रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक :
१५३
विषय क्रमांक :४
विषय : नक्की हा
देश कोणाचा
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला भाषण करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात भारताची विविधता मान्य करताना म्हटले होते की, " आपण कोणत्याही समुदायाचे, कोणत्याही भागाचे असलो तरी देशाच्या साधनसंपत्तीवर सर्वांचा समान अधिकार आहे. विविधता हेच भारताचे बलस्थान आहे. सर्व वर्ग, समुदायांना योग्य स्थान देणाऱ्या राष्ट्राच्या रूपात जाऊया. विकास, एकतेतील विविधता आणि लोकशाही या तत्वांचा स्विकार करून लोकशाहीच्या सर्व उत्सवांमध्ये सामील होऊ या ". यात राष्ट्रपतीने भारतातील विविधता नुसती मान्य केली नाही तर त्या विविधतेचे बलस्थानसुद्धा मान्य केले आहे. मग प्रश्न पडतो तो म्हणजे विविधता म्हणजे काय? विविधता ही कुठल्या प्रकारची असू शकते? याचे उत्तर द्यायचे झाल्यास असे म्हणता येईल की विविधता म्हणजे विविध पार्श्वभूमी आणि दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींचा समूह. मग त्यात वेगवेगळे पण असलेला वांशिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनशैली लोकांचा एकत्र राहणारा समूह की ज्यात प्रत्येक माणूस आपल्या विचारसरणीप्रमाणे इतरांच्या विचारांना समजून घेऊन त्यातील फरक लक्षात घेऊन त्या विविधतेच्या संकल्पनेचा स्वीकार व आदर करतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे हे समजून घेणे आणि आपले वैयक्तिक फरक ओळखणे. अशा या विविधतेमध्ये केवळ अस्तित्वाचे मार्ग नसून जाणून घेण्याचे मार्ग देखील समाविष्ट झालेले आहेत. सुप्रसिद्ध जर्मन लेखक आणि शिक्षणतज्ञ पीटर ग्राफ यांच्यामते प्रत्येक माणूस इतर समाजातील संस्कृतिशी संवाद साधून त्यांच्याशी एकरूप झाला नाही तर त्याला आरशात स्वतःचे प्रतिबिंब नीटसे समजणार नाही आणि स्वतःची ओळख नीटपणे करून घेता येणार नाही. जेव्हा तो इतर समाजातील संस्कृतीच्या लोकांशी संवाद करेल तेव्हाच त्याला त्याची ओळख निश्चित करता येईल. सुप्रसिद्ध आर्थिक पत्रकार Pascal Zachary आपल्या "The Diversity Advantage " या पुस्तकात म्हणतात की आता आपल्याला धैर्याने इतर समाजातील धर्म आणि पंथ यांच्या बरोबर संवाद करून विविधता साजरी करण्याची वेळ आली आहे. जे राष्ट्र सर्वप्रकारच्या विविधतेला मान्यता देते, ज्या देशामध्ये बहुसंख्य वर्चस्व असलेल्यांची संस्कृती आणि अल्पसंख्याकं असलेल्यांची संस्कृती शांतपणे एकत्र राहतात, ते राष्ट्र खरोखरच धन्य आहे". या सर्व गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट निर्विवादपणे म्हणता येईल ती म्हणजे विविधतेचे सर्वात नेत्रदीपक उदाहरण जगात कुठे सापडत असेल तर ते म्हणजे भारत देशात.
खरोखरच जगातील कोणताही मोठा देश भारताच्या विविधतेशी तुलना करूच शकत नाही. कारण इथे विविधता आढळते ती भारतीय लोकांच्या वांशिक आणि सांस्कृतिक गटाशी, धर्माशी, भाषेशी, जातींशी आणि हवामानाशी. हे सर्व एका कल्पनाशक्तीच्या मार्गाने आकलन होणे खूपच कठीण आहे. सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते मायकेल केन २००५ मध्ये एका सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांबरोबर भारतात आले होते. सुरुवातीला त्यांची कल्पना भारताबद्दल मिश्र स्वरूपाची होती. आपल्या The Elephant to Hollywood या आत्मचरीत्रामध्ये लिहितात, " येथील लोकांची शिक्षित कार्यशक्ती खूपच कौतुकास्पद आहे. स्वातंत्र्यापासून भारताने धार्मिक सहिष्णूता फार छान पणे हाताळली आहे. हा देश इतका वेगळा आहे की तिथे एका राष्ट्रीय पक्षाची अध्यक्षा जन्माने ख्रिस्ती आहे, राष्ट्रपती मुस्लिम आहेत, पंतप्रधान शीख आहेत आणि ऐंशीटक्के जनता हिंदू आहे. त्यामुळे या देशाची विविधता पाहून थक्क व्हायला होते". इंग्रजी सम्राज्यातून भारत मुक्त झाला आणि भारताने धार्मिक सहिष्णूता हा त्यांच्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रमुख गाभा मानला. आपल्या धर्माप्रमाणे इतर धर्मांचाही आदर करून धार्मिक सहिष्णूता एक नागरी मूल्य मानले. या देशात ऐंशी टक्के हिंदू बरोबर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, ज्यु, जैन व पारशी धर्माचे लोक एकत्र राहत असतात. या देशात मलेशियापेक्षाही जास्त संख्या असलेले मुस्लिम आहेत तर ऑस्ट्रेलिया पेक्षाही जास्ती संख्या असलेले ख्रिश्चन आहेत. या सर्व धर्माची माणसे अजूनही गंगेच्या पाण्याने स्वतःला पवित्र करण्यात येथे यावर विश्वास ठेवतात. सुप्रसिद्ध सनई वादक बिस्मिल्ला खान एकदा म्हणाले होते की पाकिस्तान माझ्यासाठी परका देश आहे कारण तिथे गंगा ही नदी नाही. त्याचप्रमाणे बरेच हिंदू इस्लामच्या सूफीवाद या एका गूढ परंपरेबरोबर स्वतःला जोडतात. भारतातील सर्व धार्मिक समाजातील लोक आपल्याहून वयाहून मोठया असलेल्या व्यक्तींचा मान राखणे ही गोष्ट त्यांच्या श्रद्धेसाठी फार महत्वाची मानतात. हे सर्व काही वाचल्यावर या देशातील लोकांबद्दल आदर वाढू लागतो.
इंग्रज भारतात आले तेव्हा हा भारत हा देश फक्त भारतीय उपखंड होता असे मानले जाते. पण सांस्कृतिक दृष्टीकोनातून भारताच्या सीमा अफगाणिस्तान, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, म्यानमार पर्यंत होत्या असे सांगण्यात येते. ब्रिटिश सत्तेने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी या देशाच्या सीमा तयार करून भारत एक राष्ट्र निर्माण केले आणि त्यात केंद्रीय सरकारची निर्मिती केली. त्यानंतर अनेक भारतीयांनी इंग्रजी शिक्षण घेऊन भारताला स्वराज्याचे स्वप्न दिले. त्यात लोकमान्य टिळकांचा मोठा वाटा होता. लोकमान्याप्रमाणे बंगालमध्ये बिपीनचंद्र पाल आणि पंजाबमध्ये लाला लजपत राय सारख्या नेत्यांनी सुद्धा स्वराज्याचे महत्व सांगण्यास सुरुवात केली. पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा मंत्र सर्व सामान्य म्हणजे समाजातील सर्व थरामध्ये पोचवीला तो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीला व्यापक रूप दिले. गांधीजी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे भारतात फक्त वेगवेगळे धर्म नसून वेगवेगळ्या भाषासुद्धा आहेत. जर सर्व भाषिकांना एकत्र आणले नाही तर स्वातंत्र्य येऊनही काही फायदा होणार नाही. त्यासाठी त्यांनी सर्व भारतातील भाषिक लोकांना सांगितले की भारत स्वतंत्र झाल्यावर प्रत्येक भाषिकांचे शिक्षण त्यांच्या भाषेतूनच होईल आणि भारतातील प्रत्येक भाषेला स्वतंत्र्य भारतात महत्वाचे स्थान असेल. महात्मा गांधींची अशी हाक देऊन भारतातील सर्व भाषिकांची मने जिंकली आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ मिळवून दिले. भाषिक प्रश्नासारखा दुसरा प्रश्न होता धर्माचा. त्यासाठी त्यांनी धार्मिक एकतेसाठी खूप प्रयत्न केले. त्या काळी अनेक नेत्यांच्या मनाची जडणघडण धार्मिक नव्हती तरीसुद्धा त्यांनी आपले आयुष्य धार्मिक राजकारण करण्यात पुढे घालवले. त्यातील प्रमुख नेते होते महंमद अली जीना. महात्मा गांधींनी धर्माचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. त्यांनी प्रार्थना, धर्म साधना, वैराग्याची साधना जीवनभर करून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणून सांप्रदायिक सौहार्द निर्माण केले. त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीवर लागलेला जातीयवाद दूर करण्यासाठी एक चळवळ १९३३ सालापासून सूरू केली. हे सर्व करत असताना त्यांनी सर्व धर्म, सर्व जाती आणि सर्व भाषिक एका झेंड्याखाली एकत्र आणले. त्यांची अहिंसेचे तत्वज्ञान म्हणजेच संसदीय लोकशाही. म्हणजे सर्व प्रश्न चर्चा करूनच सोडवणे. अशा या महात्म्याने भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत विविधता असलेल्या भारतीयांना एकत्र आणले हे निर्विवाद सत्य आहे. भारतीय संविधानाचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमीच जाणवते ती म्हणजे महात्मा गांधींचे विचार भारतीय संविधानात विचारपूर्वक आले आहेत.
अशा या विविधता असलेल्या देशाला स्वातंत्र्यानंतर महत्वपूर्ण संविधान देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविधता असलेल्या भारतीयांना एकत्र जोडले. आज भारतीय संविधान भारतीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सर्व भारतीय आज संविधानात म्हटल्याप्रमाणे आपली विविधता जपून आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते, अनेक लोकशाही संस्था, अनेक शास्त्रज्ञ, अनेक खेळाडू व कलाकार, गायक अशा लोकांनी भारताची विविधता जपून सर्वांना एकत्र केले आहे. त्यात सिंहाचा वाटा आहे भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीचा. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या India After Gandhi या पुस्तकात भारतीय लोकशाहीच्या वाटचालीचा अभ्यासपूर्णपणे आणि रोचकपूर्णपणे आढावा घेतला आहे. या अत्यंत वाचनीय असलेल्या पुस्तकात त्यांनी शेवटची पंचवीस पाने भारतीय समाज जीवनावर सिनेमाचा असलेला प्रभाव या विषयावर लिहिली आहे. त्यात एकत्माचे सात "बाइंडिंग एजंट " सांगताना हिंदी सिनेमा आणि त्यातील गाणी यांचा उल्लेख विशेष भर देऊन नोंदवितात. ते म्हणतात, "Apart from elements of politics and economics, cultural factors have also contributed to national unity. Pre-eminent here is Hindi Film. This is the great popular passion of Indian people watched and followed by Indians of all ages, genders, castes, classes, religions and linguistic groups. Lines from film songs and snatches from film dialogue are ubiquitously used in conversations in schools, colleges, homes and on the street. Because it is one more state of union, Hindi cinema also speaks its own language - one that is understood by all others. इतके सांगून ते पुढे लिहितात, " The Hindi language was resisted by the people of south and east but Hindi Cinema and its music has been accepted by them". किती सुंदरपणे आणि सहजपणे त्यांनी हे सांगितले आहे. हो मी सुद्धा हे स्वतः अनुभविले आहे. हिंदी सिनेमाप्रमाणे क्रिकेट या खेळाने आणि भारतीय रेल्वेनी सुद्धा सर्व भारतीयांना एकत्र आणून भारतीयांची विविधता जपली आहे.
असा हा भारत देश हा फक्त एकाच पंथीयाचा किंवा एका धर्माचा किंवा एका जातीचा असे म्हणता येणार नाही. तो सर्वांचा आहे जो या देशावर प्रेम करतो आणि हा देश घडवीण्यासाठी आपले प्रयत्न प्रत्येक वेळेस करत असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवतो. इथली प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक माणसाचे प्रेम आहे. त्याच माणसाचा हा देश आहे. इथल्या विविधताच या देशाचे बलस्थान आहे. म्हणूनच या लेखाचा शेवट करताना मी रॉबर्ट ब्लॅकविल जे २००३ पर्यंत अमेरिकेचे भारतीय राजदूत होते. परत अमेरिकेत जाताना ते म्हणतात, " India is a pluralist society that creates magic with democracy, rule of law and individual freedom, community relations and cultural diversity. What a place for an individual... I would not mind being born ten times to rediscover India". याचे मराठीत भाषांतर करावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की भारत हा बहूभाषिक आणि बहूधार्मिय देश असून तो लोकशाही, कायद्याचे राज्य, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक विविधता यासंह जादू निर्माण करतो. प्रत्येक मानवासाठी हा एक महत्वाचा देश आहे. भारताचा शोध घेण्यासाठी मला दहा वेळा जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही.
धन्यवाद
Comments
Post a Comment