Skip to main content

Shrikrishna-कृष्ण

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १४९

विषय : कृष्ण
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :

भारतीय संस्कृतीमध्ये सर्व देवांमध्ये मला तीन देवतांचे चरित्र खूपच आवडते. त्या देवता म्हणजे भगवान शिवशंकर, गणपती आणि श्रीकृष्ण. खरोखरचं या तिघांमध्ये अशी काय लोकविलक्षण शक्ती आहे की त्याबद्दल कितीही वाचले किंवा ऐकले तरी मन भरत नाही. त्यातही भगवान श्रीकृष्णाचे चरित्र मला फारच मोहवते. याचे कारण म्हणजे गूढ आणि मोहक हे गुण एकाच वेळी असणारे त्याचे व्यक्तिमत्व फारच लोकविलक्षण आहे. म्हणूनच  त्याचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्याचे पराक्रम कुठल्याही संकुचित जगात सामावणे अशक्य आहे. ज्यांचा खूप मोठा व्यासंग आहे किंवा खोलवर जाऊन केलेला अभ्यास आहे, त्यांना सुद्धा त्याच्या चरित्राचे विवेचन सहजपणे करणे जमले नाही. याला कारण त्याच्या चरित्र्यात बालपणी केलेल्या लबाडया आहेत, चोऱ्या आहेत, गोपिका आहेत म्हणून रासक्रीडा आहेत, संगीत आहे, लढाई आणि पराक्रम आहेत,  राजकारण आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या चरित्र्यात तत्वज्ञानाचा फार महत्वाचा भाग आहे. श्रीकृष्ण पराक्रमी आहे, शत्रुंचा नाश करणारा आहे, गरजेच्यावेळी धावून येणारा मित्र आहे आणि भगवद गीतेचा प्रवक्ता आहे. तो पराक्रमी असून सुद्धा महत्वाच्या युद्धात शस्त्रे न घेता सारथी बनून मार्गदर्शन करतो, कंसाचा वध करून तो स्वतःच्या ताकदीवर साम्राजाची उलथा पालथ करतो आणि तो भोगविलास असून सुद्धा वैराग्य आणि संयम यांचा प्रतिनिधी आहे. कोणत्याही साम्राज्याचा मोह तो धरत नाही. तो जे काम करतो ते स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन प्रेमाने करतो. कुठलेही राज्य न उपभोगता गणतंत्राचा नेता आहे. त्याच्यामध्ये वर्णश्रेष्ठत्व नावाचा अहंकार कुठेच आढळत नाही. म्हणून तो गवळ्यांचा सुद्धा देव आहे. भारतीय संस्कृतिवर  त्याच्या विविधांगी वा बहुव्यापक व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका खोलवर रुजला आहे की कधी तो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जाणवत असतो. म्हणूनच तो लोकविलक्षण देव आहे. अशा या देवाचे चरित्र आपल्याला वाचावायस मिळते ते महाभारतात , हरिवंशात , भागवतात आणि ब्रह्मवैवर्त पुराणातही.

अशा लोकविलक्षण देवाचा जन्म मानवी रूपात श्रावण मासी कृष्णपक्ष अष्टमीच्या दिवशी रात्री मृत्यूच्या अटीतटीत, भीतीच्या भोवऱ्यात, आशेच्या अमर आश्वासनात भगवंत चंद्रवंशातील यादव कुळात झाला. असे म्हणतात की कृष्ण जन्माच्या वेळेस गंधर्व आणि किन्नर लोकांतील निवासी गायन करू लागले. सिद्ध आणि चारण लोकांतील निवासी त्याच्या सेवेची स्तुती गान गाऊ लागले. स्वर्गीय देवदूत आपल्या रमणी बरोबर नृत्य करू लागले. ऋषी आणि देव आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले. कारण भगवान विष्णूने परत एकदा मानवी रूपात कृष्ण वासुदेव या नावाने आपला आठवा अवतार घेताना देवकीच्या पोटी जन्म घेतला होता. कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला खरा पण त्याच्या जन्माबरोबर तिला विरहाचा चटका पण लावला. देवकी कडून तो गोकुळात यशोदा आणि नंद यांच्या घरी येतो. तिथे तो रांगतो, खडा लागला म्हणून तो रडतो, हट्ट करतो, मार खातो, खोड्या करून जीवाशी गाठ आणतो. हे सर्व करत असताना यशोदेच्या त्रासलेल्या मनाला उभारी देऊन टवटवीत करतो. म्हणूनच कृष्णाचे बाळपण घरोघरी खेळत राहते. प्रभू रामचंद्रासारखे बालकांडातच अडकून पडत नाही. कृष्णाचे बाळपण सर्वाना आठवते आणि प्रभू रामचंद्राचे कुणालाच आठवत नाही. याला कारण म्हणजे प्रभू रामचंद्र मानव रूपात देव म्हणून राहिले तर भगवान श्रीकृष्णानी देव म्हणून जन्म घेतला असला तरी जगले माणसासारखे. खरोखरच श्रीकृष्णाप्रमाणे कोणाचेच बालपण छानपणे आठवत नाही मग ते बुध्दाचे असो वा ख्रिस्ताचे. कारण दोघांनचेही बाळपणसुद्धा प्रौढपणाने केव्हाच संपवून टाकले आहे..

श्रीकृष्ण पुढे तारुण्यात अनेक गवळी मित्र मिळवतो. त्यांच्या बरॊबर खेळताना अनेक लबाड्या करतो, अनेकदा चोऱ्या सुद्धा करतो, बायकांच्या खोड्या सुद्धा काढतो तरीसुद्धा भाबडी मुले आणि गोपी त्याच्यासाठी प्राण देण्यास सिद्ध होतात. गाईगुरे त्याच्या वत्सल स्पर्शाने सुखावतात व त्यांचे प्रसव वाढत जाते आणि दूधभत्याचे पाट वाहत जातात. म्हणूनच कृष्णाच्या गवळी मित्रांना आणि गोपिकांना वैदिक यज्ञयागात मग्न न होता फक्त श्रीकृष्णाच्या प्रेममय दिव्य सेवेत संलग्न होऊन ते सर्व प्रकारच्या ऋणांतून मुक्त होऊ पाहत होते. हे सर्व प्रकार श्रीकृष्णाने जाणले होते. म्हणूनच त्याने कोणत्याही भौतिक समृद्धीसाठी देवीदेवतांची उपासना करण्याची गरज नाही असे सांगून तो म्हणतो, " देवातांची उपासना करून मिळणारे लाभ केवळ क्षणभंगुर आणि केवळ अल्पबुद्धीच्या लोकांनाच अशा नाशिवंत वरदनामध्ये स्वारस्य असते. तसेच, देवोपासनेपासून जे काही आस्थायी लाभ प्राप्त होतात त्या सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या परवानगीनेच प्राप्त करून दिले जातात. पूर्ण भगवंताच्या परवानगीशिवाय कोणालाही वरदान देण्याचे सामर्थ नाही ; परंतु देवतांना भौतिक प्रकृतीच्या प्रभावाने गर्व होतो. ते स्वतःलाच सर्वेसर्वा समजू लागतात आणि भगवंताच्या परम सामर्थ्याला विसरतात ". म्हणून तो देवराज इंद्रासाठी करण्यात येणारा वृंदावनातील पारंपारिक पद्धतीने होणारा वैदिक यज्ञ थांबवतो आणि सर्वांना गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगतो. त्यामुळे देवराज इंद्र क्रोधित होतो आणि सर्व मेघांना वृंदावनात जाऊन संपूर्ण व्रजभूमी मुसळधार पावसाच्या पाण्याने बुडवून टाकण्याची आज्ञा देतो. देवराज इंद्राची आज्ञा प्रमाण मानून मेघांनी वृंदावन पाण्याखाली जाईल अशी व्यवस्था केली. श्रीकृष्णाने या सर्व गोष्टींची जवाबदारी घेऊन एका हाताने गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि वृंदावनवासी लोकांना त्यांच्या गाई, वासरे, बैल सुरक्षितपणे  गोवर्धनाखाली आश्रयाला आणले. त्या काळात त्यांना तहान, भुकेचा कोणताच त्रास झाला नाही, त्यांची कुठलीही गैरसोय झाली नाही आणि देवराज इंद्राचा गर्वहरण होण्यास मदत झाली. अशा प्रकारे आपल्या लीला करीत श्रीकृष्ण नवीन तत्वज्ञान निर्माण करत होता.

श्रीकृष्णाच्या आयुष्यात वेगवेगळ्या बायका आहेत. काही पुराणे त्याला सहस्त्र सोळा बायकां असल्याचे सांगतात.  आपण इथे तीन बायकांचा उल्लेख करू. त्या म्हणजे सत्यभामा, रुक्मिणी आणि राधा. द्रौपदीचा उल्लेख पुराण कथेत किंवा महाभारताच्या इतिहासात त्याची सखी म्हणून होतो. तिच्या प्रत्येक हाकेला तो मदत करण्यासाठी धावून येतो आणि ती सुद्धा कृष्णाची सखी म्हणूनच मिरवते. वस्त्रहरणाच्यावेळी द्रौपदीच्या मदतीला येऊन तिला वस्त्रे पुरवून तो तिची लाज राखतो. तेव्हा त्याच्यावर होणारे व्यभिचाराचे आरोप किती मूर्खपणाचे आहेत हे यातून सिद्ध होते. इथे आपण सुरुवात करूया  सत्यभामेपासून. सत्यभामेबरोबर त्याचा विवाह पारंपारिक पद्धतीने आईवडिलांच्या पसंतीने झाला आहे. ती त्याची धर्मपत्नी आहे. त्याच्यासाठी ती संसारातील सर्व सुख-दुःखे भोगायला तयार आहे. ती आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे. तरीसुद्धा तिची प्रतिमा भांडकुदळ आहे. या भांडणाचे कारण म्हणजे तिच्या आणि कृष्णामधील प्रेमात तिला दुसरी वाटेकरीण मान्य नाही. या मुद्यावर आग्रही असणारी प्रामाणिकपणे संसार करणारी सत्यभामा एक दुर्मिळ स्त्री आहे. या सत्यभामेपेक्षा प्रेमाचे अधिक वरचे रूप म्हणजे रुक्मिणी ! रुक्मिणीची भूमिका निराळी आहे. कारण कृष्णानेच तिची निवड केली आहे आणि तिने त्याला प्रियकर मानले आहे. काहीही पदरात पडले म्हणून तिने स्वीकारले नाही, पण जे आवडले ते पदरात पाडून घेण्याचा तिने प्रयत्न केला आहे. ती कृष्णावरील प्रेमात खुश आहे, त्याच्याशी संसार करायला मिळतो यावर ती आनंदी आहे. त्यामुळे तिच्या प्रेमात वाटेकरी किती आहेत याची याची तिला पर्वा नाही. सत्यभामेप्रमाणे ही सुद्धा दुर्मिळ स्त्री आहे. तरीसुद्धा रुक्मिणी हे भारतीय पुराणानुसार  प्रेमकल्पनेचे सर्वोच्च रूप नाही. त्याचे सर्वोच्च रूप आहे राधा ! सत्यभामेचा वरचा टप्पा रुक्मिणी आहे तर रुक्मिणीचा वरचा टप्पा राधा आहे. ती श्रीकृष्णावर फक्त निर्मळ प्रेम करते. त्याने तिच्याशी लग्न करावे म्हणून तिची इच्छा नाही तसेच नित्य सहवास घडावा याचीही इच्छा नाही. कृष्णाच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या तरी तिला काहीही फरक पडत नाही. म्हणूनच जगातील साहित्यातील खास करून काव्यात राधा आणि कृष्ण यांचे प्रेम सर्वात मधुर वा उदात्त स्वरूपाचे आहे. राधेमुळेच श्रीकृष्णाच्या चरित्र्याला काव्यात मोठा प्रवाह झाल्याचे दिसून येते. जसे आपण श्रीकृष्णाचे चरित्र वाचतो तेव्हा एक गोष्ट आपणास जाणवते ती म्हणजे रुक्मिणीला कृष्णच्या चरित्र्यात कवडीचीही किंमत नाही. कारण श्रीकृष्णाबरोबर नेहमी सत्यभामाच आहे. महाभारतात रुक्मिणी आहे ती केवळ त्याची बायको म्हणून. पण कृष्णाबरोबर सदैव सत्यभामा आहे त्याची पट्टराणी म्हणूनच कारण त्याच्या आठ बायकांमध्ये सत्यभामाच यादव कुळातील आहे. जर त्याच्या चरित्र्याचा नुसता अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल की पहिल्यांदा राधा जाते, मग रुक्मिणी आणि शेवटपर्यंत राहते ती सत्यभामा.

श्रीकृष्णाचे चरित्र वाचताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्याने प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणले. प्रत्येक गोष्ट करताना त्याने अमर्याद सौंदर्य आणि चैतन्य ओतले. लहानपणी खेळात त्याचे पटूत्व होते. जीव ओतून तो खेळला. विनोदाचे अंग सुद्धा मनमुराद जोपासले. त्याचा पिंड कलेचा पण आहे. संगीताचा तो उपासक आहे. त्याने बासरी हे वाद्य घेतले आणि त्यात त्याने आपले प्राण फुंकून ते वाद्य मोठे केले. असे म्हणतात की श्रीकृष्णाला हे वाद्य भगवान शंकराने दिले आहे. जेव्हा भगवान विष्णूने कृष्ण रूपात आपला आठवा अवतार घेतला तेव्हा अनेक गंधर्व, देवता वेष बदलून कृष्णाची भेट घेऊ लागले. भगवान शंकर आणि भगवान विष्णुना एकमेकांबद्दल खूप आदर होता. म्हणून कृष्णावतारातील भगवान विष्णुना भेटण्यासाठी भगवान शंकर अधीर झाले होते. त्यासाठी त्यांनी विश्वकर्मांना त्यांच्याकडे असलेल्या ऋषी दधीचींच्या हाडापासून एखादी सुंदर बासरी बनवावी अशी विनंती केली. त्यानंतर विश्वकर्मानी सुंदर आणि मोहक अशी बासरी बनवली आणि ती बासरी भगवान शंकरांना दिली आणि भगवान शंकरांनी ती बासरी गोकुळात जाऊन श्रीकृष्णास दिली आणि कृष्णाने ती बासरी त्याच्याकडे शेवटपर्यंत ठेवली. इथे ऋषी दधीचीचा उल्लेख आला आहे. त्याबद्दल थोडे सांगणे जरुरीचे आहे. ते महान ऋषी होते. त्यांनी  धर्मासाठी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि आपल्या शरीरातील सर्व हाडे दान केली. दधीची ऋषींनी दान केलेल्या हाडांपासून विश्वकर्मांनी पिनाक, गांडीव, शारंग आणि इंद्रासाठी वज्र तयार केले होते. ही गोष्ट भगवान शंकरांना माहित होती. म्हणूनच त्यांनी इतकी सुंदर बासरी श्रीकृष्णासाठी तयार करून घेतली. आज भारतीय शास्त्रीय संगीतात कृष्णाचे नाव अजरामर आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा तो आत्माच आहे. सर्व धर्माचे गायक भारतीय संगीत गाताना त्याचे नाव घेतच असतात. त्याच्याशिवाय भारतीय संगीत शक्यच नाही. नुसते संगीत नाही पण चित्रकला, काव्य, नाटक, नृत्य अशा सर्व भारताच्या सांस्कृतिक जीवनाला श्रीकृष्ण चरित्र आधारभूत राहिले आहे.

श्रीकृष्णाचे सर्वात मोठे कार्य आहे ते महाभारतात. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस श्रीकृष्ण महाभारतात येतो. त्यावेळीस तिथे रूप बदलून आलेल्या पांडवाना तो सहज पणे ओळखतो. पांडवांची आई कुंती ही वासुदेवाची बहीण असते म्हणजे कृष्णाची आत्या असते. पण तो पांडवांच्या जवळ जातो केवळ नाते आहे म्हणून नाही तर पांडव नेहमी धर्मसंकल्पनेप्रमाणे आचरण करत असतात  म्हणून. महाभारताचा तो नायक नाही पण त्याच्याशिवाय महाभारत शक्य नाही. कारण इथेच तो राजकारणी आहे, शांतिदूत आहे, पांडवचा मित्र आहे, तत्वज्ञानी आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो भगवद गीतेचा प्रवक्ता आहे. इथे त्याचा वावर हा  राजनीतीनिपुण मुत्सद्दी या रूपात आहे. त्याची ही भूमिका धर्माची म्हणजे नैतिक मूल्यांची चाड बाळगणाऱ्या तत्ववेत्वाची आहे. हे तत्वज्ञान कर्माचे आहे, राजकारणाचे आहे. म्हणूनच महाभारत आणि कृष्ण एकमेकांत एवढे गुंतले आहेत, की त्यांना एकमेकांपासून वेगळे करताच येणार नाही. कृष्णाच्या हस्तक्षेपाशिवाय महाभारत पुढे जाऊ शकत नाही. इथे त्याच्या रूपाने राजनीतीच वावरत असते. यादव आणि पांडवानी त्याचे नेतृत्व स्वीकारले ते उगीच नाही. त्याचे राजकीय मार्गदर्शन आणि चातुर्य हेच पांडवांच्या  यशाचे मुख्य कारण आहे. महाभारतात त्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. त्याने जो उपदेश केला आहे, त्याने जे काही घडवून आणले आहे त्यामागे मानवी जीवनाचा स्वतंत्र असा विचार आहे. त्यामुळेच इथे तो भीष्म आणि विदुराप्रमाणे  राजनीतिज्ञ आहे. कृष्णही या दोघांचा आदर करत असतो. जेव्हा जेव्हा तो हस्तीनापुरात येतो तेव्हा दुर्योधनाचे वैभवसंपन्न आणि श्रीमंती थाट नाकरतो आणि विदुराकडे जाऊन राहतो. त्याचप्रमाणे तो भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांच्याशी सुद्धा विचारविनिमय करतो. पांडवाना तो राजसुय यज्ञ करण्यासाठी तयार करतो पण त्यासाठी जरासंध वध जरुरीचा आहे असे सांगून तो भीम आणिअर्जुन यांना घेऊन जरासंधाला आव्हान देतो. मग भीम जरासंधाचा वध करतो. त्यामुळे अनेक यादव खुश होतात कारण मथुरेची राजवट स्थिर होते. अशी अनेक प्रकरणे महाभारतात येतात. त्यामध्ये शिशुपाल वध सुद्धा आहे. युद्ध टाळण्याचा शेवटचा उपाय म्हणून तो शांतिदूत बनून हस्तीनापुरात येतो पण दुर्योधन त्याचे कुठलेही प्रस्ताव मान्य करण्यास तयार होत नाही. त्यामुळे युद्ध अटळ होते. मग युद्धात भीष्म पर्वात तो अठरा अध्यायाची भगवद गीता सांगतो आणि जगाला एक महत्वाचे तत्वज्ञान देऊन जातो. या भगवद गीतेचा उपयोग भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळकांनी, महात्मा गांधींनी सुद्धा केला आहे. विनोबा भावेनी तर गीताई म्हणून त्यावर सुंदर भाष्य केले आहे. या गीतेतील तत्वज्ञानमुळेच श्रीकृष्णाचे जीवन फारच आकर्षक बनते. महाभारतामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी कृष्णाने पांडवाना जो उपदेश केला आहे त्यात कुठेही कपटनीती नसून एका प्रज्ञासंपन्न आणि सदैव जागृत अशा व्यक्तीचे एक विवेचन आहे आणि ते त्यानी नीतीला धरून उघड्या डोळ्यांनी केले आहे.

श्रीकृष्णाचे जीवन समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या वरील लेखातून केला आहे. त्याने निर्माण केलेले तत्वज्ञान त्याच्या कार्यापासून वेगळे करताच येत नाही. त्याचे कार्य म्हणजे त्याने केलेल्या विचारांचा, तत्वज्ञानांचा उत्कर्ष उदाहरण आहे. त्याचा चरित्र्याचा अभ्यास सर्व  मानवजातीला उपयुक्त असा आहे की त्यातून अनेक समस्यांना, चिंताना सहजपणे वा धैर्याने समोरे जाऊ शकू. 

धन्यवाद

संदर्भ

१. व्यासांचे शिल्प : नरहर कुरुंदकर
२. युगान्त : इरावती कर्वे
३. व्यास पर्व : दुर्गा भागवत
४. या सम हा : डॉ. सदानंद मोरे
५. कृष्ण पूर्ण पुरषोत्तम भगवान : कृष्णकृपा मूर्ती
६. K. P. Jaiswal : Hindu Polity
७. À.D. Pusalkar : studies of epics and Puranas in India
८. V. S. Sukahtankar : On meaning of Mahabharata
९. D. D. Kosambi :  Articles on The historical Krsna
१०. Articles of George Harrison on Lord Krishna
११. दैनिक लोकसत्ता मधील काही लेख 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...