रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १४५
विषय : निसर्ग आणि मानव-लेख
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
काही वर्षा पूर्वी मी साऊंड ऑफ म्युझिक ( Sound of Music ) नावाचा इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटाच्या सुरुवातीला या चित्रपटातील नायिका निसर्गाच्या सानिध्यात फिरत एक इंग्रजी गाणे गात असते. त्यात ती म्हणते, " Hills are alive sound of music, with the songs they sung for thousand years". मराठीत याचा अर्थ होईल, "हजारो वर्षे चालत आलेलं संगीत मी या पर्वतांच्या टेकडी मधून आजही ऐकत आहे आणि हे संगीत मला भारावून टाकत आहे". पुढे ती गाण्यात म्हणते, " ही प्रत्येक गाणी त्यातील प्रत्येक ओळ मला हवी हवीशी वाटते. त्यासाठी मला हृदयासाठी पंख हवेत जे मला तलावापासून झाडापर्यंत सहजपणे नेऊन आणतील. त्यातून होणारा ढगाचा आवाज, ते पाण्याचे झरे, वाटेवरील दगड मला गाणे शिकवत राहतील. जेव्हा माझे हृदय एकाकी पडेल तेव्हा मी परत टेकडीवर जाईन आणि मला परत माझे गाणे मिळेल". किती खरं आहे या गाण्यातील शब्द. जेव्हा जेव्हा या नायकीला एकाकी वाटते तेव्हा ती परत तिला हव्या असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात जाते आणि तिकडे तिला त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये संगीताचे नवीन सूर सापडतात. खरोखरच या गाण्यामध्ये निसर्ग आणि मानव यांचे नाते किती अतूट आहे हे खूपच छानपणे मांडले आहे. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे निसर्गात असलेली प्रत्येक गोष्ट किती महत्वाची आहे याचा अनुभव जेव्हा मी निसर्गाच्या सानिध्यात जात असतो तेव्हा ते प्रकर्षाने जाणवू लागते. कारण निसर्गानेच मानवाला निर्माण केले. त्यामुळेच निसर्गातील प्रत्येक घटक माणसाच्या जीवनाशी संबंधित आहे.
निसर्ग हा मानवाला मिळालेला सर्वात मोठा ठेवा आहे. कारण हवा, पाणी, वृक्ष, पशुपक्षी अशा अनेक सजीव निर्जीव गोष्टी मानवाला निसर्गाने दिल्या आहेत. या मिळालेल्या गोष्टी मुळेच मानवाने आपली प्रगती केली आहे. असे म्हणतात की माणसाला आपले जीवन अस्तित्वात ठेवण्यासाठी प्राणवायुची गरज असते. हा प्राणवायू मिळवीण्यासाठी त्याला विशिष्ट हवामानाची गरज लागते. त्याला कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उन्हाळा याची गरज असते. त्यासाठी निसर्गाने झाडांची आणि पशुपक्ष्यांची निर्मिती मानवा बरोबर केली आहे. याचाच अर्थ असा की पृथ्वीवरील निसर्गसृष्टी ही एक व्यवस्था आहे की ज्यात कोणताही जीव, मग तो वनस्पतीमधील असो किंवा प्राणीमात्रामधील, या नैसर्गिक परिस्थितीत केव्हाही आणि कुठेही राहू शकतात. त्यामुळेच भौतिक निसर्ग हा भौतिक नियमांनी बद्ध आहे. म्हणूनच माणसाच्या वृत्ती निसर्गामध्ये फुलून येतात आणि त्याची चिंता, व्यथा सर्व काही दूर होऊन जातात. निसर्गाच्या सहवासात गेल्यावर आपल्याला कविता सुचू लागतात असे सांगताना कवी बा. भ. बोरकर म्हणतात, "हिरवळ आणिक पाणी | तेथे स्फूर्ती मजला गाणी ||". छोटी छोटी रानफुले, फ़ांद्याफ़ांद्यात गुंतलेली झाडे, सुखद येणारा वारा, रिमझिम पडणारा पाऊस, सतत वाहत असणारे पाण्याचे झरे या सर्व गोष्टी पहिल्या तर निसर्गाची एक वेगळीच किमया जाणवते आणि वाटत राहते की आपण घराला काढलेला रंग पुसला जातो पण निसर्गाचा हिरवा रंग कधीच पुसाला जात नाही. जेव्हा मी हिरवे गार वन पाहतो तेव्हा मला बालकविंच्या कवितेचे शब्द आठवतात. त्यात ते म्हणतात ," हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालिचे".
अशा या निसर्गाशी मानावाचे नाते अनुकुलतेकडे झुकणारे हवे होते पण आज दुर्दैवाने म्हणावे लागते आहे की ते प्रतिकुलतेकडे जाणारे दिसते आहे. कारण निसर्ग मानवाला झाडे देतो. त्यातून मानवाला फळे, फुले, लाकूड आणि प्राणवायू सारख्या गोष्टी मिळत असतात. जमिनीत धान्य पेरल्यामुळे मानवाच्या अन्नाची व्यवस्था होत असते. आज परिस्थिती वेगळीच दिसते. विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी जंगलतोड केली जात आहे. त्यासाठी जिवंत आणि मजबूत असलेली झाडे तोडली जात आहे. मुंबईतील रस्त्यावरची झाडे तर कमालीची कमी होताना दिसत आहे. माझ्या लहानपणी मी मुंबईच्या परिसरामध्ये नारळ आंबा, गुलमोहर, सूरू सारखी झाडे पाहत होतो. हळुहळु या झाडांची संख्या कमी झाल्याचे दिसत होते. आता मोठ्या टॉवरची उभारणी करताना त्याच्या आजूबाजूला असलेली सर्व जुनी झाडे तोडली जात आहेत. ही वृक्षतोड होत असताना आजूबाजूचे नागरिक फक्त उभे राहून बघत असतात. त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. झाडे ही सर्व सजीवांप्रमाणे संवेदनशील असतात. फळे फुले देणाऱ्या झाडांची व्यवस्थित निगा राखली गेली तर त्या झाडांची वाढ चांगली होऊन मानवाला चांगले उत्पन्न मिळू शकते. माणसाने माणसांवर केलेले उपकार माणूस विसरतो पण प्रेमाने आणि निष्ठेने वाढवलेली झाडे माणसाला कधीच दगा देत नाही किंवा त्याची कधीच फसगत करीत नाही. त्यांच्यावर प्रेम कराल तर ती परतफेड करताना बरेच काही देत असतात. याचे उदाहरण म्हणून मी आमच्या सोसायटीच्या परिसरात लावलेल्या दोन नारळाच्या झाडांबद्दल सांगतो. नारळ हा तर कल्पवृक्ष. त्या झाडाची दोन छोटी रोपे वृक्षप्रेमी लोकांनी अतिशय प्रेमाने लावली आणि त्याची व्यवस्थित निगा राखली. पुढे ती झाडे मोठी होऊन वर्षाकाठी ४० ते ५० नारळ देऊ लागली. हाच प्रकार तुम्हाला आंबा, फणस, काजू वगैरे झाडांच्या बाबतीत सुद्धा दिसून येतो. याचाच अर्थ असा की झाडांमार्फत तुम्ही निसर्गाच्या जवळ जातात. मग निसर्ग आपणांस हवे तसे फायदे देत असतो. इथे मला शांता शेळके यांची झाड नावाची एक कविता आठवत आहे. त्यात कवियत्री म्हणते, "हे एक झाड आहे : याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक दोघांवरून जाते". असे सांगून त्या पुढे लिहितात, "मला आवडतो तो फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास". काव्याचा शेवट करताना त्या लिहितात," कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानामधून ओळखीचे जुने गाणे गाईन ". म्हणूनच प्रत्येक माणसांनी स्वतःहून प्रेमाने झाडे लावली पाहिजे आणि त्यांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे.
निसर्ग आणि मानव यांच्यामधील नाते इतके जबरदस्त असते की निसर्गाच्या सहवासात माणसांच्या वृत्ती फुलून येतात. मी जेव्हा गोव्यात जातो तेव्हा तिकडचा निसर्ग पाहून थक्क होतो. तेथील शुद्ध हवा, गावागावात लावलेली अंबाडा सारखी छोटी झाडे त्याचप्रमाणे नारळ, आंबा, फणस, कोकम, काजू सारखी मोठी झाडे बघितली तर असे वाटते की निसर्गाने मानवाला किती सुंदर गोष्टी दिल्या आहेत. जेव्हा आपल्याला पाऊस, झाड, पक्षी, नदी, समुद्र यांची ओढ लागते तेव्हा आपण एकाकी नसल्याची जाणीव होते. वर म्हटल्याप्रमाणे साऊंड ऑफ म्युझीक या चित्रपटातील नायिका सांगते की एकाकीपण निसर्ग दूर करतो आणि आपणास जगण्यासाठी नवीन सूर देत असतो. त्यामुळे माणसाच्या जन्मापासून निसर्गाशी निर्माण झालेलं हे नाते खूपच विलक्षण आहे. पण मानवाचे आयुष्य फार गतिमान होत चालले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईतील मिठी नदी तर पूर्णपणे खराब झाली असून ती एक नदी होती असे सांगून कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही. गंगा, यमुना सारख्या नद्यासुद्धा याच मार्गाने प्रवास करीत आहेत का? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. नद्या स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हव्यात. कारण त्या टिकल्या तरच नदीकाठाची समृद्ध संस्कृती टिकेल आणि त्याचा फायदा सर्व मनुष्य जातीलाच होऊन मानावाचे जीवन सुंदर होईल यात तिळमात्र शंका नाही. गंगेचा प्रवाह आणि त्या नदीशी असलेले माणसाचे घट्ट नाते यावर गुलजरांची एक सुंदर कविता आहे आणि ती कविता काबुलिवाला या चित्रपटात गाणे म्हणून वापरले आहे. त्यात गुलजार म्हणतात, " गंगा आये कहासे, गंगा जाये कहाँ रे, लहराए पानी मे जैसे, धूप- छाव रे | रात कारी दिन उजियारा, मिल गये दोनों साए | सांज ने देखो रंग रूप के, कैसे भेद मिटाए रे ||". किती भावपूर्ण शब्द त्यांनी या कवितेत मांडले आहेत. त्यासाठी गंगा, यमुना सारख्या सर्व नद्या स्वच्छ करून मानावानेच पर्यावरणाचा प्रश्न सोडवला पाहिजे.
निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते उत्कट होणे गरजेचे आहे. माणूस हा खूप हुशार प्राणी आहे. त्याची बुद्धिमत्ता अगाध आहे. त्यामुळे त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज घेणे फार कठीण होत असते. निसर्ग मानवाला हतबल करतो पण तो त्याचा पराभव कधीच करू शकला नाही. तरी सुद्धा तो माणसाला वेगवेगळी स्वप्ने पुरवतो, सहस्त्र हातांनी सतत काहीतरी देत असतो. सूर्यापासून माणसाला प्रकाश तर मिळतोच पण त्याबरोबर उष्णतासुद्धा मिळते. चंद्र, चांदण्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झालेला आहे. समुद्रपासून मीठ आणि जलप्रवास मिळाला तर नदीच्या खोऱ्यात विविध संस्कृती निर्माण झाल्या. निसर्गामुळेच माणसाला उदात्त, भव्यता, शीतलता या गुणांची ओळख निर्माण झाली. विविध पशुपक्ष्यांची साथ मानवाला निसर्गामुळेच मिळाली. तरीसुद्धा विकासाच्या नावाखाली माणूस निसर्गाची पर्वा करीत नाही आणि निसर्गाचा कोप ओढवून घेतो. मग भूकंप, महापूर, दुष्काळ असे भयानक प्रकार करून निसर्ग माणसाला हतबल करतो. तेव्हा माणूस खडबडून जागा होतो आणि निसर्गाकडे लक्ष देऊ लागतो. यावरून एवढेच लक्षात येते की माणूस आपल्या अगाध बुद्धिमत्तेच्या जीवावर अनेक नवी निर्मिती करताना आपला अहंकार जोपसतो पण निसर्ग आपल्या सुंदर कलाकृतीने माणसाच्या त्या अहंकाराला छेड देत असतो. त्यामुळेच निसर्ग आणि मानव यांचे संबंध अधिक दृढ करावयाचे असतील तर प्रत्येक मानावाने आपल्या भौतिक प्रगतीकडे वाटचाल करताना आपल्या हातात छोट्या बिया घेऊन त्या रुजवाव्यात. कारण नंतर त्याचे फायदे त्यालाच मिळणार आहेत. म्हणूनच म्हणावसे वाटते की मानव निसर्गा शिवाय आपले कर्म करूच शकत नाही. लेखाचा शेवट करताना मी कवी गुलजार यांनी झाडांबद्दल केलेला वक्तव्य लिहून करत आहे. ते म्हणतात, "झाडावर, निसर्गावर मी खूप कविता लिहिल्या. झाडं मला आवडतात. झाडं चैतन्यशील असतात. नुसतं झाडांकडे पाहिलं तरी मन उल्हसित होते. प्रवासाला निघतांना मी पहाटेलाच निघतो. त्यावेळेचा निसर्ग मला मोहवून टाकत असतो. सूर्य उगवत असतो. पाखराची किलबिल चालू झालेली असते. रस्ताच्या आजूबाजूची झाडे पाहत प्रवास कसा संपून जातो ते कळत सुद्धा नाही".
धन्यवाद
Comments
Post a Comment