रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक :
१५२
विषय क्रमांक : ४
विषय : माणूसपण
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.com/
माणूसपण हा मानव
जातीतील एक महत्वाचा मानवी गुण आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मानवाने प्रेम करण्याच्या क्षमतेवर मिळवलेला हा
गुण आहे. इथे प्रेम करणे म्हणजे फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर किंवा
मित्रांवर करणे नसून, सर्व मानवजातीवर
करणे असा आहे. स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर किंवा मित्रांवर प्रेम करणे सोपे असते
पण अखंड मानवजातीवर प्रेम करणे खूपच कठीण असते. त्यासाठी हवा असतो सर्व मानवी
समाजाला समजून घेण्याचा समजूतदारपणा. नाहीतरी माणूस स्वतःची ओळख त्याच्या एका
विशिष्ट वंशाशी, धर्माशी, त्वचेच्या रंगाची व आर्थिक प्रश्नाशी
करून घेत असतो. या कक्षेतील लोकांना तो आपले मानतो किंवा आपल्याला त्यांच्यापैकी
एक मानतो. जी माणसे आपल्या सामाजिक स्तरात येत नाही अशा लोकांकडे एकतर आपण संशयाने
पाहतो किंवा त्यांच्याकडे जीवनात दुर्लक्ष करतो. म्हणूनच आपल्याला सर्व
मानवजातीबद्दल प्रेम किंवा आदर वाटत नाही. याला कारण म्हणजे आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाबद्दलच आपल्या मनात आदराची
भावना निर्माण झालेली असते. आपल्या कक्षेच्या बाहेरील लोकांवर प्रेम करायला एक
प्रकारचे धैर्य लागते. पूर्वी माणूस निवाऱ्याकरिता गुहेत राहत असे. मग जशा गरजा
वाढू लागल्या तसा तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला. हल्ली तर तो आलिशान
घरामध्ये राहण्यासाठी मेहनत करू लागला. अशी स्वप्ने पाहून मेहनत घेण्यासाठी
कोणाचाही आक्षेप असणार नाही. पण हे घडत असताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते ती
म्हणजे हरवलेला आपलेपणा, मायेचा ओलावा व
एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची विचारपूस करण्याची लुप्त झालेली वृत्ती. अलीकडे
सर्व क्षेत्रात विकसित होतो आहे फक्त संकुचितपणा. त्यामुळेच आजच्या काळात मानवजात
हरवून बसली आहे मानवातील महत्वाचा गुण आणि तो म्हणजे माणूसपण.
सर्व मानवजातीवर
प्रेम करणे हे काही सोपे काम नव्हे. एकवेळ तुम्ही ज्यांना ओळखता त्यांच्यावर प्रेम
करणे सोपे असते पण ज्यांना तुम्ही ओळखतपण नाही अशा माणसांवर प्रेम करणे फार कठीण
असते. मला माहिती आहे की आजच्या काळात मानवतेवर विश्वास ठेवणे कठीण आहे, तरीसुद्धा माणसाला माणूसपण देण्याचे प्रयत्न
व्हायला पाहिजे. महात्मा गांधी आपल्या एका लेखात म्हणतात, " You must not lose faith in
humanity. Humanity is ocean; if a few drops of the ocean are dirty, the ocean
does not become dirty". याचा मराठी अनुवाद करावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की आपण
कोणीही मानवजातीवरील विश्वास गमावता कामा नाही. मानवता एक महासागर आहे. समुद्रातील
काही थेंब घाणेरडे असतील म्हणून महासागर गलिच्छ होत नाही. असे सांगून महात्मा
गांधी पुढे लिहितात, " संपूर्ण मानवता एक
अविभाजित आणि अविभाज्य घटक आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकजण इतर सर्वांच्या गैरकृत्यासाठी जबाबदार
आहे. मी स्वतःला दुष्ट आत्म्यापासून अलिप्त करू शकत नाही. जेव्हा ते इतर मानवांचा
अपमान करतात तेव्हा लोक स्वतःचा आदर कसा करू शकतात हे माझ्या साठी नेहमीच गूढ
राहिले आहे.म्हणूनच माणुसकीचा मोठेपणा हा माणसात
नसून माणुसकी असणे जरुरीचे आहे." ( All humanity is one undivided and indivisible, and each
one if us is responsible for misdeeds for all others. I cannot detach myself
from the wickedest soul. It has always been a mystery to me how people can
respect themselves when they humiliate other humans. The greatness in humanity is not
being in human, but being in humane). म्हणूनच महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून
देताना मानवजातीसाठी आपले जीवन समर्पित केले. हिंसेने माणूस गुलामगिरीतून स्वतंत्र
होईल पण विचारातून नाही. त्यासाठी तो परत हिंसेकडे वळेल आणि माणूसपण घालवून बसेल.
म्हणून स्वातंत्र्याचा लढा लढताना सत्याग्रह, आंदोलने त्यांनी अहिंसक मार्गानी नेली आणि माणूसपण
टिकविण्यासाठी मानवजातीला अहिंसेचा नवीन मंत्र दिला. पुढे या मंत्राने प्रेरित
होऊन त्याचा उपयोग नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग, व्हेरिर एल्वीन सारख्या नेत्यांनी करून माणसाचे माणूसपण
टिकविण्याचे प्रयत्न केले आहेत.
माणूस जसजशी
प्रगती करू लागतो तेव्हा एक गोष्ट त्याने लक्षात ठेवली पाहिजे की मानवतेच्या दूषित परिणामापासून
त्याने दूर राहिले पाहिजे. आज जरी जग राष्ट्रीयत्वाच्या सीमांनी विभागलेले असले
तरी सुद्धा मानवाला कुठेही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य आहे. या बाबतीत मानवाने
स्वतःला भाग्यवान म्हटले पाहिजे. बरीच राष्ट्रे इतर देशातील जमीन मिळविण्यासाठी
सतत युद्ध करून निष्पाप लोकांचे प्राण घेत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे येमीन, सिरिया, म्यानमार सारखे देश. तिथे मानवी जीवनाला काही किंमत आहे असे
दिसून येत नाही. हा तिढा माणूसकीच्या दृष्टीने लवकरात लवकर सुटला पाहिजे. इथे अजून एक गोष्ट
नमूद करावीशी वाटते ती म्हणजे माणूसपण केवळ माणसापुरते मर्यादित न राहता पर्यावरण
आणि इतर सजीव गोष्टींसाठी सुद्धा असायला हवे. त्यासाठी सर्व मानवाने एकत्र येऊन
खरी माणूसकी दाखवीली पाहिजे. जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा मला अमेरिकेचे भूतपूर्व
अध्यक्ष जे. फ. केनेडी यांच्या भाषणातील काही ओळी आठवतात. अध्यक्ष केनेडी म्हणतात, " I believe in human dignity as
a source of national purpose, human liberty as a source of national action, the
human heart as a source of national compassion, and in the human mind as the
source of our invention and our ideas". किती सुंदर ओळी आहेत या. त्यांनी
राष्ट्रीयत्व मानवी स्वातंत्र्याशी जोडून मानवी मनावर विश्वास दाखवला आहे आणि
त्यातूनच माणूसपण जपण्याचे प्रयत्न केले आहे.जर माणसाला माणूसपण जपून ठेवायचे असेल
तर त्याने काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. त्यासाठी मानवाचे नुसते चांगले हावभाव सुद्धा मानवजातीवर
प्रेम दाखवू शकेल. म्हणून माणसाने लोकांमध्ये चांगले पाहिले पाहिजे. लोकांच्या
क्षमतेवर लक्ष्य केंद्रित करून त्यांना त्यांचा विकास करण्यास मदत केली पाहिजे.
प्रत्येक मानवजातीवर प्रेम करावयास शिकले पाहिजे. सर्व मानवाला समानतेने वागविले
पाहिजे. दुर्बल समाजातील माणसांना तुमच्या कुटुंबातील घटक असल्याप्रमाणे वागविले पाहिजे. प्रत्येक कुंटुंबातील
किंवा समाजातील प्रत्येक मानवाला त्याच्या चुकांसाठी क्षमा करण्यास शिकले पाहिजे.
त्यासाठी करुणा दाखवून समाजाकडून ज्या गोष्टी घेतल्या आहेत ते त्यांना परत दिले
पाहिजे. जर असे केले तरच माणसांचे माणूसपण ठिकण्यासाठी मदत होईल आणि मानवजात सुखी
होईल. म्हणूनच सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein ) म्हणतात, " एक दिवस तंत्रज्ञान आपल्या मानवी
संवादाला मागे टाकेल आणि जगात मुर्खाची पिढी तयार होईल ( I feel a day that technology will
surpass our human interaction. The world will have generations of idiots).
आज सर्व जग
युद्धाने, उपासमारीने आणि
साथीच्या रोग्याने त्रस्त झाले आहे. त्यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे ती
म्हणजे द्वेषाची. त्यामुळे मानव संकुचित होत चालला आहे. आता हा प्रकार आपल्या
मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये आणि
आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा पाहावयास मिळत आहे. यात सोशल मीडिया
तर चुकीची माहिती
लिखाणाद्वारे किंवा व्हिडीओ मार्फत पसरवून द्वेष निर्माण करत असताना दिसत आहे. मी
जेव्हा काहीजनांणा सत्य गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर मला सांगण्यात येते की
हे लोक जे काही लिहीत आहे किंवा व्हिडीओ मार्फत दाखवत आहे त्यांचा अभ्यास
असल्याशिवाय त्यांना हे काही करणे शक्य नाही. मग अशा असत्य गोष्टी पाहून मानवजातीतील माणूसपण हरवत जात आहे याची
जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. पूर्वी अनेक सणानां घरातील सर्व कुटुंबातील किंवा
मित्रपरिवारातील माणसे एकत्र येत असत, एकमेकांची विचारपूस करीत असत. आता फक्त व्हाट्सअपच्या
माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात पण फोन करून त्या शुभेच्छा दिल्या तर त्या
माणसाला चांगले वाटून अनेक विचारांची देवाणघेवाण होईल असे सुद्धा वाटत नाही.
प्रत्येक गोष्ट व्यवहारिक दृष्टीने बघण्यात येऊ लागली आहे. मध्यंतरी माझ्या एका
मित्राने मला गाडी घेण्याचा सल्ला दिला. तसा सल्ला देताना त्याने सांगितले की गाडी
असली की तुला समाजात प्रतिष्ठा मिळेल. मग मी त्यास सांगितले की गाडी जर माणसाची
गरज असेल तरच ती उपयोगी पडते. नुसत्या प्रतिष्ठेसाठी घेतली तर डोईजड होते. मला तर
गाडीचा काहीच उपयोग नाही त्यापेक्षा मी असे काही करीन ते मानवजातीला उपयोगी पडेल.
पण त्याच्या संकुचित मनाला ते पटले नाही. मग मी त्याच्या व इतर मित्रांच्या
यादीतून बाद झालो आणि त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण येणे बंद झाले.
तेव्हाच जाणवते की हळूहळू माणसामाणसातील माणूसकी, प्रेम यांची जागा प्रतिष्ठा, पैसा, देखावा आणि
मोठेपणा यांनी घेतली असून माणसातील माणूसपण हरवत चालले आहे.
हे सर्व लिहीत
असताना मला शशिकांत शिंदे यांची एक कविता आठवली. त्या कवितेत त्यानी गाव व गावपण
या संकल्पना कशा नष्ट होऊ लागल्या आहेत. सर्वजण शहराकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे
गावच्या तळ्यातील माणूस नाहीसा होऊन माणूसपण सुद्धा संपत आहे. याची खंत कुणालाच
वाटत नाही आहे. त्यामुळे ही कविता वर्तमानकाळाची भूतकाळाशी सांगड घालताना दिसते. ते आपल्या "माणुसपण
गारठलंय" या कवितेत म्हणतात,
पूर्वी कसा
पाऊसकाळ
चार महिने असायचा,
हिरवेगार रान पाहत
माणूस खुशीत
हसायचा.
प्रत्येकाची कणगी
भरून
धान्य मोप असायचे,
दूधदुभतं, तूप,लोणी
याला माप नसायचं.
पसाभरून धान्यतर
चिमणीच दारात
टिपायची
पै-पाहुण्यांसाठी
माय
दिवसरात्र खपायची
सणवार जत्रांमधून
किती जल्लोष
असायचा,
भजन कीर्तन करीत
गाव
अख्खी रात्र
बसायचा.
एवढ्या तेवढ्या
पावसा वाचून
सार चित्र पालटलंय,
गावपण हरवल्याने
माणूसपण
गारठलंय".
या कवितेत कवीने
किती सुंदरपणे माणसाचे माणूसपण कसे हरवते आहे हे दाखवून दिले आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment