Skip to main content

Mokalik मोकळीक (लेख)

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १३३

विषय क्रमांक :३

विषय : मोकळीक (लेख)

दिनांक : ८/५/२०२१

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

मोकळीक या शब्दाला समानार्थी शब्द आहे स्वातंत्र्य किंवा सोडवणूक किंवा बंधनातून मुक्तता. याचा अर्थ असा की बंधनाचा अभाव मान्य करणे म्हणजे मोकळीक किंवा स्वातंत्र्य. आज माझ्या कुटुंबातील लोकांनी मला वागण्याची मोकळीक दिली आहे. म्हणजे त्यांनी आज मला कौटुंबिक बंधनातून मुक्त केले असा अर्थ निघतो. हा अर्थ कितपत योग्य आहे हे तपासण्यासाठी सर्वप्रथम  आपल्याला मिळालेली मोकळीक कश्या प्रकारची आहे हे समजून घेणे जरुरीचे आहे. मानवी जीवन जरी गुंतागुंतीचे असले तरी माणसाचे मन दुसऱ्या कुठल्याही शक्तीच्या दबावाखाली विचार करण्यास सहजपणे तयार होत नाही. त्यासाठी मानवाला सतत स्वायत्ततेची गरज असते. स्वायत्तता मिळाल्यानंतर मानवाला आपला वैयक्तिक विकास वाढवण्यासाठी खूप मदत तर होईलच पण त्याला हव्या असलेल्या विषयात शिक्षण घेण्याची मोकळीक मिळाल्यामुळे तो त्या विषयात नवीन निर्मितीसुद्धा करू शकेल. याचाच अर्थ मानवाला अनेक बंधनातून मुक्त करणे जरुरीचे आहे. मग ही बंधने कुठली राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक असली तरी त्या बाजूला ठेवून मानवाला मोकळीक दिली पाहिजे असे वाटू लागते.

कुठल्याही बंधनातून मुक्त होणे म्हणजेच मोकळीक अशी व्याख्या बरोबर आहे असे मला वाटत नाही. कारण कुठल्याही स्तरावर आपण पाहिले तर असे दिसून येईल की जिथे बंधन आहे तिथे स्वातंत्र्यसुद्धा आहे. जेव्हा आपण बंधनाला अभावात्मक ठरवून स्वातंत्र्याला किंवा मोकळीकेला भावरूप ठरवतो, तेव्हा आपण नकळत मोकळीक या शब्दाची नकारात्मक व्याख्या करतो. कारण माणूस स्वतंत्र म्हणून जन्माला येतो नंतर तो बंधनात सापडतो. सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर आपल्या एका लेखात म्हणतात प्रत्येक तत्वज्ञानाचे अभ्यासक 'बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य किंवा मोकळीक' अशी व्याख्या विचाराचा आरंभ म्हणून स्वीकारतात आणि वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा आपल्या समोर ठेवतात. त्या पद्धतीप्रमाणे इच्छेनुसार वर्तनाची पूर्ण संधी म्हणजे स्वातंत्र्य किंवा मोकळीक असे मानतात. येथे वर्तन म्हणताना कृती आणि विचार, हे दोन्ही गृहीत धरले आहेत. कारण विचार हे मानसिक वर्तनच आहे. इष्ट काय, अनिष्ट काय ; चांगले काय, वाईट काय ; हिताचे काय, अहिताचे काय ; खरे काय, खोटे काय ; याबाबत विचार करण्याचा आणि त्यानुसार वर्तन करण्याचा पूर्ण हक्क प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे. हा हक्क म्हणजे इच्छेनुसार वर्तनाची पूर्ण संधी. हीच माणसाला मिळालेली पूर्ण मोकळीक.

तरीसुद्धा मोकळीक या शब्दाची कल्पना प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या इच्छेनुसार वर्तनाच्या हक्कामुळे पूर्ण होत नाही. कारण इथे हवी असते समाजाची मान्यता. त्यासाठी कुरुंदकर लिहितात की प्रत्येक माणसाचे त्याच्या इच्छेनुसार वागणे समाजाने दंडनीय मानले आणि दुर्लक्षणीय मानले अगर क्षम्य मानले तर त्याला पूर्ण संधी मिळाली असे म्हणता येणार नाही. कारण दंडनीय काय समजावे, क्षम्य काय समजावे हे समाज ठरवतो. समाज मान्य करील त्या परिघात वावरणे म्हणजे मोकळीक नव्हे. त्यासाठी कुरुंदकर सांगतात की जर समाजाने एका व्यक्तीचे वर्तन क्षम्य किंवा दुर्लक्षणीय  मानले तर त्या व्यक्तीला सहकार्य आणि सहानुभूती गमवावी लागते. त्यामुळे समाजाने नुसते उदासीन राहून चालणार नाही, तर एका व्यक्तीचे इच्छेनुसार वर्तन इतर सर्वांनी समर्थनीय उचित मानल्याशिवाय त्या व्यक्तीला इच्छेनुसार वर्तनाची संधी मिळाली असे होणार नाही. जेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार वर्तनाची संधी मिळते तेव्हा त्यास पूर्णपणे स्वातंत्र्य किंवा मोकळीक मिळाली असे म्हणता येईल. याचाच अर्थ म्हणजे समाजाने व्यक्तीचे स्वातंत्र्याचे जे हक्क मान्य केले आहेत आणि त्यासाठी काही कायदे  केले आहेत, त्या कायद्याच्या मर्यादेत राहून प्रत्येक व्यक्तीने आपल्या इच्छेनुसार वर्तन करणे म्हणजे त्या व्यक्तीला मिळालेली मोकळीक होय. म्हणून मानवाला मोकळीक देताना काही बंधने गरजेची असतात.

गुलामगिरीत मानवावर जशी बंधने आहेत तशीच बंधने स्वातंत्र्यावरसुद्धा आहेत. तरीसुद्धा माणूस या  बंधनातून मोकळीक मागत असतो कारण स्वातंत्र्य ही फार मोठी आकर्षक संकल्पना आहे. प्रत्येक माणसाला वैचारिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मोकळीक हवी असते. याचे कारण माणूस ज्या परिस्थितीत असतो त्यात तो स्वतःला घडवत असतो किंवा बदलण्याचा प्रयत्न करीत असतो. तसे घडत असताना त्याला त्याचा पर्याय निवडता आला पाहिजे. जर आजूबाजूची सामाजिक परिस्थिती अगर माणसे त्याचा पर्याय ठरवत असतील तर त्याला मुक्तपणे पर्याय निवडता येणार नाही. समाजाने मान्य केलेले व्यक्तीचे हक्क इतकेच त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रूप असेल तर ती व्यक्ती स्वतंत्र किंवा मुक्त आहे असे आपण म्हणू शकणार नाही. कारण स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या सुरक्षितेच्या विरोधी असते. आपणास अनेक व्यक्ती अश्या दिसतील की त्या व्यक्तीची स्वातंत्र्याची कल्पना अनेक प्रकारचे बंधकत्व दाखवत असते. म्हणून बरीच माणसे लहान मोठया पिंजऱ्यात आपले स्वातंत्र्य उपभोगत असतात. सुप्रसिद्ध मानवतावादी, तत्वज्ञानी, मनोविश्लेषक आणि समाजशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम आपल्या आर्ट ऑफ लिविंग या पुस्तकात लिहितात की माणसाला मोकळेपणाची किंवा स्वातंत्र्याची भीती वाटते. आपल्या दुबळेपणाच्या जाणीवेमुळे माणूस सुरक्षिततेकडे वळतो. म्हणून ते धोक्यापासून पलायन असावे असे त्यांना वाटते. हे बहुतांशी बरोबर असल्याचे आपण पाहत असतो. जेव्हा कुठल्याही व्यक्तीला घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जाणवणारे स्वातंत्र्य आणि त्यांची बंधने लक्षात येतात तेव्हा ती व्यक्ती समग्र स्वातंत्र्याचा विचार करू लागते  आणि त्यासाठी लागणारी मोकळीक ती व्यक्ती शोधू लागते.

माणसाला सगळ्यात जास्त मोकळीक कशात हवी असेल तर ती विचारांमध्ये. म्हणजे त्यास विचारस्वातंत्र्य फार महत्वाचे वाटत असते. कारण माणूस विचारस्वातंत्र्याला सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता मानत असतो. सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर लिहितात की विचारस्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून करावे लागते. व्यक्तीला सुरक्षितता देऊन दिल्यामुळे, व्यक्तीचे हक्क मान्य करून मान्य केल्यामुळे, व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन घेतल्यामुळे स्वातंत्र्य निर्माण होत असते. व्यवस्थाविरोधी स्वातंत्र्य हा जसा व्याज तर्कवाद आहे, त्याचप्रमाणे सुरक्षितताविरोधी स्वातंत्र्य हा एक तर्कव्याज आहे असे सांगून ते पुढे लिहितात वैचारिक स्वातंत्र्याचा विचार करताना नकळत शरीर आणि आत्मा ह्यांचे परस्परभेद मानणारे अध्यात्म आपल्या मनात वावरत असते. त्यामुळे सुरक्षितता शरीराची स्वातंत्र्य मनाचे, हा भेद आपण करून ठेवतो आणि माणसाच्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य समजण्याऐवजी विचारस्वातंत्र्य, हा स्वातंत्र्याचा गाभा समजतो. विचारस्वातंत्र्य हे सुरक्षित व्यक्तित्वाचे फलित असते, हे विसरण्याची सवय ह्यामुळे लागते. काहीजण असेही म्हणतात की स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता असेल तरच विचारस्वातंत्र्याला अर्थ असतो. कुरुंदकरांचे वरील विवेचन पहिल्यास आपणास विचार करण्यासाठी मोकळीक अगर स्वातंत्र्य जरुरीचे आहे असे वाटते.

आजच्या काळात मोकळीक जास्त कशात असेल तर सोशल मीडियात. आज सर्व वयोगटातील लहान मोठी माणसे या सोशल मीडियाचा वापर खूपच मोकळ्या पद्धतीने करतात. तो वापरताना कुठल्याही प्रकारचे तारतम्य वापरताना दिसत नाही. कोणत्याही धर्मावर किंवा जातीवर, कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीवर किंवा आजच्या कोणत्याही राजकीय व्यक्तीवर कुठलाही अभ्यास करता किंवा त्यांची सत्यता तपासता आपली मते व्यक्त करत असतात. अभिव्यक्तीला जाचक वाटणारे निर्बंध नसल्यामुळे सर्वाना अधिक खुलेपणाने  व्यक्त होण्यासाठी हे एक व्यासपीठ मिळालेले आहे. इथे मिळालेली मोकळीक कदाचित हीन गोष्टी मोठया प्रमाणात होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर चुकीचे विडिओ दाखवून, चुकीचा इतिहास तरुणांच्या समोर ठेऊन आपण त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करत असतो. अश्याप्रकारची मोकळीक आपल्यासाठी धोकादायक तर आहेच पण आपल्या सर्वाना ती परावलंबी बनवत आहे. फेसबुकवर एकाद्या विचाराला अगर कृतीला किती लाईक मिळाले यावर आपली आनंदाची मात्रा अवलंबून राहू लागली आहे. त्यामुळेच समाजाच्या हितासाठी आणि तरुण वर्गाचे संरक्षण करण्यासाठी काही संस्थानी जबाबदारी घेऊन सर्व समाजात जनजागरण करणे जरुरीचे आहे आणि अश्या प्रकारची मोकळीक काही बंधने आणून मर्यादित केली पाहिजे.

सर्वसामान्य  माणसाच्या  परिस्थितीकडे पाहिल्यास माणसाला खरोखरच विचार करण्यासाठी मोकळीक हवी आहे. कारण संसाराचे किंवा कायद्याचे कितीही बंधन असले तरी त्याचे स्वतःचे एक विश्व असते आणि त्यासाठी त्याला स्वातंत्र्य हवे असते. ते स्वातंत्र्य जपण्यासाठी त्याला वैचारिक विचारांची मोकळीक जरुरीची आहे.

धन्यवाद 

 


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...