रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १४२
विषय क्रमांक : २
विषय : एकदा इतिहासकार होऊनीही पाहावं !
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम, मुंबई:
माझे शिक्षण वाणिज्य शाखेतील लेखा आणि लेखापरीक्षणशी संबंधित असले तरी इतिहास माझा खूप आवडता विषय आहे. इतिहास म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटनांच्या ज्ञानाची माहिती. एका विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा देशाबद्दल अगर कालखंडाबद्दल मागील घडून गेलेल्या घटनांची त्याच्या कालक्रमानुसार पद्धतशीरपणे लिहिलेली व मांडलेली आख्यायिका. इतिहासकार ही अख्यायिका भूतकाळाचा व्यवस्थितपणे अभ्यास करून सर्व समाजाला आकलन होईल अशा पद्धतीने लिहून काढतो. ते करत असताना तो कोणताही भेदभाव करत नाही आणि मिळालेल्या पुरव्यांच्या आधारे तो नेहमी सत्य दाखविण्याचा प्रयत्न करतो. भूतकालीन गोष्टींचे संशोधन करत असताना इतिहासकाराला नेहमी आपल्या परंपरागत विचारधारेपासून किंवा जुने दृष्टीकोन व पूर्वग्रह यापासून मुक्त असावे लागते. जग सतत विकसित होत असते, त्यासाठी इतिहासकाराला भूतकाळात घडलेल्या घटनांचे व्यवस्थित विश्लेषण करून त्यांच्या नोंदी जतन करणे जरुरीचे आहे. तसे केल्यास इतिहासात घडलेल्या प्रत्येक घटनांचे आकलन होऊन सर्व समाजाला एक चांगला भविष्यकाळ निर्माण करण्यास मदत होऊ शकेल. कारण कोणताही इतिहासकार संशोधन करताना कोणी कोणाला मारले किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांच्या तारखा एवढ्यावर विसंबून न रहता मानवी भूतकाळाचे व्यवस्थितपणे संशोधन करून, इतरांशी संवाद साधून आपल्या लेखनाद्वारे तो समाजापुढे ठेवत असतो आणि वर्तमानकाळातील समाजाचे पूर्वग्रह बदलून नवीन दृष्टीकोन निर्माण करण्यास मदत करतो. म्हणूनच मला वाटले की एकदा इतिहासकार होऊनी पाहावे!
प्रत्येक माणसाला आपल्या समाजाच्या किंवा देशाच्या भूतकाळाबद्दलची माहिती असल्यास तो आपल्या देशाचा किंवा आपल्या समाजाचा भविष्यकाळ चांगला करू शकेल. त्यासाठी त्यास इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. इतिहास ही एक बहुभाषित शिस्त असून ती मानवाला त्याची जगण्याची सांस्कृतिक जगरूकता आणि नैतिक समज वाढवण्यास मदत करते. इतिहासाच्या अभ्यासातून मिळविलेले ज्ञान अनेक शाखेशी संबंधित असल्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग आपले कौशल्य दाखवण्यासाठी खूप होत असते. कारण ते ज्ञान मानावाच्या पारंपरिक विषयांपैकी एक आहे. पूर्वी फक्त कला शाखेतील विद्यार्थी या विषयात रस घेऊन अभ्यास करीत असत. हल्ली इतर शाखेतील विद्यार्थी यात रस घेताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार डॉ. टोनी जोएल म्हणतात, "असे दिसते की जरी त्यांनी अभियांत्रिक, नर्सिंग, विज्ञान, कायदा, वाणिज्य, वैद्यकीय किंवा इतर काही विषयात प्रवेश घेतला असला तरी बरेच विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून इतिहासात रस घेत असतात". (It seems that, even if they are enrolled in engineering, nursing, science, law, commerce, medicine or from any other field, many students love to dabble in little bit if history as part of their course). त्यासाठी प्रत्येक इतिहासकारांना थेट लोकांशी संवाद साधून नेहमी अग्रभागी राहावे लागेल. नाहीतर राजकीय दृष्टया चुकीच्या गोष्टी प्रसार होऊन समाज चुकीच्या मार्गाने जाईल आणि आपला भविष्यकाळ अस्पष्टतेकडे जाण्यास मदत होईल. यातून मार्ग फक्त इतिहासकारच दाखवू शकेल कारण इतिहासकार हा वर्तमानकाळातील लोकांमध्ये राहून तो भूतकाळातील घडलेल्या घटनांचे विश्लेषण त्यांना करून देत असतो. म्हणूनच वाटते की एकदा इतिहासकार होऊनीही पाहावं !
इतिहासाकडे बरेच काही उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना इतिहासातील व्यक्ती, प्रसंग, महत्वाच्या तारखा आणि ठिकाणे लक्षात ठेवणे जरुरीचे असते. कोण, काय, केव्हा आणि कोठे हे प्रश्न फक्त इतिहासकारांना सुरवातीलाच पडत असतात. पण इतिहासातील घटना समजून घेताना कसे आणि का असे महत्वाचे प्रश्न इतिहासकारांना पडत असतात. त्यासाठी त्या घटना चांगल्या पद्धतीने शोधण्यासाठी ते रस घेत असतात. म्हणूनच चुकीचे वाटणारे संदर्भ इतिहासकार सहजपणे उलगडून त्यातील सत्य सांगतात. आज काही शिकलेली माणसे उगीचच ऐकिव गोष्टीवर विश्वास ठेवून त्यावर विचार न करता चुकीचे अंदाज बांधतात आणि इतिहासातील सत्य घटनेकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा काही गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यापेक्षा जास्त शिकलो असून आम्हाला जास्त माहिती आहे अशी त्यांची भावना असते. त्यांना इतिहासाबद्दल काही ज्ञान नसते. त्याबद्दल त्यांनी काही वाचलेलेसुद्धा नसते. पण चुकीच्या गोष्टीवर त्यांची मते इतकी चुकीची बनलेली असतात आणि त्याच गोष्टीमध्ये रमण्यात त्यांना आनंद वाटतो. या सर्व गोष्टी इतिहासकारच त्यांच्याशी संवाद साधून दूर करू शकतो. कारण इतिहास हा तथ्य, घटना आणि तपशिलांनी परिपूर्ण आहे आणि इतिहासकार आपल्या अभ्यासाने या तथ्यामधील संबंध प्रस्थापित करून वस्तुस्थितीचा तपशील लोकांसमोर ठेवत असतो. त्यामुळे भूतकाळात तंत्रज्ञान, सरकारी यंत्रणा आणि संपूर्ण समाज कसा कार्यरत होता हे परिपूर्णपणे आपण समजून घेऊ शकतो. म्हणूनच मला वाटते की एकदा इतिहासकार होऊनीही पाहावं !
इतिहासातील मजकूर हा नेहमी लिखित स्वरूपात असतो. म्हणून तो जाणून घेण्यासाठी अवांतर वाचनाची आवश्यकता असते. त्यामुळे आपणास जास्त माहिती मिळून आपले ज्ञान वाढत जाते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे अवांतर वाचन म्हणजे वॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावर येणारी माहिती नव्हे. ती माहिती चुकीची आणि खोटी सुद्धा असू शकते. आता खोटे व्हिडीओ बनवून चुकीची माहिती प्रसारित होत असते. त्यात आपले उच्चशिक्षित माणसे विश्वास ठेवून ते सत्य असल्याचा अभिप्राय देतात. अशावेळेस त्यांना सत्य सांगितलेले आवडत सुद्धा नाही. मग त्यांना पुस्तकांचा संदर्भ दिला तर तो संदर्भ चुकीचा असून डाव्याविचारांच्या लोकांनी लिहिलेला असून तो चुकीचा आहे असे सांगतात. त्यावेळीस खूप वाईट वाटते आणि त्यांच्याशी कुठलाही संवाद करावयाचा वाटत नाही. त्यांना इतिहासाचे पुस्तक वाचनणे हे कंटाळवाणे किंवा वेळ वाया घालविणे वाटत असते. त्यासाठी आज अनेक इतिहासकार सोशल मीडियाचा वापर करून चांगली माहिती लोकांना देत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तसे त्यांना करावे लागते कारण इतिहास हा भूतकाळाशी जोडलेला असून त्याचा अभ्यास हा सामूहिक स्मृतीचा एक प्रकार आहे. इतिहास म्हणजे आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत आणि कुठे चाललो आहोत हे संभाव्यपणे सांगू पाहणारी कथा आहे. इतिहासकार आपल्याला अस्मितेची भावना प्रदान करण्यास मदत करू शकतो. म्हणूनच जगभरातील शाळेत अजूनही इतिहास शिकविला जात आहे. देश, कुटुंबे आणि गट कसे तयार झाले आणि कालांतराने उक्रांती होऊन कसे विकसित झाले हे उत्तमरीत्या इतिहासकारच सांगू शकतात आणि वर्तमानकाळातील प्रश्न सोडविण्यास मदत करतात. म्हणूनच मला असे म्हणावसे वाटते की एकदा इतिहासकार होऊनीही पाहावं !
इतिहासाचा अभ्यास करणे जरुरीचे आहे कारण आपल्याला सभोवतालचे जग समजण्यास मदत होते. मग तो इतिहास देशाचा असो वा संगीताचा, खेळाचा, कलेचा किंवा चित्रपटांचा, राजकीय,आर्थिक किंवा सामाजिक पद्धतीचा. या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे तो जाणून घेणे फारच गरजेचे आहे. या सर्व गोष्टीमधील भूतकाळातील घटना आणि त्यांचा जगावर झालेला परिणाम समजून घेतल्यास असे जाणवेल की त्या काळातील माणसांचे व्यवहार वर्तमानकाळातील मुख्य प्रवाहापेक्षा कितीतरी वेगळे होते. म्हणूनच भूतकाळातील दुःख, आनंद आणि अनागोंदी समजून घ्याव्या लागतात आणि त्या समजल्यानंतर सक्षम भविष्यकाळ निर्माण होण्यास खूप मदत होऊ शकते. इतिहासामुळे आपण चांगले नागरिक बनू शकतो आणि लोकशाही समाज टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी जरुरी असलेले ज्ञान त्यांना इतिहासामुळे मिळते. मग ते मिळालेले ज्ञान परिपक्व करण्यासाठी त्या विषयातील ज्ञानी माणसाबरोबर संवाद जरुरीचे असते. जर माणसाला आजच्या प्रत्येक क्षेत्रातील बदलेल्या घडामोडीचा अभ्यास करावयाचा असेल तर त्याला पूर्वी घडलेल्या घटकांचा शोध घ्यावा लागेल. हे केवळ इतिहासामुळे शक्य होऊ शकते. कारण इतिहासच आपणास सामाजिक नैतिकता आणि मूल्ये शिकवित असतो. सुप्रसिद्ध जमैकन राजकीय प्रवक्ते मार्क्स गरवे सांगतात की, "ज्यांना आपला पूर्वीचा इतिहास, त्यांचे मूळ आणि संस्कृती माहित नाही असा समाज हा मुळं नसलेल्या झाडासारखा असतो"(People without knowing their past history, origin and culture is like a tree without roots), तर सुप्रसिद्ध कादंबरीकार Michael Crichton म्हणतात की, "जर आपल्याला इतिहास माहित नसेल तर आपल्याला काहीच माहित नाही. आपण झाडाचा भाग आहे हे माहित असलेली पाने आहात "( If you do not know the history, then you do not know anything. You are the leaf that does not know it is part of a tree). म्हणूनच मला सारखे वाटत राहते की एकदा इतिहासकार होऊनीही पाहावं !
धन्यवाद
Comments
Post a Comment