रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १६२
विषय क्रमांक : १
विषय : आधी केलेची पाहिजे
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
केल्याने होत आहे रे |
आधी केलेची पाहिजे ||
यत्न तो देव जाणावा |
अंतरी धरिता बरे ||
या ओळी आहेत संत रामदास स्वामींच्या. ते सांगतात कोणतीही व्यक्ती त्यांचे ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतात पण त्यासाठी आधी त्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे. काम करणे म्हणजेच परमेश्वराला प्रसन्न करणे हे आपल्याला मनात बिंबवले पाहिजे. आपला आळस झटकून टाकला पाहिजे. जर आपण कर्म करत राहिलो तर ते कर्म आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जाते आणि त्यातच आपल्याला परमेश्वर दिसू लागतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात कर्माला फार महत्व आहे. जर माणसाने आपले आयुष्य कर्म न करता आळस करण्यात घालवीले तर त्याचे पुढील आयुष्य हे कष्टदायक किंवा त्रासदायक होऊ शकते. कोणतेही कर्म करताना अडचणी आणि अडथळे येऊ शकतात. म्हणून कर्म न करता नुसते पडून राहणे हा काही त्यावरील उपाय नाही. अशा अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. त्यासाठी प्रथम कामाला सुरुवात केलीच पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने तर कर्मयोगाचे संपूर्ण तत्वज्ञान आपल्या समोर भगवत गीतेत उलगडून ठेवले आहे. कर्माचे महत्व सांगताना भगवंत सांगतात की परमेश्वरचा साक्षात अनुभव घेण्यासाठी दोनच मार्ग आहे. एक आहे ज्ञानाचा आणि दुसरा आहे कर्माचा. पण ज्ञानाचा मार्ग हा ज्ञानी लोकांसाठी आहे तर कर्माचा मार्ग हा सर्वसाधारण किंवा सामान्य माणसांसाठी आहे. याचाच अर्थ स्वतःचे हित घडवून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येक माणसात आहे. पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. म्हणूनच समर्थ सांगतात की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
जगात आपण नेहमी दोन प्रकारची माणसे पाहत असतो. त्यातील एक प्रकार म्हणजे निसर्गाने किंवा परमेश्वराने जे काही आपल्याला दिले आहे ते आपण निमूटपणे स्वीकारून त्यातच आनंद मानत राहणे. तर दुसऱ्या प्रकारची माणसे म्हणजे भरपूर मेहनत घेऊन किंवा सतत संघर्ष करून स्वतःचे असे जीवन घडवितात. यात दुसऱ्या प्रकारच्या माणसांचा कर्म योगावर अतिशय विश्वास असतो. अशीच माणसे स्वतःच्या जीवनाचे भाग्य निर्माते असतात. अश्याच प्रकारच्या माणसांबरोबर परमेश्वर आपल्याला उभा राहिलेला दिसतो. त्यात अडचणी किंवा अडथळे बरेच येत असतात. पण आपल्या कृतीच्या समर्थ्यावर अशी माणसे त्यावर मात करतात. याचे कारण असे की कर्म केल्याने त्यांच्या विचारांना चालना मिळते आणि त्यांच्या कामामुळे आयुष्याला ऊर्जा प्राप्त होऊन वातावरण सकारात्मक होत जाते. म्हणूनच समर्थ रामदास सांगतात की कर्मात प्रचंड ताकद असते. त्यासाठी पहिल्यांदा ते केले पाहिजे. त्यात यश मिळत जाते. आपल्याला जगातील प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असेल पण त्या ज्ञानाचा उपयोग कर्म करण्यासाठी केलाच नाही तर माणूस स्वतःचे आयुष्य घडवू शकणार नाही. वरती सांगितल्याप्रमाणे पहिल्या प्रकारची माणसे निसर्गाने किंवा परमेश्वराने जेवढे दिले आहे त्यातच समाधानी राहिली की कालांतराने अशा माणसांना सकारात्मक ऊर्जा मिळूच शकणार नाही आणि आपल्या जीवनाचे ते भाग्यविधाते होऊच शकणार नाही. इथे असे म्हणायचे नाही की अशा माणसांमध्ये काम करण्याची क्षमता नसते. ती त्यांच्यात असते पण त्यांच्याकडे असलेल्या आपल्या खऱ्या क्षमतेचा ते लोक कधीच ठाव घेत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार जर कोणी एखादे चांगले काम करण्यास तयार केले तर अशी माणसे व्यवस्थित काम करून स्वतःमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार हकरतात आणि स्वतःच्या जीवनाचे भाग्यविधाते बनतात. अशावेळी आधी केलेची पाहिजे हा समर्थ रामदासांनी सांगितलेला उपदेश आपल्याला सकारात्मक विचारांची ऊर्जा देऊन जातो.
मानवी जीवनात कर्मा शिवाय दुसरे काहीच मोठे असू शकत नाही. जर माणसाने कृती केली नसती तर आज माणसांची परिस्थिती काय झाली असती याचा विचार आपण न केला तर बरे होईल. आज माणसाने आपल्या कृतीने अनेक शोध लावले. आज तो चंद्रावरसुद्धा पोहचू शकला कारण त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग कर्म करण्यास वापरला. जेव्हा आपण एका गावातून दुसऱ्या गावात जाताना आगगाडी, बस, विमान यासारख्या सुविधा वापरत असतो तसेच एका देशातून दुसऱ्या देशात जाताना विमान किंवा जहाजाचा उपयोग करतो तेव्हा जाणवते हे सर्व शक्य झाले ते माणसांनी केलेल्या कृतीमुळेच. आपल्या ज्ञानाचा उपयोग कृतिमध्ये करून माणसाने अनेक यंत्रे निर्माण केली. त्याचप्रमाणे रेडिओ, टीव्ही, फ्रीज, संगणक, मोबाईल सारखी उपकरणे तयार केली आणि सर्व मानव जातीला फारच जवळ आणले. वैद्यकीय शास्त्र विकसित करून अनेक रोगांवर अचूक उपाय शोधून काढले. अनेक विषयांवर संशोधन करून विचार करण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन तयार केला. आज खेळामध्ये सुद्धा अनेक नवीन विक्रम निर्माण करून स्वतःचे आणि स्वतःच्या देशाचे नाव मोठे केले. अनेक लेखकांनी व कलावंतानी आपल्या कर्मानेच लोकांना ज्ञान दिले आणि त्यांची करमणूक केली. यात अनेक माणसांचे प्रयत्न आहे आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वामुळे त्यांना उंच शिखरे गाठता आली. म्हणूनच आज मानवी जीवन सुखी होऊ शकले. चिकाटी, संयम, आत्मविश्वास आणि योग्यपद्धतीने वाटचाल करून माणूस कधीही निराश होऊ शकणार नाही. कधी कधी निसर्गाने केलेल्या आक्रमणामुळे माणूस जरूर हतबल होतो पण त्याला पराभव माहित नसतो. निसर्गाने वादळ, पूर, वेगवेगळे रोग वगैरे सारखे प्रकार करून माणसाचे जीवन यातनादायिक बनविले. मागील एक दीड वर्षात निर्माण झालेल्या करोना १९ संकटाने तर मानवजातीला मोडून टाकले. तरीसुद्धा मानव घाबरला नाही. योग्यपद्धतीने त्यावर संशोधन करून वैद्यकीय उपचार शोधून काढले आणि अजूनही त्यावर संशोधन चालू आहे. हे सर्व करताना माणसाला कृती करणे जरुरीचे आहे कारण विज्ञानाची प्रगती संपूर्ण प्रयत्नांवर अवलंबून आहे. माणसाने त्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना फळ जरूर मिळत जाते. म्हणून म्हणावेसे वाटते की आधी केलेची पाहिजे.
अनेक महापुरुषसुद्धा त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच यशस्वी झाले आहेत. मग त्यात शिवाजी महाराज असोत किंवा महाराणा प्रताप असोत, महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो. अब्राहम लिंकन असो किंवा विस्टन चर्चिल असो. या सर्वांनी केलेल्या कर्मामुळेच मानवी जीवन सुखमय झालेले दिसते. शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा. जेव्हा त्यांना आग्र्याला औरंगझेबाने कैद केले तेव्हा ते नुसते विचार करीत बसून न राहता तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यासाठी कवी परमानंद आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्या मुलाचा म्हणजे राजा रामसिंग यांचा उपयोग आपल्या सुटकेसाठी कसा केला हे इतिहासात नमूद केले आहे आणि हे वाचताना आपण थक्क होऊन जातो. नुसतं आग्रावरून सुटका नाही तर हिंदवी स्वराज्याची स्वप्ने साकरण्यासाठी त्यांनी केलेले कर्म तर इतके जबरदस्त आहे की त्यांच्यासारखे प्रेरणादायक काहीच नाही असे वाटू लागते. हिटलरची विमाने लंडनची भूमी बेचिराख करत होती तेव्हा V for Victory असे म्हणत सर्वांना धीर देत हिटलर सारख्या राक्षसी माणसाचा पराभव केला याला कारण म्हणजे विस्टन चर्चिल यांनी केलेल्या कृती. स्वतः उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या ज्ञानाचा फायदा आपले जातबांधवासाठी करून त्यांना अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता प्राप्त होऊ शकली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीमुळेच. त्याचप्रमाणे नुसते ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून नव्हे तर संपूर्ण मानवजातीला माणुसकीचा धर्म शिकवताना अहिंसेचे तत्वज्ञान जगाला देताना भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ते महात्मा गांधीं यांच्या अथक परिश्रमाने आणि कृतीमुळेच. जेव्हा आपण अशा महापुरुषांची चरित्रे वाचतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नेहमीच जाणवते ती म्हणजे त्यांनी कधीही विश्रांती घेतलेली दिसत नाही. अहोरात्र मेहनत करून मानवजातीला सुखी करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. या महापुरुषांनी कधीही कृती करण्याचा संकोच केला नाही. आज काही लोक स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्यांना नावे ठेवत असतात. काम न होण्याबद्दलचा दोष ते दुसऱ्याला देत असतात. तेव्हा अशा माणसांना अनेक महापुरुषांची चरित्रे वाचण्यास देऊन यश फक्त काम केल्याने मिळते हे दाखवून देण्यास मदत होईल आणि चांगल्या कृत्याची जबाबदारी ते घेऊ शकतील. म्हणूनच केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
आज आपल्याला बऱ्याच कार्यालयात अनेक माणसे काम करण्यासाठी हवी असलेली कृती करण्यासाठी चालढकल करीत असतात. असे नाही त्यांना काम माहित नसते पण ते करण्यासाठी ते तयार नसतात. त्यात त्यांचा आळशीपणा हे एक कारण असू शकते किंवा कामापेक्षा इतर गोष्टींकडे त्यांचा रस अधिक असतो. तेव्हा अशा माणसांना कामाचे महत्व समजून देऊन त्यांच्याकडून काम करून घेणे हेच उद्दिष्ट व्यवस्थापनाचे असते. कारण कुठेही कर्माशिवाय आयुष्य सुंदर होऊ शकत नाही. म्हणून समर्थांचा उपदेश समजून घेऊन आधी केलेची पाहिजे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment