Skip to main content

Maze Avadate Vyaktimatv माझे आवडते व्यक्तिमत्व




विषय : माझे आवडते व्यक्तिमत्व

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

व्यक्तिमत्व या शब्दावर अनेक व्याख्या आहेत. निसर्गाने माणसाला अनेक जीवन-बीजे दिली आहेत. मानवी जीवनात आलेल्या सामाजिक, भावनिक व शारीरिक परिस्थिती नुसार त्या बीजांची वाढ होऊन त्याचा एक पिंड तयार होतो. माणसाचा हा पिंड म्हणजेच त्याचे व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. पण ही व्याख्या एकांगी वाटते. कारण त्यात माणसाच्या स्वभाववैशिष्ट्यांचा, बुद्धीचा, भावनांचा, गुणांचा व वृत्तीचा त्यात समावेश होत नाही. त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करायची असल्यास असे म्हणावे लागेल की सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या वर्तनाची सर्वांगस्पर्शी व संघटकस्वरूप गुणात्मकता म्हणजे व्यक्तिमत्व. अशी अनेक व्यक्तिमत्वे जगात होऊन गेली आहेत, होतही आहेत आणि पुढे सुद्धा होत राहतील. पण त्यातील एक व्यक्तिमत्व माझे आवडते आहे असे शोधणे सुद्धा खुप कठीण आहे. काही व्यक्तिमत्वे आपल्या जीवनावर असा काही ठसा उमटवून जातात की त्यावर लिहिण्यासाठी चार पानी लेख कमी पडू लागतो. भारताबद्दल बोलायचे झाल्यास अनेक व्यक्तिमत्वे अशी आहेत की त्याबद्दल किती लिहू असे होऊन जाते. शिवाजी महाराज, झाशीची राणी, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राममनोहर लोहिया, हमीद दलवाई, यशवंतराव चव्हाण, वगैरे. अशा  अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांची व्यक्तिमत्वे आपल्या समोर येतात. या सर्वांची जीवन चरित्रे आपल्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराची भावना निर्माण करून जाते.  जशी राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्वे आहेत तशीच काही लेखकांची सुद्धा व्यक्तिमत्वे आहेत. मराठीबद्दल सांगायचे झाले तर बाळशास्त्री जांभेकर, ह. ना. आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, न.चि. केळकर, आचार्य अत्रे, पु. ल.देशपांडे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, रणजित देसाई अशी अनेक नावे आहेत की त्यांच्याबद्दल बोलताना किंवा लिहिताना मन अभिमानाने फुलून येते आणि आदराने त्यांच्या पुढे नतमस्तक होते. कारण ही व्यक्तिमत्वे एकाचवेळी आदराएवढाच दराराही उत्पन्न करतात. या व्यक्तिमत्त्वांची चरित्रे वाचताना किंवा त्यांनी निर्माण केलेले लिखाण वाचल्यानंतर आपली बौद्धिक उंची वाढल्याचा अनुभव येतो आणि त्या व्यक्तींवर आपण नकळत प्रेम करू लागतो. म्हणून मी माझे आवडते व्यक्तिमत्व म्हणून निवड करताना अशा व्यक्तिमत्वाची निवड केली आहे की त्यांनी लिहिलेल्या लिखाणातून मला बौद्धिक उंचीचा अनुभव येऊ लागला. असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे मराठीतील अभ्यासक, लेखक आणि समीक्षक नरहर अंबादास कुरुंदकर.

अत्यंत अवघड विषय सहज सोप्या भाषेत आपल्या बुद्धीचा वापर करून सांगण्याच्या क्षमतेमुळे अनेक तरुणमंडळी तत्ववेत्ता सॉक्रेटिसच्या भोवती फिरत असत. असाच गुण मला नेहमी नरहर कुरुंदकरांचे लिखाण वाचताना आढळत असे. सॉक्रेटिसप्रमाणे त्यांनी काय विचार करावा यापेक्षा विचार कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. त्यांचे लिखाण आणि विचार त्यावेळी असलेली परिस्थिती आणि समस्या यांचा विचार करून लिहिलेले आहेत. त्यांच्या व्यासंगाला कधीच सीमा नव्हती. साहित्य, संगीत, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, रहस्यकथा असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. ज्या प्रमाणे ते मार्क्स, फ्रॉइड आणि शंकराचार्य यांचे तत्वज्ञान सहजपणे सांगतात त्याचप्रमाणे ते भरतमुनींच्या नाट्यशास्त्र विषयी अतिशय सुंदरपणे लिहितात. त्यामुळे त्यांचा खास आवडीचा किंवा व्यासंगाचा विषय कोणता आहे हे ठरवणे खूप कठीण आहे. त्यांच्या लिखाणात नेहमीच तर्कशुद्ध पणा असायचा. हा तर्कशुद्धपणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून आणि शाळेतल्या शिक्षकांकडून मिळाला असे ते म्हणतात. महाविद्यालयात असताना त्यांच्यावर बट्रॉड रसेल या तत्ववेत्याचा प्रभाव पडला आणि त्यांनी रसेलच्या विचारांचा आणि तर्कांचा अभ्यास केला. त्यामुळे ते सखोल विचावंत आणि साहित्यिक तर बनलेच पण त्याबरोबर ते सामाजिक कार्यकर्तेसुद्धा बनले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबर हैद्राबादच्या मुक्ती संग्रामात, मराठवाड्याच्या विकास आंदोलनात, जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात आणि आणीबाणी विरोधीच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. या सर्व चळवळीबद्दलसुद्धा त्यांनी चिकित्सक पद्धतीने लिहिले आहे. त्यामुळे त्यांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. त्यांनी आपले कार्य करत असताना नांदेडला कधीच विसरले नाहीत. नांदेड शहराचे आधुनिकरण करण्याचे मोठे श्रेय कुरुंदकरांना जाते असे तेथील जनता नेहमीच सांगत असे. त्यामुळे सर्व नांदेडकरांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की ते असे मानीत हा माणूस आपल्याला कोठेही घेऊन गेला तरी आपला कडेलोट करणार नाही. म्हणून नांदेड म्हणजे कुरुंदकर आणि कुरुंदकरांचे नांदेड इतके समीकरण महाराष्ट्राच्या जीवनात पक्के झाले होते. नांदेड प्रमाणे त्यांनी पूर्ण मराठवाड्यावर प्रेम केले आहे. त्यांचे माझा मराठवाडा हे व्याख्यान वाचताना आपल्याला मराठवाडा बद्दल खूप माहिती मिळून जाते. तेव्हा जाणवते की मराठवाडा ही संतांची, लढवय्यांची जमीन आहे आणि विकासाची क्षमता असणाऱ्यांची सुद्धा जमीन आहे.

अशा या विद्वत्तेच्या मेरूमणीचा जन्म १५ जुलै १९३२ साली महाराष्ट्राच्या परभणी ज़िल्ह्यातील नांदापूर येथे झाला. हैद्राबादच्या सिटी कॉलेजमधून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्याकाळात ते उत्कट वाचक बनले. त्यांनी साहित्य, तत्वज्ञान, इतिहास, राजकारण, धर्म यावरील अनेक पुस्तके वाचली. १९५५ साली नांदेड मध्ये प्रतिभा निकेतन शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी अध्यापनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९६३ मध्ये ते नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. नरहर कुरुंदकर हे स्वतः जरी विकसित व्यक्ती असले तरी त्यांच्या विकसित होण्यामागे तीन व्यक्तिमत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक म्हणजे त्यांचे वडील. त्यांनी त्यांच्यात भगवतगीतेची आवड निर्माण केली आणि नीट विचार केला तर प्रत्येक व्यक्ती आपली प्रतिभा व्यवस्थितपणे विकसित करू शकते असे सांगितले. दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे गुरु प्राध्यापक भालचंद्र महाराज कहाळेकर. त्यांनी कुरुंदकरांना इतिहासाचा अभ्यास करताना प्रत्येक ऐतिहासिक नोंदी समजून घेऊन तर्काचा आधार घेऊन  विश्लेषणात्मक पद्धतीने विचार करून सत्य कसे शोधावे हे समजावून सांगितले. तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे मामा एन. जी. नांदापूरकर जे उस्माना विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख होते. त्यांनी त्यांना  मराठी साहित्याची आणि महाभारताची आवड तर निर्माण केलीच पण त्याबरोबर कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचे लोकायतन शिकवून त्यांचा भौतिकवादी दृष्टिकोन विकसित करण्यास मदत केली. त्यामुळे वाचन आणि लेखन हे त्यांच्या जीवनाचे छंद बनले. वाचन तर त्यांचा आयुष्यातील एकमेव ध्यास बनले. वाचन आणि लेखनामुळे हे एक परिपूर्ण माणूस बनले आणि परिस्थितीचे योग्य प्रकारे आकलन करू शकले. त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत पण त्यांचे पाहिले पुस्तक होते मराठवाडा साहित्य परिषदने १९६२ साली प्रकाशित केलेले रिचर्डसची कलामीमांसा. पण त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली ते १९६४ साली प्रकाशित झालेल्या रुपवेध या पुस्तकाने. या पुस्तकात त्यांनी मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राचा परामर्श घेताना त्यांनी जे विवेचनात्मक विश्लेषण केले आहे त्यास तोड नाही. नंतर त्यांचे अनेक लेख साधना या मासिकातून येऊ लागले. ते वाचून यदुनाथ थत्ते सारखे लेखकही कुरुंदकरांचे चाहते बनले. कुरुंदकरांबद्दल लिहिताना थत्ते लिहितात, "स्वतःला सेवादलाच्या गोतावळ्यातील म्हणून अभिमान बाळगणारा हा माणूस सहजपणे साधनाच्या गोतावळ्याचा घटक बनला. मग बैठकी जमू लागल्या. तेव्हा एक गोष्ट जाणवली ती म्हणजे एखाद्या माणसाबद्दल आदरबुद्धी म्हणजे तिच्या विचारांना अंध मान्यता नव्हे आणि विचार भेद स्पष्ट करण्याबाबत अंगचूकारपणा करणे नव्हे, हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट झाले. हा माणूस वैचारिक क्षेत्रातील एक कलाकार असल्यामुळे त्याची मांडणी अत्यंत देखणी असते आणि हा नकळत आपल्याला एखाद्या मनोहारी वळणाने नव्याच मुक्कामावर घेऊन जातो, नव्याचे दर्शन घडवितो, हे ध्यानी आले. त्यांच्या साधनेतील लेखनामुळे त्यांचा मोठा चिकित्सक चाहता वर्ग निर्माण झाला". असे सांगून यदुनाथ थत्ते म्हणतात की कुरुंदकरांसारखा माणूस आपण जपला पाहिजे. असा माणूस परदेशी असता तर त्याला व्याख्यान देण्यासाठी विमानाने घेऊन गेले असते. इथे त्याला आपण बसने, ट्रकने घेऊन जातो. तरीसुद्धा हा माणूस तक्रार करीत नाही. कारण तरुणांची शिबीरे -चर्चासत्रे ही त्यांची आवडती ठिकाणे आहेत.

नरहर कुरुंदकरांच्या लिखाणाची पहिली ओळख झाली ती त्यांनी  रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी या शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावानेतून. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक महत्व सांगून त्यांचे मोठेपण दाखवून दिले आहे. तेव्हापासून ग्रंथालयात जाऊन कुरुंदकरांची पुस्तके वाचू लागलो. अशावेळीस पहिल्यांदा हाती आले ते म्हणजे जागर आणि या पुस्तकाने राजकारण, इतिहास, धर्म, आर्थिक परिस्थिती व  लोकशाही त्याप्रमाणे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दलचे गैरसमज दूर केले आणि या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला. या पुस्तकाने विचारांच्या पातळीवर त्रस्त करण्याऱ्या प्रत्येक प्रश्नाला हात घालून त्याचे विश्लेषण केले आहे. खरोखरच जागर या पुस्तकाने खरी जाग आणली. आजही हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्याची खूप गरज आहे. त्यानंतर हाती आले छायाप्रकाश. या पुस्तकाने हुकूमशाही आणि समाजवादी मूल्ये यांच्या विचारांचे अनेक दरवाजे उघडले. फॅसिस्ट या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे खोटेपणाचा प्रचार हे या पुस्तकाने दाखवून दिले. राष्ट्रवाद आणि समाजवाद या संकल्पना परस्परपूरक आहेत असे हे पुस्तक सांगते. आजही या पुस्तकातील विचार आपल्याला उपयोगी आहे. शिवरात्री हे पुस्तक जाती धर्मावर आधारित राजकारणाचा दुष्परिणाम स्पष्ट करते आणि त्यापासून भारतीय जनतेने दूर राहावे असे सांगते. या पुस्तकात ते हिंदू मुस्लिम यांचे सांप्रदायिक राजकारण, गोळवलकर गुरुजी आणि गांधी हत्येचे राजकारण, धर्मनिरपेक्षता या विषयावर चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करतात. मराठी कादंबरीच्या इतिहासातील महत्वाच्या कादंबरीवरील विवेचन वाचायचे झाल्यास धार आणि काठ हे पुस्तक जरूर वाचावे. महाभारतावर वाचण्यासाठी व्यासांचे शिल्प हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यासपूर्ण विश्लेषण वाचण्यासाठी मागोवा आणि भरतमुनीचे नाट्यशास्त्र वाचावायचे झाल्यास रंगशाळा हे पुस्तक जरूर वाचावे. पायवाट मध्ये त्यांनी मराठी कविता आणि नाटक यांचे सुंदर विश्लेषण केले आहे तर भजनमध्ये दलित साहित्याचे अचूक विश्लेषण केले आहे. आकलन या पुस्तकात डॉ आंबेडकर, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे व मोगल सम्राट अकबर यावरील व्यक्ती विश्लेषण खूपच सुंदर आहे. मनुस्मृतीचे दहन का बरोबर होते हे समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेले  मनुस्मृती हे पुस्तक जरूर वाचावे.  त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांवर दिलेल्या व्याख्यानांचे पुस्तक खूपच वाचनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यावर लिहिलेले अन्वय या पुस्तकामधील लेख जरूर वाचण्यासारखे आहेत. त्यांची अजूनही पुस्तके आहेत. पण त्यांची जागर, शिवरात्री, आकलन आणि छायाप्रकाश ही चार पुस्तके जरूर वाचावी. ते वाचल्यानंतर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे नरहर कुरुंदकर एक जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.

राष्ट्रवाद, समाजवाद  आणि लोकशाही पूर्णपणे समजून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत कुरुंदकरांनी व्यक्त केले आहे. जरी ते प्रस्थापित इतिहासकार नसले तरी इतिहासाच्या अभ्यासात आणि संशोधनात नवीन क्षितिजे शोधण्याचे काम कुरुंदकरांनी  जिद्दीने व समर्थकपणे केले आहे. इतिहासकार म्हणून त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे योगदान म्हणजे बदलत्या काळाबरोबर शब्दांच्या अर्थाशी निगडीत असा अर्थ लावून त्याची  संकल्पना तयार करण्याच्या प्रक्रियांचा अभ्यास. या प्रक्रियेशिवाय हा अभ्यास अपूर्ण आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची पुस्तके इतिहासाच्या संशोधकांसाठी मार्गदर्शक मानली जातात. नुसता इतिहासाचा अभ्यास करून कुरुंदकर थांबत नाही. अशावेळीस ते सांगतात केवळ इतिहासाचा अभ्यास करणे पुरेसे नसून त्यासाठी सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा अभ्यास सुद्धा करणे जरुरीचे आहे. तसेच कला व इतर विषयांचे महत्त्व यांचा अभ्यास करण्यावरसुद्धा भर दिला गेला पाहिजे. कला ही स्वतंत्र असली पाहिजे आणि कलेसाठीच असली पाहिजे असे त्यांचे मत कधीच नव्हते. कला ही कधी समाज जीवनाशी निगडित असली पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यामुळेच विविध सामाजिक समस्यांवर त्यांचे विचार लोकांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करते. दलित साहित्य आणि दलित चळवळ हे त्यांच्यासाठी विशेष अभ्यासाचे विषय होते. त्यांनी अनेकदा दलित नेत्यांना मार्गदर्शन केले आणि दलित चळवळ उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे ते समर्थक बनले. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचा वापर करून वक्तृत्व आणि लेखनाद्वारे महाराष्ट्राच्या बौद्धिक जगात अमूल्य योगदान दिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणातून आणि चर्चेतून लोकशिक्षणाचे कार्य चालू ठेवले. उदगीर, औरंगाबाद येथे भारतीय संगीतावर जाहीर भाषण चालू असताना मृत्यूने त्यांना धडक दिली आणि वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी १० फेब्रुवारी १९८२ रोजी त्यांचे निधन झाले. या गोष्टीला आज चार दशके ओलांडून गेली तरी कुरुंदकरांचे लिखाण आणि विचार अजूनही ताजे वाटत आहेत. आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात बहुआयामी अशी दोनच व्यक्ती झाल्या. एक म्हणजे आचार्य अत्रे आणि दुसरे म्हणजे पु. ल. देशपांडे. मला वाटते तिसरे बहुआयामी व्यक्तिमत्व होते नरहर अंबादास कुरुंदकर.

नरहर कुरुंदकरांना मी पाहिले नाही. त्यांची ओळख झाली ती त्यांच्या लेखणी मधूनच. अशा या महान व्यक्तिमत्वाचे विचार मांडून  माझा हा लेख संपवितो. कुरुंदकर लिहितात, " इतर कुणाच्या बरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसाबरोबर नरकात राहणे चांगले, असेच मी मानतो. इतर कोणाच्या सहवासात सॉक्रेटिसला काढून सुखी होण्यापेक्षा सॉक्रेटिसच्या सहवासात तर्कशुद्ध होण्याचा प्रयत्न करून आपले दुःख स्वतःवर ओढवून घेणे, हे मला जास्त श्रेयस्कर वाटते. कारण सॉक्रेटिसचे विचार बरोबर असोत की चूक असोत ; त्याचा विचार करण्याचा हक्क आणि तो हक्क प्रस्थापित करताना त्याने पत्करलेले उदात्त मरण मला विलोभनीय वाटते".

अशा या महान व्यक्तिमत्वास त्रिवार सलाम

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...