रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १३९
विषय क्रमांक : २
विषय : राशीचक्र (लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
प्राचीन वेदकालीन भारतात ऋषींजनांनी सूर्याला पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा आधारभूत ठरवले व सूर्याची अनेक प्रकारे स्तुती केली आहे. त्यासाठी त्यांनी सूर्य व चंद्र यांना महत्व देण्यासाठी मास, ऋतु, नक्षत्र यासंबधी काही सिद्धांत ठरविले. त्यामुळे पुराणात अनेक ठिकाणी आपणास असे आढळेल की सूर्य कधीच अस्त पावत नाही. जेव्हा आपण म्हणतो सूर्य अस्तास जातो तेव्हा त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सूर्य दिवसाच्या अंतास जाऊन स्वतःच उलटा फिरतो आणि एकीकडे रात्र व दुसरीकडे दिवस करतो. उदय याचा अर्थ असा की सूर्य रात्रीचा अंत करून स्वतःस उलट फिरतो. सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे पृथ्वीवर प्रकाश आणि अंधःकार यांचे सिद्धांतानुसार नियमन होऊन सजीव पदार्थाचे स्थित्यंतर होत असते. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा उदय झाला असे वाटते. याचे कारण ज्योतिषशास्त्रज्ञानी कालमानाचे माप ठरवून वर्ष, ऋतु, मास, वार असे मुख्य भाग पाडले. भारतीय ज्योतिषशास्त्र असे सांगते की सूर्य आणि चंद्र एका ठिकाणी येतात तेव्हा अमावास्येचा अंत होऊन एक मास पूर्ण होतो. काही ठिकाणी चंद्रमास पौर्णिमेपर्यंत तर काही ठिकाणी अमावस्येपर्यंत आहेत. वैज्ञानिक सिद्धांतानुसार पृथ्वी सूर्यभोवती फिरते आणि तिची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो व त्याच्या बाराव्या भागाला सौरमास असे म्हटले जाते. पण जेव्हा माणूस या गोष्टीचे पृथ्वीवरून निरीक्षण करतो तेव्हा त्यास भासते की सूर्यच पृथ्वीची प्रदक्षिणा करतो आहे. म्हणजे सूर्यच प्रत्येक सौरमासी आपले स्थान बदलतो, असा आपणास भास होतो. याचाच अर्थ सूर्याचा भासमान मार्ग म्हणजे आयनिक वृत्त होय व ते एक काल्पनिक वर्तुळ आहे की ज्यातून सूर्य, चंद्र व इतर ग्रह आकाशभ्रमण करीत असतात. आकाशात ८८ तारकांचा समूह असल्याचे मानले जाते. पण फक्त १२ तारकांच्या समूहात सूर्य, चंद्र किंवा इतर ग्रहांचे भ्रमण होत असते. थोडक्यात हे तारकसमूह सूर्याच्या भ्रमण मार्गात येत असतात. अश्या १२ तारकसमूहांना राशी असे म्हटले गेले आहे. या राशी म्हणजे मेष वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. थोडक्यात ८८ पैकी १२ तारकासमूहांना दिलेला हा दर्जा आहे.
आपण नेहमी पाहत असतो की प्रत्येक माणसांच्या वागण्याबोलण्यात किंवा वर्तणुकीमध्ये निरनिराळे फरक असतात. त्याला आपण बारा राशी बरॊबर जोडत असतो. कारण ज्योतिषशात्र असे सांगते की बारा राशींची वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये असून त्यांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. एखादी गोष्ट एक राशी सहन करेल किंवा मान्य करेल पण दुसरी राशी नाही मान्य करणार. त्यामुळे त्या दोन राशींच्या व्यक्तींच्या वर्तणुकीत खूप फरक पडतो. आज भारतात वेगवेगळ्या भाषेचे, धर्माचे व पंथाचे लोक राहत आहेत. आजची जीवनशैली पाहिली की असे लक्षात येईल आज भारतीयांचे राहणीमान एकाच राज्यापुरते मर्यादित राहिले नाही. त्यामुळे प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तींची राशी कुंडली परिपूर्ण असणे शक्य वाटत नाही. याचे कारण जन्म कुंडली ही जन्मवेळेवरून मांडली जाते आणि उचित जन्मवेळ ठरविणे नुसते कठीण काम नसून ती एक अशक्य गोष्ट आहे. पृथ्वी ही सूर्यापासून पंधरा कोटी किलोमीटर दूर असून सूर्याची किरणे दर सेकंदाला तीन लाख किलोमीटर प्रवास करून पृथ्वीवर पोहोचतात. त्यामुळे अचूक जन्मवेळेची नोंद करणे जसे शक्य होत नाही तसेच अचूक रास सांगणेही शक्य होत नाही. म्हणूनच माणसांचे गुणधर्म त्यांच्या जन्म राशींवरून अचूक सांगणे बरोबर होणार नाही. तरीसुद्धा खागोलातील ग्रहांचे स्थान दाखविण्यास व सांगण्यास राशींची फार मदत होत असते कारण एका वर्षात सहा ऋतु येतात आणि प्रत्येक ऋतुमध्ये सूर्य तीन राशी ओलांडून जात असतो. शरद उपाध्ये यांनी मराठीत ज्योतिषविषयक राशीचक्र नावाचे पुस्तक लिहिले आहे आणि त्या पुस्तकात १२ राशी आणि त्यांचे गुणधर्म सांगितले आहे. याच विषयावर त्यांनी राशीचक्र व राशीरंजन असे एकपात्री कथाकथनांचे कार्यक्रम केलेले आहेत. राशीचक्र या कार्यक्रमाचे जवळजवळ ३००० प्रयोग केलेले आहेत. कार्यक्रम विनोदी करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगाचा भाग सोडला तरीसुद्धा राशींचा जो मूळ स्वभाव असतो तो त्या राशीतल्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात लागू पडत नसल्याचे निदर्शनात येत असते. जर ते लागू पडत असतील तर बारा राशींप्रमाणे फक्त बारा प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली पाहिजे होती. याचाच अर्थ एका अमुक राशीच्या माणसाचा स्वभाव त्या राशीतील गुणधर्मनुसार वेगळासुद्धा असू शकतो. उदाहरण म्हणून आपण कर्क राशीत असलेली माणसे पाहू. असे म्हणतात या राशीतील माणसे प्रेमळ असतात आणि स्वयंपाकघरात रमणारी असतात. त्यात पुरुष सुद्धा असतात. मी कर्क राशीतील काही माणसे पहिली आहेत. त्यातील बहुतेकजण प्रेमळपणा तर दाखवत नाही आणि स्वयंपाकघरात पाय फक्त जेवण्यासाठी ठेवतात. तसेच कन्या, तूळ, राशींचे.
ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी येतात. त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. ती आपण पाहू. ज्योतिषशास्त्रा प्रमाणे पहिली रास मेष आहे. ती मेष का आहे याचे कारण असे की ज्यावेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी वसंतसंपात बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. मेष ही रास मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी रास असून या राशीचे चिन्ह मेंढा आहे. शौर्य, धाडस, अन्याया विरुद्ध आवाज उठविणे आणि कामाची सुरुवात जबरदस्त ताकदीने करणे पण ते पूर्ण न करता अर्धवट सोडणे असे गुण या राशीतील माणसांचे समजले जातात. आपले मत सांगताना दुसऱ्यांचे न ऐकणे असाही एक स्वभाव मेष राशीतील माणसांचा असतो. वृषभ ही रास शुक्राच्या अधिपत्याखाली येणारी रास असून या राशीतील माणसे प्रेमळ व सौंदर्याची आवड असलेली असतात. प्रसन्न वातावरणात राहणे, नाटक सिनेमा पाहणे, सहलीला जाणे आणि कमीतकमी पैसे वापरून आवडती गोष्ट करून घेणे अशा प्रकारची माणसे या राशीतील आहेत असे मानले जात असून या राशीचे प्रतीक बैल आहे. मिथुन राशीतील माणसे कुशाग्र बुद्धीची, उत्तम स्मरणशक्ती असलेली असतात असे मानले जाते. या राशीचे प्रतीक गदाधारी पुरुष व वीणाधारी स्त्री असलेले जोडपे असून ही रास बुधाच्या अधिपत्याखाली येते. परिस्थिनुसार बदलण्याची वृत्ती, प्रेमळपणा, निश्चयी स्वभाव असे गुण दिसलेली व्यक्ती ही कर्क राशीतील आहे असे समजतात. चंद्राच्या अधिपत्याखाली येणारी ही रास असून तिचे चिन्ह खेकडा आहे. सिंह राशीतील माणसांच्या बोलण्यात किंवा वागण्यात एक प्रकारचा रुबाब आणि ऐट असते. ते उत्तम संघटक व कुशल प्रशासक असतातच पण कुठल्याही कार्यक्रमाचे सुंदर नियोजन त्यांना फार चांगले जमते. या राशीचे चिन्ह सिंह असून रवीच्या अधिपत्याखाली येणारी ही रास आहे.कन्या ही रास बुधाच्या अधिपत्याखाली येणारी रास असून या राशीतील माणसे फार संशयी वृतीची असली तरी त्यांच्या मध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती असते. एका हातात धान्यांची ओंबी व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन बसलेली स्त्री या राशीचे चिन्ह आहे.
तूळ ही रास सुद्धा वृषभप्रमाणे शुक्राच्या अधिपत्याखाली येणारी रास असून तराजू याचे प्रतीक आहे. ही रास प्रेमाची रास असल्याचेही म्हणतात. या राशीतील माणसे कलोपासक आणि वेगवेगळे छंद असलेली असतात तरीसुद्धा त्यांना जीवनातील दुःखे, संकटे कधी सहन करता येत नाही. वृश्चिक राशीतील माणसे धडाडी व प्रचंड इच्छाशक्तींची असतात. मंगळाचा प्रभाव असलेल्या या राशीचे चिन्ह विंचू आहे. धनु ही गुरुच्या अधिपत्याखाली येणारी रास असून त्याचे चिन्ह अर्धा भाग धनुर्धारी पुरुष व अर्धा भाग घोडा आहे. संकटातून मार्ग काढणे, आपल्या विचाराने दुसऱ्यांना आपलेसे करणे, दिलदारपणा आणि सज्जनपणा असलेल्यांची ही रास आहे. वाचन करून, अभ्यास करून आपला विषय मांडणे हे या राशीतील लोक करत असतात. मकर राशीतील माणसे काटकसरी स्वभावाचे असून या राशीतील माणसे बरीच असहिष्णू असतात. या राशीचे प्रतीक मगर असून शनिच्या अधिपत्याखाली येणारी ही रास आहे. कुंभ ही सुद्धा रास शनिच्या अधिपत्याखाली येणारी रास असून कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि प्रचंड स्मरण शक्ती असलेल्यांची ही रास असून याचे चिन्ह आहे हातात घट घेतलेला पुरुष. कुठलेही काम निःस्वार्थपणे करणारी माणसे या राशीतील असतात. मीन ही बारावी रास त्याचे प्रतीक एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेले दोन मासे आहेत. या राशीतील माणसांना सूड किंवा मान-अपमान अशा गोष्टींचे महत्व नसते. त्यामुळे अश्या व्यक्ती आयुष्यात अनेक जणांबरोबर मैत्री करू शकतात आणि भक्ती, प्रेम व देवकृत्य आपले कर्तव्य म्हणून करीत असतात. सर्व राशींमधील माणसांपेक्षा सर्वात सहनशील माणसे मीन राशीत असून ही रास गुरुच्या अधिपत्याखाली येणारी रास आहे.
मानवी जीवन अनेक गुंतागुंतीने बनलेले असते. प्रत्येक माणूस शांत, समृद्ध, सुखी व प्रसन्न जीवन इच्छित असतो. तो आपल्या परीने मेहनत करून ते साधण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा तो राशी भविष्य यावर विश्वास ठेवून दुःख, भय, असुरक्षितपणा यांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. वरील लिखाणात वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून राशींची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राचा सुद्धा वापर करून बारा राशींचे गुणधर्म सांगण्याचा आणि त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.अजून एक गोष्ट शेवटी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सूर्याचे मकर राशीमध्ये होणाऱ्या प्रवेशाला मकर संक्रांती असे म्हणतात. पुढे हे संक्रमण मकर मधून कुंभ राशीत होईल का आणि झाले तर आपण तो दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा करू का?
धन्यवाद
Comments
Post a Comment