रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १५७
विषय क्रमांक : ४
विषयाचे नाव : कॉमन मॅन
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम मुंबई
संकेत स्थळ :
कॉमन मॅन ज्याला आपण मराठीत सामान्य माणूस असे म्हणत असतो. जेव्हा आपण या कॉमन मॅनची व्याख्या करतो तेव्हा एवढेच म्हणावे लागेल की सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्टया एक साधारण नागरिक किंवा कोणतेही विशेष गुणधर्म नसलेला मानव. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक कॉमन मॅन आपण पाहत असतो आणि आपल्याला भेटत सुद्धा असतात. अशा या कॉमन मॅनची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये आपल्याला रोज दिसत असतात. सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीवर अन्याय होत असेल तर त्याबद्दल आवाज उठविण्यासाठी तोंड जरूर उघडतो पण एकही शब्द त्याच्या मुखाद्वारे बाहेर पडत नसतो फक्त दातओठ चावत त्या अन्यायाचा तो निषेध करतो. तसेच कुठल्याही कार्यालयात काम करताना आपल्या वरिष्ठासमोर मान वर करून न बोलणे, वर्षाकाठी आपल्याला बढती मिळण्याची आशा करणे किंवा पगार वाढीसाठी अपेक्षा करणे. मग बढती मिळाली नाही म्हणून स्वतःचे आत्मपरीक्षण न करता त्याच्या वरिष्ठानी राजकारण करून त्याला बढती दिली नाही याची सर्वांबरोबर उलट सुलट चर्चा करणे असे प्रकार कॉमन मॅन नेहमीच करत असतो. अजून एक वैशिष्ट्ये या कॉमन मॅनचे आहेत. ते म्हणजे त्याला कधीही वाईट गोष्टीला सामोरे जायचे नसते. भुताला तर तो घाबरत असतो. त्यासाठी तो देवापुढे अनेक नवस करतो. अनेक चिंता दूर करण्यासाठी तो देवाकडे विनवण्या करतो. जर एखादे मांजर आडवे गेले की तो आपला दिवस वाईट जाऊ नये म्हणून परत दहा पावले मागे जातो. आपल्या घरातील पीडा बाहेर जावी यासाठी तो अमावस्येला घराबाहेर लिंबू मिरची आणि उदबत्ती लावत असतो. आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडलेली असेल पण खिशात पैसे नसल्यामुळे तो त्या गोष्टीकडे पाहत सुद्धा नाही. अशी काही कॉमन मॅनची वैशिष्ट्ये आपल्याला रोज दिसत असतात आणि त्या गोष्टीचा आपणही एक भाग असतो. म्हणून त्यांची सुखदुःखे ही सामान्यच असतात. त्यांना असामान्य होणे परवडणारे नसते. अशी सामान्य माणसे आपल्या साहित्यातून, दैनंदिन वर्तमान पत्रामधून सुद्धा भेटत असतात. यासाठी दोन उदाहरणे मी येथे देत आहे. ती म्हणजे सुप्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे यांनी असा मी असामी या पुस्तकामध्ये निर्माण केलेला धोंडो भिकाजी जोशी नावाचा कॉमन मॅन आणि सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि लेखक आर के लक्ष्मण यांनी Times of India या वृत्तपत्रातील You Said It या सदरातील व्यंगचित्रात तयार केलेले कॉमन मॅनचे पात्र.
१९६० च्या दशकात सुप्रसिद्ध मराठी लेखक पु. ल. देशपांडे यांनी सामान्य माणसाचे म्हणजे कॉमन मॅनचे आत्मचरित्र असा मी असामी लिहिले. त्यात त्यांनी निर्माण केलेले पात्र धोंडो भिकाजी जोशी या कॉमन मॅनला सुद्धा काहीतरी त्याच्या आयुष्याबद्दल सांगायचे असते. एका ब्रिटिश कंपनीमध्ये कारकूनी करत असलेल्या या कॉमन मॅनच्या आयुष्यातील अशा काय गोष्टी असणार आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो. याला कारण असते आपल्याकडे काय म्हटले आहे, यापेक्षा ते कोणी म्हटलं आहे यालाच महत्व असते. म्हणून पु. ल. देशपांडेचा कॉमन मॅन म्हणतो, " थोर माणसे देखील काही फारसे निराळे म्हणतात असे नाही ; पण ती थोर असतात हे महत्वाचे असते ". धोंडो भिकाजी जोशी या कॉमन मॅनचे आत्मकथन लिहिताना पु. ल. देशपांडेनी रोजच्या दैनंदिन जीवनातील कंटाळवाणे आणि कष्ट करून केलेल्या कामाचे चित्रण इतक्या सुंदरपणे केले आहे की न कळत धोंडो भिकाजी जोशी आम्हा सर्वांच्या हृदयाचा ठाव घेऊन जातो. त्यातील संवाद इतक्या विनोदी पद्धतीने लिहिले आहे की कॉमन मॅन धोंडो भिकाजी जोशी आपल्यातलाच आहे असे वाटू लागते. मग त्यातील संवाद आपले मन हळवं करते आणि आपल्या बुद्धीची कवाडे उघडी होण्यास मदत करते. पु. ल. देशपांडेचा हा कॉमन मॅन रत्नागिरी येथील एका कुटुंबात जन्माला आलेला. त्या कुटुंबात त्याचे आईवडील, काका, मावशी, आत्या, त्याची बायको व मुले असे सर्वजण आहेत. त्यात एकत्र कुटुंब पद्धतीची उब आहे. या कुटुंबातील सर्व नातेवाईकांची या कॉमन मॅन बद्दलची मते, त्याच्यावर मारलेले टोमणे इतके जबरदस्त आहेत की त्याचा आपण हसत हसत पूर्णपणे आनंद घेत जातो. या कॉमन मॅनची मुलेसुद्धा सहजपणे आपल्या मनाचा ठावा घेतात. आपल्या पत्नी आणि मुलांबरोबर नाटक बघताना, त्याचप्रमाणे मावशीचे घर शोधताना झालेल्या गमतीजमती आपल्याला खूपच हसवतात हे खरे पण सामान्य माणसांचे आयुष्यातील घडामोडी सुद्धा सांगून जातात. म्हणूनच शंकऱ्या, शरी, नूतन, गिरीश आपल्या मनात कायमचे घर करून राहतात. या कॉमन मॅनच्या आयुष्यातील परिवर्तन, चाळीमधून ब्लॉक मध्ये आल्यावर झालेले मध्यमवर्गीय परिवर्तन, नवरा बायकोचे नाते किती वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते हे पु.ल.देशपांडेने खूप छानपणे मांडले आहे. खरोखरच हे आत्मचरित्र इतके सुरेख आहे की आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या विसंगती आणि विसंवादी घटना पाहिल्या तर हे कॉमन मॅनचे आत्मचरित्र किती अजरामर आहे याबद्दल शंकाच राहत नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास कापड खरेदी करताना पाहिलेले "गोर अंग" आणि सरोज खरे, नानू सरंजामे, प्रो. ठीगळे यांच्या सारखी पात्रे. खरोखरच हे कॉमन मॅनचे चरित्र आपल्याला सामान्य माणसाचे जीवन उलगडून दाखवते आणि आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकतो.
कॉमन मॅनच्या सुखदुःखाच्या गोष्टी सर्व समाजापुढे मांडण्याचे काम अजून एका लेखकाने आणि व्यंगचित्रकाराने म्हणजे आर के लक्ष्मण यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी व्यंगचित्राचा वापर करून द कॉमन मॅन हे पात्र उभे केले. १९५१ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्रपत्रात You Said It या सदराखाली त्यांनी द कॉमन मॅन हे पात्र निर्माण करून भारतामधील सर्व सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व केले. कॉमन मॅनच्या आशा, आकांक्षा, त्यांच्या गरजा, त्यांना सोसावा लागणारा त्रास यांचे अनेक पैलू त्यांनी या पात्रा मार्फत समाजापुढे ठेवले. हे करत असताना आर के लक्ष्मण यांनी भारतातील विविधता आणि प्रत्येक राज्यांची संस्कृती लक्षात घेऊन त्यांचे सविस्तर विश्लेषण आपल्या व्यंगचित्रातून मांडले आहे. धोती आणि जॅकेट घातलेला, गोंधळेला हा कॉमन मॅन कोणाकडून फसला गेला आहे असे जाणवत नाही. त्याच्या तीक्ष्ण निरीक्षणामुळे त्याचे राजकीय विश्लेषण कधीच चुकत नाही. स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या दशकात अनेक व्यंगचित्रकारांचा उदय झाला पण नव्याने प्रस्थापित झालेल्या लोकशाहीचे खऱ्या अर्थाने पहारेकरी बनले ते म्हणजे आर के लक्ष्मण. जेव्हा आर के लक्ष्मण यांनी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे समकालीन होते पी. के. एस. कुट्टी, अबू अब्राहम, ओ.व्ही. विजयन, बी वी राममूर्ती, शंकर पिल्लई आणि बाळासाहेब ठाकरे. अशा वेळीस द कॉमन मॅन हे पात्र निर्माण करून आर के लक्ष्मण यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि जवळजवळ अर्धशतक त्यांनी आपल्या वाचकाला आकर्षित केले. त्यांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरी बद्दल पाहिले की त्यांच्यावर सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हीड लो यांचा प्रभाव जाणवतो. मला त्यांनी काढलेले एक व्यंगचित्र आठवते. त्यात त्यांनी भारताच्या अर्थसंकल्पावर भाष्य केले होते. त्याचे विश्लेषण करताना देशातील गरीब माणसे समृद्धीच्या खोट्या प्रचारामागे कसे लपले गेले आहेत याचे चित्रण करताना त्यांनी पडद्यामागून एक उद्ध्वस्त खेडे दाखवले आणि त्यावर अर्थसंकल्प असे लिहिले होते. इतके सुंदर चित्रण मी कुठेच पाहिले नव्हते. द कॉमन मॅनच्या विसंगत घटनांची जुळवाजुळव आपल्या व्यंगचित्रात इतक्या छानपणे त्यांनी केली आहे. त्यांनी दाखवलेले वास्तविक जीवनातील घटकांचे दृश्य इतके जबरदस्त आहे की आजच्याही काळात त्यांचा उपयोग होऊ शकतो. अशी अजरामर कॉमन मॅनची व्यक्तिरेखा निर्माण करून आर के लक्ष्मण यांनी भारतीय समाजावर उपकाराच केले आहे. त्यांच्या या द कॉमन मॅन यावर डी डी नॅशनल वाहिनीने वागळे की दुनिया अशी मालिका तयार केली होती.
साधी राहणी, आपल्या गरजा कमी ठेवून आपल्या संस्कृतीला जपणारा, सुरक्षित जीवन जगणारा, कोणावरही विश्वास ठेवणारा, देवावर श्रद्धा असणारा, थोरामोठ्यांचा आदर करणारा कॉमन मॅन माणुसकीचा धर्म पाळत सामाजिक एकता निर्माण करीत असतो. ते करत असताना तो सामान्य जीवन जगत असतो. त्यात त्याला कधीही कमीपणा वाटत नाही. आपल्या कुंटुंबाची काळजी घेत, इतर सर्वांच्या सुखदुःखात सामील होत आपले मदत कार्य चालू ठेवत असतो. त्यात त्याला कुठेच कमीपणा वाटत नाही. म्हणून कॉमन मॅनबद्दल लिहिताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आपल्या गीतांजली या काव्य संग्रहात लिहितात, " महान होऊन गेलेल्या अनेक माणसांनी आपली जीवन पद्धती मात्र सामान्य ठेवली आहे. असे करताना त्यांना सामान्य माणसांची सुखदुःखे समजतात आणि त्यांच्या यात्रेत त्यांना सहभागी होऊन त्यांच्या दुःखाचे निवारण करता येते". असे सांगून गुरुदेव पुढे सांगतात, " कॉमन मॅन हा जन्मापासून सामान्य असतो. तो त्याच्या प्रश्नांशी सतत झुंजत असतो. आपल्या कुटुंबाची काळजी घेत तो समाजातील आपले स्थान टिकवीत असतो. त्याला मिळणारी विकासाची संधी आणि त्या संधीचा उपयोग आपल्या क्षमतेनुसार करण्याची त्याची कुवत त्याला असामान्य बनवते". म्हणून गुरुदेव टागोर यांना कॉमन मॅन म्हणून राहणे जास्त आवडते. याचे कारण सांगताना ते म्हणतात, कॉमन मॅन आयुष्यात प्रत्येक भावने पर्यंत पोहोचतो, त्या भावना तो अनुभवतो आणि त्यावर व्यक्तही होतो. म्हणूनच तो सत्यापर्यंत पोहोचतो". म्हणून ते कॉमन मॅनच्या आयुष्याला महायात्रा म्हणतात. कॉमन मॅन बनून माणुसकीचा धर्म सांगणाऱ्यामध्ये भारतातील अजून दोन महान व्यक्तींचा उल्लेख करावासा वाटतो. कारण त्यांनी आपले जीवन कॉमन मॅन साठीच व्यथित केले आहे. त्या दोन महान व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
धन्यवाद
Comments
Post a Comment