रंग लेखणीचा परिवार
आठवडा क्रमांक : १३४
विषय क्रमांक : २
विषय : परशुराम जयंती (लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता :माहीम,मुंबई
महाभारतात युद्ध सुरु होण्यापूर्वी अर्जुनाला कर्म योगाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली. तेव्हा एका श्लोकात उपदेश करताना श्रीकृष्ण सांगतात, " जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर अवतार धारण करतो. तसे पूर्वी झाले आहे आणि पुढे सुद्धा होत राहील". अश्या अनेक अवतारांची नोंद आपल्या पुराण कथेत आढळतात. त्यापैकी भगवान विष्णुच्या दहा अवतारांची नोंद आपल्याला बऱ्याच पुराणकथेत ठळकपणे आढळून येतात. या कथा आपल्याला ईश्वराला असे अवतार का घ्यावे लागले आणि प्रत्येक अवतारात अधर्माचा पराभव करून धर्माचे कसे रक्षण केले याचे सविस्तर वर्णन देतात. भगवान विष्णुच्या दहा अवतारांपैकी नऊ अवतार होऊन गेलेले आहेत आणि दहावा अवतार कल्की अजून जन्माला यायचा आहे. विष्णूने आपल्या बौद्धावतारात मोह निर्माण करून असुरांचा स्वर्गाचा मार्ग चुकवला आणि नरकाकडे जाण्याचा पापमार्ग आदेश म्हणून असुरांना सांगितला. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे सातव्या आणि आठव्या अवतारातील त्यांच्या कार्यांचे महत्व रामायण आणि महाभारत या ग्रंथात आले आहे. त्याशिवाय मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह आणि वामन असे क्रमाने पाच अवतार आणि त्यांचे कार्य पुराणकथेत येतात. त्याच पुराण कथेमध्ये सहावा अवतार आहे परशुरामाचा. काही ठिकाणी या अवतारचा उल्लेख अंशावतार असा ही केला जातो. भगवान श्रीविष्णूचा हा एकमेव अवतार सात चिरंजीवांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
पुरुरव्याच्या वंशात रुचिक नावाच्या ब्राह्मणाचा गाधी नावाच्या राजाची मुलगी सत्यवती या क्षत्रियकन्येशी विवाह झाला. त्यांच्या पदरी महाब्रह्मज्ञानी जमदग्नि ऋषिचा जन्म झाला. जमदग्नि ऋषी हा अत्यंत तापट स्वभावाचा असून त्याचे लग्न क्षत्रिय कन्या रेणुका हिच्याशी झाले. त्यांना चार पुत्र झाले त्यापैकी शेवटचा पुत्र परशुराम. भागवत कथेनुसार परशुरामाचा जन्म भार्गव वंशात त्रेता युगात वैशाख शुक्ल तृतीयेस पुनर्वसु नक्षत्रावर रात्रीच्या प्रथम प्रहरी झाला. जन्माच्यावेळी त्याचे नाव राम ठेवण्यात आले. त्याशिवाय रामभद्र,भार्गव, भ्रूगुपति, जमदग्न्य इत्यादी नावाने ओळखला जाऊ लागला. भगवान परशुराम हे कमालीचे शिवभक्त होते. आपल्या तपस्येद्वारे त्यांनी भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शंकराकडून अनेक शत्रे मिळवली. त्यातील एक शत्र त्यांचे आवडते होते ते म्हणजे परशु. या शस्त्राचा म्हणजे परशुचा उपयोग युद्धात करून शत्रुंचा पराभव केला तेव्हा पासून त्यांस परशुराम ह्या नावाने सर्व ओळखू लागले. काही पुराणकथेत त्यांस दशरथी रामापासून वेगळे दाखवण्यासाठी त्यांचे नाव परशुराम ठेवले असे उल्लेख आढळतात. परशुराम हे अत्यंत मातृ आणि पितृ भक्त आहेत. ते जरी विष्णूचे अवतार असले तरी महादेवाचे मोठे भक्त आहेत. त्यांचे महत्वाचे अवतार कार्य म्हणजे उन्मत्त झालेल्या क्षत्रिय कुळाचा नाश करणे हे होय.
वर म्हटल्याप्रमाणे परशुराम हे पितृभक्त आणि मातृभक्त कसे होते हे बऱ्याच पुराण कथेत नमूद केले आहे. त्यातील एक कथा अशी आहे की एकदा परशुरामची आई रेणुका स्नान करून आश्रमाकडे जायला निघाली तेव्हा राजा चित्ररथसुद्धा तिथेच स्नान करत होता. राजाला बघून रेणुकाच्या मनात वाईट विचार आले आणि त्याच अवस्थेत ती आश्रमात पोहोचली. जमदग्निने तिच्या मनातील विचार जाणले आणि आपल्या पत्नीकडून म्हणजे रेणुकेकडून पतिव्रतेस कलंक लागण्याजोगे कृत्य घडले म्हणून परशुरामास सांगून तिचा शिरच्छेद करविला. परशुराम पितृवचनाचे परिपालन करणारा असल्यामुळे त्यांनी आपल्या मातेचा शिरच्छेद केला. आपली आज्ञा पाळल्यामुळे जमदग्निने खुश होऊन परशुरामास वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा जमदग्निस सांगून आपल्या मातेस परत जिवंत केले आणि त्यांना या गोष्टीची आठवण न राहण्याचे वरदान मागितले. म्हणून असे म्हटले जाते की रेणुका मातेने परशुरामास चिरंजीव होण्याचा वर दिला
ज्या वेळी परशुरामांचा जन्म झाला त्यावेळी क्षत्रिय फार त्रासदायक झाले होते. जरी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात शरीरसंबंध होत असले तरी क्षत्रियांना ब्राह्मणांचा मोठेपणा नको होता. त्यांना आपल्या राजवंशीपणाचा गर्व होता. याचा परिणाम म्हणून दोन्ही पक्षात वारंवार भांडणे होऊ लागली. त्यामुळे ब्राह्मण वर्गाला क्षत्रिय वर्ग खूपच त्रास देऊ लागले. त्याकाळी माहिष्मती नगरीवर हैहय वंशातील सहस्त्रार्जुन कार्तवीर्य हा क्षत्रियराजा राज्य करीत होता. ब्राह्मण हे क्षत्रियांवर अवलंबून असून, क्षत्रियचं प्रजेचे रक्षण करू शकतात असे तो म्हणत असे. अशा विचारमुळे उन्मत्त झालेल्या सहस्त्रार्जुनाने ऋषिजनास अनेक प्रकारे त्रास दिला. एकदा त्याने वसिष्ठ ऋषींचा आश्रम जाळला. तेव्हा वसिष्ठाने त्याला शाप दिला की भार्गव कुळातील परशुराम तुझा वध करील. त्यामुळे सहस्त्रार्जुन आणि जमदग्नि यांच्यातील वैर अधिक तीव्र झाले. मग त्याने जमदग्निच्या आश्रमात जाऊन त्यांच्या कामधेनू या गायीचे हरण केले. हे कृत्य सहन न झाल्यामुळे परशुरामाने सहस्त्रार्जुन आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार केले आणि कामधेनू गाय परत आणली. परशुरामांच्या या कृत्याचा जमदग्निने निषेध केला आणि केलेल्या या कृत्यासाठी परशुरामास तीर्थयात्रा करण्यास सांगितले. पुढे काही काळानंतर सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी जमदग्नि ध्यानस्थ बसले असताना त्यांचा शिरच्छेद केला. तेव्हा रेणुकाने एकवीसवेळा वक्षस्थळ बडवून आकांत केला आणि म्हणूनच परशुरामानी एकवीसवेळा क्षत्रियांचा संहार करून पृथ्वी नि:क्षत्रिय केली. हैहय वंशाचे राज्य नर्मदेपासून हिमालयापर्यंत होते. परशुरामाने आपल्या पराक्रमाने हैहय या कुळाचा नाश केला. त्याचप्रमाणे त्यांनी अंग, वंग, कलिंग, विदेह, त्रिगर्त, मालव इत्यादी राजांचाही संहार केला. शेवटची लढाई कुरुक्षेत्रावर झाली आणि तेथील स्यमंतपंचक नावाचे तीर्थ क्षत्रियांच्या रक्ताने भरून टाकले असे दाखले अनेक पुराण कथेत आढळतात.
क्षत्रियांचा संहार करून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली आणि संपूर्ण पृथ्वी परशुरामाच्या ताब्यात आली. त्यासाठी हे नरसंहारी कृत्य थांबविण्यासाठी ऋषी कश्यप प्रकट झाले व परशुरामास क्षत्रियांना न मारण्याची आज्ञा केली आणि या हत्येचे प्रायाश्चित्त घेण्यासाठी यज्ञ करण्यास सांगितले. या यज्ञात परशुरामाने यज्ञदक्षिणा म्हणून सर्व पृथी ऋषी कश्यप यांना दान केली. यानंतर ऋषी कश्यप परशुरामास म्हणाले की सर्व भूमी आता माझ्या मालकीची झाली आहे. आता तू दक्षिणेकडे निघून जा. ही आज्ञा मान्य करून परशुराम महेंद्र पर्वताकडे निघून गेला. पुढे ऋषी कश्यपाने काही क्षत्रिय राजवंशाचे राज्य स्थापन करून आर्यावर्तात विस्कळीत झालेली राज्ये परत एकदा नीट बसवली. सर्व पृथ्वी ऋषी कश्यपास दान केल्यामुळे त्याला राहण्यासाठी जागा पाहिजे म्हणून परशुरामाने पश्चिम सागराच्या तीरावर वरुण देवाची प्रार्थना केली आणि वरुणाने परशुरामास जी भूमी दिली त्या भूमीत आपल्या पराक्रमाने जो नवीन प्रदेश बसवला तो म्हणजे कोकण प्रांत होय. त्यात गोमांतक आणि केरळचाही समावेश आहे. चिपळूण हे लोटे परशुराम म्हणून परशुरामाचे महत्वाचे स्थळ मानले जाते. तळकोकणातील परशुरामाचे खूप सुंदर मंदिर आहे.
रामायणात आणि महाभारतात परशुरामाचा उल्लेख आहे. सीतेच्या स्वयंवराच्यावेळी शिव धनुष्याचा भंग केल्यामुळे क्रोधीत झालेल्या परशुरामाने दशरथी रामाबरोबर शाब्दिक वाद केले आणि त्यात परशुरामाचा पराभव झाला. तसेच महाभारतात अंबेच्या सांगण्यावरून परशुरामाने पितामह भीष्म यांच्याशी युद्ध केले आणि त्यातही परशुरामांचा पराभव भीष्मानी केला. पुराणात असे म्हणतात की या दोन क्षत्रियाकडून झालेल्या पराभवामुळे परशुरामांच्या अवताराची पूर्तता झाली. क्षत्रियांचा वध केल्यानंतर परशुरामाने शस्त्र खाली ठेवले आणि वैरभाव सोडून दिला. सर्वाना अस्त्र शस्त्र विद्या शिकवण्यास सुरुवात केली. त्यात पितामह भीष्म, आचार्य द्रोण आणि महारथी कर्ण हे परशुरामाचे शिष्य होते. वर म्हटल्याप्रमाणे सीतास्वयंवराच्यावेळी शिवशंकराचे शिवधनुष्य भंग केल्यावर परशुराम प्रकट झाले. सुरुवातीला ते श्रीरामास ओळखू शकले नाहीत. मग विष्णुरूपी रामाची ओळख पटल्यावर ते तिथून निघून गेले आणि जाताना श्रीरामाने त्यांना सुदर्शन चक्र भेट दिले आणि त्यांस सांगितले की जेव्हा मी द्वापार युगात येईन तेव्हा मला त्याची गरज पडेल. द्वापार युगात जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा युद्धाच्या काही दिवस अगोदर परशुरामाने सुदर्शन चक्र श्रीकृष्णास परत दिले.
अजून एक गोष्ट पुराण कथेत आढळते ती म्हणजे गणपतीचे नाव एकदंत पडले ते परशुरामामुळे. परमशिवभक्त असलेले परशुराम भगवान शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात तेव्हा त्यांना गणपतीने प्रवेशद्वारावर अडवले. त्यामुळे परशुरामाने रागाने गणपतीबरोबर युद्ध छेडले. या झालेल्या मोठ्या युद्धात गणपतीचा एक दात परशुरामाने परशुने केलेल्या प्रहारमुळे निखळला. तेव्हापासून गणपतीस एकदंत हे नाव पडले.
विष्णुचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या परशुरामावर एकही प्राचीन ग्रंथ नाही. काही पुराणकथेत व रामायणात आणि महाभारतात परशुरामासंबधी ज्या कथा आहेत त्या आधारे त्याचे चरित्र समजून घ्यावे लागते. परशुरामाच्या कार्याचा विचार केला तर असे दिसून येईल की तो जन्मला ब्राह्मण म्हणून पण कर्म केले क्षत्रियासारखे.
धन्यवाद
संदर्भ:
व्यासांचे शिल्प : नरहर कुरुंदकर
महाभारत, एक सुडाचा प्रवास : दाजी पणशीकर
परशुराम जयंतीवर असलेला वामन मंगेश
दुभाषी (ऋग्वेदी) यांचा लेख
परशुरामावर लिहिलेला वि वि भिडे यांचा
लेख
युगान्त : इरावती कर्वे
Comments
Post a Comment