रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १४३
विषय क्रमांक : २
विषय : दिंडी: मला दिसलेले वेगळेपण
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
दिंडी या शब्दाचा वापर बऱ्याच ठिकाणी होत असतो. काही लोक दिंडी या शब्दाचा वापर अध्यात्मिक गोष्टीसाठी करताना सनातनी लोकांची दिंडी किंवा वारकरी लोकांची दिंडी असे म्हणतात तर काही लोक मराठी साहित्यातील दिंडीला पुरोगामी लोकांची दिंडी किंवा ग्रंथदिंडी असा उल्लेख करतात. माझ्या मते पर्यावरणवादी लोकांची सुद्धा दिंडी असते. त्यामुळे दिंडी या शब्दाचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात होत असतो. आपण दिंडी म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी जमलेल्या व्यक्तींचा समूह असा करू शकतो. अध्यात्मिक भाषेत पायी चालत देवाचे नामस्मरण अभंग किंवा भजने गात करणाऱ्या व्यक्ती समूहास दिंडी असे म्हणतात. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण देवाची पालखी घेऊन चालत असतो तेव्हा त्या पालखी बरोबर देवाचे नामस्मरण मोठया आवाजात करत चालणारा किंवा राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहालाच दिंडी असे म्हणतो. काही ठिकाणी दिंडी म्हणजे वीणा किंवा विणेसारखे एक वाद्य असाही केला जातो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या भागातून पालख्या निघतात आणि त्यात अनेक भक्तजन टाळ, मृदंग वाजवीत, भजने गात आणि हातात ध्वज पताका घेऊन नाचत पंढरपूरला जातात. त्या दिंडीतील लोकांना वारकरी असे म्हणतात. त्यात एका माणसाच्या हातात वीणा असते तो मनुष्य दिंडीचा सर्वधिकारी असतो. त्याच्याच मार्गदर्शनाखाली ती दिंडी वाजत गाजत पुढे जात असते. काही लोक दिंडीला एक छोटासा दरवाजा समजतात कारण दिंडीत राहून भजन, किर्तन केल्याने स्वर्गातील दिंडीचा दरवाजा उघडतो अशी एक समजूत आहे. असे म्हणतात ज्ञानेश्वर, तुकाराम व नामदेव सारखे संत स्वतः आपले सहकारी घेऊन नाचत गात पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात असत आणि अशा मिरवणुकीस दिंडी म्हणत. आता अशी दिंडी फक्त वारकरी समूहाचीच निघते.
दिंडी फक्त अध्यात्मिक प्रकारच्या असत नाहीत. जर आपल्याला आपला समाज सुसंस्कृत व समृद्ध करावयाचा असेल तर वाचन संस्कृती वाढवावी लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील ग्रंथ एकत्र आणून त्याची जोपासना करावी लागते. कारण ग्रंथ हा माणसाला मिळालेला असा खजिना आहे की त्यामुळे त्याचे जीवन समृद्ध होते आणि त्याच्या आयुष्याला व्यवस्थित दिशा मिळण्यास मदत होते. गणित, विज्ञान, औषधशास्त्र, अंकशास्त्र,, वैद्यकीयशास्त्र, इतिहास, कथा, कादंबरी, कविता वगैरे ग्रंथ एकत्रित केले तर ग्रंथाचे स्वतंत्र व वेगळे विश्व तयार होऊ शकते. म्हणूनच सर्व वयातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. आज ग्रंथदिंडी साहित्य संमेलनाचा महत्वाचा घटक झाला आहे. संमेलन सुरु होण्यापूर्वी या ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. त्यात शालेय विद्यार्थ्यांना महत्वाचे स्थान दिले जाते. या उपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना याची व्यवस्थित माहिती देण्यात येते. विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षक, अनेक लेखक, संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यप्रेमी असलेला वाचक वर्ग, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सामील होतात. बऱ्याच ठिकाणी ही दिंडी गावातल्या एका मंदिरापासून किंवा त्या गावात राहणाऱ्या एखाद्या मराठी साहित्यिकाच्या घरापासून काढली जाते. तेव्हा अनेक लेखकांनी लिहिलेली वेगवेगळ्या विषयांची पुस्तके पालखीत ठेवून त्यांची पूजा केली जाते. मग ती पालखी खांद्यावर घेऊन नाचत गाजत संमेलांनाच्या ठिकाणी येऊन पोचते आणि साहित्य संमेलनाला सुरुवात होते. या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मराठी साहित्याची परंपरा सर्व वयोगटातील खास करून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि साहित्याच्या चळवळीला समाजात पोषक वातावरण निर्माण व्हावे. त्यासाठी अनेक लेखक आणि लेखिका एकत्र येऊन परिसंवादाचे आयोजन तर करतातच पण व्यासपीठावर विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उल्लेखनीय कामागिरीबद्दल सत्कार करून त्यांच्या कार्यांची माहिती देत असतात. दोनतीन वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आले होते की औरंगाबादमध्ये नवीन वर्षासाठी शाळा सुरु होण्यापूर्वी ग्रंथादिंडीचे आयोजन केले होते आणि त्यात त्या शाळेतील विध्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता. त्यातून वाचन संस्कृती मुलांमध्ये वाढवावी हाच मुख्य कार्यक्रम होता. ग्रंथादिंडीची अशी संकल्पना खूप सुंदर असून महाराष्ट्रातील सर्व शाळेनी चालू करावा असे वाटते.
आषाढी एकादशीच्या वारीनंतर चंद्रभागा नदीचे पात्र आणि तीर यांची अवस्था दयनीय असते. मानवी विष्ठा, खाऊन टाकलेले अन्न, प्लास्टिकचा कचरा त्याचप्रमाणे इतर कचरा यामुळे चंद्रभागा नदीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी पर्यावरण मंडळी वेगळ्या प्रकारे याचा विचार वारकरी लोकांमध्ये पोहोचवीण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ते पंढरपूरला जाण्याऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत लोककलाकारांना सामील करून निसर्ग आणि पर्यावरणाची माहिती पुराणातील दाखले देऊन गाऊन दाखवीत असतात. याचा परिणाम दिंडी मध्ये सामील झालेल्या वारकरी लोकांमध्ये होऊ लागला आहे. कारण लोककलाकारांनी सांगितलेली गोष्ट दिंडीमधील वारकरी लक्ष देऊन ऐकत होते आणि त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करीत होते. संतांनी निसर्गाबद्दलची ओव्यातून किंवा अभंगातून सांगतलेली माहिती हे लोककलाकार त्यांचीच भजने किंवा ओव्या गाऊन दिंडीतील वारकरी पंथास सांगत असतात. त्यात संत एकनाथची भागवत पुराणातील एक गोष्ट लोककलाकार आवर्जून सांगतात. ती म्हणजे श्रीकृष्णानी उचलेल्या गोवर्धन पर्वताची. ही गोष्ट तशी जुनी आहे. एकनाथ सांगतात की पूर्वी पाऊसासाठी किंवा पाण्यासाठी लोक इंद्राची पूजा कऱीत असत. श्रीकृष्ण या पूजेला हरकत घेतात आणि लोकांना गोवर्धन पर्वताची पूजा करावयास सांगतात. श्रीकृष्ण लोकांना सांगतात की पूजा निसर्गाची करा, गोवर्धन पर्वताची करा कारण तो तुम्हाला पाणी देतो, अन्न देतो आणि संकटापासून वाचण्यासाठी निसर्ग पूजक बना. कारण पूजन म्हणजे निसर्गाचा आदर ठेवणे किंवा त्याचे रक्षण करणे असा आहे. त्यामुळे वारकरी जेव्हा आपली दिंडी पंढरपूरच्या दिशेने नेऊ लागतात तेव्हा महाराष्ट्र कला संस्कृती मंच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाची निसर्गोपासनेचा संदेश देणारी पर्यावरणाची दिंडी वारकऱ्यांच्या दिंडी बरोबर चालत असते. त्यात स्त्रिया सुद्धा डोक्यावर तुळस व हातात निसर्गपूजेचा संदेश घेऊन चालत असतात. ही सर्व माणसे निसर्गावरील असलेली भारूडे, अभंग, संतवाणी आणि लोकगीते गात पर्यावरणाविषयी माहिती लोकांना आणि वारकऱ्यांना देत असतात. असे एक दिंडीचे स्वरूप आपणास पाहावयास मिळते व ते खूप आनंददायक असते.
आपण वर पहिले की देवाची स्तुती करण्यासाठी किंवा ग्रंथाचे महत्व सांगण्यासाठी किंवा पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी दिंडीचा वापर करतो. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न सुद्धा दिंडी मार्फत केला जातो. अंधश्रद्धा या लोक कलेशी जोडलेल्या आहेत आणि त्या दूर करण्याचे काम वेळोवेळी भारूडे, कीर्तने, पोवाडे या माध्यमातून केला जातो. त्याचप्रमाणे जातीजातीतील फरक नाहीसा करण्याचे कामही दिंडी मार्फत केले जात असते. जेव्हा अशा दिंडी आपल्या पालखीसह निघतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते. सूर्य उगवण्याआधी जशी लाली येते तश्याच प्रकारे भगव्या पताकांनी क्षितिज झाकळले जाते. पालखीच्या दिंड्या येत असतात तेव्हा टाळमृदूंगाचा ध्वनी निनादू लागतो आणि असंख्य मुखातून बाहेर पडणाऱ्या अभंगाच्या शब्दांनी वातावरण रंगून जाते. नाचत-बागडत दिंड्या पुढे पुढे सरकत जात पंढरपूर पर्यंत जातात. ही एक प्रकारची पदयात्राच असते. इथे कोणी काही मागत नसतते. फक्त देवाचे भजन करीत चालत राहण्यातच आनंद व्यक्त केला जातो. मग रात्री प्रवचन -कीर्तन करून समाज प्रबोधनाचे काम करण्यात दिंडीमधील माणसे धन्यता मानत असतात. आज शेकडो वर्षे पंढरपूरला जाण्याऱ्या दिंडी आहेत. ही परंपरा टिकली आहे कारण महाराष्ट्रातील संतांनी आपल्या अप्रतिम आणि उत्कट काव्याने केलेले समाज प्रबोधनाचे कार्य आहे. या संतांनी पंढरपूरी विठ्ठलाची एक विलक्षण प्रतिमा लोकांच्या हृदयावर अभंगाद्वारे कोरली आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला खूप महत्व आहे. जेव्हा अशी दिंडी आपल्या गावात येते तेव्हा आपण जरूर जाऊन ती पाहावी आणि त्यात समरस होऊन जावे. मी फक्त देवांच्या दिंडी बद्दल सांगत नसून ग्रंथदिंडी, पर्यावरण दिंडी व इतर दिंडीबद्दलसुद्धा सांगत आहे. कारण प्रत्येक दिंडीत समाजाला शिक्षित करण्याचे कार्यक्रम अभंगाद्वारे , किर्तनाद्वारे किंवा पोवाड्याद्वारे केले जातात.
धन्यवाद
Comments
Post a Comment