Skip to main content

Niruttar Mee निरुत्तर मी

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १५६

विषय क्रमांक : ५

विषय : निरुत्तर मी

शब्दांकन : योगेश गोगवेकवर

पत्ता : माहीम, मुंबई

निरुत्तर या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीच्या प्रभावामुळे आपण अवाक झाल्यामुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याकडे शब्दाद्वारे उत्तर नसणे. याचाच अर्थ आपल्याला तात्पुरता धक्का बसला असल्यामुळे आपण काहीही बोलू शकत नाही. आजच्या या तंत्रज्ञानाच्या जगात अनेक प्रकाराने आपण निरुत्तर होत असतो. याचा अर्थ फक्त वाईट गोष्टींमुळे आपण निरुत्तर होत असतो असे नसून अनेकदा चांगल्या गोष्टींमुळे सुद्धा आपण निरुत्तर होत असतो. बऱ्याच वेळी अनेक माणसे घडलेल्या काही वाईट गोष्टींमुळे ते कसे निरुत्तर झाले किंवा होत आहेत असे सांगत असतात. त्यासाठी ते प्रत्येक दिवशी काहीतरी घडत असलेल्या एखाद दुसऱ्या घटनांचा उल्लेख करून त्याचा निषेध करण्यास आपल्याकडे कसे उत्तर नाही असे सांगत असतात. त्यामध्ये काही चूक आहे असे मला वाटत नाही. कारण आजच्या युगात मानावाने तंत्रज्ञानामध्ये आणि वैज्ञानिक पद्धतीमध्ये खूपच चांगली प्रगती केली असली तरी त्या ज्ञानाचा उपयोग माणुसकीच्या दृष्टीकोनातून न होता ते ज्ञान मानव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू लागला तर सर्व समाज निरुत्तर होत राहील यात शंका नाही. याचे उत्तम उदाहरण आहे या दशकातील सोशल मीडिया. यावर येणारी माहिती वाचली तर अवाक व्हायला होते आणि आपण निरुत्तर होतो. त्या चुकीच्या माहितीवर आपण काय प्रतिक्रिया द्यावी हे सुद्धा सुचत नाही. जर प्रयत्न केला तर समोरच्या व्यक्तीकडून येणारी प्रतिक्रिया पहिली तर आपण पूर्णपणे निरुत्तर होत जातो. कारण त्यांना सत्य आणि त्यावर आधारित असलेल्या सत्य कथा यांच्यातील फरक समजत नसतो. सोशल मीडियावर मिळालेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे याचे विवेचन करत असताना त्यांचा कोणताही अभ्यास नसतो आणि चुकीचे तर्क लावून ते आपल्याला ती गोष्ट समजावून सांगतात तेव्हा माझ्यासारख्या कडे उत्तर द्यायला कोणतेही शब्द नसतात. मला असे वाटते की निरुत्तर होणे ही एक तात्पुरती घटना असते. त्या घटनांचा असर कमी झाला की आपण आपली प्रतिक्रिया व्यवस्थित मांडू लागतो. इथे मला इंग्रजीत लिहिलेले एक वाक्य आठवते. ते वाक्य असे आहे, " Sometimes overwhelmed by emotions can leave you speechless but even then it is important to identify the correct emotion".  खरोखरच या वाक्यात सत्यता आहे याची जाणीव होते. म्हणून मी जरी तात्पुरता गप्प झालो असलो तरी माझ्या लेखणीतून उत्तर देण्यासाठी शब्द तयार असतात.

आज सोशल मीडिया सारख्या माध्यमातून चुकीची माहिती सांगितली जाते आणि ती आंधळेपणाने आपण त्या माहितीचा स्वीकार करीत आहोत. कोणतीही माहिती सत्याच्या आधारावर आहे का नाही किंवा त्यामागे कोणताही पुरावा आहे की नाही हे सुद्धा आपण तपासून पाहत नाही. कुठल्याही व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीची दिलेली माहिती बरोबर आहे का? हे सुद्धा आपणास माहित नसते. याचे उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलेल्या काही राष्ट्रीय नेत्यांचे. अशा नेत्यांचे व्यवस्थित मूल्यमापन करून त्यांच्याबद्दल बरोबर माहिती न देता खोटी आणि चुकीची माहिती दिलेली वाचली की आपण काय बोलावे हेच कळत नाही. इथे मला महाराष्ट्रातील इतिहासकार  त्र्यंबक शंकर शेजवलकर यांची आठवण येते. आंधळेपणाने कुणालाही शरण जावे यांची त्यांना फार चीड होती. मराठ्यांच्या इतिहासात स्वतःला जन्मभर गाडून घेऊन नंतर  त्यावर लिहिताना त्यांनी कोणतीही खोटी स्तुती केलेली आढळत नाही आणि आपली मते फटकळपणे मांडून आमच्या सारख्या इतिहासप्रेमीवर खूप उपकार केले आहेत. जेव्हा मी त्यांची पुस्तके वाचतो तेव्हा मी पूर्णपणे निरुत्तर होत असतो. याच पद्धतीने मी नरहर कुरुंदकरांकडे सुद्धा पाहतो. आजच्या काळात मला त्यांची गरज फारच वाटते आहे. मी कुरुंदकरांना काही पाहिले नाही किंवा त्यांना ऐकलेसुद्धा नाही. ते मला भेटतात ते त्यांच्या लिखाणातून. आज कुरुंकारांना जाऊन जवळजवळ ४० वर्षे झाली तरी सुद्धा त्यांचे लेखन आजच्या पिढीलासुद्धा उपयोगी आहे असे वाटत राहते. त्यांच्या लिखाणांचे विषय असंख्य व प्रचंड आहेत. त्यात राजकारण आहे, सामाजिक प्रश्न आहेत, इतिहास आहे, साहित्य आहे, नाट्यशास्त्र आहे, हिंदु-मुस्लिम प्रश्न आहे, संगीत आहे, भारतीय परंपरा आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यांनी काही पुस्तकांवर लिहिलेले लेख वाचले की आपल्याला या विषयांवर आकलन होण्यास वेळ लागत नाही. कोणत्याही व्यक्तीविषयी लिखाण करताना कुरुंदकर त्या व्यक्तीचा पूर्णपणे अभ्यास करतात आणि अभ्यास करताना ते स्वतःसमोर काही प्रश्न उभे करतात. मग त्यांच्या अनुषंगाने त्या व्यक्तींचे मूल्यमापन करतात. त्या व्यक्तींचे कर्तृत्व समजून घेताना त्यांच्या आयुष्यातील रोमांचीत घटनांचा मोह टाळला पाहिजे असे ते सांगतात. या संदर्भात शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वरील लिखाण वैशिष्टपूर्ण आहे. म्हणूनच जागर, शिवरात्री, आकलन, अभयारण्य, यात्रा, छायाप्रकाश, अभंग, अन्वय, मागोवा सारखी पुस्तके वाचताना आपण निरुत्तर तर होतो. कुठल्याही काळातील समाजाकडे डोळसपणे पाहणारा लेखक असेच त्यांच्याबद्दल म्हणावे लागेल. कोणत्याही लेखकाचे लिखाण वाचताना आपण कसे निरुत्तर होतो हे सांगताना मी दोन लेखकांची उदाहरण दिली आहेत. तरीसुद्धा मला असे वाटते की जर मी एखादी गोष्ट वाचून निरुत्तर होतो म्हणजे मी माझ्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देतो असे नाही. मी माझा अभ्यास वेगळ्या प्रकारे चालूच ठेवतो. म्हणूनच येथे मी  नरहर कुरुंदकर यांच्या एका लेखातील काही वाक्ये देत आहे. एका लेखात ते म्हणतात, " उपेक्षा, आक्रस्ताळीपणा, उपहास, याने मी मरणार नाही. माझे मरण मला निरुत्तर करणाऱ्या खंडनात आहे. जे मला पुरावा व तर्क यांनी खोडून काढता येत नाही, ते मी हट्ट न करता निमूटपणे स्वीकारतो. म्हणूनच कोणी मला निरुत्तर करणारे  खंडन केले की, मी माझी मते सोडून त्यांची मते स्वीकारीन ते माझे खरे मरण आहे. त्या मरणाची मला भीती आहे व मरणाचे आकर्षणही आहे. तेव्हा मी नामशेष होईन किंवा कृतार्थ होईन".

निरुत्तर होण्याचे प्रकार माझ्या बाबतीत अनेकदा झाले आहे. काही बाबतीत निरुत्तर होणे मला फार आवडते. इथे मी संगीताचे उदाहरण देईन. मला संगीत खूप आवडते. सुरांमध्ये हरवून जाताना जे सुख मला मिळते ते मी शब्दात सांगू शकत नाही आणि तिथे मी निरुत्तर होत असतो. अनेक गायकांनी, संगीतकारांनी आणि वादकांनी संगीत क्षेत्रात अशी काही कामगिरी केली आहे त्याबद्दल बोलण्यासाठी काही शब्दच असत नाही. जेव्हा आपण एखाद्या गायकाचे किंवा गायिकीचे गाणे ऐकतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्या गायकाचे किंवा त्या गायिकीचे त्या गाण्यावर असलेले प्रेम. अशी माणसे आपली गायकी सादर करीत असताना फक्त गाण्यासाठी गातात. त्यांना आपण कुठल्या घराण्याचे पाईक आहोत हे सांगण्याची गरज वाटत नाही. त्यांना सूर-तालांमध्येच काहीतरी करून दाखवायचे असते. ते गात असताना त्यांचे गाणेपण इतके जाणवते की ते शब्दात मांडणे खूप कठीण होत जाते. अशापैकी एक गायिका होती की तिने गाताना कधी मुश्किल रचनेचा आव आणला नाही आणि  तिच्या सुरांवर  कुठलाही संगीतप्रेमी सहजपणे प्रेम करू  लागतो. मग ती दादरा गावो किंवा ठुमरी किंवा गझल. ती गायिका म्हणजे मल्लिका-ए-गझल बेगम अख्तर. अख्तरी बाई फैजाबादी हे त्यांचे मूळ नाव. त्यांना मी प्रत्यक्षात कधीच पाहू शकलो नाही किंवा ऐकलेही नाही. पण त्यांचे  स्वर ऐकायला मिळाले ते रेडिओच्या माध्यमातून किंवा  कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग केलेल्या गाण्यांमधून. त्यांच्या गाण्याची मला पहिली ओळख झाली ती १९८० च्या दशकात  कॉलेजमध्ये असताना. एकदा आकाशवाणीवर त्यांची, "मेरा अज्म इतना बुलंद है की पराये शोलों का डर नहीमुझे खोंफ आतिश ए गुल से चमन को जला ना दे"  ही शकील बदायुनीने लिहिलेली गझल बेगम अख्तरने गायली होती. ती गझल ऐकताना न कळतच मी खूप भारावून गेलो. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक गाण्याची मजा घेत गेलो. त्यांच्या आवाजाने माझ्या हृदयाच्या तारा कधी छेडल्या गेल्या हे कळलेच नाही. अजूनही मी त्यांच्या  भैरवी रागातील शकील बदायुनीने लिहिलेली गझल , "ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने आज क्यू तेरे नाम पे रोना आया " ऐकतो तेव्हा असे वाटते की किती छानपणे त्यांनी आपल्या वेदनादायक आवाजाने आणि सुरांनी ती गझल स्वतःचीच बनवली आणि ती गझल खूप  उंचीवर नेऊन ठेवली की ती गझल लिहिणारे सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी गायलेली दिवाना बनाना हैं, दिवाना बना दे, कोयलिया मत कर पुकार, छा रही धरा, जिया मोरा लहराया हैंसुना करो मेरी जानइनमे उनसे अफसाने सब अजनबी है यहा, किसको कौन पहचाने, ऐकली की खूप भारावून जायला होते आणि त्यांची गायकी ऐकताना निरुत्तर व्हायला होते. सुप्रसिद्ध मराठी लेखक आणि संगीततज्ञ पु. ल. देशपांडे बेगम अख्तर यांच्या गायकी बद्दल सांगताना लिहितात, " बेगम अख्तरचे शब्द अलगद झुलत्या डहाळीवर येऊन बसणाऱ्या पाखरांसारखे मुक्काम गाठताहेत. पाखरांइतकेच मुग्ध अनपेक्षित सुरकांडी मारणारे, तसे तप्तरही आणि मोहकता पीसभर सुटू न देणारे, किती बेताचा व्याप, किती अटकर, भरारी इतकेच विसावणेही आल्हाददायक. त्या सुरांना उबही अशीच ". किती सुंदर वर्णन केले आहे पु. ल. देशपांडेनी आणि बेगम अख्तर यांच्या बाबतीत हे खरे सुद्धा आहे. इथे मी निरुत्तर होणे पसंद करीन.

भारत स्वातंत्र्य झाला आणि भारताला घडविताना राजकीय क्षेत्राप्रमाणे इतर क्षेत्रातील लोकांची कामगिरी पाहताना मी बऱ्याच वेळा निरुत्तर झालो आहे. विज्ञान क्षेत्रामध्ये विक्रम साराभाई, प्रशांत महाबोलोनीस, सतीश धवन, डॉ होमी भाभा, एम. एस. स्वामिनाथन, डॉ अनिल काकोडकर, ए पि जे अब्दुल कलाम यांनी केलेली कामगिरी पाहिली तर आपण निरुत्तर होत असतो. अनेक वेळेस रंगलेला क्रिकेटचा सामना बघतानासुद्धा मी  भारावून गेलो आहे आणि निरुत्तर सुद्धा झालो आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकरची १९९८ साली शारजामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली फलंदाजी. ती त्याची खेळी इतकी अप्रतिम होती की त्यावेळी त्याचे वर्णन करायला शब्द नव्हते. असे अनेक क्रिकेटच्या खेळी मी पहिल्या आहेत आणि त्यांचे वर्णन शब्दात होणे कठीण असते.  त्याचप्रमाणे सिनेकालावंत किंवा नाट्यकलावंत यांचे अभिनय सुद्धा आपल्याला निरुत्तर करून टाकतात. आनंद मधील राजेश खन्ना, दिवार मधील अमिताभ बच्चन, इक्बाल मधील नासिरउद्दीन शाह अशा अनेक जणांचे अभिनयाचे पैलू मला खूप आनंद देऊन गेले आहेत. ते व्यक्त करताना शब्द कमी पडत असतात. तेव्हा आपण खरोखरच निरुत्तर होत असतो.

मी नेहमी अनेक लोकांची तक्रार ऐकत असतो की आजच्या पिढीला काही गोष्टी माहिती नसतात. त्यांना अनेक क्रांतिवीर माहित नसतात किंवा कुठलाही इतिहास माहित नसतो. त्यांना फक्त सिनेमातील गोष्टी माहित असतात. त्यामुळे आपण निरुत्तर होत असतो असे ते म्हणत असतात. जर आपण बारकाईने बघितले तर आपल्याला आजच्या पिढीमध्ये माहिती असलेले अनेक तरुण विद्यार्थी दिसतील. त्यांच्याकडे असलेला माहितीचा खजिना पाहिल्यावर थक्क व्हायला होते. काही विद्यार्थी विज्ञान क्षेत्रातील असले तरी त्यांना इतिहास, खेळ किंवा गाण्याची, चित्रपटांची चांगली माहिती असते.  त्यांच्याकडे असलेला ज्ञानाचा वापर करून ते नवनिर्मिती करतात तेव्हा थक्क व्हायला होते. एखादी व्यक्ती क्रिकेट खेळते  किंवा सिनेसृष्टीमध्ये काम करते म्हणून त्यांच्याकडे काही माहिती नसते किंवा ते कमी दर्जाचे असते असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. नाहीतर गुरुदत्त, राज कपूर, श्याम बेनेगल, सत्यजित रे सारखी माणसे चित्रपटाची निर्मिती करूच शकली नसती. अशा लोकांनी केलेली निर्मिती सुद्धा आपणांस निरुत्तर करून टाकते. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की माणूस केवळ वाईट गोष्टीमुळे निरुत्तर होत नसतो तर चांगल्या गोष्टीनी सुद्धा निरुत्तर होत असतो. मला खेळ, अभिनय आणि गायन कलेमध्ये कोणी निरुत्तर केले तरी चालेल पण लेखन, इतिहास व व्यक्ती विश्लेषण मध्ये मी मिळालेल्या पुराव्या वरूनच माझे निष्कर्ष काढीन. या बाबतीत काही वेळेपुरता  निरुत्तर झालो असलो तरी पूर्णवेळ निरुत्तर राहणार नाही.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...