Skip to main content

Sakha Pandurang -सखा पांडुरंग (वैचारिक लेख)

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १४४

विषय : सखा पांडुरंग (वैचारिक लेख)

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

 श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पंढरपूर हे विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र आणि तिथे या देवतेचे भव्य असे सुंदर देवालय आहे. हे देवालय कधी बांधले गेले याचा नक्की पुरावा उपलब्ध नसला तरी हे देवालय तेराव्या शतकापासून उभे असल्याचा पुरावा जरूर आहे. विठ्ठल आणि पंढरपूर या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत जे संत होऊन गेले त्यांनी या विठ्ठलाची स्तुती करताना अनेक अभंग रचले. त्यामुळेच या विठ्ठलाची प्रतिमा  महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर कोरली गेली आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकाराम इत्यादी संतांनी केलेली विठ्ठलाची वर्णने इतकी अप्रतिम आहेत की ही वर्णने आपल्या हृदयाचा एक कप्पा बनल्याशिवाय राहत नाही. पंढरपूर येथे असलेल्या भव्य देवालायाच्या पूर्व भागात महाद्वार असून संत नामदेवाशी निगडित असलेली नामदेवाची पायरी याच ठिकाणी आहे.  महाराष्ट्रातील सर्व समाज मग तो मराठा असो किंवा महार असो, वैष्णव असो किंवा शैव पंथी असो किंवा वारकरी संप्रदाय असो आपल्या परीने विठ्ठलाची भक्ती अगर पूजा करण्यात रमून जात असतो. या देवतेसाठी वर्षातून चार यात्रा भरल्या जातात. त्यातील प्रमुख असते ती आषाढी एकादशीची यात्रा. या यात्रेत अनेक भक्त सहभागी होतात आणि चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या यात्रेसाठी देहू आळंदीहून  संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम  महाराजांची पालखी घेऊन त्यांच्या नावाचा गजर करत वारकरी भक्त पायी चालत पंढरपूरला जातात. अशी अनेक शतके ही परंपरा चालत आली आहे, याला कारण म्हणजे विठ्ठल हा देव आपल्या भक्तांचा  कैवारी बनून त्यांच्या भेटीला येत असतो आणि त्यांनी केलेल्या सेवेमुळे त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना मोक्ष प्राप्त करून देतो. म्हणूनच या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विठ्ठलाची शासकीय महापूजा करतात.

संत नामदेव विठ्ठलास विठाई असे संबोधतात आणि त्यास प्रत्येक जीवाचे जीवन असल्याचेही सांगतात. पांडुरंग विठ्ठल वारकरी लोकांचा प्राण आहे. त्यांच्या एवढी विठ्ठल भक्ती इतर कुणामध्ये आढळत नाही. आजही वारकरी लोक, " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीमहाराज की जय " असा गजर करत पालखी घेऊन जात असतात. या मागे बरीच आख्याने पुराणात सांगण्यात आली आहे. त्यातील एक असे आहे की पुंडलिक हा स्त्रीच्या सहवासात मग्न होऊन आपल्या वृद्ध मातापिताची सेवा करण्याकडे दुर्लक्ष करू लागला. तेव्हा त्याच्या बरोबरचा रोहिदास संत आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न झाला आणि त्यावर प्रसन्न होऊन गंगा, यमुना, सरस्वती या तिघीजणी त्याच्या घरची कामे करू लागल्या. संत रोहिदासची कथा ऐकून पुंडलिकाला पश्चाताप झाला तो ही आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. त्याने केलेली ही तपस्या पूर्ण होत असताना त्याच्यावर खुश होऊन भगवान विष्णू विठ्ठलरुपी प्रकट झाले. तेव्हा आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत तू वाट पाहा असे म्हणून विठ्ठलास विटेवर उभे केले आणि तेव्हापासून तो आजपर्यंत अठ्ठावीस युगे विटेवर कर ठेवून उभा आहे. तेव्हा असा प्रश्न पडतो की अशी अठ्ठावीस युगे म्हणजे किती वर्षे? कारण इतिहासात किंवा पुराण कथेमध्ये चारच युगे येतात. मग विठ्ठल अठ्ठावीस युगे उभा आहे याचा नक्की अर्थ काय? यावर संत नामदेवानी एक आरती लिहिली आहे. त्यात ते सुद्धा म्हणतात, "युगे अठ्ठावीस विटेवर उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा", यात युगे अठ्ठावीस लिहिताना नामदेवाना काय म्हणावयाचे आहे, असे अनेक प्रश्न पडतात. ही गोष्ट समजून घेताना नरहर कुरुंदकरांचा एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात ते म्हणतात की अठ्ठावीस युगे चार वेद, अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे यांची बेरीज केली तर अठ्ठावीस होते आणि हे वेद, पुराणे आणि शास्त्रे विठ्ठलाचे गुणगान करणारी आहेत म्हणून तो युगे अठ्ठावीस उभा आहे. दुसऱ्या एका लेखात ( लेखकाचे नाव आठवत नाही ) असे वाचले होते की युगे ही चार असून सध्या पृथ्वीचा सातवा फेरा चालू आहे. त्यामुळे सात गुणिले चार (*) केले तर अठ्ठावीस संख्या येते. म्हणून विठ्ठल अठ्ठावीस युगे उभा आहे. पण हा दुसरा तर्क स्वीकारण्यास जरा कठीण जातो. त्यामुळे विठ्ठल २८ युगे आपल्यामध्ये निर्गुण स्वरूपात कार्यरत आहे हेच मानणे योग्य होईल. यात एक गोष्ट स्पष्ट आहे की पुंडलिकानेच विठ्ठलाला पंढरपूरला आणले. त्याचे एक भव्य मंदिर पंढरपूरला चंद्रभागेच्या पात्रामध्ये असून सर्व भाविक पाहिलांदा पुंडलिकाचे दर्शन घेऊन पुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.

 संत नामदेवानी विठ्ठलाचे नाव भारतभर केले. त्यांच्याचमुळे तो शिखांच्या गुरुग्रंथाचा अविभाज्य अंग झाला. पण विठ्ठल हे दैवत मुळचे कर्नाटकातील असल्याचा बराच पुरावा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील संतांनी सुद्धा विठ्ठलाला कर्नाटकातील दैवत ठरविले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीने तर या दैवताला, " कानडा विठ्ठलु कर्नाटकु | येणे मज लाविले वेधी ||" असे म्हटले आहे. तर संत एकनाथ म्हणतात, " नाठवेचि दुजे कानड्यावाचुनी | कानडा तो मनी ध्यानी बसे ||". संत एकनाथ  पुढे म्हणतात, " तीर्थ कानडे देव कानडे | क्षेत्र कानडे पंढरिये | विठ्ठल कानडे, भक्त हे कानडे | पुंडलिके उघडे उभे केले ||". संत नामदेव तर विठ्ठलाची भाषा कानडी असल्याचे सांगताना लिहितात, " विठ्ठल कानडे बोलू जाणे | त्याची भाषा पुंडलिक नेणे ||".  महाराष्ट्रातील संताप्रमाणे अनेक इतिहासकारांनीसुद्धा महाराष्ट्रा इतकाच उत्कट भक्तीभाव श्री विठ्ठल आणि त्याचे क्षेत्र पंढरपूर या बद्दल कर्नाटकात आढळतो असे म्हटले आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार सेतूमाधवराव पगडी तर बहुभाषिक. त्यांना मराठी, कानडी, तेलगू, उर्दू, इंग्लिश, संस्कृत, गोंडी, बंगाली, फारसी आणि हिंदी अशा भाषा येत होत्या. महाराष्ट्र-कर्नाटकातील सुवर्णकाल या पुस्तकात ते म्हणतात की कर्नाटकातील विठ्ठलभक्तांची, कीर्तनकारांची आणि साधुसंतांची नावे आणि त्यांनी रचलेल्या शेकडो काव्यांचे वरवर जरी परीक्षण केले तरी विठ्ठलाविषयी कर्नाटकात किती अपूर्व जिव्हाळा आहे याची कल्पना येते. चौड-अरस, पुरंदरदास, कानकदास, व्यासराय, श्रीपादराय, वादिराज, पुंडरिक विठ्ठल इत्यादीची नावे आज कर्नाटकात विठ्ठल भक्त म्हणून सर्वतोमुखी आहे असे सांगून ते पुढे लिहितात की विठ्ठल हा कन्नड देशाचा देव असून पंढरपूर हे एकेकाळी कन्नड राज्यात राष्ट्रकूट उत्तर चालुक्य म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या मते कर्नाटकातील विठ्ठल भक्ती ही प्राचीन असून निदान सहाव्या शतकापासून चालू होती. काही इतिहासाकारांच्या मते कर्नाटकातील विठ्ठलभक्तीचि सुरुवात विठ्ठल भक्त अचलनंदापासून म्हणजे . .८०१ पासून झाल्याचे म्हटले आहे. चौदाव्या शतकात उदय झालेल्या माध्व संप्रदायामुळे विठ्ठल भक्तीचा प्रसार अधिकच होऊ लागला. महाराष्ट्रातील संताप्रमाणे कर्नाटकातील संतांनीसुद्धा विठ्ठलावर अनेक भक्ती काव्य लिहिली आहेत. त्यामध्ये व्यासराय, श्रीपादराय  आणि पुरंदरदास यांचा महत्वाचा वाटा आहे. या संतांमुळे कर्नाटकात निर्माण झालेला विठ्ठल भक्तीचा महापूर अजूनही चालू आहे. संत पुरंदरदास हे बारा वर्षे पंढरपूरला वास्तव करून होते. त्यांच्या नावाने ओळखला जाणारा एक खांब अजूनही विठ्ठल मंदिरात आहे. जेव्हा हा इतिहास आपण वाचतो आणि महाराष्ट्र कर्नाटकातील भक्तांचि विठ्ठलाच्या पायाशी एकवटून जडलेली भक्ती पाहतो तेव्हा या दोन्ही राज्यातील विठ्ठल आणि पंढरपूर यांचे सांस्कृतिक महत्व फारच विलोभनीय वाटते.

 ज्या प्रमाणे हे दैवत महाराष्ट्र आणि कर्नाटक जनतेचे आराध्य दैवत असले तरी सर्व भारतीय लोकांच्या जीवनाशी समरस झालेले दैवत आहे. कुणाला तो बुद्ध वाटतो तर कुणाला कृष्ण. जैन धार्मियांना तो जैन लोकांचा देव वाटतो. त्याचप्रमाणे शैव पंथीयांना तो भगवान शंकराचा अवतार वाटतो. म्हणूनच हे दैवत आराध्यदैवत असले तरी कुणाचेही कुलदैवत असल्याचे वाटत नाही. सुप्रसिद्ध मानवतावादी लेखिका आणि इतिहासकार इरावती कर्वे आपल्या महाराष्ट्र : एक अभ्यास या पुस्तकात म्हणतात की विठ्ठल हे कुणाचेही कुलदैवत नाही,असल्यास ते फार कमी लोकांचे असेल. हे सांगून त्या पुढे लिहितात की खुद्द विठ्ठलाची पूजा करणारे सहा-सात तऱ्हेचे लोक आहेत. बडवे, डिंग्रे, दिवटे, पुजारी वगैरे यांच्यापैकी कुणाचेही कुलदैवत नाही. इरावती कर्वे प्रमाणे सरोजिनी बाबर यांनीही विठ्ठल कुणाचे कुलदैवत असल्याचा पुरावा त्यांच्या कुलदैवत या पुस्तकात दिलेला आढळत नाही. पण या दैवताचे उपासक आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी पंढरपूरची वारी करत असतात. या उपासकांचा भक्तीभाव उठून दिसत असल्यामुळेच पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांना वारकरी असे म्हणतात. या वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला फार महत्वाचे स्थान आहे. या दिवसाला ते प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. मग पुढे येणारा हे वारकरी संप्रदाय चातुर्मास पाळतात आणि त्या काळात कोणतेही मंगलकार्य करीत नाही. या वारकरी संप्रदायात तुळशीच्या  माळेला फार महत्व असते. जो वारकरी ही माळ घालतो तो साऱ्या व्यसनांपासून मुक्त होतो असे मानले जाते आणि तो पूर्णपणे शाकाहारी झालेला असतो. कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा संप्रदाय ठेवत नसून तो प्रत्येक वारकरी हा सदाचारी आणि निरूपद्रवी असतो. तो कोणालाही त्रास देत नाही. अशा या संप्रदायात संत नामदेव यांना फार महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. जातीपातीच्या भिंती पाडून सामानतेचा संदेश हा वारकरी संप्रदाय सगळीकडे देत असतो.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विठ्ठल हा बुद्ध असल्याचे ठाम मत व्यक्त केले आहे. धनंजय कीर आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या चरित्र लिखाणात लिहितात की डॉ. आंबेडकरांनी  विठ्ठल बुद्ध असल्याचा पुरावा देण्यासाठी एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. पण तो पूर्ण झाला नाही. त्यात डॉक्टरांचे मत  संक्षेपाने सांगताना कीर लिहितात की पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही मुळात बुद्धाची मूर्ती आहे आणि यावर ते एक प्रबंध लिहीत होते आणि तो प्रबंध पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळापुढे वाचला जाणार होता. डॉक्टरांच्या मतानुसार पांडुरंग हा शब्द पांडुरीक या शब्दाचे संक्षिप्त रूप असून त्याचा अर्थ पाली भाषेमध्ये कमळ असा आहे. यावरून डॉक्टर म्हणतात पांडुरंग म्हणजेच बुद्ध असून दुसरा कोणीही नाही. या बाबतीत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेल्या श्री विठ्ठल : महासमन्वय पुस्तकातील विचार पाहू. डॉ ढेरे यांनी विठ्ठलाला बुद्ध म्हणून महाराष्ट्रातील संतांनी पहिल्याचा पुरावा देतात. त्यात संत जनाबाई सांगतात, " होऊनीया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला माझा सखा ||". संत जनाबाईप्रमाणे संत एकनाथना सुद्धा विठ्ठल बुद्ध असल्याचे वाटत होते. त्यासाठी ते लिहितात, "नववा बैसे स्थिररूप | तया नाम बौध्दरूप ||". ते पुढे सांगतात," बौध्द अवतार घेऊन | विटे समचरण ठेवून | पुंडलिक दिवटा पाहून | तयाचे द्वारी गोंधळ मांडिला ||". संत नामदेवानी सुद्धा विठ्ठलाला बुद्ध असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, " व्रतभंगासाठी बौध्द अवतार | झाला दिंगंबर अवनीये ||". अशा अनेक संतांची उदाहरणे देऊन डॉ ढेरे सांगतात," बौध्द हा नवा भागवती अवतार म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनातलं वैचारिक पातळीवरच एक महान युगांतर आहे. अनेक विद्वानांनी दिलेल्या पुराव्या नुसार आपणास विठ्ठल हा बुद्ध वाटतो. विठ्ठल बुद्ध असल्याचा अजून एक पुरावा म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपातील दगडी खांबावर आढळणाऱ्या ध्यानस्थ बुध्दाच्या कोरीव मूर्ती आणि आषाढी एकादशीला आषाढ पौर्णिमेला बौध्द ग्रंथात असलेले महत्वाचे स्थान. बौध्द लोकांप्रमाणे जैन लोकांना सुद्धा विठ्ठल त्यांचा देव वाटतो. याचा संदर्भ देतांना डॉ. ढेरे त्रिपुतीच्या गोपाळनाथांचे शिष्य गोविंदनाथ यांचा अभंग सांगतात. त्या अभंगात म्हटले आहे की, " पंढरीचा देव म्हणती जैनांचा | तया गाढवाचा जन्म वृधा ||". हा अभंग देऊन डॉ ढेरे पुढे सांगतात पद्दपुराणात पांडुरंगाला दिगंबर म्हटले आहे आणि दिगंबर शब्द जैनवाचक आहे. त्यामुळे जैनांनी विठ्ठलाला नेमीनाथ रूपाने मानण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. विठ्ठल हा जैन लोकांचा देव असल्याचे अनेक प्रवाद आपल्याला इतिहासकारांकडून मिळतात. तो पूर्णपणे अभ्यासूनच त्याबद्दल निश्चित भाष्य करणे उचित ठरेल.

 पंढरपूरच्या विठ्ठलाला सर्वांनी आपले मानले आहे. जसे वैष्णव पंथीय त्याला भगवान विष्णूचा अवतार मानतात. तसेच शैव पंथीय त्यास भगवान शंकराचा अवतार मांडतात. याला कारण पांडुरंग हा शब्द. या शब्दाने अनेकांना चकवा दिला आहे. शैव लोकांच्या मते पांडुरंग हे नाव मुळात विठ्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे. ते म्हणतात की भगवान विष्णुच्या २४ अवतारातही किंवा विष्णू सहस्त्रनामातही विठ्ठल नावाचा उल्लेख नाही. संजय सोनवणी आपल्या विठ्ठलाचा नवा शोध या पुस्तकात लिहितात पौड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौड्रपुर म्हणजे आजचे पंढरपूर. तेथे असलेले पांडुरंगाचे देवालय हे शंकराचे देवालय असून ११व्या शतकापर्यंत तेथील विठ्ठल मंदिराला दुय्यम स्थान होते. पण हे विश्लेषण किती योग्य आहे हे इतिहासकार व्यवस्थित विश्लेषण आपल्या पद्धतीने करून सांगू शकतात. पण एवढे मात्र खरे आहे की या पंढरपूरच्या विठोबाने जात, धर्म आणि पंथ यांच्या भिंती तोडून टाकल्या आणि त्यांच्यातील संघर्ष मिटवून सर्व समाजाला एकत्र आणले. मी जे वाचले आहे त्यातून काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दलचे संदर्भ पण दिले आहेत. शेवटी मी विठ्ठल चरणी एकच प्रार्थना करीन ती म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला वैचारिक वारसा विठ्ठलाच्या भक्तीमुळे अखंड चालत राहो.

धन्यवाद

संदर्भ

 इरावती कर्वे - महाराष्ट्र : एक इतिहास

सरोजिनी बाबर - कुलदैवत

डॉ अशोक राणा - दैवतांची गोष्ट

सेतूमाधवराव पगडी-महाराष्ट्र-कर्नाटकातील सुवर्ण काळ

डॉ रा. चिं. ढेरे - श्री विठ्ठल : महासमन्वय

संजय सोनवणी : विठ्ठलाचा नवा शोध

धनंजय कीर : डॉ बाबासाहेब आंबेडकर.

 


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...