रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक :१६१
विषय क्रमांक :१
विषय : व्यक्ती तितक्या प्रकृती
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
माणूस हा पृथ्वीवरचा सर्वात हुशार आणि बुद्धीमान प्राणी आहे. तो लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो. आपल्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर हवे ते करू शकतो. विचार, आणि कृतीच्या द्वारे तो आपल्या भावना व्यक्त करू शकतो. या त्याच्या गोष्टी जरी नैसर्गिक असल्या तरी प्रत्येक व्यक्तीचे विचार त्याच्या स्वभावानुसार घडत असतात. म्हणूनच समाजामध्ये एक म्हण तयार झाली ती म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. इथे प्रकृती हा शब्द प्रवृत्ती म्हणून वापरला गेला आहे असे वाटते. पाहायला गेले तर असे दिसेल की प्रकृतीची मोजदाद गणिती पद्धतीने करणे शक्य होत नाही. त्यासाठी कोणतेही परिणाम नाही आहेत. याला कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा असलेला वेगळा दृष्टीकोन. अशा वेगवेगळ्या दृष्टीकोन असलेल्या अनेक व्यक्ती बऱ्याच ठिकाणी भेटत असतात किंवा दिसत असतात. मुंबईमध्ये लोकल ट्रेन किंवा बस मधून प्रवास करताना, देवळाच्या रांगेत उभे असताना, कार्यालयात काम करत असताना, मुंबईहून बाहेरगावी जाताना कधी विमान प्रवासात किंवा रेल्वे प्रवासात वगैरे ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे आपल्या सतत संपर्कात येत असतात. तेव्हा काही लोकांच्या चेहेऱ्यावर त्रासलेले भाव असतात, तर काही लोकांच्या अंतरीच्या नाना कळा असतात. काही विचित्र हुशार असतात तर काही अती विद्वान असतात. काही बंडलबाज तर काही बोलघेवडे असतात. अशावेळेस कुणाचे किती आणि कसे गुण सांगावे असा प्रश्न तयार होतो. एकदाच संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्वभाव आपणास समजू शकत नाही त्यामुळे त्या व्यक्तीवर कोणतेही मत बनविणे योग्य होणार नाही. संपर्कात असलेल्या किंवा नव्याने आलेल्या व्यक्तींच्या काही गोष्टी ऐकून घेण्यासारख्या असतात तर काही लोकांच्या ऐकून सोडून देण्यासारख्या असतात किंवा हसण्यावारी न्यायच्या असतात. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती बरोबर आहे असे वाटू लागते.
व्यक्ती तितक्या प्रकृती या वाक्याचा अर्थ आपल्याला जास्त अनुभवास मिळतो जिथे आपण काम करतो अशा कंपनीच्या कार्यालयात. एखाद्या कंपनीच्या कार्यालयात काम करताना आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती संपर्कात येत असतात. जेव्हा या व्यक्ती कार्यालयात काम करत असतात तेव्हा त्यांच्या कामात विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या स्वभावानुसार पडत असते. काही व्यक्ती शिकण्यासाठी करत असतात तर काही व्यक्ती काम करायला आवडते म्हणून काम करीत असतात. अशा व्यक्ती आपली कामे मनापासून करीत असतात. काही व्यक्ती कामे नाईलाज म्हणून करतात तेव्हा त्यांची नजर फक्त मासिक पगारावर असते. ज्या व्यक्ती आपली कामे मन लावून करतात त्या व्यक्तींचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व तयार झालेले असते. ते इतर व्यक्तींना स्वतः बरोबर घेऊन काम करत असतात. अशा व्यक्ती लढवय्ये असतात. त्यांच्यावर सोपवलेली कामे आनंदाने पूर्ण करतात. या व्यक्ती चांगले सहकारी निवडतात आणि त्यांना काम शिकवून तरबेज करून त्यांना संघटनात्मक काम करण्यासाठी तयार सुद्धा करतात. त्यामुळे त्यांची प्रगती होण्यास वेळ लागत नाही. अशांना त्यांच्या वरिष्ठयाकडून सुद्धा प्रोत्साहन मिळत जाते आणि त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होत जातात. काही व्यक्ती हुशार असतात. त्याच्याकडे नवीन नवीन कल्पना असतात. पण कंपनीच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे अशा व्यक्ती यशस्वी होईल की नाही असे सांगता येणार नाही. काही व्यक्ती फक्त मासिक पगार मिळण्यासाठी काम करीत असतात. कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेमध्येच अशा व्यक्ती काम करत असतात. इतर कोणी व्यक्ती स्वतः कामात रस करून पुढे जाऊ लागतात तेव्हा त्यांच्याबद्दल हा आपल्या वरिष्ठांचा खास आहे म्हणून त्यास त्याच्या कामात बढत मिळते आहे असे बोलत राहतात. अशी माणसे कंपनी मधील वातावरण दूषित करीत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दूर ठेवणे हाच एक मार्ग कंपनीच्या व्यवस्थापनाकडे असतो. याशिवाय अजून एका स्वभावाची व्यक्ती आपल्या बरोबर काम करीत असते. ती व्यक्ती म्हणजे कुठल्याही छोट्या गोष्टी मोठ्या करून त्या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेते. सतत आपल्या सहकाऱ्यांबरोबर किंवा वरिष्ठ व्यक्तींबरोबर चर्चा करीत स्वतःचे महत्व वाढवीत असते. इतरांना दाखविण्यासाठी कामात किती बुडून गेलो आहे असे भासवीत राहणे हा त्यांचा स्वभाव असतो. काही व्यक्ती इतक्या सहनशील असतात की त्यांना काही म्हटले तरी गप्प बसून आपले काम करीत असतात. अशा प्रकारच्या अनेक स्वभावाची माणसे आपण छोट्या मोठया कंपन्यामध्ये काम करताना संपर्कात येत असतात. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण आपल्याला अनेक प्रकारच्या कार्यालयात अनुभवास मिळत असते.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपणास स्वतःच्या नातेवाईकांमध्ये व मित्रपरिवारांमध्ये पाहावयास मिळतात. प्रत्येक व्यक्तींच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारांमध्ये काही लोक कमी बोलतात तर काही लोक खूप जास्त बोलतात. काही व्यक्ती बडबडी असतात, त्यामुळे त्यांना कुठेही गेले किंवा कोणामध्येही मिसळून जायला वेळ लागत नाही. अनोळखी माणसांना पटकन आपलसं करण्यास त्यांना वेळ लागत नाही. त्यांच्या स्वभावात काहीसा अल्लडपणा सुद्धा असतो. तरी सुद्धा समोरील व्यक्तींना आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी होतात. या उलट काही व्यक्ती स्वतःमध्येच मग्न असतात व फारच कमी बोलतात. त्यांना कुणा मध्ये मिसळून जायला आवडत नसते. समोर जर अनोळखी व्यक्ती असेल तर अशा व्यक्ती स्वतःहून त्यांची ओळख करून घेणार नाही. घरातील इतर नातेवाईकांबरोबर सुद्धा त्यांचे फारसे संबंध असत नाही. त्यांच्याकडे मित्रपरिवार यांचा गोतावळा असत नाही. अशा व्यक्ती नेहमीच अंतर्मुख असतात. काही व्यक्तींचे विचार आणि मत त्यांच्या नातेवाईक किंवा मित्रांपेक्षा वेगळे असतात. मग अशा व्यक्ती केवळ नाते टिकावे म्हणून आपली मत व्यक्त करत नसतात. मला वाटते असे करणे चुकीचे आहे. नात्यांची किंवा मित्रत्वाची बंधने कमकुवत नसतात की त्यामुळे आपले संबंध बिघडून जातील. वाद होत असताना एखादी व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी समोर मांडू पाहतो तेव्हा तिथे संवादाची गरज असते. इथे प्रत्येक व्यक्तीने आपला अहंकार बाजूला ठेवून समोरचा माणूस काय सांगू पाहतो आहे हे पूर्णपणे ऐकून आपले विचार मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या संवादात भाग घेणाऱ्या व्यक्तींचा पूर्णपणे अभ्यास असणे गरजेचे आहे. याबाबतील मी तुम्हाला माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा मुंबईच्या लोकल मधून प्रवास करताना माझ्या समोर बसलेल्या एक व्यक्तीने महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांवर विचित्रपद्धतीने टीका केली. तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही या दोनही महापुरुषांचा अभ्यास केला आहे का?. तेव्हा समोरच्या व्यक्तीने काहीच उत्तर दिले नाही, उलट त्याचे कसे बरोबर आणि माझे कसे चूक असे चुकीचे तर्क लावून ती व्यक्ती सांगू लागली. तेव्हा समोर असलेल्या माझ्या मित्राने त्या व्यक्तीचे चुकीचे तर्क बरोबर असल्याचे सांगितले. तेव्हा मी माझ्या मित्राला काही वाचलेल्या गोष्टींचा उल्लेख करून गप्प बसविले आणि त्यांना माझे म्हणणे पटवून दिले. इथे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे एखाद्या विषयावर आपली मते जरूर वेगळी असणार आणि ती मांडल्यामुळे आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारांमध्ये भांडणे होतील अशी कल्पना करणे चुकीचे ठरेल. प्रत्येक व्यक्तीचे विचार त्याला आलेल्या अनुभवानुसार असतात कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यासाठी संवाद जरुरीचा असतो.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा लेख लिहिताना मला आठवण झाली ती आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची. म्हणजे पु. ल. देशपांडेची. त्यांचे कुठलेही लिखाण वाचा, तुम्हाला त्यांच्या लिखाणात प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचे चित्र दिसेल. स्वतः पु. ल. देशपांडे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. एक विनोदी लेखक, संगीतकार, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व कलाकार, हजरजबाबी वक्ते असे अनेक विविध पैलू त्यांच्यामध्ये होते. त्यांच्या पुस्तकातील व नाटकातील अनेक व्यक्तिमत्वे लोकांच्या मनात घर करून आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र आणि आपुलकी या पुस्तकातून पु. ल. देशपांडेनी त्यांच्या आयुष्यात खरोखरच आलेल्या व्यक्तींचे चरित्र लेखन केले आहे. अशी चरित्रे लिहिताना त्या व्यक्तींनी केलेली निर्मिती, त्यांच्या स्वभावाची वैशिष्टये खूप सुंदरपणे मांडली आहेत की आपण वाचून थक्क होत जातो. ती फुलराणी, सुंदर मी होणार, तुझे आहे तुझपाशी, अंमलदार आणि एक झुंज वाऱ्याशी या नाटकातून व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उभे करून प्रत्येक व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख त्यांनी करून दिली आहे. त्याचप्रमाणे अपूर्वाई, पूर्वरंग, वंगचित्रे आणि जावे त्यांच्या देशा सारखी प्रवासवर्णने ही एखाद्या ठिकाणी काय पाहिले यापेक्षा त्यांना प्रवासात भेटलेल्या व्यक्तींचे अनेक पैलू दाखवीत प्रवासातील धमाल फारच छान मांडली आहेत. पण आम्हा सर्वांना मोहवून टाकते ते म्हणजे त्यांनी लिहिलेले व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक. १९६२ साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आजही वाचताना मनाला खूपच आनंद देऊन जाते. या पुस्तकात त्यांनी वीस काल्पनिक पात्रे घेतली असून त्यात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याची भावना, त्याचे वर्तन, त्याची विचार करण्याची पद्धत आणि त्या व्यक्तीचा त्या लेखका बरोबर होत असलेला संवाद वाचून ही पात्रे जिवंत असल्यासारखी वाटतात. यात आलेल्या व्यक्ती कधी मजेदार आहेत तर कधी भावनात्मक किंवा गंभीर आहेत. या प्रत्येक व्यक्ती आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जातात. जीवन जगण्याचे धडे देतात. त्यांच्या या वेगळेपणामुळे त्या व्यक्ती वल्ली होऊन जातात. हरितात्या, सखाराम गटणे, अंतू बर्वा, नंदा प्रधान, भैय्या नागपूरकर, नामू परीट, चितळे मास्तर, हंड्रेड पर्सेंट पेस्टन काका अशा व्यक्ती आणि वल्ली आपल्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. जीवनातल्या विसंगत अनुभवांना आपल्या विनोदी शैलीतून पु. ल. देशपांडेनी ही पात्रे आमच्या समोर खूप सुंदरपणे मांडली आहेत. बटाट्याची चाळ आणि असा मी असामी ही दोन पुस्तके म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीमध्ये योग्यरीतीने समाविष्ट होणारी पुस्तके आहेत. हे सर्व वाचताना जाणवते की पु. ल. देशपांडेना माणसेच या जगात सुंदर वाटत राहिली.
व्यक्ती तितक्या प्रकृती जरी खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती या समाजासाठी एक जबाबदार व्यक्ती असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपले कौशल्य दाखवताना खेळकरपणा जरुरीचा असतो तसेच त्याला वैज्ञानिक पद्धतीने आपले सूत्र मांडता आले पाहिजे. त्याचे वागणे हे वैधानिक असले पाहिजे. सर्वांना एकत्र घेऊन, स्वतःच्या कृत्याची जबाबदारी घेता आली पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल नेहमी आपुलकी असायला हवी. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींशी संबंध चांगले होऊन मानवजात पूर्णपणे विकसित होण्यास मदत होईल.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment