आणि पूर्णपणे वाचन करून ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही. जेव्हा त्याचे कारण विचारल्यास अशी माणसे सांगतात की कोणत्याही ग्रंथाचे  वाचन करणे त्यांना कंटाळवाणे होते. त्यासाठी ते फक्त पाहिजे तेवढी माहिती इंटरनेट वरून घेतात. ती माहिती बरोबर आहे किंवा नाही याची कोणतीही तपासणी ही माणसे करीत नाही. त्यामुळे माणूस सक्षम वाचक होईल असे दिसत नाही. त्यात आलेल्या चुकीच्या गोष्टी वाचून खूपच वाईट वाटते. सक्षम वाचक होण्यासाठी किंवा अभ्यासू वाचकासाठी या माध्यमाचा हवा तसा उपयोग होत नाही असे दिसून येत आहे. म्हणून वाचनाची आवड लहानपणापासून असायला हवी. मग त्या आवडीचे छंदात रूपांतर होते आणि वाचन एक सुंदर कला होऊन जाते. पूर्ण जगाची माहिती आपल्याला वृत्तपत्रातून मिळत असते. जेव्हा आपण पुस्तके वाचू लागतो तेव्हा आपल्याला अनेक महापुरुषांची माहिती, त्यांचे कार्य, त्यांनी केलेला संघर्ष यांचे पुरेपूर ज्ञान होऊन जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, त्या देशातील माणसे, त्यांचा आहार, त्यांची राहणी, त्या देशातील हवामान यांची पूर्णपणे माहिती मिळत जाते. त्यामुळे वाचन हा एक जबरदस्त छंद असून तो सतत ज्ञान देत राहतो. एखाद्या विषयात तुम्हाला ज्ञान मिळविण्यासाठी वाचन कला मदत करते. मग त्या विषयात तुमची बरोबरी कोणच करू शकणार नाही. म्हणून वाचन एक सर्वात श्रेष्ठ कला आहे.

आज दूरदर्शनवर विविध वाहिनी वरून प्रत्येक तासाला बातम्या दिल्या जातात तरीसुद्धा आपण वृत्तपत्रे वाचतच असतो. याचे कारण आपल्याला वाचून जे काही समाधान मिळते ते ऐकताना मिळत नाही. म्हणूनच वाचनाची कला आपल्याला वेगळे विचार करण्याची संधी देत असते. वाचन कला जशी आपल्याला ज्ञान देते तसेच आपले  मनोरंजनही करते. रिकामा वेळ वाचनामुळे चांगला जातो. प्रवाससुद्धा वाचन करीत केला तर आपल्याला प्रवासाचा कंटाळा येणार नाही. हा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतला आहे. उत्तम ग्रंथ वाचल्याने आपल्या मनाला खूपच आनंद मिळतो आणि भविष्यात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते. वाचनाचा छंद असलेली व्यक्ती कुणास त्रासदायक होत नाही तर बऱ्याचवेळा अशा व्यक्ती मार्गदर्शक ठरतात. वाचन कलेमुळे आपल्याला जगाची ओळख होते आणि पुस्तकांशी मैत्री होते. म्हणूनच मला वाचन कलेमुळे मी नकळत अंधाराला दूर करतो आणि प्रकाशाची दारे उघडत असतो. प्रत्येक पुस्तक वाचून झाल्यावर मी ते बाजूला कधीच ठेवत नाही तर त्या पुस्तकाचे विश्लेषण करीत जातो. त्यासाठी  मेहनत घेऊन मी माझ्या लेखातून ते इतरांना सांगत असतो. जगातील अनेक महान व्यक्तींनी जी बौद्धिक उंची गाठली आहे त्याचे कारण म्हणजे वाचन. वाचन कलेमुळेच ज्ञानाचे कवाडे बंधमुक्त होतात आणि अनेक गुपिते आपल्याला माहित होतात.  म्हणूनच मला वाटते वाचन कला ही इतर सर्व कलांमध्ये सर्वश्रेष्ठ कला आहे.

धन्यवाद 
✍🏻 योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...