रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १५८ विषय क्रमांक : ४ विषय : स्वभावाला औषध आहे ? शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई आधी होता वाघ्या | दैव योगे झाला पाग्या || त्याचा येळकोट राहीना | मूळ स्वभाव जाईना || आधी होती दासी | पट्टराणी केले तिसी || तिचे हिंडणे राहिना | मूळ स्वभाव जाईना || वरील ओळी आहेत तुकाराम महाराजांच्या अभंगातील. या अभंगानुसार त्यांना सांगायचे आहे की मनुष्य हलक्या पदावरून श्रेष्ठ पदावर गेला तरी त्याचा स्वभाव काही बदलत नाही. त्याची स्वाभाविक प्रवृत्ती मधूनच उचल खाऊन त्याचे खरे स्वरूप बाहेर येते. त्यासाठी ते म्हणतात मानव प्रथम खंडोबा देवाचा वाघ्या होता. त्यावेळेस त्याला मल्हारी मार्तंडाचा येळकोट म्हणून ओरडण्याची सवय होती. जेव्हा अशा माणसाला पागेवरचा मुख्याधिकारी म्हणजे घोडदळाचा प्रमुख केले. तेव्हा तो रणगर्जनेच्या ऐवजी येळकोट म्हणून ओरडू लागला. तेव्हा त्याची मुळवृत्ती उघडकीस आली. तसाच अर्थ दुसऱ्या ओळीचा आहे. या अभंगच्या काही ओळी आपण नेहमी आपल्या रोजच्या जीवनात मानवाचा स्वभाव एकदा बनला तर तो बदलत नसतो असे सांगण्यासाठी वापरत असतो. मग...