Skip to main content

sanskrutik Varasa-सांस्कृतिक वारसा, मी भारताचा, हा गौरव माझा

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १४६

विषय : सांस्कृतिक वारसा, मी भारताचा, हा गौरव माझा

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळतो आणि तो पुढील पिढीकडे जात असतो. त्यात अनेक प्रकारच्या परंपरा असतात. त्यात अनेक बोली असतात, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असते, अनेक प्रकारचे संगीत आणि त्याचे सादरीकरण, सामाजिक रूढी व वेगवेगळे सणसमारंभ असतात. भारतीय सांस्कृतिक वारसा हा विविधतेने समृद्ध झालेला असा वारसा असून त्यात अनेक प्रकारचे साहित्य, संगीत, नृत्य, खेळ, भारतातील ऐतिहासिक स्थाने व तेथील इतिहास, हस्तकला, चित्रपट, नाट्य  या सारखे अनेक प्रकार येत असतात. असे म्हणतात मौर्याच्या कालखंडात साहित्य, गणित, शिक्षण, खागोल शात्र, धातूशास्त्र, वैद्यकीयशास्त्र यांची प्रगती झाली. पुढे शिक्षणासाठी नालंदा विद्यापीठाची झालेली निर्मिती, वरहमिहीर आणि आर्यभट्टचे गणित आणि खागोल शास्त्रामधील योगदान, कालिदास, विशाखादत्त, कुमारदास, हर्षवर्धन व भवभूती यांचे साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान, भरतमुनींचे नाट्यशास्त्र, पौराणिक साहित्याप्रमाणे रामायण, महाभारत आणि बौद्ध साहित्य यांची निर्मिती अशा अनेक गोष्टी आपल्याला सांस्कृतिक वारसा म्हणून लाभल्या आहेत. हा अनमोल ठेवा आपण अनेक वर्षे जपून ठेवलेला आहे आणि तो पुढेही असाच जपून ठेवला जाईल. 

अनेक परंपरानी तोलून धरलेली भारतीय संस्कृती अविरत प्रवाहित होणारी संस्कृती आहे. त्यात त्याग, जीवननिष्ठा, ईश्वरनिष्ठा असून ती सर्वांनाच आपल्यामध्ये सामावून घेणारी संस्कृती आहे. त्यामुळेच भारतात अनेक प्रकारचे साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य सर्व धर्माच्या आणि जातीच्या भिंती उलटून एका समृद्ध संस्कृतीचा वारसा प्रत्येक पिढीला मिळत गेला आणि तो सर्वार्थाने रूढ होत गेला आहे. अशा काही संस्कृतीचे पाच महत्वाचे वारस आपण पाहू. 

१. भगवद  गीता : हा एक असा ग्रंथ आहे ज्याने भारतीय मनावर अधिराज्य केले आहे. मुळात भगवद गीता महाभारतात भीष्मपर्वात आली असून ती भीष्म पर्वातील २३ व्या अध्याया पासून सूरू होऊन ती भीष्म पर्वाच्या ४० व्या अध्याया पर्यंत महाभारतात येते. या ग्रंथात १८ अध्याय असून त्यात विवेचनाच्या पद्धतीची आणि शैलीची विविधता आहे. हा ग्रंथ जरी कृष्णाने अर्जुनाला उपदेशीला असला तरी त्याचे तत्वज्ञान हे सर्व समाजासाठी आजही महत्वाचे आहे. हे तत्वज्ञान सांगताना कृष्ण स्वतःला देव म्हणून जाहीर करतो आणि प्रत्येक तत्वज्ञान पद्धतीचे ती स्वतःची असल्याप्रमाणे क्रमशः विवरण करतो. पण स्वच्छ काव्यात रेखाटलेल्या असंख्य सिद्धांतापैकी एकाचाही नामनिर्देश तो करीत नाही. तो शेवटी अर्जुनाला उपदेश करताना आपल्या बुद्धीचा वापर करून कर्म करावयास सांगतो आणि त्या कर्माच्या फळाची इच्छा धरू नकोस असे सांगताना म्हणतो तूझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर, तुझा आत्मा तुला जे सांगेल ते तू ऐक. शेवटी तुझी बुद्धी यात तुला जरूर मदत करेल. तिचे ऐक आणि तसे वाग. पुढे मध्ययुगात समाजाचा झालेल्या कायापालटामुळे भगवद गीतेला फार महत्व प्राप्त झाले. संत ज्ञानेश्वर माऊलीने हा ग्रंथ मराठी काव्यात्मक टिकेच्या स्वरूपात सामान्य लोकांपर्यंत आणला. आधुनिक काळात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींनी राष्ट्रीय चळवळीसाठी या ग्रंथाचा वापर करून त्याचे सामर्थ सिद्ध केले. आजही हा ग्रंथ आपल्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्यामुळे व वैशिष्टपूर्ण सौंदर्यामुळे कलात्मक सुख देत आहे. त्यामुळे भगवद गीतेचा वारसा फार महत्वाचा आहे

 

२. कालिदासाची काव्ये आणि नाट्यकृती : संपूर्ण भारतीय साहित्यातील सर्वात श्रेष्ठ नाव आहे कालिदासाचे. त्याच्या चरित्राबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही.  तो कदाचित विक्रमादित्याच्या दरबारासाठी लिहीत असावा. त्याच्या काव्यांपैकी प्रासादिक मेघदूताने एका हद्दपार केलेल्या यक्षाचा प्रीती संदेश दूर असणाऱ्या त्याच्या पत्नीकडे वाहून नेला. तसे करताना त्याने मेघाला ओलांडून जाव्या लागणाऱ्या भारतीय भूप्रदेशातील रम्य देखव्याचे चित्र रेखाटले आहे. रघुवंश हे काव्य प्रभू रामाच्या पूर्वजांची माहिती देणारी असून अप्रत्यक्षपणे गुप्ताच्या काही पराक्रमांचा उल्लेखही आढळतो. कुमार संभव हे जरी अपूर्ण काव्य असले तरी देव आणि मानवाना त्रास देणाऱ्या एका असुरचा नाश करण्यासाठी जन्माला आलेल्या भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मुलाबद्दल आहे. काव्याप्रमाणे कालिदासाची नाटकेही उच्च दर्जाची आहेत. मालविकाग्निमित्र हे नाटक शुगाच्या इतिहासावर असून उज्जयनीद्वारा गुप्ताच्या दरबाराविषयी आहे. अभिज्ञान शाकुंतल तर एक जबरदस्त नाटक असून सर्व बाबतीत यशाचा सर्वोच्च बिंदू गाठला आहे. दुष्यंत राजाचे आणि शकुंतला निमअप्सरेशी मिलन हा या नाटकाचा विषय आहे. कालिदास, काव्ये असो वा नाटक, मानवी भावना आणि विचार आपल्या अद्वितीय सामर्थ्याने हाताळतो. असा वारसा आपल्या पिढीसाठी फार मोलाचा आहे.

 ३. नारळाचे झाड : भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या विकासाचे खरे कारण म्हणजे नारळ हे होय. नंतर हे झाड भारतातील सर्व किनाऱ्यावर दिसू लागले आणि किनारपट्टीवरील  प्रदेशाची आर्थिक व्यवस्था खूप चांगली होऊ लागली. या झाडाची पहिली लागवड मलेशिया या देशात झाली नंतर शंभर वर्षाने या झाडाची लागवड भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर होऊ लागली. इ. स.१२० च्या सुमारास दिनिकाचा मुलगा शकराजा उषवदात याने संपूर्ण नारळाच्या झाडाची बाग करून ती दान करून टाकली. याचा अर्थ असा की या झाडाचे महत्व भारतात सहाव्या शतका पासून वाढू लागले. याला कारण म्हणजे भारताच्या अनेक  धार्मिक विधित आणि समारंभात नारळाला महत्वाचे स्थान मिळू लागले. या झाडापासून मिळणारे लाकूड, काथ्या, मद्य व इतर उत्पादने सुद्धा फार मोलाची आहेत. खुद्द नारळ स्वयंपाकासाठी खोबरे आणि खाण्याचे तेल पुरवितो. या तेलापासून साबणसुद्धा बनवला जातो. पश्चिम किनाऱ्यावर भरपूर पाऊस आणि उष्ण हवामान असल्यामुळे नारळाला वाढण्यास चांगला वाव मिळतो हे झाड सर्वाना जास्त फायदाच मिळवून देत आले आहे. म्हणूनच आपण त्यास कल्पवृक्ष म्हणतो. असे हे झाड आपल्याला मिळालेला एक वारसाच आहे.

४. लोक साहित्य आणि संत साहित्य : भारतातील अनेक संत मंडळीने खासकरून महाराष्ट्रातील संतांनी पूर्वपार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा लक्षात ठेवून त्यांच्यातील योग्य अर्थ काढून सर्व सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत लिहून भारतातील भावी पिढीवर खूप उपकार केले आहेत. लोकांची दुःखे, त्यांच्या गरजात्यांचे अधिकार लक्षात घेऊन लोकांना नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे विचार त्यांनी समाजाच्या सर्व स्तरांवर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना त्यांनी लोकभाषेचा वापर अधिक केला आहे. म्हणूनच आजसुद्धा ग्रामीण भागात संताविषयी आदर व प्रेम आहे. संतसाहित्यात लोकतत्व अतिशय व्यापक आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम लोकांच्या मनावर अधिक होतो. त्यांनी रचलेले अभंग, भारुडे अनिष्ट गोष्टीना दूर करण्यास मदत करतात. संस्कृत भाषा ही सामान्य लोकांना न समजणारी असल्यामुळे सर्व संतांनी ती बाजूला सारली आणि लोकांना त्यांच्या मातृभाषेत त्यांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातून संत आणि लोक यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. त्यात लोकसहित्य आणि संतसाहित्य यांच्या अनुबंधाचे गूढ दडले आहे. म्हणूनच संत  ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची तुकारामगाथा, संत रामदास स्वामींचे दासबोध, संत एकनाथांची भारुडे आणि संत नामदेवांचे व संत चोखामेळाचे अभंग आमच्यासाठी अनमोल असा सांस्कृतिक ठेवा आहे.

५. श्रीकृष्ण :  या देवाचे एक लोकविलक्षण चरित्र आहे. त्याच्या चरित्र्यावरून अनेक लोक त्याच्या बद्दल वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. कोणी त्यांस लबाड म्हणतात तर कुणी त्यास गरजेच्या वेळी धावून येणारा मित्र मानतात. याला कारण त्याच्या चरित्र्यात लबाड्या आहेत, त्याच्याबरोबर गोपिका आहेत त्यामुळे रासक्रीडा आहेत, त्याच्या चरित्र्यात चोऱ्या सुद्धा आहेत तरीसुद्धा त्याचे चरित्र देव म्हणून पुण्यमय आहे. याला कारण म्हणजे त्याच्या चरित्र्यात तत्वज्ञानाचा एक महत्वाचा भाग आहे. जसा तो गोकुळाचा चोर आहे तसा भगवद गीतेचा प्रवक्ता आहे आणि भगवत गीता ही सर्वांनाच प्रमाण आहे. श्रीकृष्ण हा लढवय्या आहे, पराक्रमी आहे, शत्रुंचा नाश करणारा आहे. तरी सुद्धा युद्धात तो शस्त्रे न घेता सारथी बनून मार्गदर्शन करतो. कंसाचा वध करणारा श्रीकृष्ण, स्वतःच्या ताकदीच्या जोरावर सम्राज्याची उलथा -पालथ करतो. कोणत्याही सम्राज्याचा मोह  न धरणारा असा हा श्रीकृष्ण आहे. तो भोगविलास जरी असला तरी तो वैराग्य आणि संयम यांचा प्रतिनिधी आहे. म्हणूनच लोकविलक्षण चरित्र आपल्या समोर येत असते. त्यामुळे तो अनेक काव्यात, नाटकात, नृत्यात, नानाविध संगीतात येत असतो. सर्व भारतीय संगीताचा तो प्राण आहे. त्याच्या शिवाय भारतीय शास्त्रीय संगीत शक्य नाही. सर्व धर्माचे लोक हे शास्त्रीय संगीत गाताना श्रीकृष्णाचे नाव घेतच असतात. तो सत्यभामेचा पती आहे तसा रुक्मिणीचाही आहे. पण त्याचे सर्वात जास्त प्रेम सत्यभामेवर आहे. हे रुक्मिणीला पण माहित आहे. जेव्हा श्रीकृष्णाचे चरित्र वाचतो तेव्हा मला त्यात गणतंत्रचा नेता सापडतो, तत्वज्ञानाचा प्रवक्ता सापडतो आणि त्याच्यामध्ये वर्णश्रेष्ठत्व नावाचा अहंकार कुठेच सापडत नाही. म्हणून तो गवळ्यांचा सुद्धा देव आहे  आणि राज्य न उपभोगता राज्य देणारा गणतंत्राचा नेता आहे.  सुप्रसिद्ध समाजवादी नेते राम मनोहर लोहिया श्रीकृष्णाचे हृदय भारतमातेकडे मागतात. असे हे श्रीकृष्णाचे चरित्र  सर्व भारतीयांसाठी अनमोल ठेवा आहे आणि तो जतन करून ठेवणे जरुरीचे आहे.

मित्रहो, अशा अनेक गोष्टी आहेत की संस्कृतीचे वारस म्हणून महत्वाचे आहेत. त्यात रामायण, महाभारता सारखे ग्रंथ पण आहेत   त्याबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहेत. तरीसुद्धा मी वरील पाच वारस निवडले आणि त्यांचे विश्लेषण केले आहे.

 धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...