रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १३५
विषय क्रमांक : ५
विषय : मंत्र ( लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
मंत्र हा शब्द संस्कृत भाषेतला असून
त्याचा अर्थ म्हणजे काही शब्दांची किंवा अक्षरांची विशिष्ट पद्धतीने केलेली जुळवणी.
मराठीत या शब्दाचा अर्थ विचार करण्याचे साधन अगर मनाला मुक्त करणारा शब्द असा
सुद्धा होऊ शकतो. माणसाला नेहमी बाह्य विचारांची काळजी वाटत असते आणि त्यातून
मुक्ती मिळविण्यासाठी त्याला अनेक मंत्र हवे असतात. मग ते मंत्र अध्यात्मिक असो
किंवा धार्मिक किंवा आयुष्याला उपदेश करणारे असो, ते त्याच्या मनाला व्यस्त ठेवतात आणि काळजीपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्यातून
मानावाचे मन सकारात्मक होते आणि दिवसभर ते उत्साही राहण्यास मदत होते. आपण जेव्हा एखाद्याचे भाषण ऐकतो आणि त्या भाषणाने आपल्याला मंत्रमुग्ध केले असे आपण म्हणतो
तेव्हा आपण वैचारिक दृष्टया त्या भाषणाचे चिंतन करीत असतो. असाच प्रकार भारतीय
शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत होतो. जेव्हा त्या मैफिलीचे स्वर आपल्या मनाचा ताबा
घेतात तेव्हा नकळत त्या स्वरांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलेले असते. याचाच अर्थ असा होतो की आपण त्या स्वरांचे मनात चिंतन करण्यात व्यस्त होऊन
जातो. त्यामुळे मंत्र हा शब्द अनेक ठिकाणी शतकानुशतके वेगवेगळ्या प्रकारे
वापरण्यात येतो. कुठल्याही धर्मकार्यात,
राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात आणि खेळात सुद्धा अनेक शब्द मंत्रप्रमाणे
उच्चारले जाऊन आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जातात.
हिंदू धर्मामध्ये धार्मिक कार्यात वापरण्यात येणाऱ्या अनेक मंत्राचे विशेष महत्व धर्म ग्रंथात सांगितले आहेत. धर्म ग्रंथानुसार मंत्र खूप प्रभावी असून ते व्यवस्थित उच्चारल्याने अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊन मानवाला सुख लाभते. त्यासाठी काही नियम धर्म ग्रंथात सांगण्यात आले आहेत. इथे मंत्रांचा वापर करणे म्हणजे मन एकाग्र करून श्रद्धेने आपल्याला देवतेचे स्मरण करून जप करणे असा आहे. धर्म ग्रंथात अनेक मंत्र असून त्यांचा वापर नियमात सांगितल्याप्रमाणे विशिष्ट कालावधीतच करावयाचा असतो आणि एकाच जागी व एकाच सुरात म्हटले गेले पाहिजे. तेव्हाच त्या मंत्रांचा वापर शक्तिशाली ऊर्जा निर्माण करण्यासाठी होतो. वारंवार मंत्रजप केल्याने माणसांमध्ये मानसिक बदल होत जातो आणि असा बदल शब्दात व्यक्त करता येत नसून तो आपल्याला प्रत्यक्ष अनुभवावा लागतो. कारण पवित्र मंत्रात इतकी प्रचंड शक्ती असते की त्यांच्या उच्चारामुळे निर्माण होणाऱ्या लहरी माणसांच्या शरीराच्या पेशीत भिनल्या तर जातातच पण मनातही विरल्या जाऊन माणसांच्या अंगात एक चैतन्य निर्माण होण्यास मदत करते. त्यामुळे माणसांच्या बुद्धीला चालना मिळून, त्यांना त्यांच्या कामाची लय सापडते आणि त्यात यश प्राप्त होऊन मानवी आयुष्य सुखी व आनंदी होते.
जसे धार्मिक कार्यामध्ये मंत्राचा वापर होतो तसेच अनेक मंत्र आपल्याला वेगवेगळ्या प्रांतामध्ये मुशाफिरी करताना दिसतात. त्याचे अनेक दाखले राजकारणात व समाजकारणात दिसून येतात. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील अग्रणी नेते. दोघांनीही भारतीय लोकांना असे मंत्र दिले की त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीचे रूपच बदलून गेले. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क असल्याचा मंत्र त्यांनी भारतीय समाजाला देऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात चैतन्य निर्माण केले. लोकमान्यांनी स्वराज्याच्या मंत्राबरोबर अजून एक मंत्र भारतीय समाजाला दिला तो म्हणजे स्वतःचे गुणधर्म ओळखून प्रचंड मेहनत करून आणि सृजनशीलतेने आपण स्वीकारलेल्या कार्यात उत्तम प्रगती करणे. त्याचे उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे श्रीधरपंत टिळक यांना लिहिलेले पत्र पाहू. हे पत्र लिहिण्याचे कारण मॅट्रिकच्या परीक्षेत श्रीधरपंत दोनदा नापास झाले होते. तेव्हा मंडाला तुरुंगातून पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, " श्रीधर मॅट्रिक नंतर तुला काय करायचे ते तू ठरव. चांभार व्हायचे तर चांभार हो पण चांभार झाल्यास जोडे उत्तम शिव की लोकांनी म्हटले पाहिजे की उत्तम जोडे शिवायचे असतील तर टिळकांकडेच जा. उत्तम जोडे शिवायचे ते टिळकांनीच". याचाच अर्थ असा की जे काम करशील त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन ते काम उत्तम पद्धतीने करणे. आज हा मंत्र आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतो.
महात्मा गांघी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जबरदस्त आणि महत्वाचे नेते. स्वातंत्र्याचा लढा सुरु करण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण भारत फिरून तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेतली आणि अहिंसेचा मंत्र देऊन त्यांनी स्वातंत्र्याचा लढा बैठकीच्या चार भिंतीमधून सर्वसामान्य लोकांपर्यंत नेऊन भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा नवीन इतिहास निर्माण केला. त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या मंत्राने कोट्यावधी दरिद्री माणसांना त्यांच्या हृदयाचे दार उघडण्यास मदत झाली. आज राजकीय स्वातंत्र्यात अहिंसेचा मंत्र सर्व जगभर महत्वाचा मानला जातो. राजकीय स्वातंत्र्याप्रमाणे महात्मा गांधीने सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि शैक्षणिक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळे मंत्र माणुसकीच्या दृष्टिकोनातून देऊन सर्वाना विस्मयचकित केले. त्यांनी चळवळीच्या धोरणात अमुलाग्र बदल केले आणि सर्वसामान्य समाजाला जमेल त्या पद्धतीने कृती करण्यासाठी तयार केले. ते म्हणत आनंद हा नेहमी सुगंधाप्रमाणे असतो. जेव्हा आपण तो इतरांना देतो तेव्हा त्याचे काही थेंब आपल्यावर पडतच असतात. माणसाने परिधान केलेल्या कपड्यावरून नाही तर त्याच्या गुणधर्मामुळे ओळखले गेले पाहिजे. त्यासाठी दुसऱ्याच्या प्रगतीसाठी नेहमी सकारात्मकतेचा मार्ग निर्माण करण्यासाठी क्षमाशीलतेचा मंत्र त्यांनी जनतेस सांगितला. त्याचप्रमाणे त्यांनी वेळेचे महत्व सांगताना त्यांनी मिळकतीचे साधन नेहमीच चांगले असावे असा मंत्र तर दिलाच पण मुक्तीचा मंत्र सांगताना त्यांनी कुठलेही काम कमी दर्जाचे न समजता ते सतत करून नवीन गोष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. कुठल्याही दीन दुबळ्या माणसांचा फायदा घेऊन त्यांना न फसविण्याचा मंत्रसुद्धा त्यांनी जनतेस दिला. त्यांचा सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणे हाच होता.
जसे मंत्र धार्मिक, राजकीय आणि सामाजिक ठिकाणी वापरले जातात तसेच खेळातही अनेक मंत्र उच्चारले जातात. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास २५ जून १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान खेळला गेलेला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना. भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला ४१ धावांनी हरवून विश्वचषक जिंकला होता आणि सर्व भारतीयांना हा क्षण अभिमानाचा होता. पण या सामन्याची सुरुवात नाट्यमय ठरली. नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागल्या नंतर त्यांनी भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. वेस्ट इंडिजच्या जलद तोफखान्यासमोर भारतीय संघ १८३ धावात गारद झाला. त्यात श्रीकांतने ३८ धावा, संदीप पाटीलने २७ आणि मोहिंदर अमरनाथने २६ धावा केल्या आणि बाकीचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. वेस्ट इंडिजला ६० षटकात १८४ धावा करण्याचे माफक आव्हान होते. तेव्हा वेस्ट इंडिज सलग तिसऱ्या वेळेस विश्वचषक जिंकणार असा समज झाला होता. भारताचा कर्णधार कपिल देवने सर्व खेळाडूंना एकच मंत्र दिला तो म्हणजे खेळ अजूनही संपलेला नाही. आपण हा सामना जिंकू शकतो. तेव्हा जिंकण्यासाठीच खेळा. तेव्हा प्रत्येक भारतीय खेळाडूंनी जबरदस्त प्रयत्न करून वेस्ट इंडिज संघाला केवळ १४० धावात गारद केले. कर्णधार कपिल देवने नुसता मंत्र दिला नाही तर त्याने स्वतःही खूप मेहनत घेतली. मदनलालच्या गोलंदाजीवर व्हिव रिचडर्सचा झेल कपिल देवने १८ यार्ड धावत जाऊन टिपला आणि भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शेवट पर्यंत जिंकण्यासाठी खेळणे हाच अंतिम विश्वचषक सामन्याचा मंत्र होता.
असे अनेक मंत्र आपल्याला प्रत्येक वेळी ऊर्जा देण्याचे काम करीत असतात. मग क्षेत्र कुठलेही असो. मंत्राच्या मिळालेल्या ऊर्जेमुळे चैतन्य निर्माण होऊन प्रत्येक माणसाला यश मिळविणे सोपे जाते.
धन्यवाद
Comments
Post a Comment