Skip to main content

Mukhvatyamagacha Vidushak मुखवट्यामागचा विदूषक (लेख )

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १३५

विषय क्रमांक : १

विषय : मुखवट्यामागचा विदूषक (लेख )

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

तीस वर्षा पूर्वी मी मेरा नाम जोकर नावाचा एक हिंदी सिनेमा पाहिला होता. सुप्रसिद्ध सिनेकलाकार आणि दिग्दर्शक  राज कपूर यांचा हा चित्रपट. त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वेगळा होता. यामध्ये कोणीही खलनायक तर नव्हताच पण कुठेही मारामारीचा देखावा सुद्धा नव्हता.या चित्रपटाची गोष्ट होती एका मजेदार विदूषकाच्या दुःखाची. इथे विदूषक आपलं आयुष्य जगतो तो केवळ दुसऱ्यांसाठी. त्यांनी स्वीकारलेले विदूषकाचे तत्वज्ञान त्याला नकारात्मक भावना व्यक्त करण्यास प्रतिबंधित करते आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटावर त्याला फक्त हसायला लावते. चित्रपटात एक दृश्य असे आहे की विदूषकाची म्हणजे राजूची आई आपल्या मुलाला सर्कसमध्ये जीवावर उदार होऊन कसरत करताना पाहते आणि त्यात तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. अशा परिस्थितीतसुद्धा त्या विदूषकाला आपल्या दुःखाचे अश्रूसुद्धा दाखवण्याची परवानगी मिळत नाही. विदूषक किती मोठया मनाचा आहे, हेच सारखे जगाला त्याला सांगत राहावे लागते. हा चित्रपट बघताना एकच संदेश मिळतो तो म्हणजे एकदा का विदूषकाचा मुखवटा चेहऱ्यावर लावला मग स्वतःची दुःखे विसरून जगाला फक्त आनंद देत आयुष्य जगाव लागत. या चित्रपटातील विदूषक आपणास सांगतो की  विदूषक इथून गेला तर जगाला कोण हसवेल. त्याच्या चेहऱ्यावर असलेला मुखवटा आणि त्यास बघून हसणारे प्रेक्षक यातच त्याला समाधान वाटत असते. त्याच्या साठी त्याचे जीवन आणि मरण फक्त विदूषकी रूपातच असते. म्हणून तो चित्रपटात म्हणतो, " जीना यहाँ मराना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ".

विदूषक आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. कधी सर्कशीत तर कधी सिनेमात किंवा कादंबरीत. लहान मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी तर विदूषकाचा मुखवटा अनेकजण घालून मिरवत असतात. सुरुवातीला लोकांना हसवणारं अस एक विनोदी पात्र म्हणून नावाजलेला हा  विदूषक पुढे मात्र भयपट सिनेमात खलनायक म्हणून दृष्टीस पडू लागला. विदूषकाला खलनायक दाखवणे ही गोष्टच मला चुकीची वाटते. कारण एकदा का विदूषकाचा मुखवटा चढवला की लोकांना फक्त विदूषकाचे आनंदी रंगरूप दिसायला पाहिजे. जरी तो मनाने प्रचंड दुःखी असला तरी त्याचे अश्रू लोकांना दिसता कामा नये याची काळजी त्यास घ्यायला पाहिजे कारण त्याच्या दुःखावर एकच औषध असते ते म्हणजे इतरांना देणारं निर्व्याज हसू. जेव्हा विदूषकाला या देणगीची जाणीव होते तेव्हा त्याच्यातील कलाकार आनंदी होतो किंवा सुखवतो. हसणं आणि हसवणं हाच त्याचा स्थायीभाव असतो. जर विदूषकाला खलनायक ठरविले तर त्यामागचे तत्वज्ञान चुकीचे ठरते. कारण विदूषक खलनायक होऊच शकत नाही. खलनायक लोकांना फसवतो किंवा नेहमी त्रास देऊन लोकांना दुःखी करतो पण विदूषक स्वतःची दुःखे विसरून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. प्रत्येक लहान मुलांना विदूषकाची भलतीच ओढ असते. विदूषकाने आपल्याशी नेहमी बोलावे, आपल्या बरोबर मस्ती करावी असे लहान मुलांना वाटत असते.  रंगीबेरंगी कपडे घातलेला, चेहऱ्यावर रंगरंगोटी करून मुखवटा चढवलेला, कुरळ्या केसांची टोपी घालून आपल्या हावभावाने लोकांना हसवणारा विदूषक मोठया माणसांनासुद्धा जवळचा वाटत असतो मग तो कसा काय खलनायक होऊ शकतो. त्यामुळे अश्या भयपट सिनेमात विदूषकाची दाखवलेली खलनायकाची भूमिका मनास न पटणारीच आहे.

आजच्या व्यावहारिक जगात आपणही अनेक ठिकाणी मुखवट्यामागचा विदूषक बनून जगत असतो. म्हणजे या जगात जगताना आपण मुखवटा धारण करून आपली खरी ओळख जगापासून लपवत असतो. मग ते कार्यालयात असो किंवा नातेवाईकांत किंवा मित्रपरिवारात अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा मुखवटा धारण केलेला असतो. कधी नम्रतेचा मुखवटा तर कधी स्थितप्रज्ञेचा मुखवटा. बऱ्याचवेळा स्वतःच्या फायद्यासाठी खोटं हसणाऱ्याचा मुखवटा घातलेली माणसे आपण ठिकठिकाणी पाहत असतो. याचे कारण असे की आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजात मिसळून जायचे असेल तर आपली इच्छा असो वा नसो आपल्याला समाजाच्या समेवर येत नाचवेच लागते. जर आपण तसे केले नाही तर त्या सगळ्यामध्ये आपण उपरे ठरवले जातो. त्यात माणूस आपला खरा चेहरा हरवून बसतो आणि मग तो मिळवण्यासाठी खूप धडपड करतो.  यासाठी उत्तम उदाहरण देता येईल ते व्ही शांताराम यांनी काढलेल्या पिंजरा या चित्रपटाचे. या चित्रपटात शांतारामबापूनी एकाच माणसाच्या दोन चेहऱ्याच्या संघर्षाची गोष्ट खूप छान पद्धतीने मांडली आहे. आपल्या खऱ्या चेहऱ्यावर दुसरा  मुखवटा चढवून पिंजरा चित्रपटातील मास्टर जेव्हा आपला खरा चेहरा विसरतो आणि तो परत मिळवण्यासाठी आपणच जिवंतपणी स्वतःचे मरण स्वीकारतो. अश्याच संघर्षात माणूस नेहमी फसत जातो. म्हणून मला इथे सर्कशीत काम करणारा विदूषक आठवतो. असे म्हटले जाते की सर्कशीला सुंदरपण येते ते विदूषकामुळे. पण विदूषक हा कधीच सर्कसचा मालक होऊ शकत नाही. कारण अनेक मुखवटे धारण करणाऱ्याला स्वतःचे अस्तित्वच नसते. तरीसुद्धा त्याचे सर्कशीतील स्थान  महत्वाचे असते. तो नसेल तर सर्कशीला काही महत्व उरणार नाही. म्हणूनच आपल्या व्यवहारिक जगात प्रत्येक माणसाला त्याच्या प्रत्येक गोष्टीत विदूषकाप्रमाणे महत्व असते.

विनोदी अभिनेता आणि सर्कशीत काम करणारा विदूषक या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. कुठल्याही विनोदी अभिनेत्याला विनोद करून लोकांना हसवणे कठीण असते. विनोदी अभिनय करणे म्हणजे नुसते हावभाव करून लॊकांस हसविणे नसून कोपरखळ्या मारत लोकांना गुदगुल्या करीत हसवावे लागते. हे काम फारच कठीण असते. त्यासाठी बारीकसारीक तपशील माहित करून घ्यावे लागतात. कारण कुठलाही विनोद माणसाला नुसता हसवत नसून हसता हसता त्याला जीवनाच्या विसंगती दाखवून देतो. विदूषक आणि विनोदी अभिनेता आपल्या आयुष्यातील विसंगतीवर एक रंगीत मुलामा चढवितात आणि वाईट गोष्टी आपल्या मुखवट्यामागे लपवून आपल्याला रुचेल आणि समजेल अश्या पद्धतीने ते सादर करतात. ते करत असताना आपणसुद्धा या विसंगतीचे भाग आहोत हे दोघेही म्हणजे विदूषक आणि विनोदी अभिनेता जाणून असतात. म्हणूनच विदूषक किंवा विनोदी अभिनेता होणे ही सोपी गोष्ट नाही आहे. विनोदाची मांडणी आपल्या देहबोलीतून करत असताना त्यांच्या आयुष्यात कितीही प्रचंड दुःखे आली तरी त्यांना आपल्या चेहऱ्यावर हसरा मुखवटा लावून लोकांचे मनोरंजन करावेच लागते. यासाठी उदाहरण बघायचे असेल तर सुप्रसिद्ध विनोदी कलाकार चार्ली चॅप्लिन याचे देता येईल.

हसणं ही निसर्गाची देणगी असून हसवणं एक कला आहे. लोकांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत विदूषक आपले दुःख विसरतो. तो आपले आयुष्य जगाला हसविण्यासाठी देतो.  त्याच्या हातात फक्त एक मुखवटाच असतो आणि त्यातून तो आपले वर्चस्व दाखवत असतो. जर मानावाच्या आयुष्यातून विदूषक कायमचा निघून गेला तर कुठल्याही माणसाच्या आयुष्यातील सर्कशीला काही अर्थ असणार नाही.

धन्यवाद 

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...