रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १३४
विषय क्रमांक : २
विषय : रमजान ईद ( लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
मुस्लिम समाजात सर्वप्रथम दिवस साजरा केला जातो तो प्रेषित मुहंमद पैगंबरांचा वाढदिवस. त्याला मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद असे म्हणतात. पण हा काही त्यांचा सण नसून त्या दिवशी फक्त प्रेषितांचा वाढदिवस साजरा केला जातो. इस्लाममध्ये दोन सण फार महत्वाचे मानले जातात. त्यातील एक ईद-उल-फितर म्हणजे रमजान ईद आणि दुसरा आहे ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद. इथे आपण जाणून घेऊया ईद-उल-फितर म्हणजे रमजान ईद बद्दल. रमजानचा महिना खूपच पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात (रोजा ठेवतात) आणि महिन्याच्या शेवटी उपवास सोडून रमजान ईद साजरी करतात. रमजान म्हणजे बरकती किंवा परमेश्वराचा आशीर्वाद आणि ईद म्हणजे आनंद. मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत मग तो मित्र असो वा शत्रू हा सण आनंदाने साजरा करतात. या दिवशी सर्व मुस्लिम बांधव नवीन पांढरे कपडे घालून व सुगंधित अत्तर लावून मशिदीत नमाज अदा करतात कारण पांढरा रंग पवित्र मानला जातो. नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव कुराणात सांगितल्याप्रमाणे गरिबांना अन्नदान करतात आणि मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव निर्माण करतात.
रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेप्रमाणे नववा महिना. या महिन्याच्या अमावस्येनंतर चंद्रदर्शन झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. यानंतर शव्वाल महिना सुरु होतो. रमजानच्या महिन्यात सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते मग सुर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सुर्यास्त झाल्यानंतर प्रार्थना करून उपवास सोडला जातो. असे दरदिवशी म्हणजे ३० दिवस रोजे पाळले जातात. सुर्योदयापूर्वी जे अन्नग्रहण केले जाते त्यास सहेरी असे म्हणतात तर सुर्यास्तानंतर केल्याजाणाऱ्या अन्नग्रहणाला इफ्तार असे म्हणतात. रमजानच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या घराला रंगरंगोटी करून स्वतःच्या नातेवाईकांना आणि मित्रांना आपल्या घरी शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात. प्रेषितांच्या काळात खारका खाऊन हा सण साजरा केला असे इस्लामी पंडित सांगतात. भारतात बऱ्याच ठिकाणी प्रार्थनेनंतर दही आणि साखर खातात. या दिवशी मुख्य धर्मगुरु सामुदायिक प्रार्थनेमध्ये कोटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक कर्तव्यांचा उपदेश जमलेल्या सर्व लोकांना करतात. जेव्हा जमलेले लोक आमीन म्हणतात तेव्हा ही प्रार्थना संपते. इस्लामच्या इतिहासानुसार बद्रच्या युद्ध्यात मिळालेल्या विजयानंतर पवित्र कुराण स्वर्गावरून पृथ्वीवर आले म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तेव्हा बद्रीची लढाई म्हणजे काय आणि ती का झाली याची माहिती समजून घेण्याआधी इस्लामची थोडीशी माहिती जाणून घेऊ.
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम असा आहे. त्याचा शब्दश: अर्थ आहे परमेश्वराला म्हणजे अल्लाला सर्वशक्तिमान म्हणून शरण जाणे. बरेच मुस्लिम पंडित इस्लाम या शब्दाचा समानार्थी शब्द शांती असा सांगतात आणि इस्लाम हा शांतीचा धर्म असल्याचेही सांगतात. या शांतीच्या धर्माची म्हणजे इस्लाम धर्माची स्थापना केली प्रेषित मुहंमद पैगंबर यांनी ६ ऑगस्ट ६१० रोजी सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली आणि त्याच दिवशी ते अल्लाचे प्रेषित बनले. त्यावेळी त्यांचे वय ४० होते. याचाच अर्थ त्यांचा जन्म २०/०८/५७० रोजी कुरैश जमातीत झाला (काही मुस्लिम पंडित २०/०४/५७१ सांगतात तर काही ११/११/५६९ सांगतात). प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या जन्माच्या अगोदरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली. नंतर त्यांचा सांभाळ त्यांचे चुलते अबू तलिब यांनी केला. असे म्हटले जाते की अल्लाची ही इच्छा होती की सर्व जगाला प्रकाशमान करण्यासाठी मानवतेच्या मार्गदर्शनाचा तेजस्वी सूर्य अरबभूमीतच जन्माला यावा आणि तो अल्लाचा संदेश सर्व जगभर पोचवेल. ६ ऑगस्ट ६१० या दिवशी इस्लामची स्थापना करून प्रेषित मुहंमद पैगंबरानी इस्लाम धर्माचा प्रचार सुरु केला. सुरुवातीला आपला धर्मप्रचार संथगतीने व गुप्तपणे सुरु केला. जसजसे त्यांना जास्त अनुयायी मिळत गेले आणि प्रचार उघडपणे होऊ लागला तेव्हा प्रेषित मुहंमद पैगंबरांना खूप विरोध होऊ लागला आणि त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. त्याचा परिणाम त्यांना मक्का सोडून त्यांच्या आजोळी म्हणजे मदिनेकडे जावे लागले.
त्यासाठी त्यांनी गुप्तपणे योजना तयार करून अनेक अनुयायी मदिनेकडे पाठवून दिले. मग मोहरमच्या सुरवातीला म्हणजे २०/०६/६२२ रोजी स्थलांतरास सुरुवात झाली आणि १६/०९/६२२ रोजी मदिनेला पोहचले. मदिना मक्के पासून 200 मैल दूर होती. या स्थलांतरास हिजरत असे म्हटले जाते. बघता बघता त्यांचे सर्व अनुयायी मदिनेत सुरक्षित येऊन पोचले. मदिनेत धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती मक्केपेक्षा वेगळी होती. त्यावेळी तेथील लोकसंख्या पंधरा हजारपर्यंत होती व तिथे पाच टोळ्या राहत होत्या. त्यातील दोन टोळ्या मूर्तीपूजक अरबांच्या होत्या त्यांची नावे होती खजरज आणि औस तर तीन टोळ्या ज्यू लोकांच्या होत्या. ज्यू लोकांच्या टोळ्यांची नावे होती बनू कैनुका, बनू नजीर व बनू कुरैझा. या टोळ्या एकमेकांशी संघर्ष करीत आणि त्यांची भांडणे रक्तपात घडवत असत. तसे पाहिले तर हे सर्व बाहेरून आले होते पण ज्यू अगोदर आले होते आणि त्यांनी तिकडच्या सुपीक जमिनी आपल्या हातात घेतल्या होत्या आणि शेती व्यवसाय करून स्वतःची भरभराट केलेली होती. आर्थिक व प्रतिष्ठा यावरून त्यांच्यात संघर्ष होत असत. त्यात बौस युद्ध झाले आणि औस टोळीचा पराभव झाला. पुढे औस टोळीने ज्यू टोळ्यांची मदत घेऊन खजरज टोळीचा पराभव केला. खजरज आणि औस टोळ्या मध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी प्रेषित मुहंमद पैंगबरांना पाचरण केले. त्यांनी ऐक्य तर घडवून आणले आणि मुस्लिम बंधुसंघाची स्थापना केली.त्याचप्रमाणे ज्यू बरोबर जुळवून घेऊन इस्लाम राज्याची स्थापना केली. त्यानंतर सहा महिने प्रेषितांना कोणताही त्रास झाला नाही पुढे निर्वासितांचे हाल होऊ लागले. त्यांना अंगावर घालायला पुरेसे कपडे पण नव्हते आणि पुरेसे अन्नही मिळत नव्हते. खूप काम करूनही मोबदला फार कमी मिळत असे. त्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे मक्केचे व्यापारी आणि काफिले यांना लुटण्याचे. त्यासाठी त्यांनी सहा मोहिमा आखल्या पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी सातव्या मोहिमेत ते यशस्वी झाले आणि बरीच लूट हाती लागली ; पण ही लूट पवित्र महिन्यात केल्यामुळे प्रेषितांनी कोणास ही वाटा न देता अल्लाच्या आदेश्याची वाट पाहणे पसंद केले.
नंतर त्यांनी आठवी मोहीम इ. स. ६२४ मध्ये जानेवारी महिन्यात बद्र या ठिकाणी करायचे ठरवले. जेव्हा प्रेषितांना कळले एका काफिल्याचा प्रमुख अबू सुफियान सिरिया कडून येत आहे तेव्हा त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की हा कुरैशांचा काफीला भरपूर वस्तू घेऊन येत आहे. त्यांच्यावर हल्ला करा. कदाचित अल्ला तुम्हांला श्रीमंत बनवेल. दुर्दैवाने अबू सुफियान यांस या मोहिमेचा सुगवा लागला आणि संरक्षणासाठी कुमक पाठवण्यासाठी मक्केस निरोप पाठविला. त्यासाठी हजारोजण संरक्षणासाठी निघाले आणि त्याचे नेतृत्व केले अबू जहल याने. पण ती मदत येण्यापूर्वी अबू सुफियान दुसऱ्या मार्गे मक्केस सुखरूप पोचला. तरीसुद्धा अबू जहल यांनी प्रेषितांच्या सैन्याशी मुकाबला करण्याचे ठरवले. प्रेषितांच्या सैन्याला या बद्दल कल्पना नव्हती, ते फक्त काफिला लुटण्यासाठी आले होते. हे नवीन आव्हान अनपेक्षितपणे उभे राहिले होते. शेवटी त्यांनी अल्लाची प्रार्थना केली आणि लढाईस सुरुवात केली. प्रेषितांचे सैन्य जरी कमी असले तरी शिस्तबद्ध होते. कुरैशांच्या सैन्यात एकवाक्यता नव्हती आणि शिस्तीचा अभाव होता. त्यामुळे प्रेषितांच्या सैन्याचा विजय झाला आणि कुरैशांचे सैन्यातील योध्ये एकामागोमाग गारद झाले. ही लढाई होत असताना प्रेषित अल्लाचा धावा करत होते आणि आपल्या सैन्याला उत्तेजित करत होते. त्यावेळी अचानक वादळ उठले. तेव्हा प्रेषितांनी विशिष्ट क्षणी हातात वाळू घेतली आणि शत्रुवर उधळीत ते मोठ्याने ओरडले की कुरैशीच्या सैन्याचे चेहरे गोधळून जावो. त्याप्रमाणे कुरैशीच्या सैन्यात गोधळ उडाला व प्रेषितांच्या सैन्यांचा विजय झाला. अल्लाच्या आदेशानुसार युद्ध्यात मिळालेल्या लुटीचे वाटप झाले तसेच वर म्हटल्याप्रमाणे पवित्र दिवसात मिळालेल्या लुटिचेही वाटप झाले आणि इस्लाम धर्माचा प्रचार मक्केत करण्यासाठी खूप मदत झाली. तसेच युद्धामध्ये सापडलेल्या कैद्यांना आदराने वागावल्यामुळे कैद्यांच्या मनात इस्लाम विषयी आदर निर्माण होऊन त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. या युद्धला इस्लामच्या इतिहासात मोठे स्थान तर आहे आणि मुस्लिम मन घडविण्यात सुद्धा या युद्धाचा बराच वाटा आहे. हे युद्ध प्रत्येक मुस्लिमांकरिता शतकानुशतके प्रेरक ठरले आहे.
बद्रीची लढाई जिंकल्यावर खुद्द प्रेषित मुहंमद पैगंबर यांनी पहिल्यांदा ईद-उल-फितर साजरी करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे पवित्र कुराण याच महिन्यात अवतरले असल्यामुळे ह्या सणाला फार महत्व आहे. रमजान ईद या सणाचा मुख्य उद्देश आहे अल्लाच्या आदेशाचे पालन करून पुण्य कमवा व गरीब आणि अनाथ मुस्लिम बांधवाना दान करून त्यांना हा सण आनंदाने साजरा करण्यास मदत करावी.
धन्यवाद
मित्रानो,
काश्मीर प्रश्न समजून घेत असताना मला
जाणवले की काश्मीरमधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाचा काश्मीर
प्रश्नाबरोबर अभ्यास करणे जरुरीचे वाटले. ब्रिटिशांनी भारत सोडताना १५ ऑगस्ट १९४७
या दिवशी भारताचे विभाजन करून दोन राष्ट्राची निर्मिती केली. ते म्हणजे पाकिस्तान
जे मुस्लिम राष्ट्र झाले आणि दुसरे म्हणजे भारत ज्यांनी सर्वधर्मसमभाव हे सूत्र
स्वीकारले. अश्यावेळी बहुसंख्य मुस्लिम प्रदेश असलेला काश्मीरने मुस्लिम पाकिस्तान
बरोबर न जाता भारताबरोबर येणाचा निर्णय घेतला. असा निर्णय
बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाने का घेतला यासाठी मुस्लिम समाजाचा अभ्यास करणे
गरजेचे होते. त्यासाठी बरीच पुस्तके इंग्रजी आणि मराठीतून वाचली. कुराण आणि हदीस
समजून घेण्याचा प्रयत्न केला ( मराठी आणि इंग्रजी मधून ) आणि अजून अभ्यास चालू
आहे. त्यातूनच मिळालेल्या माहितीवरून वरील लेख लिहिला आहे. त्याची सुरुवात साने
गुरुजींनी लिहिलेल्या इस्लामी संस्कृती या पुस्तकापासून झाली. वरील लेखासाठी खालील
पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे.
संदर्भ
मुस्लिम मनाचा शोध : शेषराव मोरे
चार आदर्श खलिफा : शेषराव मोरे
इस्लामी संस्कृती : साने गुरुजी
भारतीय मुसलमान शोध आणि बोध : सेतू
माधवराव पगडी
अप्रिय पण : शेषराव मोरे
Muhammad
& The Quran :Rafiq Zakeria
Islam : The Arab
National Movment : Anwar Shaikh
The Preaching
of Islam :T W Arnold
Comments
Post a Comment