रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १४७
विषय : श्रावण
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
खरच श्रावण महिन्यात हर्षाचा झंकार निनादतो. धार्मिकविधि आणि सण यामुळे सगळीकडे भक्तीरस भरलेला दिसतो. त्यामुळेच की काय महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवियत्रीनि अशी काव्य रचली आहेत त्यास तोड नाही. कवी कुसुमाग्रज श्रावण महिन्याचे सुंदर व समर्पक वर्णन करताना म्हणतात, "हसरा नाचरा, जरासा लाजरा सुंदर साजरा, श्रावण आला". तर इंदिरा संत आपल्या श्रावणा या कवितेत निसर्गाचे चंचल स्वरूप सांगताना लिहितात, "उन्हाचे पाटव नेसले, टाकले | वाऱ्याचे पैंजन घातले, फेकले| घातले, धुतले, डोळ्यात काजळ | लावले, पुसले केवडा अत्तर || ". तर श्रावणातील शृंगाराची भावना व्यक्त करताना कवियत्री शांता शेळके म्हणतात " रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला ". सर्वसामान्य माणसांच्या मानसिकतेचे वर्णन करताना कविवर्य बा. सी. मर्ढेकर म्हणतात," आला आषाढ-श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋतु तरी ". शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी त्याचप्रमाणे चमेली सारखी फुले दिसू लागल्यावर मला कविराज गदिमांची एक कविता आठवते ती म्हणजे, श्रावण आला गं वनी श्रावण आला, दरवळे गंध मधुर ओला ". श्रावणाची गंधमयी किमया कशी घडते हे सांगताना कविवर्य बा. भ. बोरकर लिहितात," आला गं श्रावण आला गं श्रावण | सृष्टीचा लावण्यराज, मोतिया वृष्टीला घेऊन सोबत लेवून सुवर्णंसाज || असे सांगून ते पुढे लिहितात, मनातले सल रुजून आता | त्याचा झाला मरवा रे |". या सर्व कविता मला आजही श्रावण महिना आला की आठवत असतात. तरीसुद्धा अजून दोन गाण्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यातील पाहिले गाणे म्हणजे लता मंगेशकर यांनी गायिलेले कवी मंगेश पडगांवकारांनी लिहिलेले आणि त्यास छानपणे स्वरांत बांधले ते श्रीनिवास खळे यांनी. ते गाणे म्हणजे, " श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा. मुंबईतील शीव ते बोरिबंदर मधील लोकल प्रवासात मंगेश पाडगांवकारांना सुचलेले गाणे आणि त्याचवेळी गाण्याचा पहिला मुखडा तयार केला तो ही या प्रवासातच. किती अप्रतिम गाणे आहे. आजही ऐकताना श्रावणातील निसर्ग पूर्णपणे उभा राहतो. म्हणूनच पन्नास वर्षानंतर सुद्धा हे गाणे सुंदर आणि नव्याने उलगडत जाते. या श्रावणाचे मला आवडणारे दुसरे गाणे म्हणजे किशोरी अमोणकर यांनी गायलेले एक हिंदी गीत, " सावनिया संझा मे अंबर झर आये ". हे गाणे ऐकताना सुद्धा श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये आपल्या मनाला दिसू लागतात.
आपण वर पहिले की या महिन्यावर अनेक कवींनी छानपणे काव्यरचना करून याचे महत्व दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे हा महिना अनेक सणांचा सुद्धा आहेत. हा असा एकच महिना आहे की त्यात दरदिवशी कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यात ही व्रत-वैकल्ये त्या महिन्यातील तिथीप्रमाणे केली जातात. उत्तर भारतात या महिन्यात विशेष करून पाळले जाणारे सण म्हणजे झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि नंदोत्सव हे होत. झुलन यात्रा आणि नंदोत्सव हे दोन सण महाराष्ट्रात किंवा गोव्यात साजरे केले जात नाही. झुलन यात्रा हा सण एकादशी पासून श्रावण पौर्णिमे पर्यंत साजरा केला जातो. त्यात राधा व कृष्ण यांस हिंदोळ्यावर बसवून झोके देतात आणि स्त्रिया त्यांच्या संबंधाची गाणी गातात. यात राधाकृष्णाची पूजा करून ब्राह्मण आणि सुवासिनीस भोजन दिले जाते. काही लोक कृष्णचरित्र्यावर आधारित नाटके बसवीतात. नंदोत्सव हा कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदास पुत्र झाला या समजुतीने साजरा करतात. त्यादिवशी अनेकजण नृत्य, गायन, वादन यांचे कार्यक्रम करतात. सुप्रसिद्ध बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया आपल्या मुंबईच्या घरी कृष्णजन्माच्या दिवशी गायन आणि बासरी वादनांचा कार्यक्रम करून नंदोत्सव साजरा करतात. हा कार्यक्रम सर्व जनतेसाठी असून रात्री सूरू झालेला कार्यक्रम पाहाटे पर्यंत चालतो. असा कार्यक्रम पाहण्याची मौज काय वेगळीच असते हे आपणास कार्यक्रम पहिल्यानंतर जाणवते. पण महाराष्ट्र, गोवा व उत्तर कर्नाटकामध्ये जे सण साजरे केले जातात ते म्हणजे नागपंचमी, मंगलागौरी, श्रावणी, पोवतीपौर्णिमा, नारळीपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पिठोरी अमावास्या व पोळा. या सर्व सणांची माहिती थोडक्यात पाहू.
नागपंचमी : श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते म्हणून या सणाला नागपंचमी म्हटले जाते. हा सण भारताच्या बहुतेक सर्व भागात रूढ असून धार्मिकदृष्ट्या फार महत्वाचा आहे. श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला आणि तो यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे वर आला, त्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमी असल्यामुळे नागाची पूजा रूढ झाली असे म्हटले जाते. हा सण या दिवशी साजरी करण्याचे अजून एक कारण सांगितले जाते आहे ते म्हणजे मणिपूर राज्यात एक खेडवळ राहत होता. त्याने श्रावण पंचमीच्या दिवशी जमीन नांगरली. त्या जमिनीत नागिण आणि तिची पिल्ले वास्तव करीत होती. जमीन नांगरताना त्या नागिणीच्या पिलांस इजा होऊन ती मरण पावली. त्यामुळे त्या नागिणीस राग येऊन तिने त्या खेडवळाच्या कुटुंबातील सर्व माणसांना दंश करून मारून टाकले. मग ती नागिण त्या खेडवळ्याच्या मुलीला दंश करण्यासाठी तिच्या सासरी गेली. त्यावेळेस त्या मुलीने नागिणीची पूजा करून तिला दूध वगैरे दिले. त्यावर ती नगिणी खुश झाली आणि त्या मुलीला आपण येण्याचे कारण सांगितले आणि तिच्या वडिलांनी केलेल्या कृत्याचा कसा सूड घेतला हे सांगितले. मग त्या मुलीने नागिणीची क्षमा मागून आपल्या सर्व माणसांना जिवंत करण्यासाठी तिच्याकडे प्रार्थना केली. त्याप्रमाणे त्या नागिणीने त्यांना अमृत सिंचन करून जिवंत केले. तेव्हा पासून नागपंचमी या सणाला फार मोठे महत्व प्राप्त झाले असे म्हटले जाते.
मंगलागौरी : श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंगलागौरीचा उत्सव साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रातील काही ब्राह्मण वर्गात आहे. मुलीचे लग्न झाल्यावर पाच वर्षापर्यंत तिच्याकडून मंगलागौरीची पूजा करून घेतली जाते. त्यामुळे पतीचे आयुष्य दीर्घायुषी होते अशी समजूत आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी मुलगी माहेरी जाऊन शंकर पार्वतीची पूजा करते. नंतरची चारवर्षे आपल्या सासरी पूजते. पूजा झाल्यानंतर हात जोडून आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करते. मग एका पात्रात हळदकुंकू व काजळ, फणी, करंडा, दक्षिणा, नारळ, फुलांची वेणी वगैरे ठेवून आपल्याकडे असलेल्या सुवासिनीस वाण म्हणून देते आणि त्यांच्या ओट्या भरते. त्यादिवशी सुवासिनी रात्रीचे जेवण करीत नाही पण गायन, नृत्य, खेळ वैगरे ठेवून देवीस संतुष्ट करतात. हा सण फक्त महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबात पाळला जातो. इतर कुठेही हा असल्याचे माहिती मिळत नाही.
श्रावणी : प्रत्येक श्रावण पूर्णिमेस श्रवण नक्षत्राच्या दिवशी श्रावणी नावाचा विधि ब्राह्मण करीत असतात. श्रावणी म्हणजे ब्राह्मण समाजात जानवे बदलण्याचा दिवस होय. या दिवशी उपनयन म्हणजे मुंज झालेल्या ब्रम्हचारी मुल व गृहस्थाश्रमी पुरुष गावातील देवालयात जाऊन पुरोहिताकडून मंत्राच्या उच्चाराने श्रावणीचा विधि पूर्ण करतात. जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदि ब्राह्मणांची श्रावणी असते. हल्ली हा सण फक्त पुराणमतवादी ब्राह्मण समाज आपल्या घरीच भक्तीपूर्वक पद्धतीने साजरा करतात. हल्ली श्रावणी करताना फक्त गायत्री मंत्राचा उच्चार करतात.
पोवती पौर्णिमा व नारळी पौर्णिमा : प्रत्येक श्रावण पौर्णिमेस पोवती धारण करण्याची पद्धत भारताच्या अनेक भागात दिसून येते. या विधिस पवित्ररोपण असेही म्हणतात. या पोवत्याची लांबी किती असावी आणि त्यात किती ग्रंथी असाव्यात याची माहिती धर्मशास्त्रात दिली आहे. असे म्हणतात की उत्तम पोवते म्हणजे कापसाच्या सुताची नवसूती करून तिचे एकशे आठ फेऱ्यांचे व मूर्तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचेल एवढे लांब व चोवीस ग्रंथीने युक्त असे असावे. या पोवत्यांच्या ग्रंथीस कुंकू लावून देव्हाऱ्यापुढे मांडून देवाकडे सर्व विघ्नांचा नाश करून घरामध्ये सुख शांती लाभो अशी प्रार्थना या दिवशी करतात. उत्तर भारतात हा सण रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. यात बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून सर्व विनाशापासून त्याचे रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. रक्षाबंधन सारखा विधि हा समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी फार महत्वाचा मानाला जातो. पोवती पौर्णिमेस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या पौर्णिमेस वरुण देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. असे केल्याने वरुण देव खुश होतो आणि समुद्रमार्गे व्यापाराची देवाणघेवाण व्यवस्थित होते असे मानले जाते. महाराष्ट्रातील किनाऱ्यावर नारळ एकमेकांच्या हातात देऊन फोडण्याचे खेळ केले जातात. नारळी पौर्णिमा हा सण सर्व जातींच्या समाजात साजरा केला जातो. म्हणूनच सामाजिक ऐक्यासाठी या सणाचे महत्व फार मोठे आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी : भगवान श्रीकृष्ण हा एक लोकविलक्षण देव आहे. त्याचे चरित्र प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचा ठाव घेणारे आहे. महाभारत, हरिवंश, भागवत आणि जैमिनी अश्वमेध या पुराणात त्याचे चरित्र सापडते. अशा श्रीकृष्णाचा जन्मदिवस प्रत्येक वर्षी श्रावण वद्य अष्टमीस सर्व जातीधर्माचे लोक साजरा करीत असतात. श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी उपावास करून मध्यरात्री बाळकृष्णच्या मूर्तीची पूजा करतात. पूजा झाल्यानंतर सुंठवडा प्रसाद म्हणून खातात. दुसऱ्या दिवशी अष्टमी संपल्यावर जेवण करतात. महाराष्ट्रात खास करून मुंबईत दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम करून हा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो. मायावादात अडकल्यामुळे कर्तव्यशून्य बनलेल्या मानव जातीला कर्तव्यकर्माची योग्य दिशा श्रीकृष्णाने दाखवून दिली आहे आणि तत्कालीन तत्वज्ञानाविषयक मतापैकी योग, सांख्य व वेदांत यांच्यातील एकवाक्यता कशी आहे हे सुद्धा त्यानेच दाखवून दिले आहे. म्हणूनच त्यास जगद्गुरू म्हटले जाते. हा सण साजरा करून प्रत्येक मानव आपला श्रीकृष्णाबद्दल आदर व्यक्त करतो आणि आपल्या पूजेद्वारे आपली भक्ती प्रकट करीत असतो.
पिठोरी अमावास्या व पोळा : श्रावण वद्य ३० या दिवशी पिठोरी अमावास्या साजरी केली जाते. हा सण सौभाग्यवती स्त्रिया पार्वतीप्रीत्यर्थ साजरी करतात. पुराणात अशी एक कथा आहे की पार्वतीने इंद्रायणीस या व्रताचा महिमा कथन केले आहे. त्यात देवी पार्वती सांगते की हे व्रत केल्याने सौभाग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. या दिवशी स्त्रिया उपवास करून संध्याकाळी आठ कलश मांडून ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, माहेश्वरी व चामुंडा या देवतेंच्या प्रतिमा स्थापन करतात. या शिवाय ६४ सुपाऱ्या ठेवून निरनिराळ्या नावांच्या देवतांची आराधना करतात आणि घरातल्या मुलींना पोळ्याचे वाण दिले जातात. असे केल्यास ऐश्वर्य प्राप्त होते असे समजले जाते. श्रावण पौर्णिमेस शेतकरी लोक पोळा नावांचा सण साजरा करतात. हा सण बैलासंबंधी असून बैलांना रंगवून आणि शृंगारून त्यांची गावात मिरवणूक काढतात. महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर हा सण मोठया पद्धतीने साजरा करतात. यात शेतकरी आपल्याकडील गुरांचे सामर्थ दाखविण्यास उत्सुक असतात. पूर्ण दिवस बैलांच्या शर्यती लावण्यात जातो आणि संध्याकाळी वाजत गाजत मिरवणूक काढून हा सण साजरा करतात. त्यात लहान मुलांपासून मोठया पर्यंत सगळेजण आनंदाने देखावा पाहण्यासाठी एकत्र येतात. काही ब्राह्मण लोक मातीचा बैल करून त्याची पूजा करतात पण येथे कोणताही विधि केला जात नाही. या दिवशी गोधनांचेही महत्व असून गाईंची पूजा केली जाते.
अशा प्रकारे श्रावण महिन्याचे महत्व सांगताना त्या महिन्यावर केलेल्या कविता सांगितल्या आहेत तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वर म्हटल्याप्रमाणे ज्या गाण्याने आपणास पूर्णपणे श्रावणसरीमध्ये चिंब भिजवून टाकले आहे त्यातील एक शेवटचे कडवे लिहून माझा हा लेख संपवतो.
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा
धन्यवाद
Comments
Post a Comment