रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १४०
विषय क्रमांक :३
विषय : भ्रमंती (प्रवासवर्णन)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
मी माझ्या आयुष्यात खूप भ्रमंती केली आहे.
मग ती भ्रमंती कधी कामानिमित्त घडलेली असो किंवा वैयक्तिक ठरवून केलेली असो. तो एक
घडलेला सुखमय प्रवास असतो. मग तो प्रवास डोंगर खोऱ्यातील असो किंवा समुद्र
किनाऱ्यावरचा किंवा आपण ज्या शहरात राहतो त्या शहरात केलेली भ्रमंती असो. भ्रमंती
किंवा प्रवास ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या शरीरातील सुप्त असलेले उत्साहाचे
इवलेसे कारंजे मोकळे करते,
मनाचा शिणवटा कमी करून मन प्रसन्न करते.
जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. नवीन देश
प्रदेश पाहिल्याने किंवा फिरल्याने आपल्याला जे ज्ञान मिळते व अनेक अनुभव येतात
त्यातून आपली संवेदना वाढीस लागण्यास मदत होते आणि आपल्याला मनसोक्त आनंद मिळत
असतो. भ्रमंती करत असताना त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती तर मिळतेच पण त्या
प्रदेशाचा इतिहास, तिथली माणसे व त्यांचे राहणीमान, त्यांची वेशभूषा, त्यांचे संगीत व साहित्य, त्यांचे खेळ, त्या भागातील प्रेक्षणीय स्थळे या गोष्टींची माहिती
आपणास होत असते. म्हणून इथे मला समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आठवतो. ते
म्हणतात, " सृष्टीमध्ये बहताक परिमण कळ कवतिक, नाना प्रकारिच विवेक आढळागती".
इथे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
ती म्हणजे भ्रमंती किंवा प्रवास म्हणजे तीर्थ यात्रा नव्हे. कारण तीर्थ यात्रा
फक्त मोक्षाचा मार्ग सांगते पण मोक्षापेक्षा ऐहिक सुख सुद्धा महत्वाचे असते. कारण
ताण-तणावा पासून दूर होण्याचा मार्ग म्हणजेच भ्रमंती किंवा प्रवास. मी केलेला
प्रवास आणि त्यातून माहीत झालेल्या गोष्टी याचे विश्लेषण थोडक्यात लिहिण्याचा
प्रयत्न करत आहे कारण प्रवासात दुरदूरच्या वाटा असतात की त्या सर्व काही
सांगण्यासाठी एक पुस्तक लिहावयास लागेल.
भारतात जवळ जवळ सर्व राज्ये पाहण्याचा योग मला आला तसेच परदेशात सुद्धा जाण्याचा योग आला पण मनाला भावला तो विद्याव्यासंग आणि सुसंस्कृत असलेला देश इंग्लंड. या देशाने जगाला स्वतःची भाषा तर दिलीच त्याचबरोबर वैज्ञानिक शिक्षण, लोकशाही, संसद, साहित्य, क्रिकेट आणि फुटबॉल सारखे खेळ दिले. त्यामुळे या देशात भ्रमंती करण्यास मिळणार म्हणून खूप आनंद झाला. युनाइटेड किंगडम मधील हा एक घटक देश आणि त्याची राजधानी आहे थेम्स नदीच्या किनाऱ्यावर बसलेले लंडन हे शहर. जगातील सर्वात आर्थिक उलाढालिचे प्रमुख शहर. इथले हीथ्रो विमानतळ तर खूपच सुंदर असून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीचे जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे. अशा शहरात भ्रमंती करावयास मिळाली आणि त्यातून मिळालेला आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. आम्ही लंडन फिरायला सुरुवात केली ती लंडनमध्ये असलेल्या भुयारी रेल्वेनी. इंग्लिश लोक त्या रेल्वेस ट्यूब असे म्हणतात.हा प्रवास खूप मजेदार आणि सुखाचा आहे. प्रत्येक स्टेशनवर स्टेशनचे नाव तर आहे पण पुढील स्टेशन कुठले आहे याची सुद्धा नोंद आढळते. त्याशिवाय एका छोट्या कार्डावर छानपणे काढलेला नकाशा पूर्ण ट्यूबच्या स्टेशनची माहिती नकाशाने सुद्धा दाखवलेली असते. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायला ट्यूबचा उपयोग फार होतो. त्यासाठी लंडनला गेल्यावर ट्यूबमधून प्रवास केलाच पाहिजे. लंडनला जाऊन ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठापैकी एकतरी विद्यापीठ जरूर पहावे. याचे कारण जगाला ज्ञान देणारी आणि अनेक शास्त्रज्ञ, तत्वज्ञ तसेच वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ या विद्यापीठातून तयार झालेले आहेत.मला ऑक्सफर्ड पाहण्याचा योग आला. तेथील सर्व इमारती फार जुन्या म्हणजे शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. तेथील फर्निचर सुद्धा जुन्या काळातील वाटत होते. पण वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या इमारती आहेत व अनेक संशोधन संस्था आहेत.ऑक्सफर्डप्रमाणे अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे स्ट्रॅटफर्ड अपऑन एव्हन ( Stratford Upon Avon) हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांचे जन्मस्थान. तिकडे असे सांगितले जाते की त्यांच्या बालपणीचा बराच काळ त्या घरात व्यतीत केला गेला आहे. त्याची जपणूक फार सुंदरपणे केली आहे. या इमारतिची वास्तूशैली फारच जुनी असून त्यास ठराविक लाकडी चौकट आहे. निळा आणि राखाडी रंगाचा दगड वापरला गेल्याचे वाटते व तळमजला एका असामान्य दगडापासून बनवलेला वाटतो. त्यात चिमणी असलेले एक पार्लर (fireplace) असून एक मोठा हॉल आहे. मग क्रॉस पॅसेज आहे त्यातून पहिल्या मजल्यावर जाऊ शकतो. हे घर साहित्यप्रेमीने एकदा तरी पाहावे असेच आहे आणि हा प्रवास फारच आनंददायक आहे आणि हे सर्व जतन केलेलं पाहून थक्क व्हायला होते.
बाकी लंडन पायी फिरण्यात खूप मजा आहे. मॅडम तुस्सा, लंडन आय, टॉवर ब्रिज, थेम्स नदी, संसद, बकिंगहॅम पॅलेस, वगैरे खूप पाहण्यासारखे आहे. त्यात अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सेंट जॉन वूड येथील क्रिकेटची पंढरी असलेले लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम. या स्टेडियमचे संस्थापक होते थॉमस लॉर्ड आणि त्यांचेच नाव या स्टेडियमला दिले आहे. हे स्टेडियम क्रिकेटचे माहेर घर मानले जाते. इथे लॉर्ड्सची सुंदर भ्रमंती आहे. त्यात पूर्ण लॉर्ड्स मैदानाची माहिती सांगितली जाते. येथे पहिला सामना २२ जून १८१४ रोजी मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) आणि हर्टफोर्डशायर यांच्यात खेळाला गेला आणि एमसीसीने तो २७ धावानी जिंकला अशी माहिती मिळते. या स्टेडियमचे अजून एक वैशिष्ट म्हणजे हवामानाचा अंदाज जुन्या जमान्यातील Wheather Vane या साधनाचा वापर करून वाऱ्याची दिशा समजण्यासाठी करतात. लॉर्ड्समध्ये एक क्रिकेटच्या इतिहासाचे मोठे संग्रहालय आहे आणि त्यात क्रिकेट जगातील सर्व स्मृतींचा संग्रह आहे आणि तो संग्रह १८६४ पासूनचा आहे. तिथे ब्रायन जॉनस्टन थिएटर आहे त्यात क्रिकेटचा पूर्ण इतिहास दाखवीला जातो आणि तो क्रिकेटप्रेमिना अभ्यासासाठी खूप उपयोगाचा आहे. त्याशिवाय वाचनालय सुद्धा आहे त्यात क्रिकेटवर सतरा हजारावर पुस्तके आहेत. तसेच किती खेळाडूंनी शतके केली आणि किती गोलंदाजानी विकेट्स घेतल्या यांच्या नोंदी लाकडी फळ्यावर लिहिलेल्या आहेत. हे सर्व पाहिल्यावर लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमची भ्रमंती खूपच आनंददायक आणि मस्त झाली. बाकी लंडन मुबंई सारखेच आहे. शेवटी मुंबई ब्रिटिश लोकांनीच उभारलेली आहे हे एक निर्विवाद सत्य आहे. वर म्हटल्याप्रमाणे वेस्ट मिनिस्टर एबे आणि सी एस टी स्टेशन यांच्या इमारतीत बरेच साम्य आहे. खरोखरच लंडन सुद्धा खूप छान असून या शहराचा कधीच कंटाळा येत नाही.
वर दिलेली ही भ्रमंती शहरांची किंवा गावाची आपण पहिली. अशी अनेक शहरे किंवा गावे आहेत ती पाहिल्यानंतर खूप आनंद देऊन गेली आहेत. वर म्हटल्याप्रमाणे गोव्यातील दूध सागर जसा मनाला आनंद देऊन गेला तसाच आनंद वेगळ्या प्रकारे अमेरिकेतील नायगाराचा धबधबा देऊन गेला. किती अजब दृश्य होते ते. अमेरिकेतील बफेलो या शहराजवळ नायगारा नावाची एक नदी आहे. ती नदी अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या सीमेवर असून हा धबधबा या नदीवर आहे व त्यात ४० लाख चौरस फूट पाणी पडत असते अशी माहिती तेथे मिळाली. तिथे मेड ऑफ द मिस्ट टूर या बोटीने आपल्याला नायगारा धबधबा पाहायला मिळतो. तिकीट काढल्यानंतर आपल्याला निळ्या किंवा पिवळ्या रंगाचे रेनकोट घालून बोटीच्या डेकवर जावे लागते. मग ही बोट आपल्याला धबधब्याच्या अगदी जवळून घेऊन जाते. तेव्हा फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी आपल्याला चिंब भिजवून टाकते. हा एक अलौकिक अनुभव खूप आनंद देऊन जातो आणि तलावातून निर्माण झालेला हा धबधबा एक नैसर्गिक चमत्कार असल्याचेही जाणवते. या धबधब्यावर जाण्यापूर्वी एका आयनॉक्स थिएटरमध्ये नायगारा बद्दल फिल्म दाखवण्यात येते. त्यामध्ये अनेक रंजक कथा असून ती फिल्म पाहण्यास खुप मजा येते. त्यात किती लोकांनी या धबधब्यात उड्या मारल्या व त्यातून किती लोक जिवंत राहिले याची माहितीपण दिली जाते पण बऱ्याच गोष्टी काल्पनिक असल्यासारख्या वाटतात. रात्रीच्या वेळी हा धबधबा पाहण्याचे सुख खरोखरच वेगळे आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि त्यावर मारलेले वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश झोत आपल्याला तिथे खिळवून ठेवते. कितीही पहिले तरी मन भरत नाही कारण वेगवेगळ्या रंगात दिसणारा नायगारा एक अदभूत चमत्कारच आहे. या धबधब्यातून १९० मेगावॉट एवढ्या विजेची निर्मिती होते असे आम्हाला आमच्या गाईडने सांगितले. पण नायगारा धबधबा एकदा पाहून मन भरत नाही. या वेळीस अमेरिकेच्या बाजूने पहिला, पुढे कॅनडाच्या बाजूने पाहण्याची जबरदस्त इच्छा आहे. हा धबधबा पाहताना मला विश्राम बेडेकर यांच्या एक झाड आणि दोन पक्षी या आत्मचरित्र्याची आठवण झाली. पुस्तकाचा शेवट करताना ते सांगतात की ते जेव्हा नायगारा धबधबा पाहावयास गेलो असता त्यांना असा प्रश्न पडला हे सुंदर पाणी खाली पडून आपला कपाळमोक्ष का करीत आहे. तेव्हा त्यांना त्याच उत्तर मिळत ते असे. ते लिहितात, हे पाणी खाली पडून नदीत जाणार, तेथून ते समुद्रात जाणार. मग उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन ढग निर्माण होतील आणि पावसाद्वारे ते पाणी परत पृथ्वीवर पडेल आणि परत सुंदर दिसण्यासाठी आपले कपाळमोक्ष करेल. हे जलचक्र असेच चालू राहणार. खरोखरच मानवी जीवन या पाण्यासारखेच आहे. कितीही वेळा पराभव झाला तरी ते सुंदर दिसण्यासाठी परत प्रयत्न करत राहणार.
मी केलेली भ्रमंती किंवा केलेला प्रवास या बद्दल भरपूर अनुभव आहे. मला आवडलेल्या काही भागाचे वर्णन सांगण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment