Skip to main content

Ankhi kay hav आणि काय हवं

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १३८

विषय क्रमांक : २

विषय :आणि काय हवं

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

माणसाचे मन नेहमी सुखाच्या भोवती फिरत असते आणि ते सुख मिळविण्यासाठी माणूस जगभर हिंडत असतो. त्यासाठी तो भरपूर मेहनतही करतो पण त्याला बऱ्याच ठिकाणी सुखी झालेली माणसे जवळजवळ दिसत नाही. कारण सुख म्हणजे नक्की काय असते याचा पूर्ण विचार तो कधीच करत नाही. प्रत्येक छोट्या गोष्टी आपल्या मनासारखी झाली नाही तर तो नाराज होतो आणि सुखापासून दूर जातो. "सुख हे कणभर गोष्टीमध्ये लपलेले असते फक्त ते मनभर जगता आले पाहिजे", हे वाक्य मी कुठेतरी वाचले होते . नक्की कुठे ते सांगता येत नाही. पण या वाक्यात खुप खोलवर अर्थ रुजला गेला आहे. समजा आपल्याला एक पुस्तक  वाचायला हवे असते आणि ते पुस्तक  मिळवण्यासाठी आपण वाचनालयात गेलो व तिथे गेल्यावर ते पुस्तक अचानक आपल्या समोर टेबलावर ठेवलेले असते, तेव्हा आपल्या मनाला खूप आनंद होतो हे आपण शब्दात सांगू  शकत नाही. तसेच अजून एक उदाहरण पाहू. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारी अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहत असतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो. खेळाचे असो किंवा व्यवसायाचे, नाटकाचे किंवा सिनेमाचे, राजकारणाचे असो किंवा समाजकारणाचे. आपापल्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवीत काही व्यक्ती फार मोठी होतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनातसुद्धा खूप आदर निर्माण झालेला असतो आणि नकळत आपण त्यांच्या प्रेमात पडतो. अचानक एकेदिवशी त्या व्यक्तीपैकी एकाशी संवाद साधण्याची संधी आपल्याला ध्यानी मनी नसताना मिळते, तेव्हा आपण खूपच आनंदी होतो. तेव्हा जाणवते की सुख छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा असतं. तरीही माणूस नेहमी सुख शोधण्यासाठी अनेक गोष्टीच्या मागे लागत असतो. सर्व असूनही समाधानी न होता तो  स्वतःला नेहमीच एक प्रश्न विचारात असतो आणि काय हवं?

अलीकडेच माझ्या एका मित्राशी बोलत असताना तो म्हणाला की त्याला यशाची भीती वाटू लागली आहे. कारण यश आहे तो पर्यंत त्याचे अनेक मित्र, नातेवाईक त्याच्या बरोबर असतील. जर का अपयश आले तर त्याचे  मित्र  त्याच्यापासून दूर जातील आणि अनेक नातीसुद्धा तुटून जातील. त्यासाठी त्याला यशस्वी होण्यासाठी प्रत्येकवेळी काहीतरी करावेच लागत आहे. तो मला हे सांगत असताना मला जाणवत होते की या माझ्या मित्राकडे सर्व काही आहे पण तो समाधानी नाही कारण प्रत्येक दिवशी हा माणूस त्याला आणि काय हवं याचाच विचार करत असतो. आपल्या व्यक्तीमत्वाची अनेक वैशिष्ट्ये आपल्या दैनंदिन जीवनात गर्दी करताना दिसतात. जर आपण या वैशिष्ट्यांविषयीची  जागरूकता जाणून घेतली तर ही वैशिष्ट्ये आपल्या अंतःकरणामध्ये भरपूर अंतर्दृष्टी देण्यास मदत करू शकेल म्हणजेच स्वतःचा शोध घेण्यास मदत करू शकेल. तेव्हाच माणसाला जाणवेल की त्याला आयुष्याकडून काय हवे आहे, त्याला कशाची खंत आहे आणि त्याला कशाचा एवढा अभिमान आहे आणि मगच तो स्वतःचा शोध घेत स्वतःला भीतीदायक संकल्पनेपासून दूर घेऊन जाईल. जिथे आपण काम करतो ते काम आवडीने किंवा प्रेमाने केल्यास माणसाला त्याच्या कौशल्याचा वापर छान पैकी होऊन नवीन काम करण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होईल आणि जो काही मोकळा वेळ असेल त्यात तो स्वतःची आवड पूर्ण करून आपले जीवन आनंदी बनवू शकेल. तसे करताना माणसाला आपला अभिमान किंवा गर्व बाजूला ठेवावा लागेल आणि सुरक्षित जोखीम घेऊन आपला व्यावसायिक कारभार यशस्वी होण्यास मदत होईल व आपल्या मित्रांपासून किंवा नातेवाईकांपासून तुटण्याची भीतीसुद्धा दूर होईल. मग तो म्हणेल, "आणि काय हवं!

दोन तीन वर्षांपूर्वी असेल मी एका क्रिकेटवर असलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा तिथे बरीच क्रिकेटप्रेमी रसिक मंडळी जमली होती. त्या कार्यक्रमातील जो पूर्वी क्रिकेट हा खेळ खेळत होता, त्याने त्या सभेत भाषण करताना सांगितले की हल्लीचे क्रिकेट हे पूर्वी इतके म्हणजे साठ वर्षा पूर्वीचे राहिलेले नसून या खेळाचे व्यवसायिकरण झाले आहे. नंतर ते पुढे म्हणाले की पूर्वीच्या काळात डॉन ब्रॅडमन, किथ मिलर, गॅरी सोबर्स, सी. के. नायडू वगैरे सारख्या खेळाडूंचा खेळ पाहवयास मिळाला नाही म्हणून खंत तर व्यक्त केलीच पण त्यांची सर नंतर आलेल्या कुठल्याही क्रिकेट खेळाडूमध्ये दिसत नाही असेही म्हणाले. अशा वेळेस मला काय बोलावे हेच सुचेनासे झाले. डॉन ब्रॅडमन, किथ मिलर किंवा सोबर्स हे महान खेळाडू होते आणि आहेत. त्याबद्दल दुमत नाही. पण त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणी खेळाडूंनी आपणास आनंद दिला नाही असे बोलणे बरोबर होणार नाही. वेस्ट इंडिज सारख्या जलद गोलंदाजी पुढे कसे खेळावे याचे तंत्र सुनील गावस्करने दाखववून दिलेचना. बोथम, कपिल देव, इम्रान खान सारखे अष्टपैलू खेळाडू किथ मिलर किंवा सोबर्सपेक्षा कमी आहेत काय? १९९८ मधील सचिन तेंडुलकरची ऑस्ट्रेलिया विरुद्धची  शारजा मधील एक दिवसीय सामन्यातील अप्रतिम शतकी खेळी किंवा १९९८-९९ मधील चेन्नई येथे पाच दिवसाच्या सामन्यातील पाकिस्तान विरुद्धातील सामन्यात खेळलेली अशीच एक शतकी खेळी आपल्याला क्रिकेट खेळातील अनेक सौंदर्यस्थळे दाखवून गेली नाहीत का? आजसुद्धा विराट कोहली, जो रूट, बेन स्टोक्स, मार्टिन गुपतील  सारखे खेळाडू क्रिकेट खेळाची मजा देत आहेत. ब्रॅडमन किंवा सोबर्सप्रमाणे सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, इम्रान खान, झहीर अब्बास, अल्वीन कालिचरण, व्हिव रिचडर्स, अरविंद डिसिल्वा, अनिल कुंबळे, शेर्न वार्न, वगैरे अनेक खेळाडूंचे खेळ बघितल्यावर असे वाटून राहते की  क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक सौंदर्यस्थळे आहेत आणि ती आपण शोधली पाहिजेत. ती शोधल्यावर जाणवते की आपल्याला आणि काय हवं?

क्रिकेटप्रमाणे आपण ही सौंदर्यस्थळे नाटकात, सिनेमात, साहित्यात व संगीतातसुद्धा पाहू शकतो. याचे कारण या सर्वांची आवडसुद्धा आपल्याला अंतर्दृष्टी देऊ शकते. जेव्हा बरीच माणसे आपल्याला सांगतात की सिनेमा आणि नाटक बघण्यास वेळ देणे म्हणजे आपला चांगला वेळ फुकट घालविणे. तेव्हा मला अशा लोकांची कीव करावीशी वाटते. मी असे मानतो की संगीत, साहित्य, चित्रपट आणि नाटके आपल्याला नवीन विचार शोधण्यास मदत करत असतात. त्यांच्याकडे एवढे सामर्थ असते की आपण कधीच निराश होत नाही. याचे उत्तम उदाहरण बघायचे असेल तर चार्ली चॅप्लिन यांचा लाईम लाईट हा चित्रपट. रंगभूमीपासून दूर फेकल्या गेलेल्या नटाच्या जीवनावरचा हा चित्रपट आहे. एक उपेक्षित नट परत परत रंगभूमीच्या आसपास रेंगाळताना दिसतो, तेव्हा त्या नटाची प्रेयसी त्या नटाला विचारते की या रंगभूमीने तुला इतक्यावेळा झिडकारले तरीपण तू तिथे कशाला जातोस? तूला त्याचा तिटकारा येत नाही का? तेव्हा तो नट म्हणजे चार्ली चॅप्लिन म्हणतो, "हो येतो, मला कुठे रक्त पडलेले पाहूनही तिटकारा येतो पण माझ्या शरीरात सुद्धा रक्तच वाहत असते - त्याला काय करणार?". कारण नाटक करणे हे त्या नटाचे नुसते कामच नसते तर ते त्याचे वेड असते. त्यासाठी तो झपाटलेला असतो. याचाच अर्थ कुठलेही काम प्रेमाने किंवा झपाटल्या प्रमाणे केले तर आपल्याला जो आनंद मिळतो तो खूप मोठा असतो. तसेच संगीताबद्दल  सांगता येईल. कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले  यांचे संगीतसुद्धा आपल्याला बरेच काही शिकवून गेले आहेत. कुमारांनी तर अनेक नवीन राग निर्माण करून संगीतात नवीन चैतन्य निर्माण केले तर लता मंगेशकरांच्या आवाजाने इतकी मोहिनी घातली आहे की त्यांची गाणी आजही ऐकताना खूप आनंद देऊन जातो. मला जसे अनेक चित्रपट, नाटके पाहायला मिळाली त्याचप्रमाणे संगीताच्या मैफिली ऐकल्या आणि या सर्वांची  मजा घेत आयुष्याचा आनंद घेतला तेव्हा असे वाटते की आणखी काय हवं?

ज्याप्रमाणे खेळ, संगीत, चित्रपट आणि नाटके आपल्याला सकारात्मक विचार करण्यास मदत करतात त्याचप्रमाणे चांगली पुस्तकेसुद्धा आपल्या आयुष्यात खूप चांगला आणि सकारात्मक बदल घडवून आणतात. आपले विचार सुधारतात, आपल्या विचारांना चांगली दिशा देतात. जर आपण पुस्तके वाचली नाहीत तर आपल्या मनावर आजूबाजूच्या नकारात्मक घटनांचा परिणाम होऊन आपल्याला नैराश्य येऊ शकते. यासाठी विचारांची बैठक पक्की हवी आणि ती पक्की करण्यास चांगली पुस्तके खूप मदत करतात. मग ती पुस्तके मराठीत असो वा इंग्रजीत. ती वाचताना मी त्यातील सौंदर्यस्थान शोधत असतो. वूडहाऊस वाचताना जी मजा आली तशीच मजा पु ल देशपांडे किंवा चि वी जोशी वाचतानासुद्धा आली. विचार कसा करावा आणि इतिहास वाचताना घडून गेलेल्या घटनांकडे कसे पाहावे त्याचप्रमाणे कादंबरी, कथा, कविता यातील बारकावे कसे शोधावेत याची नोंद नरहर कुरुंदकरांची पुस्तके वाचताना मिळत गेली. त्याचप्रमाणे भारताचा समकालीन इतिहास वाचताना भारताने गेल्या सत्तरवर्षात केलेल्या प्रगतीचा उल्लेख रामचंद्र गुहा आणि सुनील खिल्लानी यांनी खूप छानपणे आपल्या पुस्तकात मांडून नवीन विचारांची दिशा आपल्या समोर ठेवली आहे. दुर्गा भागवत, इरावती कर्वे, आचार्य अत्रे वैगरे लेखकांनी मराठीत भरपूर लेखन केले आहे तसेच विल डुरंट यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेली अनेक पुस्तके आपणास प्राचीन काळाबरोबर समकालीन काळाबद्दल भरपूर माहिती देत असतात. हे सर्व वाचल्यानंतर  मला असे जाणवते की आणि काय हवं!

प्रत्येक माणसाला शांती आणि आनंद दोन्ही हवे असतात. ज्ञान आणि निष्ठा त्याला शांत करू शकेल पण भक्ती त्याला आनंद देत राहील. त्यासाठी शोध घ्यावा लागेल. बऱ्याच लोकांमध्ये एखादी वस्तू बनवण्याचे कौशल्य असते तर काहीजण उत्तम स्वयंपाक करत असतात. अनेकजण सुंदर चित्रे काढतात तर कुणीतरी सुंदर आवाजात गात असतात. त्याचप्रमाणे कुणीतरी सुंदर लिहीत असतो तर कुणीतरी सुंदर कविता करत असतो. आपल्या या रंग लेखणीच्या परिवारात बरेचजण सुंदर कविता करत असतात तेव्हा वाचताना जाणवते की आणि काय हवं!

धन्यवाद 

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...