विषय : वाचनातून जाणले मी
दिनांक : 17/04/2021
शब्दांकन : योगेश गोगवेकर
संकेत स्थळ :
पुस्तकाचे नाव : जागर
लेखक : नरहर अंबादास कुरुंदकर
वाचनासाठी लागलेला कालावधी : तीन दिवस
वाचनानुभूव
काही लेखक असे असतात की त्यांचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचार कुठल्याही कालखंडाशी सुसंगत असतात. मग ते विचार इतिहासाबद्दल असो किंवा वर्तमानातील प्रत्येक घडामोडीबद्दल असो. त्यांनी चिकित्सक पद्धतीने केलेले लिखाण आपल्याला कुठल्याही काळातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मूल्यप्रणाली समजून घेण्यास मदत करते. कारण अश्या लेखकांची कक्षा एवढी प्रचंड असते की त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नसतो. त्यांचे वाचन चौफेर तर असतेच पण बुद्धिमत्ता फारच तीक्ष्ण असते आणि व्यासंग म्हणाल तर खूपच मोठा असतो. अश्या लेखकांपैकी एक लेखक म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले नरहर अंबादास कुरुंदकर. इतिहास, सौंदर्यशात्र, नाट्यशात्र, स्वातंत्र्याचा लढा, संगीत, साहित्य समीक्षा अश्या वेगवेगळ्या विषयांवर सडेतोडपणे लिखाण करून त्यांनी अवघ्या वैचारिक विश्वाला हळुवारपणे विचार करायला लावले आणि पूर्वी स्वीकारलेल्या विचारांना परत एकदा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केले. हे करत असताना त्यांनी ज्या शस्त्रांचा वापर केला ती शस्त्रे म्हणजे तर्क आणि खंडनमंडन. मग तुम्ही त्यांचे कुठलेही पुस्तक घ्या, त्यात तुम्हाला विचार कसा करावा याची जाणीव झाल्या शिवाय राहणार नाही. असेच त्यांचे एक पुस्तक आहे की ते वाचल्यावर माझी अनेक विषयांवर विचार करण्याची पद्धत बदलली आणि परत एकदा नव्याने इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मिळाला. ते पुस्तक म्हणजे 1969 साली प्रकाशित झालेले "जागर ".
जागर म्हणजे जागृत करण्याची क्रिया. मी हे पुस्तक पूर्वी वाचले होते. आज भारतातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करताना ह्या पुस्तकाची मला खूप गरज वाटू लागली. त्यामुळे ते पुस्तक मी परत मागील आठवड्यात वाचायला घेतले. 256 पृष्ट्ये असलेल्या पुस्तकात त्यांनी भारतीय इतिहास, राजकारण, अर्थकारण, धर्म ह्याची विभागणी तीन भागात करताना कुरुंदकरांनी स्वतः ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक वाचण्यास मला तीन दिवस लागले. कुरुंदकर समाजवादी विचारसरणी असलेल्या राष्ट्र सेवा दलाशी संबंधित. त्यांनी जागर मधील लिहिलेल्या लेखांची निर्मिती झाली ती राष्ट्र सेवा दलाच्या शाखांवर घेतलेल्या बौद्धिक विचारातून. म्हणून ते आपल्या प्रस्तावनेत लिहितात,"मार्क्सवाद, समाजवाद, समाजवादी चळवळींचा इतिहास हाच सेवा दलातील नित्य चर्चेचा विषय होता. मी सेवादलात जरी असलो तरी कार्ल मार्क्सवाद हा कालबाह्य विचार आणि रशिया हे कत्तलीवर आधारलेले राष्ट्र अशी ठोकळेबाजी आम्ही स्वीकारलेली नव्हती.1950 पासून पुढे समाजवादाचा बारकाईने अभ्यास चर्चेसाठी करावाच लागला.त्याच अभ्यासातून मार्क्सवादातील 'अतिरिक्त मुल्याचा सिद्धांत ' विकसित भांडवलशाहीत खोटा ठरतो ही भूमिका निर्माण झाली". सामाजिक विचारांवर असलेली डोळस श्रद्धा आणि त्यांच्या मर्यादांची असलेली जाणीव आणि त्यातून राष्ट्र कसे उभारण्यात येईल ह्या विचारांची वैशिष्ट्ये त्यांच्या जागर मधील लेखनात दिसून येतात.
वर म्हटल्याप्रमाणे जागरची विभागणी तीन भागात केली आहे. पहिल्या भागात त्यांनी बुद्धिजीवी वर्गातील वैफल्य, राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम, समाजवादी शक्तींची पीछेहाट, मार्क्सवाद : तत्व व व्यवहार आणि विकेंद्रीकरण : एक दृष्टीकोन या विषयांवर चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात त्यांनी महात्मा गांधी : एक चिंतन आणि शांतिदूत नेहरू यांचे व्यक्तीचित्रण केले आहे. शेवटच्या भागात सेक्युल्यारिझम आणि इस्लाम, धर्मग्रंथ : अनुयायी जीवन आणि शेवटी राजकीय शोध आणि बोध. पहिल्याच भागात बुद्धिजीवी वर्गांचे वैफिल्य मध्ये त्यांनी आधुनिक विद्येचा आणि प्राचीन भारताच्या अतिरेकी गौरवा मध्ये अडकलेल्या बुद्धीजीवी समाजाची अवहेलना मांडली आहे. त्यात ते म्हणतात बुद्धिजीवी वर्गात सतत चिकित्सक वृत्तीचा अभाव दिसून येतो. ते सतत तडजोडीची गोष्टी करत असतात. त्याचप्रमाणे या बुद्धिजीवी वर्गाचा मार्क्सवाद आणि गांधीवादाला कसा विरोध होता याचे विवेचन करतात. तसेच बहुजन समाजातील शेतकरी वर्ग आपल्या जाती जमातील लोकांच्या नेतृत्वाखाली कसा भराडला गेला आहे याचे पद्धतशीरपणे विश्लेषण केले आहे. समाजवादी तत्वज्ञान आणि मार्क्सवाद : तत्व आणि व्यवहारमध्ये ते सांगतात की ज्या देशात औद्योगिककरण पुरे झाले होते अश्या देशात क्रांती प्रथम व्हायला हवी होती असे सांगून कुरुंदकर मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या मर्यादा सांगतात.
जागरच्या दुसऱ्या भागात महात्मा गांधी : एक चिंतनमध्ये कुरुंदकर म्हणतात अनेक राजकीय नेत्यांना महात्मा गांधी धार्मिक वाटतात तर अनेक धार्मियांना महात्मा गांधी त्यांचे शत्रू वाटतात. ह्याचे कारण देताना ते सांगतात की एखादा संत जेव्हा आपले विचार व्यवहारात आणू लागतो आणि त्याला सुशिक्षित बुद्धिवंताचे नेतृत्व मिळते तेव्हा त्या पारंपारिक लोकांना तो संत शत्रू वाटू लागतो. स्वातंत्र्याच्या लढ्यात एक दोन इंग्रज अधिकारी मारून स्वातंत्र्य मिळेल ही चुकीची कल्पना होती त्यासाठी निशस्त्र जनतेला या लढ्यात सहभागी करावे लागले असे सांगून गांधी नेतृत्वाची व्यवस्थित मांडणी करतात. शांतिदूत नेहरूमध्ये त्यांच्या कार्यांचा डोळसपणे विश्लेषण करताना कुरुंदकर नेहरुंच्या उणीवा त्यांच्या प्रचंड सामर्थ व दूरदृष्टीपुढे कश्या झाकळून जातात ह्याचे वर्णन करतात. सेक्युल्याररिझम आणि इस्लाम मध्ये वर्णन करताना आधुनिकता, धर्मसुधारणा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन इस्लाम कसा स्वीकारत नाही त्यामुळे सेक्युल्यारिझम निर्माण होण्यास मदत होत नाही असे व्यवस्थितपणे मांडतात. तसेच हिंदू समाजाची सनातनी मनोवृत्तीसुद्धा सेक्युल्यारिझमसाठी अडथळा आहे असेही निर्भयपणे मांडतात. त्यांचा शेवटचा लेख राजकीय शोध आणि बोध फारच सुंदर आहे. तो प्रत्येकानी वाचावा असे वाटते. तो वाचल्यानंतर आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक नजरेने बघू लागतो आणि कुठलीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारण्यास मन होत नाही. जेव्हा राजकारणाचा अभ्यास चिकित्सक पद्धतीने होत नाही तेव्हा ते आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, " गेले कैक वर्षे आपण राजकारणाचा अभ्यास करणे सोडून दिले आहे. जाहीर सभेतील व्याख्याने, पुस्तके आणि लेख यांच्या आधारे आपण राजकारणाचा विचार करत आहोत. राजकारणाचा विचार राजकीय प्रवाहाच्या संदर्भात करायचा असतो व राजकीय नेत्यांच्या वर्तनाची त्यांच्या व्याख्यानात दडलेल्या ध्वन्यर्थाशी संगती लावून राजकारणाचा विचार करायचा असतो. ती शिस्त आपण सोडून दिलेली आहे".
जागर हे पुस्तक 1960 च्या दशकात लिहिलेले एक महत्वपूर्ण पुस्तक आहे. त्यात कुरुंदकरांनी धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांचा प्राचीनकाळापासून ते 1968 पर्यंतचा अभ्यासपूर्ण घेतलेला आढावा आहे. आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत हे पुस्तक खूपच उपयोगी आहे. ज्यांना भारतीय राजकीय इतिहास आणि सामाजिक विश्लेषण जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी हे पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. या पुस्तकामुळे माझा इतिहास, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या सर्वाकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टीकोन तयार झाला. गांधी आणि नेहरू ह्यांच्या कार्याचे व्यवस्थित आकलन होण्यास मदत झाली. तसेच सेक्युल्यारिझम, इस्लाम आणि हिंदू धर्मा बद्दल जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राजकीय आणि सामाजिक विषयांची आवड निर्माण होऊन स्वतःचे अचूक विश्लेषण निर्माण करण्यास मदत झाली.
जागर हे पुस्तक देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. ली., 473, सदाशिव पेठ, पुणे, 411030 येथून प्रकाशित झाले आहे. माझ्याकडे 2013 मधील सातवी आवृत्ती असून त्याची किंमत 250/- रुपये आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment