Skip to main content

Kalakarachi Kalakari-कलाकाराची कलाकारी

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १५५
विषय क्रमांक: ४
विषय : कलाकाराची कलाकारी
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम मुंबई

१३ फेब्रुवारी २०१६ रोजी मुंबईतल्या बॉम्बे आर्ट सोसायटीत कलाकार आणि कलाकृती या संबधी भाषण करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की कलेची आपली स्वतःची एक ताकद असते, कलेचा आपला एक संदेश असतो, कलेमध्ये इतिहासाची सफर असते, कला संवेदनांची अभिव्यक्ती असते. त्यामुळे कला अनेक शतकापर्यंत अबाधित राहते. असे सांगून पंतप्रधानानी भारतातील मंदिरांचा उल्लेख करून मंदिर स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये सांगितली. पंतप्रधान सांगतात की मंदिरात ईश्वराचे स्थान आहे तिथे अनिवार्यपणे कलेचे स्थान आपल्याला दिसेल. तिथे आपल्याला एक नृत्यमंडप दिसेल. प्रत्येक मंदिरात आपल्याला इतिहास आणि परंपरेला उजाळा देणाऱ्या कलाकृती दिसतील. आपल्या सांस्कृतिक जीवनात कलेचे किती महत्वाचे स्थान आहे याची जाणीव होत राहते. प्रत्येक कलाकार आपली कलाकृती वेगवेगळ्या स्वरूपात विकसित करित असतो. त्यामुळे कलेला कोणतीही मर्यादा असता कामा नये. त्याच्यावर कोणतेही बंधन असता कामा नये. जेव्हा एखादा कलाकार पाषाण तासत असतो तेव्हा तो त्या दगडातून एक मूर्ती घडवत असतो. असे सांगून ते पुढे म्हणतात, " बालकाच्या अंर्तमनाची विकास यात्रा त्या केवळ पाठ केलेल्या शब्दात नव्हे तर त्यांच्या अंतर्मनातून निघालेल्या अभिव्यक्तीतून म्हणजे त्याने त्या कागदावर जे काही रेखाटले आहे, त्यात आहे. म्हणूनच व्यक्तिमत्त्वासाठी कला अनिवार्य असते". असे सांगून त्यांनी कलाकार आणि कलाकारीचे महत्व सांगितले आहे. खरंच  कलाकार आणि त्याची कलाकारी हे नुसते सुंदर शब्द नसून या दोन्ही शब्दांमध्ये एक छानसे नातेसुद्धा असल्याचे आपल्याला जाणवत असते. कारण प्रत्येक कलाकार स्वतःच्या प्रतिभेनुसार आपली कलाकारी अशी काय घडवत असतो तेव्हा सारखे वाटत राहते की कला आणि कलाकार यांचे मनोमिलन झाले आहे. मग ती कला चित्रकला असो वा लेखनकला, गायन असो वा नृत्य, वादन असो वा शिल्पकला, चित्रपट निर्मिती असो किंवा नाट्य निर्मिती. अशा सर्व कलांमध्ये कलाकार आपल्या कलेबरोबर एक मुक्त संवाद करीत असतो आणि त्यातून त्याची कलाकारी उत्तम होत असते.

कलेचे ज्ञान असणाऱ्याला आणि त्या कलेचे सादरीकरण उत्तम पद्धतीने करणाऱ्याला आपण कलाकार म्हणतो तर कलाकारी म्हणजे कलाकारने केलेली उत्तम कलाकृती. प्रत्येक कलाकाराला त्याच्या समोर बऱ्याच गोष्टी दिसत असतात. त्या गोष्टीतील भाव तो इतक्या सहजपणे आपल्या कलाकृतीत आणत असतो. मग तो लेखक, कवी, चित्रकार, नट, शिल्पकार यांच्यापैकी कोणीही असो. जेव्हा ते भाव शब्दांमध्ये रूपांतरित होतात तेव्हा एक प्रकारचा गोफ विणला जातो आणि अप्रतिम वीण घातली जाते. अशा वेळीस लेखक आपल्या लेखाद्वारे, कवी आपल्या कविताद्वारे, चित्रकार आपल्या रंगाच्या माध्यमातून आणि नट आपल्या नाटकातून किंवा चित्रपटातून हे भाव सर्व समाजापुढे सादर करताना उत्तम अशी अजरामर कलाकृतीची निर्मिती करतात. अशी कलाकारी करत असताना प्रत्येक कलाकाराने त्या कलेशी स्वतःला पूर्णपणे स्वाधीन केलेले असते. इथे कलाकार इतर लोकांच्या जीवनातील कटु, गोड किंवा काल्पनिक घटनांमधून आपले काम करीत असतो. तो स्वतः त्या निर्मितीच्या मागे असतो. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास चित्रपट दिग्दर्शकाचे द्यावे लागेल. स्वतः अनुभवलेल्या जगातील कटु, गोड अनुभव आपल्या कॅमेरामध्ये समाविष्ट करून  चित्रपट दिग्दर्शक एक नवी निर्मिती जगापुढे ठेवत असतो. इथे दिग्दर्शक जीवनपद्धती आणि कला यांचा परस्पर संबंध शोधत असतो आणि हा संबंध शोधत असताना तो त्याच्या दैनंदिन जीवनापासून दूर जात असतो. ही कला त्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. तिथे सगळे विश्व निराळे असते, त्यांचे नियम वेगळे असतात. काही कालानंतर आपण जेव्हा आपल्या नित्याच्या जगात परत येतो, तेव्हा ह्या कलाविश्वाच्या अनुभवाने आपल्यात बदल केलेले असतात. त्याचे मोजमापन करणे कठीण असते. कलाकृती जितकी श्रेष्ठ असते तितकीच त्या बदलांची व्याप्ती वाढत असते. हे बदल आत्मसात करून, आयुष्यात परत आणि नव्याने सामोरे जाणे हाच कलाकृतीचा सन्मान असतो.

कलाकार, त्याची कलाकारी आणि समाजातील प्रगल्भता यामध्ये एक पक्के नाते असते. कोणताही समाज हा आर्थिक दृष्ट्या प्रगत झाला म्हणून तो प्रगल्भ होत नाही. त्यासाठी समाजामध्ये नवीन गोष्टी निर्माण कराव्या लागतात, नवे शोध लावावे लागतात, नवीन प्रक्रिया निर्माण कराव्या लागतात. यासाठी कलाकृतीचा विस्तार होणे जरुरीचे असते. त्यासाठी  विश्लेषणात्मक पद्धतीचा उपयोग व्हायला पाहिजे. म्हणजे एखादे पुस्तक लिहून संपले म्हणजे विषय संपला असे मानू नये. कारण तो विषय वेगळ्या संदर्भात पुन्हा येण्याची शक्यता असते. जर विश्लेषण सरळमार्गी स्वतःच्या सोयी करिता केले असेल तर ते लवकरच विस्मृतीत जाण्याची शक्यता असते. जेव्हा कलाकार एखादी निर्मिती करतो तेव्हा त्याचे पाऊल एका नियमबद्ध चालीतलेच एक पुढचे पाऊल नसते, तर त्याने अंतराळात घेतलेली एक उडी असते. त्यासाठी बुद्धीचे व  शरीराचे भान ह्यांची  गरज असते आणि कल्पनाशक्ती फारच तरल असावी लागते. कारण अशा उडीनंतर परत जमिनीवर येताना त्या कलाकाराची जमीन बदलेली असते. सुंदर कलाकृती काही बौद्धिक प्रमेयातून निर्माण होत नाही. तसे प्रयत्न केल्यास त्याचा फक्त सांगाडा तयार होईल. सुंदर कलाकृतीत विसंगती, असंगती, विपरीतता, विजोडपणा, विसंवाद, वैधर्म्य हे सारे असतात. त्यातूनच तिला एक जैविक एकात्मता येते. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार गुरुदत्त यांचे देता येईल. त्यांनी अनेक चित्रपट बनवले पण ते अजरामर झाले ते त्यांच्या तीन चित्रपटामुळे कारण त्यात मी वर म्हटल्याप्रमाणे विसंगती, असंगती, विजोडपणा वगैरे सर्व गोष्टी होत्या. ते तीन चित्रपट आहेत, प्यासा, कागज के फुल आणि साहिब बीबी और गुलाम. या तिन्ही चित्रपटात दिग्दर्शक गुरुदत्तमध्ये असलेला आत्मरक्षण आणि आत्मनाश या प्रेरणांचा सुसंवाद प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहचला गेला.

प्रत्येक कला नुसती शिकून येत नसते तर कलाकार त्याला मिळालेल्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन नावीन्य आणि प्रयोगशीलता आणण्याचा प्रयत्न करतात. इथे कले बरोबर मानसिक बदलसुद्धा विशेष करून बघितला जातो. प्रत्येक कलाकार आपल्या अभ्यासातून आणि अनुभवातून एका नवीन कलेची स्थापना करत असतो. याचा अनुभव गायन व नृत्य प्रकारात ठळकपणे जाणवत असतो. वर म्हटल्या प्रमाणे कुठलाही कलाकार नियमबद्ध चालीत आपले पुढचे पाऊल टाकूच शकत नाही तर त्याही पलीकडे जाऊन नवीन निर्मिती निर्माण करण्यासाठी तो तयार झालेला असतो. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचे उदाहरण इथे लागू पडेल. त्यांनी आपली स्वतःची गायकी तयार केली. त्यांनी घराण्याच्या नियमानुसार बंदिस्त झालेले राग बाहेर काढून शास्त्रीय संगीतात एकप्रकारे बंड केले आणि त्यातून अनेक नवीन रागांची निर्मिती केली. ते म्हणत की काही गायक फक्त एकच भाव घेऊन गाणे गात असत. समजा एका मोठया गायकाने फक्त कारुण्य उचलले कारण त्या गायकांच्या आवाजात फक्त कारुण्य होते तर तो फक्त कारुण्य भावच प्रकट करू शकेल. पण इतरही भाव आहेत त्यांचे काय?  असा प्रश्न करून ते सांगतात, " रागांचे स्वभाव, बंदिशिना अभिप्रेत असलेला रस अगर भाव यातून उमटणारा आकृतिबंध जर श्रोत्यांच्या नजरेसमोर उभा करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे, भिन्न-भिन्न  रुंदीचे, हरेक भावाला साजेसे आवाजाचे लगाव कंठातून उमटायला हवेत. कधी स्वाभाविक, कधी नाजूक, त्यापेक्षा हळुवार, तरल, त्यापेक्षाही सूक्ष्म आणि याउलट प्रमाणात मोठा, आणखी मोठा, मोठ्यातला मोठा असे आवाज काढता आल्याशिवाय निराळे भाव आणि त्यांच्या छटा कशा दाखवता येणार? म्हणूनच मी रागाचा भाव आणि बदलता काळ-संगीत परिवर्तनशीलआहे असे मानले आहे. या अनुषंगाने गात असतो. गाताना अधून मधून विराम देत असतो. त्यावेळी माझे सुरात लागलेले तानपुरे मी गायलेल्या स्वरावलिंची साथ करीत असतात. जसे चित्रकलेमध्ये स्पेस दिली जाते तसे माझे विराम असतात".  म्हणूनच शास्त्रीय संगीतातील त्यांची निर्मिती अप्रतिम तर आहे पण अंतराळात झेप घेणारी आहे. असे प्रकार अनेक लेखक, कवी, वादक शिल्पकार यांनी सुद्धा केले आहे.म्हणूनच प्रत्येक कलाकार हा नव निर्माता असतो आणि सर्व समाजाला आनंद देत तो त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांना प्रेरणा देत असतो.

कलाकार आपल्या कलाकारितून सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याची कलाकारी हे वैश्विक भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. सामाजिक बदल घडवून आणण्याची ताकद फक्त कलाकारच करू शकतात. आपल्या कलेद्वारे ते सर्व समाजाला जागतिक स्तरावर एकत्र येण्यास तयार करतात आणि माणसांचा इतिहास नोंदवून जपून ठेवतात. कलाकार आपल्या कलाकारितून आशेचा संदेश देत असतात आणि नैसर्गिक जगाचे राजदूत बनून सर्व समाजात एकत्रपणाची भावना निर्माण करतात. कलाकाराची कलाकारी ही एक कलेची निर्मिती असते  यासाठी उदाहरण सांगिताचे द्यावे लागेल. कारण संगीतकारांनी संगीत निर्माण करताना मानवी भावना व्यक्त केलेल्या असतात म्हणूनच असे म्हटले जाते की संगीत मानवी गुणांच्या ध्वनी आणि शांततेचे मिश्रण आहे. प्रतिभावान कलावंत हा आपल्या समाजाच्या उदरात घडणाऱ्या हालचालींची सोनोग्राफ मांडत असतो. त्यात उद्याचे चित्र असते आणि कलाकारांचे ध्वनीत्मक स्वातंत्र्य असते. मग कला कुठलीही असो जेव्हा कलाकार त्यामध्ये स्वतःला समर्पित  करतो तेव्हा ती कलाकारी उत्कृष्ट दर्जा प्राप्त करते.

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...