Skip to main content

Amar Sheikh-शाहीर अमर शेख

 विषय : व्यक्तीचरित्र शाहीर अमर शेख

शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

माझ्यावर काही डाव्या विचारांच्या लोकांचा पगडा नाही. हे जरी खरे असले तरी इतिहासाचा अभ्यास करताना सर्व प्रकारच्या विचारांच्या लोकांची दखल घ्यावीच लागते. याला कारण म्हणजे त्यांचे भारतीयत्व प्रत्येक चळवळीत प्रखरतेने दिसून येते. मग तो लढा भारतीय स्वातंत्र्याचा असो किंवा संयुक्त महाराष्ट्राचा, गोवा मुक्ती आंदोलनाचा असो किंवा कामगार चळवळीचा. अशा चळवळीतून या लोकांनी भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनाला आकार देण्याचे महत्वाचे काम केले आहे. त्यासाठी जात, धर्म किंवा कुठलाही पंथ यासारख्या गोष्टी त्यांच्या कार्याच्या आड आल्या नाहीत. त्यापैकी एक नाव आहे मेहबूब शेख पटेल पण त्यांना सर्व महाराष्ट्रातील समाज ओळखतो ते शाहीर अमर शेख या नावाने. महाराष्ट्राचा प्रखर अभिमान असलेला हा माणूस कडवा राष्ट्रभक्त तर होताच पण स्वातंत्र्य भारत त्यांना साकारायचा होता तो महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला. म्हणजेच एकता आणि समतेवर आधारलेला समाज निर्माण करावयाचा होता. याची जाणीव त्यांची काव्ये किंवा लोकनाट्ये वाचताना सतत होत असते. स्वतः लिहिलेली व इतरांची काव्ये ते प्रभावीपणे आपल्या बुलंद आवाजात सादर करीत असत. जेव्हा भारतावर चीन आणि पाकिस्तान या देशांनी आक्रमण केले तेव्हा त्यांनी आपली  स्वालिखित कवने गाऊन लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाचा लोकांचे जीवन समाजातील सर्व थरातील लोकांना सांगण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा मनोसक्त वापर केला. त्यासाठी त्यांनी लावणी, पोवाडे, गीते व लोकनाट्ये रचली आणि आपल्या बुलंद आवाजात जनसमुदायात गाऊन आपली लेखणी ज्वलंत करून रौद्र रसाचा अविष्कारही आपल्या कवनातून घडविला.

शाहीर अमर शेख यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी भुसावळ येथील बार्शी या गावी एका गरीब मुसलमान कुटुंबात झाला. त्यांचे वडील हुसेन शेख हे रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस होते तर त्यांच्या आई मुनेरबी या गृहिणी आणि कवियित्री होत्या. असे म्हणतात अमर शेख यांना काव्याचा वारसा आपल्या आईकडून मिळाला. पुढे हुसेन शेख आणि मुनेरीब शेख यांचा घटस्फोट झाल्यानंतर अमर शेखांची जवाबदारी त्यांच्या आईने घेतली आणि खूप कष्ट करून त्यांच्या आईने त्यांना वाढवलं. आईच्या कष्टांची जाणीव अमर शेख यांना होती. म्हणूनच लहानपणापासून जे काही काम हाती पडेल ते करू लागले. कधी ते ट्रकवर क्लीनर म्हणून काम करीत तर कधी पाणक्याचं काम करीत. बारा वर्षांचे असताना त्यांनी बार्शी येथील राजन मिलमध्ये कामगार म्हणून काम करू लागले. या सर्व गोष्टीमुळे त्यांना औपचारिक पद्धतीचे शिक्षण घेता आले नाही तरीसुद्धा त्यांनी अशी काही काव्ये रचली की ती वाचतांना थक्क होऊन जायला होते.  गाण्याचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बार्शीतील नारायण भट यांच्याकडून घेतले पण आर्थिक परिस्थिती आणि कामाच्या व्यापामुळे त्यांना गाण्याचे शिक्षणही सोडून द्यावे लागले. आपल्या आईच्या कविता ऐकता ऐकता ते स्वतःच कविता करू लागले आणि वेळ मिळेल तसा गाण्याचा सराव करू लागले. राजन मिलमध्ये काम करत असताना त्यांना कामगारांचे दुःख जवळून पाहण्यास मिळाले आणि आपल्या परीने ते दूर करण्याचा प्रयत्नही करू लागले. त्यांचे दुःख ते आपल्या काव्यात मांडू लागले आणि ते कामगारांच्या मेळाव्यात गाऊ लागले. हा प्रकार जेव्हा कामगार नेत्यांच्या नजरेत आला तेव्हा त्या नेत्यांनी अमर शेखाना वेगवेगळ्या भागातील कामगार मेळाव्यात गाण्यासाठी आमंत्रित केले. त्यात त्यांची ओळख गिरणी कामगार चळवळीचे नेते कमलाकर पिंपरकर आणि रघुनाथ कऱ्हाडकर यांच्याशी झाली. हे दोघेही नेते डाव्या विचारांचे होते आणि त्यांच्याबरोबर ते विविध ठिकाणी कार्यक्रम करू लागले. इथेच त्यांची ओळख डाव्या विचारांशी झाली  पण ते संकुचितपणे एकाच ठिकाणी अडकून राहिले नाहीत.

कामगार चळवळीचे काम करत असताना त्यांनी गिरणी कामगारांचे प्रश्न मांडताना इंग्रज सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. विसापूर येथील गिरणी कामगारांचा संप स्वतः पुढाकार घेऊन घडविल्यामुळे त्यांना एक वर्षाचा तुरुंगावास भोगावा लागला. तुरुंगातून सुटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवली होती. ती चुकवत ते कोल्हापूरला आले आणि मास्टर विनायक यांच्या स्टुडिओत काम करू लागले. तिथेच त्यांचे नामकरण अमर शेख असे झाले. पुढे त्यांनी इ. स. १९३० च्या सुमारास महात्मा गांधीनी पुकारालेल्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला आणि अनेक ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याची काव्ये गाऊन जनजागृती करण्याचे काम करू लागले. १९३९ पासून  १९४२ पर्यंत ते ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध घोषणा देऊ लागले. कवी कुसुमाग्रजानी लिहिलेली गर्जा जयजयकार क्रांतीचा ही कविता स्वतः चाल देऊन त्यांनी याच काळात अजरामर केली. त्यामुळे अनेकजणांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याचे बळ मिळाले. त्यात त्यांना अटक होऊन अठरा महिन्यांची शिक्षा झाली. त्याच काळात त्यांची ओळख कुसुम शामराव जयकर उर्फ ज्योती यांच्याशी झाली आणि १९४७ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रेरणा आणि मल्लिका अशा दोन कन्या झाल्या. त्यातील मल्लिकाने नामदेव ढसाळ बरोबर तर प्रेरणाने अनिल बर्वे यांच्याशी विवाह केला. मल्लिका शेख या आपल्या वडिलांप्रमाणे कवियित्री आणि लेखिका आहेत. पुढे देश स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक कार्यक्रम आखले. कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर या कम्युनिस्ट नेत्यामुळे ते भारतीय कम्युनिस्ट पक्षांचे सभासद झाले. मग त्यांनी बार्शीमध्ये शेतसारा वाढीविरुद्ध भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली २५ हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी कामगार वर्गालासुद्धा संघटिक केले होते. त्याची सुरुवात त्यांनी बार्शी पासूनच केली. तेथे त्यांनी त्यासाठी आयटक नावाची केंद्रीय कामगारांची शाखा निर्माण करून गेट सभा, आंदोलने चालू केली. हे सर्व होत असताना त्यांनी अजून दोन महत्वाच्या आंदोलनात भाग घेतला आणि ती दोन आंदोलने म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि गोवा मुक्तीचे आंदोलन.

संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनाने ते  महाराष्ट्रवादी झाले तर गोवा मुक्ती आंदोलनाने कडवे देशभक्त. या दोन्हीही गोष्टीचा देखावा त्यांच्यापाशी नव्हता. आंदोलनात त्यांनी अनेक पोवाडे, लावण्या, कविता आणि लोकनाट्ये लिहिली आणि तेवढ्याच ताकदीने ती सादर केली. त्यांच्या या लेखणीला लोककलेच्या क्रांतीची धग होती आणि त्यातूनच लोकांची जनजागृती होण्यास मदत होत होती. त्यासाठी त्यांनी लोककला पथकाची स्थापना केली. यामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, शाहीर द. ना. गव्हाणकर यांना बरोबर घेतले. त्यात त्यांनी अनेक काव्ये रचली आणि अतिशय रसाळ आवाजात लोकांपुढे सादर केली. १९६० ला संयुक्त महाराष्ट्र झाला आणि १९६१ ला गोवा पोर्तुगल सम्राज्यातून मुक्त होऊन भारतीय घटक राज्यांमध्ये सामील झाला. त्यावेळी त्यांनी गायलेली दोन गाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या गाण्याला कोरस सुद्धा जमलेला जमावसुद्धा देत होता. ती दोन काव्ये होती " गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती " व "खुशाल कोंबडे झाकून धरा". त्याचप्रमाणे शाहीर अण्णाभाऊ साठेनी लिहिलेली, दत्ता गव्हाणकरांनी संगीत दिलेली आणि शाहीर अमर शेख यांनी गायलेली "माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते या काहीली"  हे गीत सुद्धा त्यावेळी खूप गाजले होते. या कला पथकाने महाराष्ट्र दणाणून सोडला. या पथकाने  महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात महत्वाचे कार्य केले आहे. जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी एक अजरामर काव्य केले ते म्हणजे, " बर्फ पेटला हिमालयाला  विझवायला चला". या गोष्टी वाचतांना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ते जरी कम्युनिस्ट पक्षाशी निगडित असले तरी त्यांचे विचार त्या संघटनेपुरते संकुचित नव्हते. फक्त एक राजकीय संघटना म्हणून ते त्या पक्षाशी निगडित होते.  त्यांचा कार्याचा आढावा घेत असताना मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे म्हणतात " अमर शेख हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या भारताचे शाहीर होते. त्यांची शाहिरी केवळ एका चळवळी पुरती मर्यादित नव्हती तर महाराष्ट्रातील तसेच देशातील कामगार, दलित, बहुजन, कष्टकरी यांची हाल-अपेष्टा आणि कष्टाच्या बेडीतून सुटका करून देणारी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेताना त्यांनी मराठी माणसांची व्यथा मांडली. मराठी माणसांची व्यथा मांडताना ते मुस्लिम नसतात किंवा कोणत्याही पक्षाचे नेते नसतात. आणि जेव्हा भारत मातेचे वर्णन करतात तेव्हा ते एक महाराष्ट्रीयन नसतात. ते एक विद्रोही कवी होते, पण त्यांनी समतेच्या मार्गातून विद्रोह केला".

शाहीर अमर शेख यांच्यावरील कुठलाही लेख अपुरा राहील जर त्या लेखात त्यांनी शिवाजी महाराजांवर रचलेल्या पोवाड्याचे वर्णन केले नाही. आपल्या पोवाड्यात त्यांनी शिवाजी महाराज कसे राजे होते याचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, " शिवबा सरजा राजा होतो, भूमिहीना प्रेम कळवितो, त्यांना जमिनी मिळवून देतो, बियाणं देतो, भू लागवडीला आणतो असे सांगून ते पुढे लिहितात शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर भूमिहीनांवर प्रेम असलेले, त्यांना त्यांचे हक्क देणारे, शेतकऱ्यांना त्यांची जमीन फुलवून देणारे प्रजाहितदक्ष राजे होते. म्हणूनच ते समाजवादी होते ". त्यांनी आपल्या पोवाड्यातून शिवाजी राजांचे नुसते चरित्र सांगितले नसून त्यांनी राजांच्या कार्यपद्धतीचे बारकावे आणि तत्कालीन समाज जीवनावर त्यांचा काय प्रभाव होता हे खूपच छानपणे मांडले आहे. शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनी मल्हारराव होळकर, उधमसिंह यांच्यावर सुद्धा पोवाडे रचले आहेत. म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर त्यांना राष्ट्रीय शाहीर म्हणत असे. ते नुसते मनस्वी कवी नव्हते तर जनस्वी लोकशाहीर होते. आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचे झाले तर ," अमर शेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी आणि धुंदी यांची जिवंत बेरीज". अशा या लोकशाहीरांचे दोन काव्यसंग्रह कलश आणि धरतीमाता हे १९५८ व १९६३ प्रसिद्ध झाले होते ते आजही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे अमरगीत हा गीतसंग्रह ही उपलब्ध आहे. १९५१ साली त्यांनी लिहिलेले पहिला बळी हे नाटक व युगदीप मध्ये लिहिलेले लेख सुद्धा खूप वाचनीय आहेत आणि आजच्या काळातही विचार करायला लावणारे आहे. त्यांनी रचलेल्या काही कवनांचा उल्लेख येथे जरूर करावसा वाटतो. १९४२ सालाच्या चले जाव चळवळीत भाग घेताना ते म्हणतात, "चले जाव, चले जाव, चले जाव, चले जाव माजोरी ऐतखाऊ उन्मत पशुंनो जाव, गोरे काळे सगळे जाव, जाव चले जाव ", तर कामगारांसाठी व शेतकऱ्यांसाठी  ते म्हणतात," काळ्या आईचा सखा पुत्र तू, तूच खरा घनश्याम, राजा कुणबी हरे राम ".  आणि शिवाजी महाराजांच्या वरील पोवाड्याची सुरुवात करताना ते लिहितात," एक रात्री सह्यागिरी हसला | हसताना दिसला | आनंद त्याला कसला | झाला उमगेना मानवाला ||".  अशी सुरुवात करून ते पुढे लिहितात, " सूर्य नव्हता शिवबा जन्मले | विश्व आनंदले | गाऊ लागले चराचर होऊन शिवबाचे भाट || आगळा होता त्याच्या गाण्याचा थाट | काढली शाहिरानं त्यातुनच वाट ||". या पोवाड्याचा शेवट करताना ते लिहितात, " सत्तेचा नांगर जरबेंत त्यानं चालवावा | नाफेबाज चोर त्यानं सर्व दूर सारावा | अवघा समाज समृद्धीसुखी बनवावा | त्या थोर समाज शिवबाचा पोवाडा गावा | ही फक्त अमर अभिलाषा | दुजी नाही भाषा | एक ही आशा | शाहिराचा गोड हट्ट पुरावावा ||".

अशा या शाहीर अमर शेखचा मृत्यू २९ ऑगस्ट १९६९ रोजी इंदापूर येथे अपघातात झाला. एक श्रमिक म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या उत्थनाचे स्वप्न पाहिले. उत्तम काव्य रचली आणि स्वतःच्या बुलंद आवाजात गाऊन जनजागृती केली. तरीसुद्धा ते दुर्लक्षित राहिले. ते मुस्लिम होते, पण प्रखर राष्ट्रवादी होते. कम्युनिस्ट होते पण त्यांच्या सारखे संकुचित विचार करणारे नव्हते. आपल्या कलेवर येणारी पक्षाची बंधने त्यांनी झूडकारून लावली. त्यामुळे कम्युनिस्टपक्षांनी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर वारकरी पंथाचा आणि बहुरंगी भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता. म्हणून त्यांच्या कविता आणि शाहिरी लोकांच्या ओठावर रुजली, फुलली. खऱ्या अर्थाने ते लोकशाहीर होते. अशा भारतमातेच्या सुपुत्रास जो महाराष्ट्रात जन्मला त्यास त्रिवार सलाम. त्यांनी लिहिलेल्या आईवरील काव्याचा उल्लेख करून हा लेख संपवतो.

" तूच दाखविले विश्व मनोहर, हे परमेश्वर आई
तूझ्याविना या जगी दुजा मज, गे परमेश्वर नाही ".

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...