Skip to main content

Rasgrahan Mazy Govyachya Bhumit- रसग्रहण माझ्या गोव्याच्या भूमीत


कवितेचे रसग्रहण

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई


कविता : माझ्या गोव्याच्या भूमीत

कवी : बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बाकीबाब 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

गड्या नारळ मधाचे

कड्याकपारीमधोनी

घट फुटती दुधाचे


माझ्या गोव्याच्या भूमीत

आंब्याफणसांची रास

फुलीं फळांचे पाझर 

फळी फुलांचे सुवास

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

वनश्रीची कारागिरी

पानाफुलांची कुसर

पशुपक्ष्यांच्या किनारी

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

उन्हाळ्यात खारा वारा

पावसात दारापुढे

सोन्या चांदीच्या रे धारा

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

येते चांदणे माहेरा

ओलावल्या लोचानांनी

भेटे आकाश सागरा

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

चाफा पानावीण फुले

भोळा भाबडा शालीन

भाव शब्दांविना बोले

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

गड्या साळीचा रे भात

वाढी आईच्या मायेनें

सोनकेवड्याचा हात

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

सागरात खेळे चांदी

आतिथ्याची अगत्याची

साऱ्या षडरसांची नांदी

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

जिव्या सुपारीचा विडा

अग्नी दिव्यांततुन हसे

पाचपोवाळ्यांचा चुडा

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

काळे काजळाचे डोळे

त्यांत सावित्रीची माया

जन्मजन्मनंतरी जळे 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

लाल माती, निळे पाणी

खोल आरक्त घावांत

शुद्ध वेदनांची गाणी

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

खडगा जडावाची  मूठ

वीरशृंगाराच्या भाळी

साजे वैराग्याची तीट 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

उंच घूड देवळांचे

ताजमहाल भक्तीच्या

अश्रुंतल्या चांदण्यांचे

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

तृणी सुमनांचे गेंद

सिद्ध कुणाव्यांच्या तोंडी

शुद्ध सौंदर्याचे वेद 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

सुखाहुनी गोड व्यथा

रामायणाहुनी थोर

उर्मिलेची कथा

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

सारा माझा जीव जडे

पुरा माझ्या कवनांचा

गंध तेथें उलगडे

रसग्रहण

कवी विषयी थोडी माहिती : बाळकृष्ण भगवंत बोरकर हे मराठी साहित्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जरी त्यांनी साहित्यातील विविध प्रकारात लिखाण केले असले तरी प्रकृतीने ते कवी होते. मनातले भाव ते सहजपणे शब्दांत उतरवत होते. म्हणून इतर कोणत्याही गद्द साहित्यापेक्षा त्यांच्या कविताच हृदयाचा जास्त ठाव घेतात. वास्तवतेपेक्षा किंवा वस्तुच्या बाह्य रूपांपेक्षा त्यांच्या प्राणतत्वाकडे आपल्याला घेऊन जाणारा हा कवी होता. भा.रा.तांबे आणि रवींद्र टागोर यांच्या प्रभावामुळे त्यांना जीवनाच्या सौंदर्यामध्ये सुद्धा श्रद्धा आणि पवित्र असलेली जीवन मूल्ये दिसत होती. त्यांचा सौंदर्यवाद हा भारतीय अध्यात्मिक संस्कारांशी निगडित होता. अशा या कवीचा जन्म ३० नोव्हेंबर १९१० रोजी गोव्यातील कुडचडे या गावी झाला. गोवा हा  निसर्गरम्य प्रदेश आणि त्यातील  हिरव्यागार पाचूसारख्या वनश्रीने नटलेल्या बोरी गावात त्यांचे बालपण गेले. १९३० पासून सुरु झालेली त्यांची काव्य संपदा त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८४ पर्यंत चालू होती. त्यांची एक कविता मला नेहमीच आवडते कारण प्रत्येक माणसाला आपल्या कर्मभूमीचे अप्रूप असते पण त्याची नाळ जन्मतःच अशाठिकाणी घट्ट जुळलेली असते त्या मातीत तो जन्म घेतो आणि वाढतो. त्याचे वर्णन कवितेतून फक्त एक प्रतिभावंत कवीच करू शकतो. म्हणून मी रसग्रहणासाठी कवी बोराकारांची "माझ्या गोव्याच्या भूमीत" ही कविता निवडत आहे.

माझ्या गोव्याच्या भूमीत ही  बोरकरांची कविता गोव्याच्या सौंदर्याचे रसाळ वर्णन करते. इथे कवी आपल्या शब्द सामर्थ्यांचा वापर करून तेथील सौंदर्याचे चित्र काढत आहे असेच वाटते. त्यामुळे बोरकरांनी केलेले गोव्याचे वर्णन चित्रमय शैलीतले असल्याचे जाणवते. ते लिहितात

 माझ्या गोव्याच्या भूमीत

गड्या नारळ मधाचे

कड्याकपारीमधोनी

घट फुटती दुधाचे

ह्या ओळी इतक्या सहजपणे आल्या आहेत की वाचताना आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते माडांच्या झाडाचे सुंदर बन आणि दुधसागरच्या धबधब्याचे वर्णन. त्यामुळे सुरुवातीलाच कविता वाचताना मन एका अनामिक आनंदाने भरून जाते. मग पुढे लिहिलेल्या दोन कडव्यामुळे मन अंतर्मुख तर होतेच पण एक नैसर्गिक सौंदर्यही डोळ्यासमोर जसेच्या तसे इतक्या सहजपणे उभे राहते. गोव्याच्या निसर्गाचे अप्रतिम वर्णन करताना  बाकीबाब लिहितात,

माझ्या गोव्याच्या भूमीत

आंब्याफणसांची रास

फुलीं फळांचे पाझर 

फळी फुलांचे सुवास

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

वनश्रीची कारागिरी

पानाफुलांची कुसर

पशुपक्ष्यांच्या किनारी

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

उन्हाळ्यात खारा वारा

पावसात दारापुढे

सोन्या चांदीच्या रे धारा

येथे कवी तिथल्या निसर्गाचे वर्णन करताना सांगतात की गोव्याच्या भूमीत आंबा फणस या फळांची रास खूप छानपणे फुलते आणि येथील फळांचे पाझर फुलांना तर येतातच पण फळांमध्ये फुलांचे सुगंध सुद्धा मिसळून जातात. त्याचप्रमाणे येथील वनश्रीसुद्धा आपली करागिरी करताना येथील पानांफुलांना अशा नक्षीदार पद्धतीने पशुपक्ष्यांसाठी सजवित असते. येथे उन्हाळ्यातील खारा वारा इतका सुखकर असतो तसाच पाऊस सुद्धा. त्याची संततधार पाहत असताना सोनेचांदी पडल्यासारखेच वाटते. त्यामुळे वरील तीन  कडवी वाचताना कवितेची सौंदर्यनिर्मिती करणारी सुंदर शब्दरचना आपल्याला जाणवते. 

 माझ्या गोव्याच्या भूमीत

येते चांदणे माहेरा

ओलावल्या लोचानांनी

भेटे आकाश सागरा

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

चाफा पानावीण फुले

भोळा भाबडा शालीन

भाव शब्दांविना बोले

वरील दोन कडवी लिहिताना कवी बोरकरांनी फार हळवी शब्दरचना केल्याचे जाणवते. अशी शब्दरचना फक्त प्रतिभावंत कवीच करू शकतो. निरभ्र आकाशातील शुभ्र चांदणे माहेरवाशिणी सारखी डोळ्यात पाणी आणून  आकाशातून सागराची भेट घ्यायला येते. पुढे आपला कल्पनाविलास फुलविताना कवी म्हणतात की येथील चाफा हा भोळा भाबडा आणि शालीन भाव असलेला असून तो पानाशिवाय फुलतो. त्यासाठी त्याला कोणत्याही शब्दांच्या सामर्थाची गरज नसते. या ओळी वाचताना बा. . बोरकरांच्या काव्य प्रतिभेने चकित व्हायला तर होतेच आणि कवितेचे आशयसौंदर्य सुद्धा जाणवत राहते. या कडव्यांचा आस्वाद घेत असताना पुढील दोन कडवी सहजपणे आपल्या मनाचा ताबा घेतात. बाकीबाब लिहितात,

माझ्या गोव्याच्या भूमीत

गड्या साळीचा रे भात

वाढी आईच्या मायेनें

सोनकेवड्याचा हात


माझ्या गोव्याच्या भूमीत

सागरात खेळे चांदी

आतिथ्याची अगत्याची

साऱ्या षडरसांची नांदी

गोव्याच्या मातीत पिकणारा आणि सोनकेवड्याच्या हातानी बनवलेला भात आम्ही गोवेकर खात असतो कारण त्या भातामध्ये आईच्या प्रेमाची उब असते. हे सांगून बाकीबाब पुढे सांगतात की माणसाप्रमाणे येथील समुद्र किनारेसुद्धा आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी तयार असतात. किती सुंदर आणि छानपणे मासळीच्या जेवणाचा उल्लेख करताना मराठी भाषेतील शब्दांची श्रीमंती दाखवलेली आहे.

यापुढील कडव्यामधून बा. . बोरकर गोव्यातील जीवनाची तत्वे उलगडून दाखवताना  सांगतात की  इथे काम करणाऱ्या माणसाच्या मानत नेहमी सत्कर्म करण्याचा भाव असतो. ते पाप आणि पुण्याची मोजणी  करत नाही. जर एखाद्या माणसाकडून चुकीची गोष्ट घडली तर त्या माणसाबद्दल कोणतेही शल्य मनात ठेवता ती माणसे सकारात्मक विचार ठेवून पुढे जातात. हे सर्व सांगताना त्यांच्या कवितेतील काव्य सौंदर्य फार छानपणे दिसून येते. ते म्हणतात,

माझ्या गोव्याच्या भूमीत

लाल माती, निळे पाणी

खोल आरक्त घावांत

शुद्ध वेदनांची गाणी


माझ्या गोव्याच्या भूमीत

खडगा जडावाची  मूठ

वीरशृंगाराच्या भाळी

साजे वैराग्याची तीट 

गोव्याच्या निसर्ग सौंदर्याचे आणि तेथील लोकांचे वर्णन करताना बा. . बोरकारांनी आपल्या मनाचा उलगडा केला आहे. या भूमीवरील त्यांचे प्रेम, तिकडच्या मातीची ओढ, भक्तीचा अलौकिक अनुभव देणारी देवळे, रामायणापेक्षा मोठी वाटणारी उर्मिलेची कथा आणि तेथील निसर्गाबद्दल मनी आलेले भाव पहिले तर त्यांच्या हृदयातून आलेला सूरच या कवितेत दिसतो. त्यासाठी ते लिहितात 

 माझ्या गोव्याच्या भूमीत

उंच घूड देवळांचे

ताजमहाल भक्तीच्या

अश्रुंतल्या चांदण्यांचे

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

तृणी सुमनांचे गेंद

सिद्ध कुणाव्यांच्या तोंडी

शुद्ध सौंदर्याचे वेद 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

सुखाहुनी गोड व्यथा

रामायणाहुनी थोर

उर्मिलेची कथा

 

माझ्या गोव्याच्या भूमीत

सारा माझा जीव जडे

पुरा माझ्या कवनांचा

गंध तेथें उलगडे

खरोखरच ही कविता वाचताना आपल्याला या कवितेतील शब्दांचे ताल आणि लय समजू लागतात आणि ते शब्द सहजपणे आपल्याशी संवाद साधतात आणि आपल्या रसिक मनातील विविध भावनांच्या तारा छेडाल्या जातात.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...