रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक
:१५१
विषय : गणेशत्सव :
उत्सवांचा शिरोमणी
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
गणपती हे एक भारतीय
संस्कृतीचे आराध्य दैवत. हे दैवत प्रणवस्वरूप असून या दैवताला विनायक, गणेश, गजानन, सुमुख, एक
अशा या दैवताचा वार्षिक महोत्सव प्रत्येक भाद्रपद शुद्ध चतुर्थीस साजरा केला जातो. हिंदू चातुर्मासांपैकी गणेशोत्सव एक महत्वाचा सण आहे. या दिवशी घरोघरी येणाऱ्या ह्या दैवतासाठी सगळी तयारी श्रावण महिन्यातच सूरू झालेली असते. हे दैवत जेव्हा प्रत्येक घरी आगमन करते तेव्हा त्या घरात खूपच आनंदाचे वातावरण असते. घरोघरी आणि मंडपोमंडपी प्रत्येक जण आपल्या परंपरेप्रमाणे पूजा, अर्चना करीत असतात. श्रावण महिन्यात शिवभक्ती केली जाते तर भाद्रपद महिन्यात गणेशाची पूजा केली जाते. तसे पाहिल्यास प्रत्येक हिंदु महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्थी सिद्धिविनायकी या नांवाने ओळखली जाते पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही महासिद्धिविनायकी समजली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. जर ही तिथी मंगळवारी आल्यास अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. श्रावण आणि माघ महिन्यात येणारी अंगारकी संकष्टी फार श्रेष्ठ मानली जाते. अंगारकी संकष्टीच्या दिवशी चंद्रोदयी गणपतीची पूजा केल्यास सर्व संकटांचा परिहार होण्यास मदत होते असे मानले जाते. हा सण साजरा करण्याविषयी वेगवेगळ्या कथा पुराणात सापडतात. एक कथा अशी सांगितली जाते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरिता जायचे होते. पण बाहेर कुणी पहारेकरी नसल्यामुळे तिने एक मातीची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले व त्याला पहारेकरी नेमून ती स्नानाला गेली. त्याचवेळी भगवान शंकर आले. माता पार्वतीने नेमलेल्या पहारेकऱ्याने त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या भगवान शंकराने त्या पहारेकऱ्याचा शिरच्छेद केला. जेव्हा माता पार्वती स्नान करून परत आली तेव्हा घडलेला प्रकार पाहून क्रोधीत झाली. तिचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना आदेश दिला की त्यांना प्रथम कोणी दिसेल त्याचे शिर घेऊन या. तेव्हा सेवक हत्तीचे शिर घेऊन आले आणि ते शिर त्या धडावर बसवण्यात आले आणि त्यास जिवंत करण्यात आले आणि त्यास गणपती किंवा गणेशू असे नाव दिले गेले. स्वर्गातील सर्व देवतांना आनंद झाला. पार्वतीने आपल्या मुलासाठी म्हणजे गणपतीसाठी असा वर मागितला की कुठलीही पूजा गणेशाच्या नावाने सूरू केली जाईल. सर्व देवातांनी ते मान्य केले. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस होता. तेव्हापासून गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सूरू झाली असे मानले जाते.
मत्स्यपुराणात असे सांगितले आहे की एकदा माता पार्वतीने आपल्या अंगाची मळी काढून तिचा एक पुतळा तयार केला. त्यास हत्तीचे मुख बसवून खालील आकृती पुरुषाप्रमाणे तयार केली. मग तिने आपल्या समर्थ्यांच्या जीवावर तो पुतळा जिवंत केला आणि त्या पुतळ्याने एक विशाल देह धारण केला. तेव्हा सर्व देवतांनी त्यास गंगापुत्र मानून त्यांची पूजा केली. विनायक नामक रुद्रगणाचे त्यास अधिपत्य दिले. माता पार्वतीच्या मळातून त्याची उत्पत्ती झाल्यामुळे त्याला शिवपुत्र असेही म्हटले जाते. अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की तारकासुराचा सैन्यातील गजासुर नावाच्या असुराने भगवान शंकराचा कमंडलू लाथाडून त्यांचा अपमान केला. हे कृत्य आपला द्वारपाल असलेल्या गणपतीने केले असे समजून भगवान शंकरांनी द्वारपाल गणपतीचा शिरच्छेद केला. जेव्हा खरा प्रकार देवी पार्वतीकडून समजल्यावर त्यांनी गणपतीच्या घडावर गजतुंड बसविले. अशा वेगवेगळ्या कथा पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. गणेश पुराणात एक कथा सांगते की माता पार्वतीने षड्रिपुंचा नाश करण्यासाठी गणेशाची मूर्ती घडवली. जेव्हा पार्वती श्रावण महिन्यातील व्रत-वैकल्प करीत असताना असुरांनी स्वर्गासह मृत्यूलोकातही उच्छाद मांडला होता. त्यांच्या पुढे सर्व देवता निष्काम ठरत होत्या. या असुरांचा पराभव करण्यासाठी फक्त बल प्रयोग करणारे दैवत नको होते तर बल आणि युक्तीच्या जोरावर त्यांचा पराभव करणारे दैवत हवे होते. तेव्हा नारदाने भगवान शंकराला हे कार्य फक्त एकच दैवत करू शकते असे सांगितले आणि ते दैवत म्हणजे श्री गणेश. तेव्हा श्री गणेशाने तीन दिवस तुंबळ युद्ध करून असुरांचा पराभव केला व भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपल्या भक्तांना दर्शन दिले आणि पुढील दहा दिवस पृथ्वीवर वास्तव करीन असे वचन आपल्या मातापित्यासह सर्व भक्तांना दिले. या दिवशी तो केवळ पाहुणा म्हणून येईल तेव्हा त्याचे आदरातीथ्य पाहुण्या सारखे करून त्यास प्रसन्न करावे. मग कुणाकडे तो दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे तो सात दिवस असे जास्तीजास्त दहा किंवा एकवीस दिवस राहील. तेव्हपासून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला या दैवतेच्या मूर्तीची स्थापना करतात आणि दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला या मूर्तीचे विसर्जन करतात.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला शाडू मातीपासून बनवलेल्या या देवतेच्या मूर्तीची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. त्या मूर्तीचा अभिषेक करताना त्यास अत्तर, दुर्वा, लाल फुले, पत्री अर्पण करून मोदकांचा नैवेद्य दाखवीला जातो. शेवटी मूर्तीची आरती करून सर्व भक्तीभावनेने या देवतेस प्रसन्न केले जाते. विसर्जन होईपर्यंत हा विधि चालू ठेवावा लागतो. उत्तर पूजेनंतर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करावी. काहीजण तृतीया पासून भगवान शंकराची आणि गौरीची चित्रे पूजतात. महाराष्ट्रात, गोव्यात आणि उत्तर कर्नाटकात ( ज्यास मुंबई कर्नाटक असे म्हटले जाते ) सप्तमी पासून नवमीपर्यंत जेष्ठा गौरीचा उत्सव साजरा केला जातो आणि गौरीगणपतीचे एकाच दिवशी विसर्जन केले जाते. भारताच्या इतर भागात हा सण एवढ्या उत्साहात साजरा केला जात नाही. पश्चिम बंगालमध्ये गणपतीचा उत्सव रूढ नाही पण तिथे या दिवशी दुसऱ्या दोन शिवगणांची पूजा केली जाते. फाल्गुन शुक्ल चतुर्थीस तेथे घंटाकर्ण नावाच्या गणाची पूजा केली जाते. हा गण सुंदर असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सौंदर्य प्राप्त होते अशी समजूत तेथील लोकांची आहे. दक्षिण भागात रामेश्वरापर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो पण साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कर्नाटकात कानडी लोक गणेश चतुर्थीस बनकन हब्ब आणि आंध्र व तेलंगणात तेलगू लोक पिल्लेयर चवती असे म्हणतात. पिल्लेयर हे तेलगू भाषिकांनी गणपतीस दिलेले नाव आहे तर तामिळ लोक तुंबिकाई अलवर म्हणजे बुद्धीवान गजानन असे म्हटले जाते. गुजराथेत गणपती उत्सव साजरा केला जात नाही. तिथे चतुर्थीच्या दिवशी गूळ आणि तूप घालून बाजरीच्या गोळ्या घरात जागोजागी उंदीराना खाण्यासाठी ठेवतात. त्यामुळे गणेश प्रसन्न होतो अशी तेथील लोकांची समजूत आहे. पण ही प्रथा का चालू झाली याबद्दल पुराणात कुठेही उल्लेख नाही. काठेवाडांत घरोघरी गणपतीची मूर्ती असते. त्याची पूजा ते लोक वैशाख शुक्ल चतुर्थीला तूप आणि शेंदूर लावून गणपतीची पूजा करतात पण महाराष्ट्रप्रमाणे नवीन मूर्ती आणून त्याची पूजा करीत नाही. उत्तरेत सुद्धा हा सण महाराष्ट्राप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला पाळण्याची परंपरा दिसत नाही.
असे हे दैवत महाराष्ट्रात घरोघरी पूजले जात होते आणि आजही पूजले जात आहे. लोकमान्य टिळकांनी या सणाला सार्वजनिक स्वरूप दिले. असे करण्यामागे त्यांची दोन उद्दिष्ट होती. त्यातील पहिले उद्दिष्ट म्हणजे हिंदू समाजाला त्यांच्या धर्माचा एक उत्सव मिळावा आणि दुसरे उद्दिष्ट म्हणजे हिंदू धर्मातील सर्व जातीजामातीचे लोक एकत्र करून विचारांची देवाणघेवाण होऊन हिंदू समाज संघटित होईल व जागृत होईल. त्यावेळी हा सण हिंदू धर्मातील सर्व समाज मोठया आपुलकीने आपल्या घरोघरी साजरा करीत असे. लोकमान्यांनी या सणास १८९३ मध्ये सार्वजनिक रूप दिले. पुढे स्वातंत्र्याच्या लढ्यातील महत्व सांगण्यासाठी या धार्मिक सणाचा उपयोग लोकमान्य टिळकांनी खूप करून घेतला. बिपीनचंद्र पाल हे आपल्या इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडेंन्स या पुस्तकात लिहितात की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रचार करण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी देशभक्तीपर काव्ये आणि भाषणे आयोजित केली". असे म्हणतात की बॅ. महमद अली जीनांनी सुद्धा गणपती उत्सवात लोकमान्य टिळकांबरोबर राष्ट्रवादी विचारांची भाषणे केली आहेत. लोकमान्यांनी निर्माण केलेली सार्वजनिक गणपतीची रूढी पुढे ते तुरुंगात गेल्यानंतरही चालू होती. यावर भाष्य करताना डॉ सदानंद मोरे आपल्या एका लेखात म्हणतात की लोकमान्य तुरुंगात गेल्यानंतर गणेशोत्सवात राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम चालू होते पण त्यात भडकपणा नव्हता किंवा कमी झाला होता. जेव्हा लोकमान्य टिळाकांचे अग्रलेख वाचत असताना एका गोष्टीची माहिती मिळाली ती अशी की खरा सार्वजनिक गणेशोत्सव १८९२ मध्ये भाऊसाहेब लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी यांनी प्रथम सूरू केला. व्यवसायाने भाऊसाहेब रंगारी वैद्य होते आणि सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. या गोष्टींची संपूर्ण माहिती मंदार लवाटे यांच्या, " पुण्यातील गणेश विसर्जन १२१ वर्षाचा " या पुस्तकात मिळते. आजही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामुळे वातावरणात एक वेगळा उत्साह निर्माण झालेला असतो. हा उत्साह सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करणे, गरजवंताना मदत करणे, अनेक स्पर्धांचे आयोजन करून चांगल्या गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, अनेक जुन्या चांगल्या गोष्टींची माहिती लोकांना उपलब्ध करून देणे असे काही कार्यक्रम केले तर या उत्सवाचे महत्व अजून वाढेल आणि सार्वजनिक गणेशोत्सव सर्वार्थाने सफल होईल.
गणेश किंवा गणपती हा एक आद्य देव असला तरी हे दैवत भक्तांना मार्ग दाखवत असते. याची नोंद आपल्याला अनेक पुराणातून मिळत असते. या उत्सवाच्या दिवशी खूपच आनंद मिळतो. लोकमान्य टिळकांनी या दैवताला माजघरातून चौकात आणले आणि या माध्यमातून लोकांचा एकमेकांशी उघडपणे संपर्क वाढविण्यास मदत होऊ लागली. त्यामुळे अनेकांच्या गाठीभेटी होऊन सर्व समाजात आपुलकी व प्रेमभावना वाढण्यास मदत होते. हा सण आता हिंदू धर्माप्रमाणे इतर धर्मीय सुद्धा पाळत असताना दिसतात. मुंबईच्या लालबागच्या राजाचे महत्व इस्लाम धर्मीय सुद्धा मान्य करतात. त्याचप्रमाणे ज्यू, इसाई, पारशी, शीख धर्मीय सुद्धा या देवतेचे मोठेपण मान्य करून साजरा करताना दिसतात. त्यामुळे हा सण भारतीय संस्कृतीचे वेगळेपण जपून ठेवण्यास मदत करतो. इतर कुठल्याही उत्सवापेक्षा गणेशोउत्सव हा उत्सवांचा शिरोमणी आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. म्हणून या लेखाचा शेवट मी खालील श्लोकाने त्याचा अर्थ सांगून करीत आहे.
नमस्तस्यै गणेशाय ब्रम्हविद्या प्रदायिने |
यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशेषणे ||
ज्याच्या नावामध्ये विघ्नसमुद्राचे अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ आहे आणि वेदांताचे ज्ञानही जो करून देतो, अशा या गणपतीस नमस्कार करतो आणि दरवर्षी हा गणेशोत्सव साजरा होवो आणि त्याचा आम्हा सर्वांना आनंद मिळत जावो हीच गणपतीच्या चरणी इच्छा.
धन्यवाद
Comments
Post a Comment