Skip to main content

Swabhavala Oushadh Ahe - स्वभावाला औषध आहे?

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १५८

विषय क्रमांक : ४

विषय : स्वभावाला औषध आहे?

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

आधी होता वाघ्या |

दैव योगे झाला पाग्या ||

त्याचा येळकोट राहीना |

मूळ स्वभाव जाईना ||

आधी होती दासी |

पट्टराणी केले तिसी ||

तिचे हिंडणे राहिना |

मूळ स्वभाव जाईना ||

वरील ओळी आहेत तुकाराम महाराजांच्या अभंगातील. या अभंगानुसार त्यांना सांगायचे आहे की मनुष्य हलक्या पदावरून श्रेष्ठ पदावर गेला तरी त्याचा स्वभाव काही बदलत नाही. त्याची स्वाभाविक प्रवृत्ती मधूनच उचल खाऊन त्याचे खरे स्वरूप बाहेर येते. त्यासाठी ते म्हणतात मानव प्रथम खंडोबा देवाचा वाघ्या होता. त्यावेळेस त्याला मल्हारी मार्तंडाचा येळकोट म्हणून ओरडण्याची सवय होती. जेव्हा अशा माणसाला पागेवरचा मुख्याधिकारी म्हणजे घोडदळाचा प्रमुख केले. तेव्हा तो रणगर्जनेच्या ऐवजी येळकोट म्हणून ओरडू लागला. तेव्हा त्याची मुळवृत्ती उघडकीस आली. तसाच अर्थ दुसऱ्या ओळीचा आहे. या अभंगच्या काही ओळी आपण नेहमी आपल्या रोजच्या जीवनात मानवाचा स्वभाव एकदा बनला तर तो बदलत नसतो असे सांगण्यासाठी वापरत असतो. मग पुढे जाऊन असेही म्हणतो की स्वभावाला औषध नाही आहे. हे खरे की प्रत्येक माणसाचे स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कारण त्याच्यावर झालेले संस्कार, त्याची जडणघडण होत असताना आजूबाजूला असलेली परिस्थिती व त्यातून त्याला आलेले अनुभव. वर्षानुवर्षे घडलेला हा स्वभाव एका रात्रीत बदलता येत नसतो. म्हणून त्याचा तोच स्वभाव पुढे तसाच राहील असे सुद्धा म्हणणे चुकीचे ठरेल. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे त्याच्या स्वभावात बदल होण्याची शक्यता अधिक असते. समजा, गावाकडील एक तरुण मुलगा शिक्षणासाठी व कामानिमित्त मुंबईत आला तर त्याच्या स्वभावावर  झालेले गावातील संस्कार बाजूला होऊन त्याच्या स्वभावावर मुंबई शहराचे संस्कार होऊन स्वभाव बदलू लागतो. म्हणूनच मला वाटते स्वभावावर औषध आहे.

आजचे जग एक स्पर्धात्मक युग आहे. या जीवघेण्या स्पर्धेमुळे माणसाला काळजीने ग्रासलेले आहे. त्यामुळे अनेक मानसिक रोगाने माणसाला ग्रासले असून त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत आहे. त्यातून दमा, अल्सर, हृदयरोग, अतिरक्तदाब सारखे रोग उद्भवतात. अर्थात हे आजार फक्त मानसिक त्रास नसून इतरही वैज्ञानिक कारणे आहेत. त्यामुळे माणसाचा स्वभाव रागीट, चिडचिडा होत जातो. जर मानसिक स्थिती सुधारली तर हे रोग बरे होण्यास फारच मदत होते. यासाठी मी डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेले "स्वभावाला औषध आहे" या पुस्तकाचा उल्लेख करीन. डॉ. रमा मराठे या मनसोपचार तज्ञ डॉक्टर असून त्यांनी मानसिक दुखणी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी यावर दहा बारा पुस्तके लिहिली आहेत. त्यातील दोन पुस्तके ही खूपच वाचण्यासारखी आहेत. वरती एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्यांचे दुसरे पुस्तक आहे  मनगंगेच्या काठावरती. ही दोन्ही पुस्तके मानवी स्वभाव आपण कसे बदलू शकतो आणि त्यावर औषध कसे आहे याचे विश्लेषण त्यांनी योग्य प्रकारे केले आहे. स्वभावाला औषध आहे या पुस्तकामध्ये त्यांनी डॉ एडवर्ड बाख यांनी झाडेझुडपे, वृक्ष, आणि फुलांपासून एक फ्लॉवर रेमिडीज कशी तयार केली आणि त्या औषधांचा उपयोग विकृत मनःस्थिती व मानसिक रोग असेलेल्या व्यक्तीवर कसा उपयोग होतो याचा उल्लेख केला आहे. त्याबरोबर लेखिकेने माणसाच्या रोगी स्वभावाला निरोगी करण्यासाठी काही प्रकार सांगितले आहेत. इथे डॉक्टर सांगतात मनाचा आणि शरीराचा संबंध अतूट आहे. नकारात्मक मनःस्थिती मुळे मानसिक रोग नव्हे तर शारीरिक रोगसुद्धा उदभवतात. त्यासाठी त्या वैद्यकीय कारणे देऊन त्याची चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करतात. त्या म्हणतात माणसाचे मन त्याच्यासाठी खरा कल्पवृक्ष आहे. माणसाचे मन त्याला यश, सुख, रंजन, सृजन, संपत्ती, नवनिर्मिती तर देतेच पण त्याबरोबर दुःख, आजार, विनाश, नुकसान हे सुद्धा देत असते. यासाठी लेखिकीने डॉ एडवर्ड बाख यांनी सांगितलेल्या फ्लॉवर रीमिडीस कशा वापरायाच्या याचे छान वर्णन या पुस्तकात केले आहे. हे पुस्तक खूप माहितीपूर्ण असून प्रत्येकानी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे आहे. हे पुस्तक मानवी मन सतत निरोगी कसे राहील हे वैद्यकीय दृष्टीने सांगताना लेखिकीने मानसशात्राचा उपयोग तर केला आहे पण त्यात तत्वज्ञान आणून पुस्तक मनोरंजक केले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यावर वाटते की स्वभावाला औषध आहे.

पहिल्या परिच्छेदात तुकाराम महाराजांचा अभंग सांगताना म्हटलं होत की स्वभावाला औषध नाही तर दुसऱ्या परिच्छेदात डॉ रमा मराठे यांच्या पुस्तकाचे उदाहरण देऊन म्हटले आहे की स्वभावाला औषध आहे. मानवाचा स्वभाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यात जशी आक्रमकता असते तशी शालिनता सुद्धा असते. जेव्हा अपरिचित गोष्ट घडते तेव्हा त्याच्या स्वभावाचे अनेक पैलू नजरेस पडतात. अशावेळी माणसाच्या स्वभावातील भित्रेपणा, शिस्तबद्धता, संशयितपणा, ओजस्वीपणा आणि मानसिक स्थैर्य आपल्या नजरेस पडतात. काही माणसे तर इतकी शिस्तीची असतात की त्यांना जरा काही त्यात बदल केला तर आवडत नाही. मग ती माणसे सारख्या सूचना देऊन इतरांना हैराण करून सोडतात.  त्यामुळे ते एखाद्या कार्यक्रमाची मजा घालवून बसतात. असाच प्रकार माणसाच्या भित्रेपणात सुद्धा आढळतो. अती शिस्त मानवाला त्याच्या विकासापासून दूर ठेवते. त्याचप्रमाणे अती भित्रेपणा सुद्धा मानवाचा विकास थांबवितो. मग अशा व्यक्ती आपले मानसिक स्थैर्य हरवून बसतात आणि त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा हळवेपणा किंवा तुसडेपणा दिसून येतो. स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ते वाटेल ते करू लागतात. सतत टीका करणे, आपल्यातल्या काही लोकांनी काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे कौतुक न करणे, जर एखाद्याला त्याच्या कामामुळे बढती मिळाली तर त्याचे अभिनंदन न करता त्याची निंदा करणे अशा प्रकारे या व्यक्ती व्यक्त होऊ लागतात. यावर काही माणसे सांगतात की मानवाचा हा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळे अशा गोष्टी होतच राहणार. हे खरे आहे की माणसाचा स्वभाव हा नैसर्गिक आहे पण त्याच्या स्वभावाचे काही पैलू इतरांना त्रासदायक ठरतात तेव्हा तो माणूस कळत न कळत समाजापासून तुटला जातो आणि एकटा पडू लागतो. न कळत माणूस व्यसनाधिन होत जातो.  तेव्हा अशा माणसांकडे समाजाने आपुलकीने वागून त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यातून प्रश्न सुटून माणसाचा स्वभाव बदलू शकतो. येथे सुद्धा मला प्रामाणिकपणे वाटते की स्वभावालासुद्धा औषध नक्कीच आहे.

मानव स्वतःहूनच आपले विचार आणि वागणे एका चौकटीत बांधून घेऊ लागतो. त्या चौकटीत आपले घर, आपला समाज, आपली माणसे यात तो गुरफटून जातो. त्यापलीकडे सुद्धा काही जग आहे याचा तो विचार सुद्धा करीत नाही. मग एकवेळ अशी येते की त्या मानवाला त्या चौकटीचा कंटाळा येऊ लागतो. मग त्या चौकीटीचा बंध हळूहळू सुटू लागतो. अशावेळी नात्यातील संबंधामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. त्यातून मनावर ताण निर्माण होऊन मानव विचित्र वागू लागतो. सारख्या तक्रारी करू लागतो. इथे माणूस म्हणू लागतो की तो समाजातील सर्व व्यक्तींशी चांगले वागतो आणि त्या व्यक्तींकडून कोणतीही अपेक्षा तो ठेवत नाही. तरी सुद्धा त्याच्यावर एक प्रकारचा ताण असतो. त्यात दमायला होते, त्याचा सगळ्या गोष्टीतील उत्साह हळूहळू कमी होत जातो.  त्यातून त्याचा स्वभाव नकारात्मक होत जातो. अशा वेळेस मानवाचा स्वभाव सकारात्मक व्हायला पाहिजे. इथे परत मी डॉ. रमा मराठे यांच्या 'मनगंगेच्या काठावरती' या पुस्तकाचा उल्लेख करीन. त्यात डॉक्टर लिहितात की माणूस बऱ्याचदा स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या विचार अधिक करत जातो. आपण नेहमी कोणाला तरी सतत हवे असतो असे त्यास वाटत असते. तसे न केल्यास आपण आयुष्यात एकटे पडू असे त्यास वाटत असते. त्यामुळे एक प्रकारचा विचित्र ताण त्या माणसावर पडून तो समाजापासून दूर होऊ शकतो. अशा वेळेस डॉक्टर सांगतात की व्यक्तिमत्वावरून आपल्या तणावाची पातळी निश्चित होत असते. बुद्धीच्या व गुणांच्या विकासासाठी, सर्वजनशिलतेसाठी व तिच्या अविष्काराच्या व्यक्तीजवळ भावनिक शांतता व मानसिक स्वस्थता असावी लागते. जर व्यक्तिमत्वात महत्वाचे बदल केले तर तणावाची पातळी खूप खालावते. आपले नातेसंबंध परत एकदा इतके मजबूत करावे. त्यात कमीत कमी अपेक्षा ठेवाव्यात. कुठलीही अपेक्षा ठेवून इतरांना मदत करू नये. या वेळीस इथे एवढेच लक्षात ठेवावे की इतरांच्या अपेक्षेकडे बघताना स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. यामुळे आपला स्वभाव नकारात्मक न होता सकारात्मक होण्यास मदत होते. कारण स्वभाव हा काही आपोआप घडत नाही तर तो आपण घडवत जातो. तो बदलायला हवा. त्यासाठी स्वभावाला औषध जरूर आहे.

हल्ली माणसांच्या अयोग्य मनोभूमिकेमुळे त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे  माणसाने आपली मनःस्थिती बदलली पाहिजे.  तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी, तुमचे छंद जोपासले पाहिजे. नुसते कार्यालयीन काम करत बसणे म्हणजे स्वतःचे जीवन व्यर्थ घालवणे असेच आहे. त्यामुळे माणसाला एक प्रकारची उदासीनता येते. मग त्याचा परिणाम खाण्यावर होत जातो. या इथे मी परत एकदा डॉ. रमा मराठे यांच्या मनगंगेच्या काठावरती या पुस्तकाचा उल्लेख करीन. त्यात डॉक्टर आपणास आवर्जून सांगतात की आपली स्वतःची ओळख आपल्याशी व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपले वर्तन माणुसकीच्या दृष्टीने समजू शकेल असे हवे. असे सांगून त्या पुढे लिहितात की मनाचा आणि आहाराचा अत्यंत निकटचा संबंध आहे. प्रत्येक माणसाला समतोल आहार फार गरजेचा आहे असे सुद्धा त्या सांगतात. अज्ञानामुळे चुकीचा आहार आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडवू शकतो. त्याचा परिणाम स्वभावावर होत जातो. त्यामुळे माणूस स्वतःचा कोंडमारा करून घेतो. मग त्याला प्रेमाची व सुरक्षिततेची गरज वाटू लागते. त्याचा विकास थांबतो आणि त्याचा परिणाम आर्थिक गोष्टीवर होऊ लागतो. त्यामुळे तो सार्वजनिक जीवनातून तुटून जातो आणि स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात तो अडकून जातो. त्यासाठी त्याला स्वतःच्या आवडीच्या गोष्टीकडे नेले पाहिजे. संगीत, चित्रपट, नाटक, चित्रकला, वाचन व खेळ यामध्ये परत एकदा आनंद घेण्यास सांगितले पाहिजे. त्याला समतोल आहार मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तरच त्याचा स्वभाव सकारात्मक होईल आणि तो नवनिर्मिती करू शकेल. 

म्हणूनच स्वभावाला औषध आहे. इथे मला सांगावासे वाटते की माणसाच्या स्वभावावर सगळ्यात मोठे औषध कुठले असेल तर माणसाने स्वतःहून स्वतःचा स्वभाव बदलणे. जर आपला स्वभाव आपण बदलणार नसेल तर त्यासाठी डॉक्टरांनी कितीही मदत केली तरी काहीही उपयोग होणार नाही. आपला स्वभाव बदलणे म्हणजे स्वतःचेच आत्मपरीक्षण करणे. कारण सुखी जीवनाचा मंत्र स्वभावावर अवलंबून असतो. त्यातूनच आपल्या चांगले आणि वाईट गुणांची सांगड घालून वाईट गुण आपल्यामधून काढून टाकावे. हेच स्वभावावरील सर्वात मोठे औषध आहे.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...