रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक :
१५४
विषय क्रमांक : ४
विषय: हरवलेले बालपण
आणि भरकटलेली तरुणाई
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा
मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बर्वे
जन
व्हावे लहानहुनी
लहान..
वरील अभंग आहे
तुकाराम महाराजांचा. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांनी स्वतःच
स्वरबद्ध करून गायलेला हा अभंग ऐकताना मी न कळत माझ्या बालपणीच्या गोष्टींमध्ये हरवून जातो आणि
परत एकदा लहान व्हावे असे वाटत जाते. लहानपणी केलेली मस्ती, केलेल्या खोड्या, त्यातून घडलेल्या गमती जमती व त्यासाठी
खावा लागलेला मार या सर्व गोष्टी आठवल्यावर वाटत राहते की बालपणाचा काळ किती
सुखाचा होता. मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असताना केलेली मजा, पोहण्यासाठी जायचे आणि पोहण्याऐवजी
केलेल्या इतर करामती, शाळेत मिळालेले
मित्र व त्यांच्या बरोबरीने घातलेला गोंधळ, दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली मौज, गोटया, भोवरे, विटीदांडू, लगोरी, लपंडाव सारखे खेळलेले खेळ, पतंग उडवण्यातून मिळालेला आनंद आणि हे सर्व खेळत असतांना
होणारा गोंगाट. मग वयस्कर माणसांचे ते जोरात ओरडून सांगणे, "किती गोंधळ घालतात मुलांनो, जरा बसून खेळा ". हे सर्व आठवले की
असे वाटते की किती सुंदर होते बालपण. कारण लहानपणी आम्ही सगळे मित्र एकत्र मिळून
खायचो, मन तृप्त
होईपर्यंत खेळायचो. संघ्याकाळी देवाकडे दिवा लावण्याच्या आत घरी यायचो. मग हातपाय
धुवून देवाला नमस्कार करून अभ्यास करायचो. जेवण झाल्यावर वाचन करीत झोपून जायचो.
आम्ही अशा वातावरणात वाढलो की घरामध्ये असलेल्या सर्व मोठया व्यक्तींच्या
सहवासातून प्रेम मिळाले, आपलेपणा मिळाला.
त्यात आईवडील बहीण भाऊ तर होतेच पण त्याचबरोबर आजी आजोबा होते, काका काकू होते, मामामामी होते, मावशी होती, आत्या होती. म्हणूनच आपण बालपणाच्या आठवणीत रमून जातो. तेव्हा तुकाराम
महाराजांच्या अभंगातील एक रचना आठवते. त्यात ते म्हणतात, "तुका म्हणे बर्वे जन, व्हावे लहानहुनी लहान".
मग प्रश्न पडतो ते आजच्या पिढीलासुद्धा असे बालपण मिळत असेल का? जेव्हा आपण सगळीकडे नजर फिरवितो तेव्हा एक गोष्ट जाणवते ती म्हणजे आजच्या स्पर्धात्मक जगात मुलांचं बालपण नुसते हरवलेले नसून ते पार कुठेतरी दूर निघून गेले आहे. आजच्या पिढीचे पालक स्वतःची प्रतिभा समाजात मोठी करण्यासाठी इतके पैशाच्या पाठीमागे लागले आहेत की पैसा असला तर आपण मुलांना वाटेल ते देऊ शकतो अशी त्यांची भावना झालेली असते. घरात त्यांना बघण्यासाठी कोणीही नाही म्हणून त्यांना वेगवेगळ्या शिकवणीला पाठवणे, बराच काळ शाळेमधील कार्यक्रमात गुंतून ठेऊन मुलांना दिवसभर शाळेत डांबवून ठेवणे आणि वेळ मिळाल्यास त्यांना चित्रकला, नृत्य किंवा गाण्याचे शिक्षण घेण्यासाठी क्लासला पाठवणे, मुलांना ढीगभर अभ्यास देऊन इतर चांगल्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवणे असे काही प्रकार पाहिल्यावर मन सुन्न होते. आज काही पालक आपल्या मुलांना खेळायला सुद्धा पाठवत नाही. मग मुलांना घराबाहेर जायला मिळत नसल्यामुळे ही मुले सतत टीव्ही समोर बसून राहतात. खेळामुळे मिळणारा आनंद ते हरवून बसतात. काही पालकांना खेळ खेळणे म्हणजे फालतू गोष्ट वाटत असते. खेळ खेळल्याने मुलांचा वेळ खूपच वाया जातो व मुले त्यामुळे बिघडतात असा त्यांचा चुकीचा समज असतो. आज किती मुली घरामध्ये भातुकलीचा खेळ खेळतांना दिसतात? काही पालकांना हा खेळ त्यांच्या मुलींनी खेळलेला आवडत नाही. हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे. माझ्या एका मित्राने हा खेळ खेळण्यास आपल्या मुलीला बंदी घातली. तेव्हा मी त्यास सांगितले की लहान मुलांना जेव्हा समजू लागतं तेव्हा त्यांना प्रथम आपलं छोटंसं घर दिसत. मग त्याचे अनुकरण मुली या खेळात करीत असतात. या खेळामुळे त्यांना घर आणि त्या घरातल्या कुटुंबातील नाती समजू लागतात. यावर माझ्या मित्राने मला सांगितले की असा खेळ आजच्या काळात उपयोगी नसून त्यांना स्पर्धात्मक जगात उभे राहण्यासाठी संगणकाची माहिती होणे फार जरुरीचे आहे. असे ऐकल्यावर मी काय बोलणार? संगणक शिकण्यासाठी माझा विरोध नाही पण त्यासाठी मुलांना खेळू न देणे हे काही मनास पटत नाही.
जर मुलं आज खेळ खेळली नाही तर त्यांच्यात एकत्र काम करण्याची इच्छा कशी असेल? याचे उत्तर शोधत असताना मला एरिका ख्रिस्टाकीस (Erika Christakis) यांनी लिहिलेले Importance Of Being Little : What Young Children Really Need From Grownups हे पुस्तक हाती पडले. त्यात लेखिका म्हणते की सर्व समाजाने लहान मुलांसाठी एक धोकादायक पातळी तयार केली आहे. आजचा समाज लहान मुलांना एक प्रकारची वस्तू समजतो आणि त्यांचे बालपण त्यांच्यापासून दूर करतो आहे. प्रत्येक पालक आणि शिक्षक त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादत असल्याचे दिसून येत आहे. असे सांगून लेखिका पुढे लिहितात की अशा गोष्टी पालकांनी आणि शिक्षकांनी ताबडतोब थांबविल्या पाहिजेत. आपल्या दृष्टीकोनात बदल करून लहान मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहिले पाहिजे. त्यामुळे लहान मुलांची अद्वितीय क्षमता अधिक चांगली होण्यास मदत होईल. मुलांना प्रौढ बनविण्याच्या वृतीला विरोध केला पाहिजे. आईवडिलांनी आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करताना त्यांना गुंतवणूकीची एक वस्तू म्हणून न पाहता आपल्या मुलांच्या इच्छा आणि गरजा लक्षात घेऊन त्यांचे बालपण सुरक्षित बनविले पाहिजे. आज जगात तंत्रज्ञानाचा खूप वापर केला जातो पण तंत्रज्ञान नेहमीच मुलांचे मित्र नसतात. म्हणून लेखिका आपल्या पुस्तकाला दिलेल्या नावाची सुरुवात, "The Importance Of Being Little" अशाप्रकारे करतात. लहान असणे फार महत्वाचे आहे असे लिहून त्या पुढे म्हणतात, " Being little is critical importance because we see the signature of early childhood experience literally in people's bodies: their life expectancies are longer and their social-emotional capabilities are more robust when they have chance to learn through play and through deep relationships and when their developing brains are given chance to grow in a nurturing, language-rich and relatively unhurried environment. It is clearer than even before that young children are not simply mini-adults". लेखकीने किती छानपणे आपले विचार मांडताना खेळ आणि नाते यांचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे हे पुस्तक फक्त तत्वज्ञान शिकणाऱ्यांसाठी नसून प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी वाचणे जरुरीचे आहे. मुलांना नुसते अभ्यासाचे दडपण न देता त्यांना खेळ खेळाला दिले पाहिजे. त्यांच्या नजरेतून जग पहिले पाहिजे. त्यांचे बालपण सुखद झाले पाहिजे. जर पालकांनी आणि शिक्षकांनी असे काही केले नाही तर ही मुले मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांना शिक्षकांना प्रश्न विचारतील, " तुम्ही आमचे बालपण का खराब केले?.
जसा प्रश्न हरविलेल्या बालपणाच्या आहेत तसेच प्रश्न भरकटलेल्या तरुणांचा सुद्धा आहे. जेव्हा बालपण संपवून मुले तारुण्यात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सळसळतं चैतन्य दिसायला पाहिजे, त्यांच्यात ध्येयनिश्चिती करून गगनभरारी झेप घेण्याचे वेड असायला पाहिजे, एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण करण्याची क्षमता दिसली पाहिजे किंवा जगण्यासाठी आपली संकुचित जाणीव सोडून आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याची जाणीव असायला पाहिजे. असे अनेक तरुण आपण वेगवेगळ्या क्षेत्रात पाहिले आहेत आणि पाहत आहोत. त्यात विक्रम साराभाई, सतीश धवन, दादासाहेब फाळके, होमी भाभा यांच्या सारखे वैज्ञानिक आहेत आणि सचिन तेंडुलकर, कपिल देव, धोनी सारखे खेळाडू आहेत, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार गंधर्व, संजीव अभ्यंकर सारखे गायक आहेत. अश्या माणसांनी तरुण वयात मेहनत करून आपल्या आयुष्यात खूपच उंचीचा पल्ला गाठला आहे. त्यांनी आपल्या कार्यात केलेल्या अतुलनीय कार्यामुळे भारताची मान जगात खूपच उंचावली गेली आहे. हल्ली या गोष्टी आपणास दिसत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. आजचे तरुण आपल्याला टवटवीत चेहेऱ्याने दिसत नाही आणि दिसतात ती आत्मभान हरवलेली तरुण मंडळी. असे नाही की ही तरुण मंडळी हुशार नाहीत किंवा त्यांच्यात मेहनत करण्याची इच्छा नाही. हे तर सर्व त्यांच्याकडे आहे. मग प्रश्न पडतो तो असा की ही तरुण मंडळी आजच्या जगात एवढी भरकटलेली का वाटते आहे? त्यांच्या नक्की समस्या काय आहेत? त्यांना आपण कोण आहोत, कशासाठी जगत आहोत, आपल्या जगण्याची उद्दिष्टे काय असली पाहिजे असे प्रश्न का पडत नाहीत. प्रचंड मेहनत करून ज्ञान मिळविणे आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून सर्व समाज शिक्षित करावा असे या तरुणांना का वाटत नाही. याला कारण आहे ते म्हणजे आजचा तरुण भौतिक सुखात अडकलेला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाच खूपच परिणाम झालेला दिसत आहे. व्हाट्सअप विद्यालयाद्वारे त्यांना चुकीच्या माहितीत गुंतून ठेवण्याचे काम आजच्या सर्व राजकीय पक्षांनी केले आहे. नुसता राजकीय पक्षांना दोष देऊन चालणार नाही तर त्यासाठी सर्वात मोठा दोष जातो तो आजच्या तरुणपिढिंच्या आईवडिलांकडे. विभक्त कुटुंबीय पद्धतीमुळे तरुणांना आपल्या नात्यांबद्दल प्रेम वाटत नाही. या पद्धतीमुळे कुटुंबामध्ये संवाद होत नाही. परीक्षेत गुण जास्ती मिळविण्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा व त्यासाठी मुलांना त्यांच्या खेळापासून आणि इतर गोष्टींपासून दूर ठेवण्याची क्रिया, मानसिक समाधानापेक्षा भौतिक सुखाचे समर्थन करणारे त्यांचे आईवडील आणि या गोष्टींचा हव्यास बाळगणारा समाज या प्रकारे तरुण मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम झालेला दिसून येतो. आता तर आईवडील मुलांना कॉलेजमध्ये न पाठवता खाजगी क्लासेसमध्ये पाठवतात आणि या खाजगी क्लासेस द्वारे कॉलेजमध्ये प्रवेश घेतात आणि शिक्षण पुरे करतात. अशी मुले पुढे चांगले गुण घेऊन डॉक्टर किंवा इंजिनीयरसुद्धा होतात पण मानसिकदृष्टया खूपच खालावतात. तेव्हा अशा तरुण मुलांना विचारांची, धोरणात्मक कार्यक्रमांची ओळख करून देऊन मेहनीतीचे महत्व समजून सांगायला पाहिजे. त्यांच्या समोर अनेक आदर्श व्यक्तींची चरित्र ठेवले पाहिजे.
अजूनही एक गोष्ट आपणास दिसेल ती म्हणजे अनेक तरुण त्यांच्या भविष्यासाठी जागरूक असल्याचे जाणवते. राजकीय नेते आणि लेखक शशी थरूर यांनी हल्ली एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की आजची तरुण पिढी सतत काहीतरी विचार करीत असतात. त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. ते आम्हाला प्रश्न विचारतात की आम्ही संसदेत काय करत असतो, भारतीय संसद कशी चालते त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. असाच एक अभ्यास एम टीव्हीच्या व्यवस्थापकाने केला तेव्हा त्यात आढळून आले की सगळी काही तरुण मंडळी भरकटलेली नसून अनेक तरुणांना अजूनही कुटुंब पद्धती आवडते आहे. शिक्षणाला त्यांनी महत्व दिले आहे. त्यांना चांगली राजकीय पद्धत हवी असल्यामुळे त्यावर ते अभ्यास करताना दिसत आहेत. त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी मेहनत घेऊन त्यांना भौतिक सुखापासून दूर ठेवले पाहिजे. लहान मुलांना फक्त गुण मिळवण्यासाठी तयार न करता एक चांगला डॉक्टर, वकील, इंजिनिअर, इतिहासकार बनवून चांगला नागरिक बनविला पाहिजे. जेव्हा आपण या गोष्टी लहान मुलापासून सूरू करू तेव्हा त्यांच्यातून एक चांगला तरुण तयार होईल आणि चांगला समाज तयार होण्यासाठी खूपच फायदा होईल. सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या एका कवितेचा उल्लेख करून हा लेख संपवतो. ते म्हणतात
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश
तारे.
जग यावी सृष्टीला
की,
होऊ दे माणूस
जागा.
भ्रष्ट सारे नष्ट
व्हावे
घट्ट व्हावा प्रेम
धागा.
स्वच्छ सारे मार्ग
व्हावे
अन मनेही माफ
व्हावी
मोकळ्या श्वासात
येथे
जीवसृष्टी जन्म
घ्यावी
स्पंदनाचा अर्थ
येथे
एकमेकांना कळवावा
ही सकाळ रोज यावी
अन माणसांचा देव
व्हावा.
Comments
Post a Comment