Skip to main content

Mukttata मुक्तता

 रंग लेखणीचा परिवार

आठवडा क्रमांक : १६०
विषय क्रमांक: ५
विषय : मुक्तता
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.com/

मुक्तता म्हणजे एखाद्या बंधनातून सुटण्याची क्रिया किंवा  एका त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून मानवाला सोडविणे. माणसाला अनेक गोष्टींपासून मुक्तता हवी असते. मग प्रश्न पडतो की अशा कोणत्या गोष्टीं आहेत की त्यापासून माणूस मुक्त होऊ इच्छितो. जर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट दिसून येईल की प्रत्येक माणसाला जीवनात सुख आणि शांती हवी असते. त्यासाठी त्याला मुक्तता हवी असते ती अहंकारापासून, द्वेषापासून, व्यसनापासून, भयापासून, क्रोधा पासून आणि विकारापासून. जर आपण नुसत्या याच गोष्टी मुक्तीचा शोध घेताना घेतल्या तर तो शोध मर्यादित स्वरूपाचा असू शकतो. जेव्हा आपण माणसाचाच शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की माणसाला सर्वात मोठी मुक्तता हवी असते ती गुलामगिरीतून किंवा पारंपारिक बंधनातून. मग ती मुक्तता  सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वैचारिक, शैक्षणिक अशा कोणत्याही प्रकारची असू शकते. कारण माणूस हा असा प्राणी आहे की तो ज्या परिस्थितीत असतो, त्यात तो स्वतःला घडवत असतो आणि त्याचबरोबर स्वतःला बदलत सुद्धा असतो. त्यासाठी हवा असलेला पर्याय त्याला शोधून काढायचा असतो आणि असा पर्याय शोधताना त्याला सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता हवी असते. जर आजूबाजूची परिस्थिती किंवा इतर माणसे त्या व्यक्तीसाठी पर्याय ठरवत असेल तर ती व्यक्ती स्वतंत्रपणे काम करूच शकणार नाही. त्यामुळे नवे विचार समाजापुढे येणार नाही आणि अशी व्यक्ती नवनिर्मितीची क्षितिजे निर्माण करू शकणार नाही. मग माणूस दुःखी होईल. त्याचे हे दुःख फक्त त्याच्यापर्यंत मर्यादित राहणार नाही आणि त्याचा परिणाम सर्व समाजावर होऊन त्यात असलेली मानवजात दुःखी होईल. जर प्रत्येक माणसाला शांतीपूर्ण जीवन जगण्यास मिळाले तर तो इतरांसाठी सुद्धा शांततेची निर्मिती करू शकेल. यासाठी माणसाला सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता जरुरीची आहे.

माणूस आपले जीवन शांत आणि सुखाने जगू शकला तर चांगल्या वातावरणाची निर्मिती करून सर्व समाजाचे जीवन सुखी करू शकतो. त्यासाठी माणसाला स्वतःचा अहंकार सोडावा लागेल. अहंकार कुठल्याही प्रकारचा असू शकतो. कधी कधी तर आपण समाजासाठी चांगल्या गोष्टी करत आहोत याचासुद्धा अहंकार माणसाला असतो. मी शून्यातून जग उभारले आहे, मी उच्च शिक्षित आहे त्यामुळे माझे तर्क बरोबरच आहेत, माझ्या राज्यात सर्व लोक खुश आहेत कारण मी जनतेच्या सुखासाठी कायम तत्पर असतो अशी काही उदाहरणे अहंकाराची आहेत. अहंकार म्हणजे एक प्रकारची मस्ती. जो माणूस अहंकारी असतो त्याच्याकडे कधीच विनम्रता नसते. असा मनुष्य इतरांना तुच्छ मानू लागतो व त्यांचा द्वेष करू लागतो, आम्हाला कोणाचीही गरज नाही, आमच्याकडे  सर्व आहे अशा प्रकारच्या विकृतीमध्ये अडकत जातो आणि कळत नकळत तो काही विकार ओढवून घेत असतो. त्यामुळे माणसाचे मन अशांत होते. त्याचा विकास थांबतो आणि प्रगतीचे सर्व मार्ग दिसेनासे होतात. मग तो मनुष्य समाजात एकटा पडू लागतो. स्वतःला न आवडणारा व्यवहार करू लागतो. त्यामुळे त्याच्या जीवनात अप्रिय घटना घडू लागतात आणि अचानक आंतरिक तणाव निर्माण होऊन त्याची कुठलीच कामे व्यवस्थित होत नाहीत. त्याचा परिणाम माणूस व्यसनी होऊ लागतो, त्याच्यात क्रोध, भय व इतर विकार निर्माण होऊ लागतात. या सर्वांना माणसाचा अहंकार जबाबदार आहे. त्यामुळे अहंकार दूर करणे फारच जरुरीचे आहे. त्यातून मुक्तता पाहिजे असल्यास सर्वप्रथम "मी"चे रूपांतर आम्ही किंवा आपण मध्ये झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक माणसाने आपले दुःख आपणच समजून घेऊन स्वतःला शांत करून आपल्या आयुष्यातील अप्रिय घटना टाळली पाहिजे. आपल्या बरॊबर दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे असा ग्रह सोडून दिला पाहिजे व कुठल्याही गोष्टीवर अंध प्रतिक्रिया देणे बंद केले पाहिजे. त्यासाठी स्वतःचे विचार बंद दाबून टाकण्याची गरज नाही. त्यामुळे विकारांचे निर्मूलन होणार नाही. अशावेळीस आत्मपरीक्षण करून स्वतःच या विकारांना दूर करणे जरुरीचे आहे. म्हणूनच मानवजातीला अहंकार, द्वेष, भय, व्यसन व इतर विकारांपासून मुक्तता मिळणे फार जरुरीचे आहे. तरच मानव शांतीपूर्ण सुखी जीवन जगू शकेल.

आज प्रत्येक राष्ट्र हे स्वतंत्र आहे आणि ते राष्ट्र स्वतंत्र असल्यामुळे आपण असे गृहीत धरतो की त्या देशात राहत असलेले सर्व नागरिक कुठल्याही बंधनात अडकून पडलेले नाहीत. काही देशांची राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी एक प्रश्न नेहमीच पडत असतो की त्या देशातील नागरिक स्वतंत्ररित्या  विचार करण्यास मुक्त आहे का? मग ते पश्चिमेकडील देश असो किंवा पूर्वेकडील देश असो. त्या देशातील नागरिकांच्या कल्पना, इच्छा,आकांक्षा, विचार यांना सर्व बंधनातून मुक्तता मिळाली आहे का? वाईट विचार, वाईट सवयी, इतरांचा द्वेष आणि विध्वंसक वर्तन यापासून तरी स्वतंत्र म्हणून घेणारे देश मुक्त आहेत का? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर बहुधा विकसित देशांमध्ये खूपच सकारात्मक उत्तर मिळेल आणि अविकसित देशांमध्ये नकारात्मक उत्तर मिळेल. भारताबद्दल बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की इंग्रज्यांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला खरा पण तो फक्त  राजकीयदृष्ट्याच मुक्त झाला असेच म्हणावे लागेल.  सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या भारताला पूर्णपणे मुक्तता मिळालेली दिसत नाही. म्हणूनच महात्मा गांधींनी म्हटले होते की स्वातंत्र्य हे भारताच्या तळागाळातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहचायला पाहिजे जेणेकरून तो स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकेल. याचाच अर्थ महात्मा गांधींना भारताला फक्त राजकीय दृष्ट्या मुक्त करायचे नव्हते तर त्यांना भारत सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्यासुद्धा मुक्त व्हायला पाहिजे होता. कारण स्वतंत्र भारतात त्यांना सर्वात मोठा प्रश्न भेडसावत होता तो म्हणजे धार्मिक व जातीय बंधनाचा,  मागास वर्गीयांचा आणि स्त्रियांचा. या सर्व गोष्टींपासून त्यांना प्रत्येक भारतीयांना मुक्त करायचे होते. त्यांनी अहिंसेचे मोठे तत्वज्ञान जगाला दिले आणि द्वेषमुक्त करण्यासाठी खूपच प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना आवश्यक अशी तरतूद भारतीय संविधानात असावी असेही वाटत होते. महात्मा गांधींच्या मते स्वातंत्र्य ही एक आकर्षक संकल्पना आहे. कारण माणसाला धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक स्वातंत्र्य  तर हवेच असते त्याशिवाय त्याला स्वतंत्रपणे  व्यवसाय करण्याचे, कुठेही राहण्याचे, काहीही खाण्याचे, वाचण्याचे, लिहिण्याचे, पाहिजे असलेला जीवनसाथी निवडण्याचे सुद्धा स्वातंत्र्य हवे असते. म्हणूनच महात्मा गांधींना सर्व  मानवजात सगळ्या बंधनापासून मुक्त झालेली हवी होती. कारण कुठलाही द्वेष आणि खोटा प्रचार माणसाला मुक्तता मिळवून देत नाही.

आज भारत देश अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. ही गोष्ट खुपच आनंददायी आहे. असे म्हटले जाते की आजची तरुण पिढी हुशार आहे, वास्तववादी आहे. तरीसुद्धा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात त्या म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि अजूनही स्त्रियांना मिळणारी घाणेरडी वागणूक. विकासाच्या  नावाखाली आजची तरुण पिढी नको त्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेली दिसते. महत्वाच्या परीक्षेत उच्च टक्केवारी मिळविण्यासाठी होणारा तणाव, आपली कारकीर्द उत्तम घडविण्यासाठी रात्रंदिवस फक्त काम करीत राहण्याची सवय, इतर चांगल्या सामाजिक गोष्टी जरुरीच्या नाही म्हणून दूर ठेवणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यास मदत करीत असतात. इथे व्यसन म्हणजे एखाद्या व्यक्तीला लागलेली सवय की ज्यामुळे त्या व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक मोठे नुकसान होते व त्या सवयींमुळे त्या व्यक्तीत कोणतेही बदल घडवून आणणे शक्य होत नाही. ही तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाण्याचे कारण पुष्कळदा वैयक्तिक आणि सामाजिक आहे. त्यातून या पिढीला बाहेर काढले पाहिजे. जर आजच्या तरुण पिढीचा विकास चांगल्या प्रकारे करावयाचा असेल तर त्या पिढीला वाईट व्यसनापासून मुक्तता मिळाली पाहिजे. जसा प्रश्न आजच्या तरुण पिढीचा आहे  तसाच स्त्री मुक्ती सुद्धा आहे. महात्मा फुलेनी दीडशे वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. त्यामुळे स्त्री जशी शेतातही काम करू शकते तशी अवकाशातही यशस्वी झेप घेऊ शकते. आज कोणतेही असे क्षेत्र नाही की स्त्रीचे त्यात योगदान नाही. शिक्षण, नोकरी, व्यवस्थापन यामध्ये मोठी झेप घेत सर्व पातळ्यांवर ती आघाडीवर आहे. तरीसुद्धा ती सर्व पारंपारिक बंधनातून मुक्त आहे का? असा प्रश्न आपल्याला पडत असतो. कारण काही सामाजिक रूढी स्त्रियांना आनंदाच्या प्रत्येक समयी दूर ठेवतात ते पाहून खूप वाईट वाटू लागते. त्यांच्या वर होणारे शारीरिक व लैगिक अत्याचार पाहिले की खूपच मनस्ताप होतो. अशा वेळीस एक प्रश्न पडतो की पारंपारिक दृष्टया साजरे होणारे सण स्त्रियांना समजून घेत आहेत का? आपल्या कुटुंबासमवेत प्रत्येक सण साजरा करण्यास स्त्रियांना मिळणार आहे का? चांगले शिकूनसुद्धा त्यांची जागा फक्त स्वयंपाक खोलीतच असणार आहे का? तेव्हा जाणवते की प्रत्येक घरातील स्त्रियांना रूढी परंपरेनुसार मुक्तता मिळाली पाहिजे. जेव्हा ती मिळते तेव्हा तिचे योगदान खूपच मोठे असते. दुर्गा भागवत, इरावती कर्वे, गीता साने, गोदावरी परुळेकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, झाशीची राणी, इंदिरा गांधी  अशी अनेक उदाहरणे असताना सुद्धा आजची स्त्री पूर्णपणे मुक्त नाही आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण  विकासासाठी स्त्रीची मुक्तता सर्व प्रकारच्या बंधनातून झालीच  पाहिजे.

बहुतेक वेळेस आपण पाहतो की माणूस मुक्त असल्याचे सांगत असतो. पण खरोखरच तो तसा असत नाही हे आपल्या नजरेस पडत असते. एखाद्या कार्यालयात काम करणारी माणसे पहिली की असे जाणवते की त्या माणसांची स्वातंत्र्याची कल्पना परिपूर्ण नसून कुठल्यातरी बंधनात अडकलेली असते. त्या बंधनातून ती व्यक्ती स्वतंत्र असूच शकत नाही. हे बंधन त्या माणसांसाठी एक पिंजराच असतो आणि त्या पिंजऱ्या मध्येच त्या माणसांना एखादे काम करण्याचे स्वातंत्र्य असते. जेव्हा त्या माणसाला समजते की त्याचे स्वातंत्र्य हे एका बंधनात अडकलेले आहे, तेव्हा त्याला पूर्णपणे मुक्तता हवी असते पण त्याची मानसिकता त्याला मुक्त होऊ देत नाही. अशावेळीस ही माणसे स्वतःच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही  नाकारत असतात. त्यांना वाटते की असे केल्याने त्यांना भयापासून मुक्तता मिळेल. पण त्यातूनसुद्धा त्यांना मुक्ती मिळत नाही. म्हणून सुप्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ Jean Paul Sartre म्हणतात, " Man is free to make his own choices, but is “condemned” to be free, because we did not create ourselves. Even though people are put on Earth without their consent, we must choose and act freely from every situation we are in. Everything we do is a result of being free because we have choice. The only choice we do not have is that of having choices. Not only are we condemned to be free because we did not choose to exist, but we are also condemned to be free because we are the only thing that exists that has to be responsible for all of our actions". सार्त्र यांना थोडक्यात सांगायचे आहे की मानवाला स्वातंत्र्याचा अभिशाप मिळालेला आहे. माणसाला स्वातंत्र्य हवेच असते. त्यासाठी त्याला सर्वच बंधनापासून मुक्तता हवी असते. त्यासाठी तो खूप प्रयत्न करतो पण त्याला कशाची तरी भीती वाटत असते. यासाठी त्याला मानसिक शक्तीची गरज असते. त्याला सर्व विचारांची मोकळीक मिळायला हवी आणि स्वतःच्या स्वातंत्र्या बरोबर इतरांच्या स्वातंत्र्याविषयीची जागरूकता असायला हवी. जर माणसाला मुक्तता प्रत्येक क्षेत्रात मिळायला लागली तर त्याच्या विचारांना चालना मिळेल आणि विकासाची नवीन क्षितिजे तयार होण्यास मदत होईल..

धन्यवाद

✍🏻 योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...