रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १६३
विषय क्रमांक : ४
विषय : खवय्ये (आपल्या प्रांतातील प्रसिद्ध पदार्थ )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
मुंबई माझी जन्म आणि कर्म भूमी आणि या भूमीवर माझे अतोनात प्रेम आहे. मुंबईप्रमाणे मला गोवा सुद्धा जिवाभावाचा वाटतो. अजून एक असेच गाव आहे की मला त्याबद्दल नेहमीच आपुलकी वाटत राहिली आहे. ते गाव म्हणजे माझे आजोळ. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या रांगा यामध्ये बसलेले सुंदर आणि शांत असे हे गाव. गोव्याप्रमाणे इथला निसर्ग सुंदर आहे. इथे सफेद व स्वच्छ वाळू असलेले समुद्रकिनारे, त्यात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे त्याच बरोबर जागोजागी दृष्टीस पडणारे शंखशिंपले या गावाची नक्कीच शोभा वाढवत असतात. गोव्यापासून ४० किमी अंतरावर बसलेल्या या गावाचे नाव आहे कारवार. परमेश्वराने कारवारला निसर्गाचे वरदान तर दिलेच आहे पण ते वरदान देताना त्याने अजून एक वरदान दिले आहे ते म्हणजे कारवारमधील घराघरातील गृहिणींना रुचकर स्वयंपाक करण्याचे. हो हे खरे आहे की प्रत्येक कारवारी पदार्थामध्ये नारळाची म्हणजे खोबऱ्याची चव असायला पाहिजे. जरी नारळ प्रत्येक वेळीस वापरत असले तरी धणे, चिंच, खोबरे आणि लाल सुकी मिरची यांचा मसाला वापरून जे पदार्थ बनवितात त्यास तोड नाही. कारवार शहर हे संपूर्णपणे समुद्राने घेरले असल्यामुळे नारळ तर प्रत्येक पदार्थात हवाच असतो पण भात आणि मासे हे येथील लोकांचे मुख्य अन्न आहे. इथे माशांच्या अनेक प्रकारच्या आमटी तुम्हाला खायला मिळतील. खासकरून बांगड्याची तिरफळ घालून केलेली आमटी आणि कुर्ल्या म्हणजे खेकड्याचा रस्सा या पदार्थांची चव तर लाजवाब असते. यासाठी माशांचे वेगवेगळे पदार्थ खाणारा खवय्या असावे लागते. जरी कारवारी खाद्यसंस्कृतीत मांसाहारी पदार्थांची अधिक पसंती असली तरीसुद्धा शाकाहारी कारवारी पदार्थसुद्धा खुप प्रसिद्ध आहे. भाताबरोबर डाळी तोय ( वरणासारखा प्रकार ), सांबार मसाल्याचा वापर करून तेलात परतवलेल्या भाज्या, तांदळाची भाकरी असे अनेक शाकाहारी कारवारी पदार्थ प्रसिद्ध आहेत. तोय हा प्रकार मला रोज भाताबरोबर लागतोच. त्याशिवाय मला जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. कारवारी पदार्थ जरी साधे असले तरी रस्सेदार असतात. अननस, नारळ, काजू, फणस व बदाम यांचा वापर तर पदार्थ रुचकर बनविण्यास होत असतो. अशा काही कारवारी पदार्थांबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.
सुकरुंडे नावाचा गोड पदार्थ. हा एक पुरणपोळी सारखा एक प्रकार असतो. यात चण्याच्या डाळीचे पुरण मैद्याच्या पातळ पिठामध्ये मिसळून मोदकाप्रमाणे आकार देऊन तुपात तळतात. मग तो गरम असतानाच तूप घालून खायचा असतो. खाताना हा पदार्थ खूपच चविष्ट असतो. माझी आजी, आई आणि मावशी हा प्रकार बऱ्याच वेळेस करत असत. हल्ली हा पदार्थ मी कारवारला गेलेल्यावेळेस खाल्ला होता पण घरी केलेल्या पदार्थाची चव वेगळीच होती.
थंडगार पेय पानक. हे एक सुंदर घरगुती पेय आहे. याची चव कोकणामधील पन्हं या पेया सारखी असते. गुळ, वेलची पावडर, लिंबू, थोडेसे आलं आणि काळी व पांढरी मिरीची पावडर पाण्यात टाकून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावी. असे थंडगार पेय पिण्याची मजा काय औरच असते. आज हे पेय मुंबईत राहणारे कारवारी बनवताना दिसत नाही. हल्ली कारवारमध्ये तरी बनवतात की नाही हे माहित नाही.
तळसलेली बटाट्याची भाजी. याला कारवारी कोकणीमध्ये बटाटा तलासिनी असे म्हणतात. नारळाच्या तेलात मोहरी, जिरं, सुक्या मिरच्या, हळद, मीठ, हिंग आणि उभे बारीक कापलेले बटाट्याचे काप टाकून भाजी शिजवली जाते. ही भाजी फारच चविष्ट असते.
कैरीची उडीद मेथी आमटी. ही आमटी म्हणजे कच्च्या आंब्याची आमटी आहे. ही आमटी तिखट असली तरी किंचित गोड आणि किंचित आंबट लागत असते. मेथीच्या दाण्याचा वापर केल्यामुळे आमटीला थोडासा कडवटपणा येतो खरा पण शिजवलेल्या भाताबरोबर खाताना खूपच चविष्ट लागते. इथे सुद्धा नारळाचा वापर केला जातो आणि आमटी बनविण्यासाठी नारळाचे तेल वापरतात.
तोय : तूर डाळीचा हा सोप्पा, साधा आणि स्वादिष्ट प्रकार. कारवारी लोकांमध्ये हा प्रकार खास करून केला जातो. असे म्हणतात की गोवा आणि कारवार या भागातील गौड सारस्वत ब्राह्मण समाज हा प्रकार जास्त बनवीतात. थोडीशी तूरडाळ जास्त पाण्यामध्ये शिजवून त्याला हिंग, मोहरी आणि सुक्या मिरच्यांची फोडणी तुपावरच द्यावी आणि चवीसाठी मीठ घालावे. जर फोडणी तेलावर केली तर हा प्रकार चविष्ट होणार नाही. माझा हा सर्वात आवडता प्रकार आहे. रोज जेवताना मला तोय हे हवेच.
वर काही कारवारी पद्धतीचे पदार्थ मी सांगितलेले आहेत. अजून बरेच प्रकार शाकाहारी पद्धतीचे आहेत. पडवळाची रानदोयी, मसाला लावून तळलेले बटाट्याची किंवा कच्या केळ्याची कापे किंवा फोडी, वगैरे प्रकार खाताना खूप मजा वाटत असते. आज हे प्रकार मुंबईत राहणारे कारवारी लोकसुद्धा किती बनवत असतील की नाही हे माहित नाही. खुद्द कारवारमध्ये तरी मिळतील का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शाकाहारी पद्धतीप्रमाणे मांसाहारी पद्धतीचे सुद्धा अनेक कारवारी प्रकार आहे. त्यात तिसऱ्यांची (शिंपल्यांची) आमटी, कोलंबीचे आणि कुर्ल्याचे (खेकड्याचे) सुके, कोलंबीचे लोणचे, बांगड्याची आणि पापलेटची आमटी, मीठ मिरची हळद लावून तांदुळाच्या रव्यात तळलेली नगली (मुर्दूषा) हे सुद्धा प्रकार खूपच चविष्ट पद्धतीने बनविलेले असतात. गोव्याप्रमाणे कारवारी पद्धतीचे जेवण सुद्धा जिभेला चव असणाऱ्या प्रत्येक खवय्यासाठी खरोखरीच मेजवानी असते. म्हणूनच त्याचा आस्वाद घेण्यासाठी कारवारला जावे असे वाटते आणि मग तेथील जेवणावर ताव मारीत नारळाचे गोड पाणी, नारळाच्या दुधात बनविलेले कोकमचे सार आणि कढी पिऊन कारवारी जेवण मस्तपैकी पचवून टाकू.
धन्यवाद
Comments
Post a Comment